-- मज कळलेच नाही --
सुटणार कधी कसे
माझ्या आयुष्याचे कोडे
पुरे पुरे म्हणताना
गेले राहूनिया थोडे
पाप पुण्य तोलताना
हाती न्यायाचा तराजू
साक्षीदार मी माफीचा
कशी मांडू माझी बाजू
आशा आकांक्षांचं ओझं
जड झालंय मलाही
लवलेश हसण्याचा
माझ्या ओठांवर नाही
टाळतात सुखं जेव्हा
होते जखम उरात
डबडबलेले डोळे
तरी मी गातो सुरात
ओठ शिवलेले अन
डोळे घट्ट मिटलेले
व्याज भरत राहिलो
जरी कर्ज फिटलेले
मोजतोय घटका मी
आता शेवटच्या काही
कसे जगावे जीवन
मज कळलेच नाही
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !