Monday, December 30, 2019

साधासुधा जरी मी (आनंदकंद)

------- साधासुधा जरी मी -------

साधासुधा जरी मी आरोप लाख झाले
सारेच पुण्य माझे मग अडचणीत आले

मज दुःख होत नाही पण शल्य मात्र आहे
सारे स्वकीय माझे परके कसे निघाले

आई तुझ्या मिठीने एकांत दूर पळतो
मी भाग्यवान आहे मज सौख्य हे मिळाले

भुर्दंड या सुखांवर निर्व्याज दुःख आहे
आयुष्य खर्च झाले तेव्हा कुठे कळाले

हा खेळ सावल्यांचा खेळू कुठे कुठे मी
मी धावलो जिथेही ढग सोबती पळाले

संसार मोडलेला जोडू कसा किती मी
बैचेन हात माझे अन पाय पण गळाले

बापास काय कळते अंदाज ना मुलांना
पाहून खिन्न त्याला काळीज हे जळाले

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, December 28, 2019

चारोळी

पुन्हा एकदा गदारोळ झाला
त्यातच गेली ती मजला गाळून

वाव नव्हता मैफिलीत म्हणून
पाहत राहिलो फक्त मौन पाळून

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

पुन्हा स्वैर व्हावं लाटांवर
अन पुन्हा हरवावं स्वतःला

तेवढाच काय तो दिलासा
उरलाय माझ्या भाबड्या मनाला

😊 सागरराजे निंबाळकर

Friday, December 27, 2019

न्हाली दवात धरती (अष्टाक्षरी)

-- न्हाली दवात धरती --

दृश्य मनोहारी पहा
न्हाली दवात धरती
गुणगान तिचे नित्य
माझ्या अधरांवरती

फळे, फुले, पानं, वेली
चिंच, डाळिंब, शहाळं
फुललेली वनराई
येथे सदा सर्वकाळ

दऱ्याखोऱ्यातून जातो
मार्ग नव्हे साधा सोपा
निसर्गाची कृपा दावी
मज इवलासा खोपा

खाली धरती सुंदर
वर अथांग आभाळ
लेकरांना पोसताना
होते कधी का आबाळ

शालू हिरवा नेसता
काय वर्णू नवलाई
स्वागताला चाफा अन
सोबतीला जुई, जाई

अशा या धरेचे सदा
आशिर्वच मजवर
माथा झुकतो चरणी
जुळवून दोन्ही कर

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

पुन्हा जगावे नव्याने (षोडशाक्षरी)

➖➖➖ पुन्हा जगावे नव्याने ➖➖➖

येता जाता आठवांचा भरतोय रोज मेळा
घाईमध्ये जे जे झाले आठवावे किती वेळा

पुन्हा कधीतरी जाऊ मन गाजवते सत्ता
मला सांगेल का कोणी आठवांचा योग्य पत्ता

भार तुझ्यावर सारा तरी तुला दुःख नाही
किती करावे कौतुक मज उमगेना काही

घडो सेवा नित्य देवा आठवते बालपण
चुकलेच माझे थोडे शोधताना चार क्षण

दिस आले सोनियाचे धाडा सांगावा साजणा
चिल्या पिल्यांची ही शाळा जसा हालतो पाळणा

माझे विठोबाचे मनी भक्तांसाठी तळमळ
दर्शनाने लाभे मज पूर्व संचिताचे फळ

माझे माझे करताना होते मोकळेच हात
बचावलो थोडक्यात होत असताना घात

झाले गेले विसरावे पुन्हा जगावे नव्याने
साकारले चित्र जसे विहंगाच्या त्या थव्याने

🤗 सागरराजे निंबाळकर

Thursday, December 26, 2019

चारोळी

आजही पाहतो जेव्हा तुला
डोळ्यात येतं टचकन पाणी

कोण म्हणतं आई सांग ना
चलनात नाहीत जुनी नाणी

😊 सागरराजे निंबाळकर

चारोळी

देणे घेणे नित्य होत राहिले
जगण्याचं तेवढं राहून गेलं

वार्धक्याच्या उंबरठ्यावर उमगलं
अरेच्चा हे मी काय केलं

😊 सागरराजे निंबाळकर

Tuesday, December 24, 2019

आपण राजा राणी

-- आपण राजा राणी --

पाहून मला प्रेमात पडावं
इतुका तर मी सुंदर नाही
तरी मला स्थान हृदयात
आश्चर्य वाटलं डोळ्यालाही

कोण होतो, काय होतो
कधी, कसा तुझा झालो
तुझं स्मित चांदण्यापरी
ज्यात चिंब चिंब न्हालो

भेट काही क्षणांची आपुली
आज जगण्याचा ध्यास झाला
गाळू नकोस चुकूनही कधी
तुझ्या डोळ्यातल्या मोत्याला

नाव जरी नसलं नात्याला
आहोत आपण राजा राणी
तू वाहती नदी निर्मळ सये
मी न आटणारं सागराचं पाणी

🤗 सागरराजे निंबाळकर

Monday, December 23, 2019

रुबाई

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक १

गालगा लगालगा लगागाल लगा

सोसल्या कितीतरी झळा मी पण का
काळजी सतावते अता रोज मला

विसरलोय युद्ध भावनांचं मी की
शांतचित्त अंतरात नव्हतीच कला

----- *सागरराजे निंबाळकर* -----

तुझ्या येण्याने (मुक्तछंद)

➖➖ तुझ्या येण्याने ➖➖

तुझ्या येण्याने आयुष्यात आनंद आला.
जसा खिन्न पडलेल्या वहीत एक कवडसा यावा 
आणि त्यासोबत आलेल्या मंद झुळुकेने 
पानांची हालचाल व्हावी.

तसा मी निराश नव्हतोच कधी पण,
आस असतेच ना काही गोष्टींची
तसंच काहीसं वाटायचं तू यावंस !

तुझं येणं म्हणजे..
वसंताचं आगमन
चांदण्यांचं आकाश भ्रमण
बालकाचं निरागस मन
कोकिळेचं मधुर गुंजन

सारं काही अगदी सुखावणारं.
उशीवर डोकं टेकताच गाढ झोप लागावी इतकं सहज.

ऋतू बदलतात त्याप्रमाणेच दिवस पालटले.
माझ्यापेक्षाही कोणा दुसऱ्याची आर्त हाक
परमेश्वराजवळ पोहोचली असावी,
म्हणूनच त्याने प्रसाद म्हणून त्याच्या ओंजळीत तुला स्थान दिलं.

सागर आहे तेवढाच असतो.
फक्त भरती ओहोटीच्या वेळी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं तशीच काहीशी अवस्था असते हल्ली माझी.

कधी सुखाच्या सरींनी किनारे ओलावतात
कधी अश्रूंच्या येण्याने कडा पाणावतात
कधी शंख शिंपले खुणावतात
तर कधी लाटांचं रौद्र रूप पाहून
आपली माणसं दुरावतात.
चाललाय हा अजब खेळ
नियतीच्या मनाप्रमाणे माझ्या मनाविरुद्ध.

आत्ताही तुझं येणं होत असतं कधीकधी पण,
आता तू कवडसा बनून न येता
विरहाची एक दाहक झळ वाटावी तशी वाटतेस.
आता पानांची हालचाल नाही चलबिचलता वाढते.

तुझ्या येण्याने हा शब्द जरी कायम असला तरी
त्यातली भावनेची मात्रा कुठेतरी कमी जास्त होतेय.
म्हणूनच आता मला कसलाही छंद बाळगण्याची इच्छा नाही
त्याचा परिणाम मी मुक्त होतोय.
कायमचा !

तुझ्या येण्याने
तुझ्या येण्याने....!

🤗 सागरराजे निंबाळकर

Sunday, December 22, 2019

चारोळी

अनेकांना लावलं छातीशी पण
भाव आपलेपणाचा जाणवला नाही

आदान प्रदानात व्यत्यय किंवा
मेल्या असाव्यात संवेदना काही

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, December 20, 2019

कृष्ण माझा

➖➖ कृष्ण माझा ➖➖

द्वापारयुगात । जन्म त्याचा झाला
श्याम नंदलाला । यशोदेचा !! १ !!

केले लाख यत्न । घेण्या त्याचे प्राण
आठवे संतान । देवकीचे !! २ !!

गोंडस सावळा । अति सुकुमार
आहेत अपार । लीला त्याच्या !! ३ !!

कैक नावे त्याची । गोपाल, केशव
मुरारी, माधव । वासुदेव !! ४ !!

कर्ण सुमधुर । ऐसा त्याचा पावा
लाभतो विसावा । ऐकताना !! ५ !!

चालविला त्याने । अर्जुनाचा रथ
सन्मार्गाचा पथ । दाखवाया !! ६ !!

महाकाव्य दावी । विष्णू अवतार
दैत्यांचा संहार । करावया !! ७ !!

कृष्णाचे चरित्र । लिहितात व्यास
शब्द शब्द खास । गीता ऐसी !! ८ !!

गोकुळाचा गर्व । अध्यात्माचा पर्व
लीन जेथे सर्व । कृष्ण माझा !! ९ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

हर्षोल्हास (अष्टाक्षरी)

➖➖ हर्षोल्हास ➖➖

येता पहिला पाऊस
बाळंतीण झाली धरा
आनंदाच्या बातमीने
हर्षोल्हास चराचरा

फळे, फुले, पाने, वेली
पहा किती सुखावली
गोड गोजिरा निसर्ग
मज देणगी लाभली

निसर्गाच्या सान्निध्यात
आनंदले सारे जण
हर्षोल्हास भलामोठा
देतो इवलासा कण

हर्ष यावा जीवनात
जशा पावसाच्या सरी
एक एक थेंब वाटे
लाखो आनंद लहरी

कैक मार्गाने जीवनी
लाभे प्रत्येकास हर्ष
खतपाणी देता जसा
नित्य नेमाचा उत्कर्ष

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Wednesday, December 18, 2019

बालपणीचं निरागस प्रेम

🤗 *बालपणीचं निरागस प्रेम* 🤗

_वाऱ्याची झुळूक यावी एखादी_ 
 _तसंच, तुझं येणं असतं हल्ली_ 
 _तरी ना खेद त्याचा कारण_ 
 _वाऱ्याशिवाय का बहरते वृक्षवल्ली_

 _विसरलोच कधी आठवण काढायला_ 
 _तुझं ते हक्कानं दटावणं_ 
 _मनधरणी करायची अन म्हणायचं_ 
 _पुरे आता, बरं नाही सतावणं_ 

 _आठवतंय मला आजही स्पष्ट_ 
 _बालपणीचं ते निरागस प्रेम_ 
 _शुभ्र झरा भावनांचा वाहता_ 
 _आकंठ बुडूनही वाटणं जेमतेम_ 

 _काळाच्या ओघात सुटले हात_ 
 _आकस्मिक आपण दिशाहीन झालो_ 
 _नजरानजर एके दिवशी आपसूक_ 
 _पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात आलो_

 _व्याख्या बदललेली नात्याची आता_ 
 _जवळ असूनही एक अदृश्य अंतर_ 
 _आरोप नसतो करायचा अशावेळी_ 
 _काही कोडी सुटत जातात नंतर_ 

 _दुरावा वाढल्याने प्रेम वाढतं पण_ 
 _यंदा तसं काही झालं नाही_ 
 _दरवेळी स्वच्छंदी कसं राहणार_ 
 _असतात पंखांना ही सीमा काही_ 

 _हरकत नाही, व्हायचं जे झालं_ 
 _राहशील जिथेही आनंदात रहा_ 
 _कधी पाय ओले कर किनाऱ्यावर_ 
 _तर कधी सागरात मनसोक्त नहा_

🤗 *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

फुटलेल्या कांकणाच्या साथीने
सांग, सये तू जगणार कुठवर

आज चित्र वेगळं असतं, जर
त्यादिवशी थांबली असतीस क्षणभर

😌 सागरराजे निंबाळकर

Monday, December 16, 2019

चारोळी

जसं मेण वितळताना हळूहळू
त्यासवे जळत असतो धागा

नेमकी तशीच काहीशी आई
तुझी, माझ्या हृदयातील जागा

🤗 सागरराजे निंबाळकर

Saturday, December 14, 2019

देणे घेणे (षडाक्षरी)

_-- देणे घेणे --_

 _देणे घेणे व्हावे_
_नित्य नियमाने_
_चांगले वाईट_
_शोधा ज्याचे त्याने_

_कुणा हवे धन_
_तर कुणा शांती_
_चालना दे मना_
_बसून एकांती_

_दृढ होते नाते_
_शुद्ध विचाराने_
_बाधा नको काही_
_दिल्या घेतल्याने_

_जा खोल गाभारी_
_नको फक्त घेणे_
_मातृ, पिता आणि_
_संस्कारांचे लेणे_

_ठेव सदा येथे_
_रिकामी ओंजळ_
_दान देता नको_
_फुकाचा गोंधळ_

_शेवटाला हाती_
_काही नाही राजा_
_का करतो मग_
_उगा गाजावाजा_

@ _सागरराजे निंबाळकर, कल्याण_

चारोळी

आई तुझ्या कुशीत निजल्यावर
कसलीच भीती, राहत नाही

तुझं मातृत्व अमूल्य आहेच, पण
माझंही असावं पूर्वसंचित काही

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, December 13, 2019

चारोळी

असं काही खुणावलंस तू
सये, मला चारचौघात

माझा न राहिलो मी
वाहिलो प्रेमाच्या ओघात

🤗 सागरराजे निंबाळकर

Thursday, December 12, 2019

खेळ नियतीचा

-- खेळ नियतीचा --

खेळ नियतीचा कळतो कुणाला
जरी पाहिले, नियम तपासून

कसा उसळतो चेंडू वास्तवाचा
पाहायचं फक्त आ वासून

-------------------

धावलो भौतिक सुखाच्या पाठीमागे
जशी खेळतात अंगणात लंगडी

नंतर उमगलं हा खेळ नव्हे साधा
इथे असते प्रत्येकाला स्पर्धा तगडी

--------------------

जाळीत टाकावा चेंडू ज्याप्रमाणे
त्याप्रमाणे पुण्य माझे मी साठवले

तेव्हा कुठे मिळाला जन्म मानवाचा
विधात्याने पुन्हा मज येथे पाठवले

----------------------

जरा उसंत मिळता संकटातून
दुःखे मला, खो देत राहिली

उरल्या ताकदीनिशी धावताना पुन्हा
वाताहत माझ्या डोळ्यांनी पाहिली

@ सागरराजे निंबाळकर

भौतिक सुखाच्या बेड्या

-- भौतिक सुखाच्या बेड्या --

ना मंदिरातली पूजा फळली
ना मजला रोजे कामी आले
काळ सर्वोत्तम गुरु असतो
त्यापुढे कुणाचे काय चाले

माझं माझं करता करता
हाती असलेलं सारं गमावलं
श्वास तेवढे चालताहेत बरोबर
बाकी उमगेना मी काय कमावलं

सांगत होते पादचारी येता जाता
आतातरी थांबव मुशाफिरी वेड्या
पिंजरा अदृश्य असेल नियतीचा
भौतिक सुखाच्या पडतील बेड्या 

हसण्यावारी नेलं सारं तेव्हा
आज आसवांचा बांध फुटतो
तसा नेम नसतोच सोबतीचा 
चालता चालताही हात सुटतो

एकटं पडल्यासारखं होतं कधीकधी
जरी लाखोंचा गराडा अवतीभवती
नेकीने चालत राहायचं अशावेळी
कर्म देतात नेमकी पोचपावती

शेवटी मातीतच जायचं आहे
फक्त, बोल तेवढे राहतात
काहींना उघड्या डोळ्यांनी दिसतं
तर काही अंतर्मनातून पाहतात

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

मनाला आवरता आवरता माझ्या
तोल नको तितका ढळला

वाताहत झाली स्वप्नांची मग
अर्थ वेदनेचा जवळून कळला

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

महत्व जाणलं नाही वेळेचं
म्हणूनच बहुदा ही वेळ आली

फुल समजून स्पर्श केला ज्याला
ती काही काळाने बाभळ झाली

🤗 सागरराजे निंबाळकर

Wednesday, December 11, 2019

माय लेकराची नाळ

-- माय लेकराची नाळ --

भ्रूणहत्या करताना
कंप सुटेना हाताला
काय वाटत असावं
इवल्याशा त्या जीवाला

विधात्याने जोडलेली
माय लेकराची नाळ
येऊ द्यावे जन्मा येथे
एक निरागस बाळ

अडगळ आहे का मी?
येतो विचार मनात
बंध दृढ सलोख्याचे
होते गहाळ क्षणात

आले जर जन्मा कधी
मीच दिवा नि पणती
पारावार ना हर्षाला
नाही सुखांची गणती

सांग खरेच होती ना
आई तूही कधीकाळी
ऐकू येत नाही का गं
माझी आर्त ही किंकाळी

जास्त मागत नाही मी
फक्त एक दान द्यावे
भ्रूण पोटी न मरता
सुखरूप जन्मा यावे

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

अस्तित्वाचा गंधार

------- अस्तित्वाचा गंधार -------

जेव्हा एकटं एकटं वाटायचं अन
नव्हतं कुणी पुसायला डोळे
काय होईल माझं अताशा
यायचे भीतीने पोटात गोळे

चालायचो लख्ख प्रकाशात तरीही
डोळ्यांपुढे असायचा काळाकुट्ट अंधार
जाई, जुई, निशिगंधाच्या गर्दीत
हरवलेला माझ्या अस्तित्वाचा गंधार

सतावणारे प्रश्नावर प्रश्न आणि
उत्तरांची निशब्द राहण्याची भूमिका
चालत राहायचं निरंतर अशावेळी
सोबतीला असतेच पायवाट श्रुतिका

आधाराची पर्वा करावीच कशाला
निराधारांचे पण चालतातच श्वास
दाह सोसला एकदा वास्तवाचा की
होत नाहीत मृगजळासम आभास

आर्यसत्य उमगलं निरोपाच्या क्षणी
एकटा आलेलो नि एकटंच जायचंय
कोणी होवो न होवो आपुलं येथे
आपण मात्र साऱ्यांचे व्हायचंय

🍃🍃 सागरराजे निंबाळकर 🌿🌿

Tuesday, December 10, 2019

चारोळी

चारोळी १ :-

निरोपाच्या क्षणी तुझे डोळे सये
कोण जाणे इतुके का भरले होते

जणू जगलीस चार दिवस फक्त
तरी, आयुष्य त्यातच सरले होते

चारोळी २ :-

शोध घेताना अस्तित्वाचा माझ्या
मी कमावतोय जेमतेम पोटापुरतं

तरी सारे विचारतातच मजला
सांग ना, तुझ्या हाती काय उरतं

चारोळी ३ :-

नजरेत तुझ्या स्थिरता नसते हल्ली
खरंच तुझं, हरवलंय का काही?

पेच एवढ्यासाठीच पडला मजला
जे तुझ्या ओठी तेच डोळ्यात नाही

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

हरवलंय काही कसं म्हणावं
तुझं अस्तित्व चराचरात आई

तूच माझे कौतुकाचे बोल अन
तूच निजवणारी सुखद अंगाई

🤗 सागरराजे निंबाळकर

Sunday, December 8, 2019

घडतोय मी नव्याने (आनंदकंद)

दाबून हुंदक्यांना रडतोय मी नव्याने
हो रे खरेच आता घडतोय मी नव्याने

दरबार आसवांचा हसण्यास वाव नाही
जुलुमी प्रथेस असल्या नडतोय मी नव्याने

लवकर उपाय शोधा जालीम औषधांचा
खोटा हकीम बनुनी जडतोय मी नव्याने

खेचून पाय माझे होईल काय आता
दिवसागणिक शिखर जे चढतोय मी नव्याने

गोटात ऐकले की आलास का पुन्हा तू?
पदरी कुणाकुणाच्या पडतोय मी नव्याने

चटक्या शिवाय मिळते येथे कुणास काही?
युद्धात भाकरीच्या लढतोय मी नव्याने

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, December 7, 2019

चारोळी

सहजता होती ज्यांच्या वागण्यात
आज अचानक बदलला त्यांचा वावर

घबाड हाती लागलंय कोणतं की
नावे झालीय एखादी मालमत्ता स्थावर

🤗 सागरराजे निंबाळकर

Thursday, December 5, 2019

चारोळी

मला नकोय स्वैराचार हवेतला
मी माझ्या, पायांवर आहे समाधानी

सगळं मिळालं मजला येथे, जेव्हा
मी लिहिली, दुःखांवरही गाणी

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

आपली माणसं सोबत नाहीत
नेमकं, काय केलं तू उजागर?

थेंबांना जमवण्याच्या नादात वेड्या
तुझ्या हातून निसटला सागर

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

दगड ठेवून काळजावर कर मान्य
नको ठेवू ओलीस, निष्पाप नजर

प्रेम असल्याने जाणवतंय अस्तित्व
तसा तो, केव्हाच झालाय गैरहजर

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

माझ्या झोपडीत यायचं असल्यास
सूर्यालाही यावं लागतं वाकून

करून टाक मन मोकळं एकदाचं
आता नको संवाद, हातचं राखून

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

काय फायदा रोषणाईचा सये, जर
उजेडात राहूनही दिसतोय अंधार

पावलांच्या आवाजाचा हट्ट कशाला
पुरे नाही? माझ्या अस्तित्वाचा गंधार

🤗 सागरराजे निंबाळकर

Wednesday, December 4, 2019

भावतो श्रीरंग (१४ अक्षरी गीत)

----- गोकुळात मज भावतो श्रीरंग -----

साऱ्या गोकुळात मज, भावतो श्रीरंग
रातदिन होते त्याच्या, भक्तीमध्ये दंग !! धृ !!

मीरा भाग्याची की राधा, कळेनाच काही
प्रेम ऐसे दुजे जगी, पाहिलेच नाही
कृष्णा वाजवितो पावा, हरपून भान
गोड कवनांची माला, व्यापते कमान

राधेकृष्ण जप मुखी, वाटतो अभंग !! १ !!

गोपिका विनवी कान्हा, सोड माझी वाट
वाट पाहतोय तेथे, यमुनेचा काठ
हट्ट त्याचा इतुकाच, द्यावे मज लोणी
फुटलेल्या माठाविना, जाते कधी कोणी

सताविण्याचा कान्हाने, बांधलाय चंग !! २ !!

साऱ्या गोकुळाचा आळ, कान्हा आहे द्वाड
खोड्या करून लपतो, यशोदेच्या आड
एकीकडे गाते मीरा, मनसोक्त गाणी
दुजीकडे राधेच्याही, डोळ्यामध्ये पाणी

प्रेमा तुझे पाहिले मी, विविधांगी रंग !! ३ !!

 सागरराजे निंबाळकर 

Sunday, December 1, 2019

चारोळी

आग्रह केला असता, तिने जर
खरंच सुचलं असतं थोडं काही

मी लिहीत राहिलो आनंदात पण
तिच्या ओठांवर, होकारच नाही

🤗 सागरराजे निंबाळकर

हसरी फुलपाखरे (१४ अक्षरी गीत)

--------- शोभा बगीचाची --------
          (१४ अक्षरी गीत)

हसरी फुलपाखरे, शोभा बगीचाची
छाटू नका पंख त्यांचे, विनंती नभाची !! धृ !!

खेळण्याच्या वयी जिथे, पडतात कष्ट
पाळंमुळं संस्कारांची, होती तिथे नष्ट
खताविना राहू नये, फुलं सुकुमार
वेलींनाही मग त्यांचा, वाटतो आधार

घेऊ द्यावी मनाजोगी, झेप विश्वासाची !! १ !!

दुडूदुडू धावताना, लागलेली ठेच
इवलासा जीव कसा, सोडवेल पेच
ध्यानी मनी नसताना, होते बाळ मोठे
कधी लाभ होतो कधी, भलेमोठे तोटे

पोखरते काळजाला, काळजी बाळाची !! २ !!

छकुल्याचे नाव दुजे, बाल कामगार
विटा, दगड नि माती, त्याचे आरमार
लढाया लढाई रोज, येतो रणांगणी
फुल कुठे भाळी त्याच्या, काटेच अंगणी

थांबवावे दुष्टचक्र, गरज काळाची !! ३ !!

बालपण देगा देवा, कसे म्हणू आता
कलियुगात अशा ह्या, तरते का गाथा?
वाट खाच खळग्यांची, करू मखमली
संजीवन देता फुलं, नव्याने जन्मली

मनसोक्त लाभो तया, साथ संवादाची !! ४ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
संपर्क :- 8879897797 / 9324749792