Thursday, February 28, 2019

चारोळी

सारंच मनाजोगं होत नाही आपुल्या
     कधीकधी यावं लागतं, थोडं मागे

लाख परिश्रमांनी शिवावी चादर
     अन उसवावे कळत नकळत धागे

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

आईच्या पाया पडलो की
     वाटतं, मी आलो देवाच्या द्वारी

लहानाचं मोठं केलं आईने
     आता, आई माझी जबाबदारी

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

साऱ्यांनीच आलिंगन दिलं, पण
     तुझ्या मिठीत जाणवलं वेगळेपण

जसा, अथांग सागराच्या वाळूमध्ये
     गवसावा एखादा, मोत्याचा कण

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

Tuesday, February 26, 2019

सराव गझल आनंदकंद

साऱ्याच चेहऱ्यांवर भाळू कसा अताशा
सांगा कुणाकुणाला टाळू कसा अताशा

@ *सागरराजे निंबाळकर*

सावरकरांवर गीत

कितीदा मी स्मरू तुला, थोर स्वातंत्र्यवीरा
शतदा नमन करू तुज, झुकवूनी ह्या शीरा

सोसल्यास यातना तू, गिळूनिया काळं पाणी

दिवा राऊळात (अभंग)

----- *दिवा राऊळात* -----

पेटवूया एक । दिवा राऊळात
मनोभावे गात । हरिपाठ !! १ !!

विटेवरी उभा । कटेवरी कर
धावतो सत्वर । भक्तांसाठी !! २ !!

वाजतो मृदंग । वाजवूनी टाळ
सदा सर्वकाळ । भक्त गाती !! ३ !!

विठूचे स्मरण । रात्रंदिन करा
रखुमाई वरा । बोलविण्या !! ४ !!

जागवावा नित्य । भक्तीचा सागर
मुक्तीचे आगर । पंढरी ही !! ५ !!

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Monday, February 25, 2019

चारोळी

वेळ नाही माझ्याकडे म्हणत
     वेड तिने अनेकांना लावलं होतं

तोबा गर्दी झाली अप्सरा पहावया
     एरव्ही कोण कुणासाठी धावलं होतं

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

साऱ्याच आशा धूसर केल्या तिने
     म्हणाली, हे आपलं शेवटचं भेटणं

आता घालवायचा वेळ कसाबसा
     येता जाता फक्त आठवणींना खेटणं

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

अंतरीतल्या वेदनांना माझ्या
     पुन्हा एकदा, फुंकर घाल तू

मला तर कळलेच नाही आजवर
     तूच सांग आयुष्या, कोणते मायाजाल तू

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

Saturday, February 23, 2019

चारोळी

ती माझी नी मी आहे तिचा
     नेहमीच राहिलो ह्या भ्रमात

स्वकीयांची यादी पाहिली तिची
     मी नव्हतोच कुठल्या क्रमात

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

एकांतात ही बसावं कधीतरी
     आठवांना मिळतो तेवढाच उसासा

ना कोडं कसलं ना प्रश्न कोणते
     आपसूकच होतो सारा खुलासा

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

Friday, February 22, 2019

चारोळी

आयुष्य नावाच्या रंगमंचावर
     रंगवाव्या लागतात बहुरंगी कथा

एखाद्याच्या नशिबी आनंदाने गाणं
     काहींच्या भाळी फक्त नी फक्त व्यथा

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

बरंच होतं सांगण्यासारखं पण
     हातावरली मेहंदी पाहून टाळलं

कुतूहल फक्त एका गोष्टीचं आहे
     तू मला, अलगद कसं गाळलं?

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

द्याई

ऐक ना
काय गं !
मी काही दिवस माहेरी जाऊन राहावं म्हणतेय.
का गं?, काय झालं?
तसं खास काही नाही पण, तिथे मला कोणी
सारखं सारखं सांगणार नाही बाळासाठी प्रयत्न कर.
आता माझी कूस उजवत नाही त्यात माझा दोष आहे का?

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

मानलं ज्यांना ज्यांना आपलं
     तेच अगदी परक्यासारखं वागले

वरवरच्या जखमा मिटतील ही
     काय करू व्रणाचं, जे आत डागले

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

तिला वाटलं मोडेन संसार म्हणून
     मला तिने, लाखो शपथा घातल्या

नाहीच कळालं तिला प्रेम आजही
     ना जाणल्या तिने भावना आतल्या

☘ *सागरराजे निंबाळकर* ☘

चारोळी

पिंजऱ्यात कैद करून राघूला
     लोकांनी मैनेचे गोडवे गायिले

काहींनी पिंजऱ्यात जीव सोडला
     काहींना मी मधूशाळेत पाहिले

☘ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

लाखदा प्रयत्न करतो टाळायचा तरीही
     पाऊलं मात्र, तुझ्याकडेच वळतात

आता वाटेलाच विचारावं म्हणतो
     एखाद्याला, इतकं का छळतात ?

☘ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, February 21, 2019

चारोळी

येणं नी जाणं तुझं सखये
     हल्ली फारच दुर्लभ झालंय

वाटतो वसंत पिवळागर्द जणू
     आभाळ ही भरून आलंय

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

वाटतं कधीकधी त्यागावं सारं
     जगातून साऱ्यांची रजा घ्यावी

भरभरून देऊनही उणे राहण्यापेक्षा
     सुखे एकदाचीच वजा व्हावी

------- *सागरराजे निंबाळकर* -------

चारोळी

मोजक्याच आसवांना मुभा असते
     एखाद्या ओंजळीत स्थिरावण्याची

ज्याचं सगळं निघून जातं हातून
     त्याला विचारा किंमत हिरावण्याची

🤝🏻 *सागरराजे निंबाळकर* 🤝🏻

Wednesday, February 20, 2019

चारोळी

स्वाक्षऱ्या फक्त माझ्या होत्या
     बाकी तिनेच केलेले करार सारे

जसं नाव येतं वादळावर अन
     क्षणात होतात फरार वारे

$ *सागरराजे निंबाळकर* $

चारोळी

दिवसरात्र झटूनही ज्याच्या नशिबी
     फाटकं धोतर नी सुकलेली मोळी

तोच करतो खऱ्या अर्थाने संसार
     मांडून प्रपंचाच्या समांतर ओळी

$ *सागरराजे निंबाळकर* $

चारोळी

सहजच विचारलं तिला एकदा
     आठवतं का तुला पूर्वीचं काही

उत्तरली, वर्तमानातलं विचार ना
     मी भूतकाळात रमत नाही

💲 *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

ती एक अवाक्षर बोलली नाही
     सारं सांगून गेल्या पाऊलखुणा

हातातल्या मेहंदीवर नाव त्रयस्थाचं
     मी केवळ चार दिसांचा पाहुणा

$ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

मोजकंच बोलणं असायचं तिचं
     तरी बरंच काही बोलून जायची

बंद कवाडं माझ्या हृदयाची
     माझ्या नकळत खोलून जायची

💲 *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, February 19, 2019

चारोळी

तुला पाहिलं की आठवतं बरंच
     तू जाताच विसरायला होतं सारं

मलाही कळेना दिशा कशा हरवल्या
     अन हे कोणतं फिरू लागलं वारं

🚩 *सागरराजे निंबाळकर*

माझा शिवबा (छक्कड)

माझा शिवबा (छक्कड)
चाल :- माझी मैना गावाकडं राहिली

माझा शिवबा, माझा शिवबा, माझा शिवबा

माझा शिवबा शूर सेनानी
त्याच्या किर्तीची गातो मी गाणी

बाहू ज्याची पोलादी अन, छातीत लखलखाट विजांचा
स्वराज्याचे पहिले धनी, प्रताप जिजाऊंच्या बीजांचा
कानात सुवर्णडुल मस्तकी, जिरेटोप शोभतो
लावूनी चंद्रकोर भाळी, हरहर महादेव बोलतो
तलवार खेळते वाऱ्याशी, डोळ्यांनी शत्रूचा खात्मा
हिंदवी स्वराज्य संस्थापक, गडकिल्ल्यांचा आत्मा

मुजरा माझा राजास
किल्ल्यांच्या श्रीमंतास
जयंतीला ह्या खास

गाऊ लागली शाहिराची वाणी
माझा शिवबा शूर सेनानी

शिक्षण सुरू युद्धनीतीचं, खेळावया दांडपट्टे
सोबतीला शिवबाच्या, मर्द मावळे मरहट्टे
भालेफेक झाली, तलवार झाली आता गनिमीकावा
ऐसा घडला शिवबा, स्वराज्याचा बेधडक छावा
समर्थ रामदास आणि लाभले तया दादोजी कोंडदेव
कैसे विसरावे शहाजींना, तुकोबांमुळे फुटला पेव

