नाही जमलं तुझ्या आयुष्यात येणं
मात्र, आठवण तुझी क्षणाक्षणाला येते
दूर जायचा प्रयत्न करतेस जितका तू
ती मला तितकंच तुझ्या जवळ नेते
☺ सागरराजे निंबाळकर
नाही जमलं तुझ्या आयुष्यात येणं
मात्र, आठवण तुझी क्षणाक्षणाला येते
दूर जायचा प्रयत्न करतेस जितका तू
ती मला तितकंच तुझ्या जवळ नेते
☺ सागरराजे निंबाळकर
शल्य जे काळजाला बोचलं माझ्या
इलाज त्याचा, हळूहळू होत गेला
तिच्याच हातचा गुण सगळा म्हणून
फलक हकिमाचा तिच्या नावे केला
☺️ सागरराजे निंबाळकर
_न बोलताच कसं ओळखते सारं_
_प्रश्न हा मला नेहमीच पडतो_
_बंद ओठांनी बरंच काही सांगण्याचा_
_योगायोग सहज कसा बरे घडतो_
😊 सागरराजे निंबाळकर
-- कोणाकडे ज्ञान नामी --
शोधावया गेलो जेव्हा
हरवल्या 'मी' पणाला
नवीनच ज्ञात झालं
इथे हरेक क्षणाला
कोण अन कुठला मी
काय माझे नाव गाव
पाहूनिया चेहऱ्यांना
बदलती हावभाव
ध्येय गाठण्या चालतो
वाट माझी निरंतर
कसे मोजावे मी आता
किती कापले अंतर
घालमेल ह्या जीवाची
उमगेना कुणा काही
सरबत्ती प्रश्नांची नी
उत्तरांचा पत्ता नाही
कोण सांगेल तोडगा
कोणाकडे ज्ञान नामी
असो, शेवटाला मात्र
येती फक्त कर्म कामी
😊 सागरराजे निंबाळकर
-------- सूत्र सुखी जीवनाचे --------
माझे माझे करताना । रिकामीच झोळी
मृगजळापायी केली । आयुष्याची होळी !! १ !!
धावू किती कुणा मागे । उमजेना काही
सत्संगा विना संसारी । मोक्षप्राप्ती नाही !! २ !!
संपली व्यथा कुणाची । कुणी झाले संत
त्यागता सुखाला येथे । नको कधी खंत !! ३ !!
देव तारी जीवनाला । लीन होता पायी
उगम भक्तीचा होतो । ज्याचे त्याचे ठायी !! ४ !!
तेजोमयी आसमंत । मना सुखावतो
देव भक्तीचा भुकेला । कसा खुणावतो !! ५ !!
काम, क्रोध, लोभ, माया । सारुनिया दूर
संकटा क्षणात येथे । करू चक्काचूर !! ६ !!
सूत्र सुखी जीवनाचे । आहे साधे सोपे
चाऱ्याच्या साथीने जैसे । सुगरणी खोपे !! ७ !!
😊 सागरराजे निंबाळकर
-------- का आलो भूवरी --------
एकांतात मज । स्फुरतात ओळी
वेदनांची होळी । करताना !! १ !!
कळला न कधी । जीवनाचे सार
आयुष्याचा भार। पेलताना !! २ !!
साऱ्यांच्या वाटेत । कैक अडथळे
चालायचे बळे । ध्येयासाठी !! ३ !!
इवल्या मनाची । उत्तुंग भरारी
फुंकते तुतारी । जणू काही !! ४ !!
द्वंद्व भावनांचे । झाले कधी जर
घालावा सत्वर । बांध मना !! ५ !!
हे करू ते करू । नसावा गोंधळ
भरावी ओंजळ । संयमाने !! ६ !!
आहे सुख दुःख । ज्याचे त्याचे ठायी
लीन व्हावे पायी । ईश्वराच्या !! ७ !!
उलगडले का? । कोडे अतातरी
का आलो भूवरी । हेत काय? !! ८ !!
😊 सागरराजे निंबाळकर
माझ्याच वेदनांशी झाला करार माझा
दुःखात हासण्याचा खोटा विचार माझा
सारे अवाक झाले पाहून धैर्य माझे
बेफाम वादळांवर न्यारा प्रहार माझा
@ सागरराजे निंबाळकर
इच्छा नसतानाही तुझी का
बट उडवितो खट्याळ वारा
लाजणं तुझं ते नित्याचं मग
आणतो मज अंगावर शहारा
😊 सागरराजे निंबाळकर
चारचौघात भेटल्यावर तिचं
हलकेच स्मितहास्य देऊन जाणं
तारा छेडतं हृदयाच्या अन मग
आपसूक ओठांवर येतं गाणं
😊 सागरराजे निंबाळकर
आशा अपेक्षांचे ओझे घेऊन
मी चालत राहिलो लाखो मैल
तरी सुख गवसलं नाही मजला
अन, दुःखानेही सोडलं नाही सैल
@ सागरराजे निंबाळकर
सल्ला मसलत करणारी माझ्याशी
मला, गृहीत धरून मोकळी झाली
कुतूहल फक्त ह्याच गोष्टीचं आहे
इतक्या सहज कसं काढलं निकाली
@ सागरराजे निंबाळकर
------- आयुष्याचे कोडे -------
कळले ना कधी । कशाची ही भ्रांत
काय माझा प्रांत । आयुष्यात !! १ !!
धावलो मी फक्त । मृगजळामागे
उसवूनी धागे । आनंदाचे !! २ !!
सर्व सुखसोयी । मिळविण्या हट्ट
रोवूनिया घट्ट । पाय येथे !! ३ !!
लाभली जीवाला । जरी का उसंत
थोडी तरी खंत । राहतेच !! ४ !!
कुणा कुणा सांगू । यत्न फोल सारे
जळते निखारे । नको हाती !! ५ !!
प्रत्येकाच्या भाळी । लिहिलेले काही
मिळणार नाही । दुजे येथे !! ६ !!
प्रसंगी चातुर्य । वापरावे थोडे
आयुष्याचे कोडे । सोडविण्या !! ७ !!
@ सागरराजे निंबाळकर
-- घास दोघे एकेक खाऊ --
चिंगी चिंग्या रुसून बसले
घेतली होती त्यांनी कट्टी
चिंगी म्हणाली देईन मार
चिंग्याला नको होती बट्टी
भांडण होते डब्यावरून
कोण खाणार पहिली पोळी
चिंग्या म्हणाला थांब थोडं
मला संपवू दे लिमलेट गोळी
चिंगी म्हणाली शर्यत लावू
आजही मीच तुला हरवणार
चिंग्या म्हणाला जिंकलो तर
तुझ्या डब्यातला घास भरवणार?
दोघांनाही खायचे होते डबे
द्यायला मात्र नव्हते तयार
तोडगा निघेना काही त्यातून
कोणीच घेईना की माघार
ठरले अखेरीस एकमताने
घास दोघे एकेक खाऊ
अल्बत्या गलबत्या करत
आपापल्या घरी जाऊ
@ सागरराजे निंबाळकर
-- दगडाचे जाते --
कळलेच नाही कधी
कसे दृढ झाले नाते
बंध मायेचे विणते
जुने दगडाचे जाते
ताई, माई, आई, आज्जी
साऱ्यांनाच त्याचा लळा
ओवी गात गात मग
गोड होत गेला गळा
जातं फिरवता येते
स्नायूंनाही बळकटी
आरोग्यम संपदा ती
दूर सारी कटकटी
नामशेष होत गेलं
विसरले त्याला सारे
कष्ट वाचविण्या येता
आधुनिकतेचे वारे
विधी लग्नाचे करण्या
त्याची गरज भासते
पाहूनिया वधू वरा
जाते सहज हासते
😊 सागरराजे निंबाळकर
संकटांचं स्वागत केलं हसतमुखाने
मोती झालं ज्याच्या डोळ्यातलं पाणी
त्यालाच उमगला सार जीवनाचा अन
त्यानेच गायली दुःखावरही गाणी
@ सागरराजे निंबाळकर
बंध भावनांचे कामी न आले
तकलादू ठरली सारी नाती
जेव्हा उजळवण्या घर सारं
ह्यांनी जाळल्या लाखो वाती
@ सागरराजे निंबाळकर
ठरवलंय आता अलिप्त राहायचं
त्याच वाटेवर पुन्हा चालवत नाही
आठवणी स्वतःच येतात नी जातात
मी त्यांना कधीही घालवत नाही
@ सागरराजे निंबाळकर
साऱ्यांनाच कुठे लाभलं स्थैर्य
मन अनेकांचं सैरावैरा धावतंय
फिकीर नाही अताशा मला कारण
जग माझं, आईच्या कुशीत मावतंय
😊 सागरराजे निंबाळकर
मैफिलीत बसवत नाही हल्ली
सतत तुझ्या आठवणी छळतात
नको विचारू काय असतं कारण
तसंही तुला वेदना कुठे कळतात
🙂 सागरराजे निंबाळकर
स्वतः स्वाधीन झालो असतो मी
आरोप तुझे जर का खरे असते
समजूनही घेत जा कधीकधी
दरवेळी शंका घेणे बरे नसते
😇 सागरराजे निंबाळकर
------- दुजी मैत्री नाही -------
कृष्णा सुदाम्याची । एकसंध जोडी
मैत्रीतली गोडी । वाढविते !! १ !!
