Thursday, November 7, 2019

दुःखात एकटा मी (गझल)

➖➖ दुःखात एकटा मी ➖➖

दुःखात एकटा मी जमती सुखात सारे
हे शल्य बोचणारे मज शिकवतात तारे

येणार आज राया इतुका निरोप होता
आनंदल्या मनाने केले किती पसारे

दावून स्वप्न खोटे प्रेमातल्या मिठीचे
हातात ठेवले तू मुद्दाम हे निखारे

मजला नकोच काही सारे तुलाच घे तू
उघडीच ठेवतो मी सखये सताड दारे

लाटेस वाटले की सोडून सर्व गेले
झालेत आजवर का हे वेगळे किनारे

वाळूत काढलेल्या शिल्पास नाव देऊ
आहेत तेच अपुले नाजूकसे पिसारे

पाहून सावलीला मज प्रश्न एक पडतो
थकली असेल का ती घालून येरझारे

🍃🍃 सागरराजे निंबाळकर 🍃🍃

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !