Wednesday, April 20, 2022

दे घास तू

▶️ दे घास तू..

दे घास तू घासातला
माणूस हो तू चांगला

पैसा जरी नसला तरी
वाया कुठे जाते कला

नावाजला चोहीकडे
काटा तुझ्या पायातला

कोणासही सांगू नको
किस्सा तुझ्या-माझ्यातला

यंत्रातल्या खोट्या जगी
नाती पुन्हा शोधू चला

दिसतो मला लपवू नको
होकार तू डोळ्यातला

गेल्यावरी आले मुखी
"सागर" तसा होता भला

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Tuesday, April 19, 2022

काय देऊ

▶️ काय देऊ..

कोण गेला कोण आला
ठाव सारे जीवनाला

ओंजळीला छिद्र माझ्या
काय देऊ मी तुम्हाला

कोण अपुला कोण परका
खूप मोठा घोळ झाला

दैव माझे तूच आई
काय मागू ईश्वराला

दुःख असते अल्पजीवी
अंत नसता जर सुखाला

पाहिली तू वाट इतकी..
दाद देतो संयमाला

वाट बघते रोज घरटे
का कळेना पाखराला

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, April 16, 2022

काठीसंगे

▶️ काठीसंगे..

वृद्धत्वाच्या, काठीसंगे
करायचा मी, प्रवास कुठवर
ईश्वरा अता, होऊदे मज
वैकुंठाचे, दर्शन लवकर

हयात सरली, जपण्यामध्ये
मने नि मर्जी, ह्याची-त्याची
कमीच पडलो, तरी तसूभर
हीच अवस्था, प्रत्येकाची

आई-बाबा, दोन्ही झालो
तरी न माया, मुलास कळली
सूर्य न दिसला, कधी पहाटे
सांज देखील, तशीच ढळली

खांदे माझे, खंगत गेले
सतत पेलून, भार घराचा
होत असतील, किती यातना
विचार केला, कुणी न याचा

एक समजले, मला शेवटी
द्यावे तितके, कमीच असते
नातीगोती, नावापुरती
गरजेवेळी, कुणीच नसते

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Wednesday, April 13, 2022

छाया

🌳 छाया..

कळेना अता, कशी कुणाला
द्यावी मनात जागा
विणतो नाती, आपुलकीने
तुटतो तितका धागा

क्षणात येतो, क्षणात जातो
अपुला कुणीच नाही
फिरून येण्या, माघारी मग
द्यावी कुणास ग्वाही

जीवन म्हणजे, अत्तर आहे
पटकन उडून जाते
पैसा-अडका, नश्वर असतो
उरते केवळ नाते

जमेल तितके, देत रहावे
किमया करते माया
होता आले, जरूर व्हावे
एखाद्याची छाया

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Tuesday, April 12, 2022

जाळी

▶️ जाळी..

मनात होते, पण ओठांवर
कधीच आले नाही
खरेच अडचण, एखादी की..
कारण दुसरे काही

वाढत गेला, असा अबोला
पुन्हा दुरावा भाळी
गुंता झाला, सुटेना अशी
विणली कोणी जाळी

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, April 7, 2022

गाव होते

🌿 गाव होते..

झोपड्यांचे एक छोटे गाव होते
सर्व अपुले फक्त इतके ठाव होते

पाहिली मी एकदाची पत्रिका ती
ज्यात माझे खोडलेले नाव होते

चोर ठरलो एकटा मी काळजाचा
पाहिले चोरून ज्यांनी साव होते?

देत होतो मीच उपमा गालिच्यांची
का म्हणू मग टोचणारे घाव होते

शेवटी मी अर्ज केला पावसाला
वाढले इतके सरींचे भाव होते

🌺 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Wednesday, April 6, 2022

तुझ्यामुळे मी

🤗 तुझ्यामुळे मी..

केला आहे प्रवास इथवर तुझ्यामुळे मी
दूर सारली अंतिम घरघर तुझ्यामुळे मी

जाळत असतो आत उन्हाळा नको तेवढा
पण दाखवतो श्रावण वरवर तुझ्यामुळे मी

धावत होतो "इच्छांसोबत" इकडे-तिकडे
आजघडीला बघ स्थिरस्थावर तुझ्यामुळे मी

बाई म्हणजे "सत्ता" नाही उपभोगाया
बोलू शकतो खुलून यावर तुझ्यामुळे मी

हाक मारते आई "बाळा" अजूनही पण..
झालो दुनिये मोठा लवकर तुझ्यामुळे मी

दगडालाही लाज आणली एकेकाळी
खरे सांगतो बनलो पाझर तुझ्यामुळे मी

वैरी होता नजरेमध्ये माझ्या जो-तो
आता करतो प्रेम जगावर तुझ्यामुळे मी

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Tuesday, April 5, 2022

एकांताचा सोहळा

❤‍🩹 एकांताचा सोहळा

फक्त उरले शरीर
जीव झाला सुना-सुना
जेव्हा, आला तसा गेला
चार दिसात पाहुणा

याच कारणे कुणाचा
कधी लागू नये लळा
गर्दीमध्ये एकांताचा
होतो साजरा सोहळा

ज्याला करावे जवळ
तोच जातो असा दूर
कसे सांगावे शब्दात
त्रास होतो भरपूर

🌿 सागरराजे निंबाळकर

Saturday, April 2, 2022

प्रेम ठेऊन जिवंत

❤‍🩹 प्रेम ठेऊन जिवंत

तुझा टोलेजंग वाडा
माझी झोपडी इवली
तूच सांग राणी कशी
जोडी वाटेल चांगली

फाटलेली झोळी माझी
त्यात गरिबीचा शाप
मागतेस जे तू येते
तुझ्यापुढे आपोआप

तुझ्या छोट्याशा कृतीची
पंचक्रोशीमध्ये ख्याती
माझ्या गुण-गौरवाला
इथे फक्त मूठमाती

लाख केली बरोबरी
तरी राहतोच भेद
ठाण मांडल्या रूढींना
नाही देता येत छेद

तुझा लेख परिपूर्ण
माझी अर्धवट कथा
मूक राहून बोलते
माझी साधीभोळी व्यथा

नको त्रास तुझ्या जीवा
मीच जातो माझ्या वाटे
फुल वेणीत माळ तू
मला सांभाळू दे काटे

तुझ्या आग्रहाखातर
येतो महालाच्या दारी
पुन्हा हट्ट नको, जर..
जावे लागले माघारी

बघ केले मी धाडस
आड आली माझ्या जात
सप्तपदी तुझ्यासवे
नाही माझ्या नशिबात

आहे तसेच राहूया
प्रेम ठेऊन जिवंत
नको भार अपेक्षांचा
नको विरहाची खंत

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७