Friday, November 29, 2019

दोष कसा देऊ माझ्या संचिताला (१४ अक्षरी गीत)

---- दोष कसा देऊ माझ्या संचिताला ----

दोष कसा देऊ मीच, माझ्या संचिताला
कसं पाठवू माघारी, माझ्या साजणाला !! धृ !!

भेट होते कधीतरी, मिळतो एकांत
हितगुज चाले मग, किनारी निवांत
आणाभाका शपथा नि, हाती देत हात
हरवून भान सारे, पाहू नयनात

लवते अताशा कुठे, पापणी डोळ्याला !! १ !!

संसाराच्या महालात, झालो राजा राणी
एक मुखाने गायली, आयुष्याची गाणी
जन्म गोजिऱ्या कृष्णाचा, झाला गोकुळात
मावेनाच आज माझा, हर्ष गगनात

पोटा पाण्याने धाडले, दूरच्या देशाला !! २ !!

बाळ बोबड्या बोलाचे, रांगाया लागले
पत्राद्वारे दिले तुम्ही, संस्कार चांगले
तुम्हाविन राया माझी, अंधारी दिवाळी
येत जावा अध्येमध्ये, तुम्ही कधीकाळी

दाबू कुठवर सांगा, मीही हुंदक्याला !! ३ !!

दिसा मागे दिस गेले, निरोप न आला
वेळ साधून काळाने, घातलेला घाला
साहवेना मज आता, कांकणाचा भार
असा कोणता मजला, जडला विकार

फुलांनीच केला वार, माझ्या काळजाला !! ४ !!

🌿🍃 सागरराजे निंबाळकर 🍃🌿

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !