Thursday, January 23, 2020

नव्याने सावरावे (सुकेशी वृत्त गीत)

वृत्त :- सुकेशी
लगावली :- लगागागा लगागा (पुनरावृत्ती)
यती :- सातव्या अक्षरावर

----------- नव्याने सावरावे -----------
              (वृत्तबद्ध गीत)

मनाला माझिया मी, कितीदा आवरावे
जरासा तोल जाता, नव्याने सावरावे !! धृ !!

कुणाला दोष द्यावा, कुणाचा रोष घ्यावा
असो कोणी कसेही, हरेका हात द्यावा
मनाजोगे जरीही, कधी झालेच नाही
सुखाने योजलेले, मिळाले रोज काही

करावे कर्म मोठे, नि साधे वावरावे !! १ !!

मलाही रोज येते, निनावी पत्र आता
पुन्हा मी आठवांच्या, जुन्या गावात जाता
फुलावे की झुरावे, मना तू सांग थोडे
कळेना सोडवावे, कसे हे द्वाड कोडे

मनाच्या काळजीने, कधी ना बावरावे !! २ !!

तसेही पुण्य माझे, कधी कामी न आले
जरासे पाप होता, किती आरोप झाले
सुखाचा एक धागा, सुईने जोडताना
प्रपंचाचे किनारे, नदीला ओढताना

क्षणांच्या पालवीने, वयाला नावरावे !! ३ !!

🤗 सागरराजे निंबाळकर

Sunday, January 19, 2020

चारोळी

काही सांगायच्या आतच तिला
तिच्या मेंदीने खूप काही सांगितलं

जाताना म्हणाली ती असो !
तुला हवं ते, तू उशीराच मागितलं

🍂 सागरराजे निंबाळकर

Saturday, January 18, 2020

सांग विधात्या (१४ अक्षरी गीत)

➖➖ सांग विधात्या ➖➖

दिवास्वप्न होतं हे की, रात काळी काळी?
सांग विधात्या लिहिलं, काय माझ्या भाळी !! धृ !!

नाव तुझं गोंदताना, झाला जरी त्रास
तूच होता तूच आहे, सखा माझा खास
आटू नये कशानेही, राहो अशी माया
विनविते पांडुरंगा, अन कृष्णराया

होळी झाली बेरंग नि, अंधारी दिवाळी !! १ !!

येता जाता होतो मज, पावलांचा भास
वाटे मग आहेस तू, इथे आसपास
विरहात राजा तुझ्या, होते लाही लाही
हाल माझे पुसावे तू, दश दिशांनाही

झाला परका तू होता, माझा कधीकाळी !! २ !!

पानं पिवळी पिवळी, सुकलेल्या वेली
सुंदरता वसंताची, कोणी कुठे नेली
याच माझ्या हातांनी जी, फुलविली बाग
आळविते अताशा ती, विरहाचा राग

हिवाळ्यात लागे मज, उन्हाची झळाळी !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

जगूया वर्तमानात

------- जगूया वर्तमानात -------

नव्याने काही करावं म्हणताना
प्रश्न जुनेच, मला भेडसावले
मन आणि हृदयाच्या द्वंद्वात
पहिल्यांदा नेत्र ही सरसावले

पापण्यांचा दोष नसताना काही
रात्रभर त्यांनाही जागावं लागलं
चला जगूया वर्तमानात पुन्हा
आठवात रमून कुणाचं भागलं

पुन्हा कधीतरी होईलच चर्चा
जिव्हा अन कर्णाला साक्षी ठेवून
तोवर मी जगतो खुशालीने
आयुष्या तू ये, नवे रूप लेवून

आशा-आकांक्षांचंही ऐकू थोडं
नेमकं त्यांचं म्हणणं काय
अन्यथा, कासावीस व्हायचा जीव
अन गळून पडायचे हातपाय

अशातच जाण होते वास्तवाची
सोडवताना प्रश्न पोटा पाण्याचा
कल जातो कागदी नोटांकडे
नाद होता चलनात नसलेल्या नाण्यांचा

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, January 17, 2020

सूत जुळता (सतईश वृत्त सराव)

रोज होतो काळजाला घाव येथे मित्रा
का तरी मग जीवनाची हाव येथे मित्रा

एक हाती वाजते टाळी कधी का येथे
सूत जुळता जीव तूही लाव येथे मित्रा

🍂🍂 सागरराजे निंबाळकर 🍂🍂

Saturday, January 11, 2020

हा छंद खास माझा (आनंदकंद)

--------- हा छंद खास माझा ---------

हा छंद खास माझा आनंद देत आहे
सारी सुखे सभवती न्याराच हेत आहे

आयुष्य संपते रे हे श्वास तोलताना
समजून आज आले पण मी मजेत आहे

मी सांगताच काही उडवून लावते ती
पटते न मज तरीही जमवून घेत आहे

ध्यानी मनी नसूनी दारात दुःख आले
कळले कधी न त्याचा हा काय बेत आहे

ही सांज पाहताना येती विचार काही
तेजोमयी किरण हे माझ्या कवेत आहे

गझलेत वृत्त आहे कवितेत भाव आहे
दोन्ही मला यशाच्या जवळीच नेत आहे

Thursday, January 9, 2020

चारोळी

सावल्यांनी पाठ फिरवली केव्हाच
आपलेसे वाटतात ग्रीष्माचे चटके

बांध अश्रूंचा फुटतोय, फुटू दे
कुठवर असे, हसायचे लटके

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, January 8, 2020

माझे कोडे (कल्याण वृत्त)

जगताना हे जीवन पडते रोजच कोडे
दुःखांसोबत उलगडते मग थोडे थोडे

येता जाता हसते ती पण बोलत नाही
का सरकेना प्रेमाचे अडलेले घोडे

मैलोमैली गेली आई पाण्यासाठी
अमृत झाले सहजी सारे पाणी गोडे

झिजलेले बापाचे जोडे

Tuesday, January 7, 2020

चारोळी

जगाचा विचार करताना मी
माझे जगणे हरवून बसलो

पाय निघता निघेना अताशा
अशा कोणत्या मृगजळी फसलो

@ सागरराजे निंबाळकर

Sunday, January 5, 2020

बाप नावाच्या वृक्षाचं (१४ अक्षरी गीत)

----- बाप नावाच्या वृक्षाचं -----
         (१४ अक्षरी गीत)

बाप नावाच्या वृक्षाचं, फळ किती गोड 
चाखावया मुलांमध्ये, सदा चढाओढ !! धृ !!

ऊन वारा पावसात, बापाची सावली 
माळ संस्कारांची त्याने, हृदयी लावली 
भव्यदिव्य काया जसा, मंदिरी गाभारा 
त्याच्या मिठीत लाभतो, अनोखा सहारा 

कर्तृत्वाला त्याच्या उभ्या, जगी नाही तोड !! १ !!

घाम गाळून शेतात, पिकवितो मोती
तोच दिवा अन तोच, दिव्यातील ज्योती
तोंड दिले संकटांना, फोडले न फाटे
अनवाणी पायानेच, तुडवीत काटे

भेगाळले पाय कधी, तळहाती फोड !! २ !!

लेक जाताना सासरी, दाबतो हुंदका
भाळी नाही त्याच्या कधी, निवांत घटका
बोल खडे लावू नका, कधीही बाबाला
अत्तराचा गंध त्याच्या, कष्टाळू घामाला

आई वेल जाईचा नि, बाप घट्ट खोड !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

संपर्क :- ८८७९८९७७९७ / ९३२४७४९७९२