मैत्रीतला बंध । शिवबा मावळे
साऱ्यास आकळे । जगामाजी !! २ !!
मैत्रीचा नमुना । डोळे आणि हात
एकमेका साथ । दुःखामध्ये !! ३ !!
सान थोर सारे । मैत्रीचे चाहते
आजन्म राहते । काळजात !! ४ !!
पिता पुत्रातही । असते मित्रत्व
जीवनाचे सत्व । सांगणारे !! ५ !!
ताई दादा सम । दुजी मैत्री नाही
दश दिशांनाही । मोल ज्याचे !! ६ !!
चालणारे पाय । मागेपुढे जरी
अवघ्या भूवरी । तोड नाही !! ७ !!
गुरू शिष्यातही । आहे एक नाते
जे गणले जाते । मैत्रीसम !! ८ !!
जीवनी भेटावे । मित्र प्रत्येकाला
लाभते जीवाला । सौख्य ज्याने !! ९ !!
@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
लाख यत्न केले सुख शोधाया मी
शोध मोहिमेला यश आले नाही
घेतला विसावा तेव्हा आकळले
श्वास सांगती मजला पत्ता काही
----- *सागरराजे निंबाळकर* -----
इतभर पोटासाठी टिचभर दाणे
गणित तसं हे नवीन नाही
आकडेमोड करण्यात आयुष्य जातं
सांगा तरी हाती उरतं का काही?
@ सागरराजे निंबाळकर
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
गाठणार होतो पल्ला मोठा मग
एवढ्यात का विरली आशा सारी
द्वंद्व भावनांचे सांगू कोणाला
रक्तवर्ण चटक्यांची बातच न्यारी
----- *सागरराजे निंबाळकर* -----
मुसळधार पाऊस कोसळताना देखील
मला तिचे अश्रू ओळखता येतात
ह्यालाच नाव असतं ऋणानुबंध
हेच निखळ प्रेमाची ग्वाही देतात
@ सागरराजे निंबाळकर
सारे तिच्या वदनाकडे पाहत राहिले
कुणा न कळली डोळ्यांची भाषा
मेहंदीचा रंग गर्द झाला हातांवर
मात्र, हवेतच विरली सारी आशा
@ सागरराजे निंबाळकर
बरेचदा यत्न करतो लपवण्याचा
मात्र, क्षणात ओळखते ती सारं
ह्यामुळेच टिकली प्रेमाची गोडी
सुखदुःख वाटण्याचं हे गुपित न्यारं
@ सागरराजे निंबाळकर
➖➖ *श्रावणाच्या सरी* ➖➖➖
(षोडशाक्षरी)
_धरा थकता मोजून येथ आकडे शंभरी_
_खेळ ऊन पावसाचा डाव घेण्या येती सरी_
_पाणावल्या नजरांचा दूर सारुनी उसासा_
_सरी श्रावणाच्या देती कैक जीवांना दिलासा_
_येता श्रावणाच्या सरी धुंद झाली सारी काया_
_स्पर्श खट्याळ वाऱ्यांचा लागे अंगाला झोंबाया_
_जाई, जुई, निशिगंध स्वागताला चराचरी_
_धरा हिरवी वाटते मज सरींची स्वाक्षरी_
_काय वर्णावा देखावा आभाळाची निळी शाई_
_थेंब हाताशी झेलण्या किती लगबग बाई_
_श्रावणाच्या सरींनीच होते सणा सुरुवात_
_सारे स्नेहभावे देती एकमेका हाती हात_
_सरी सरीत चालती माझ्या तालेवार होड्या_
_शंख, शिंपले वेचून द्वाड मासा करी खोड्या_
_बारा मासाच्या यादीत एक ऋतू पावसाळा_
_त्यात श्रावणाच्या सरी न्याऱ्या मायेचा उमाळा_
_नित्य लावली सरींनी मज श्रावणाची ओढ_
_सुखावून तनमन होते आयुष्याची फोड_
_गंध खुलता मातीचा सृष्टी उल्हासित झाली_
_कुणा कुणा सांगू आता सर श्रावणाची आली_
@ *सागरराजे निंबाळकर, कल्याण*