स्वराज्याची शपथ
चालुनी कैक पथ
विजयाचा हा रथ

किल्ले रायगड राजधानी
माझा शिवबा शूर सेनानी

पराक्रम ऐकू आता शिवबांचे काही थोडे
कैसे सोडविले अफजल्याचे भव्य कोडे
भेट ठरली पायथ्याशी, सोबतीला जिवा महाला
पाहताच राजास अफजल हसत हसत आला
मिठीच्या बहाण्याने केला त्याने दगाफटका
काढुनी कोथळा राजांनी केली स्वतःची सुटका

फाडला टराटरा
रक्ताच्या त्या धारा
बेभान वाही वारा

त्याच्या तोंडचं पळवलं पाणी
माझा शिवबा शूर सेनानी

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, February 17, 2019

चारोळी

बऱ्याचदा ठरवतो लिहायचं नाही
तू दिसताच अक्षरे नाचू लागतात

एरव्ही माझं जराही ऐकत नाहीत
तू आल्यावरच असे का वागतात

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, February 16, 2019

चारोळी

एकाच बाजूने चाललेला प्रवास माझा
तुझ्या येण्याने मज मिळाली दिशा

तेव्हापासून कळू लागलं सूर्याचं उगवणं
कोणास म्हणतात लखलखीत निशा

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, February 15, 2019

चारोळी

बोथट झाल्यात भावना माझ्या
अश्रू झालेत शुष्क सरोवर

हे स्वप्नात घडतंय सारं, की
नियती खेळतेय डाव खरोखर

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

सावरून साऱ्या घरादाराला
जी शिवते फाटकी चादर

आई म्हणतात त्या माऊलीला
तिच्यासाठी नेहमीच साऱ्यात आदर

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, February 14, 2019

वृत्तबद्ध चारोळी

वृत्त :- मुरजयी (८+७)

कधी न कळले तुझियासवे
बहरली कशी अबोल प्रीत

व्यक्त करण्यास प्रेम अपुले
गाऊ    एकत्र   प्रेमळ गीत

@ *सागरराजे निंबाळकर*
       उल्हासनगर, ठाणे
        ८८७९८९७७९७

चारोळी

ओसाड पडलीय बाग संपूर्ण
सुकलीत पानं, फुलं अन वेली

सांगा ना कोणीतरी मजलाही
आई, न सांगता कुठे गेली....!

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, February 13, 2019

चारोळी

विरोधाभास किती असतो पहा
राधाकृष्ण रासलीलेत रंगलेली

इकडे लीन मीरा वृंदावनी
तल्लीन होऊन भक्तीत दंगलेली

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

बऱ्याचदा हिंमत केली सांगायची
दरवेळी शब्द ओठातच अडकले

लिंपून सावरलं ज्या नात्यांना
ते असे कसे, मध्येच तडकले

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

घरादाराची चादर उसवते जेव्हा
तेव्हा जोडणारा एकमेव धागा

मंदिरात, राऊळात, अंतरात
फक्त नी फक्त आईची जागा

@ *सागरराजे निंबाळकर*

दिन उजडला न्यारा

----- *दिन उजडला न्यारा* -----

उगवले रविराज
पाखरांचा हा आवाज
झुंजूमुंजू न्यारा साज
पहाटेच्या प्रहरी !! १ !!

पहाटेचा गुंजारव
पानी कोवळाले दव
खुलणारे अवयव
निसर्गाचे रोजचे !! २ !!

खळाळता गोड झरा
देई भुईलाही चरा
वाट चालू भराभरा
मातीच्या माठासवे !! ३ !!

दिन उजडला न्यारा
गुरेढोरे खाती चारा
वाहणारा नित्य वारा
चौफेर दिशांनाही !! ४ !!

घंटारव मंदिरात
भाव माझिया मनात
देव वसे राऊळात
भक्तिभावे पूजिता !! ५ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, February 12, 2019

नाम देवाचे स्मरावे

----- *नाम देवाचे स्मरावे* -----

अंतरात एक आत्मा
नाव त्याचे परमात्मा
करी संकटांचा खात्मा
भक्तांच्या रक्षणार्थ !! १ !!

नाम देवाचे स्मरावे
चांगले कर्म करावे
आयुष्य सार्थ ठरावे
मनुष्यजन्म घेता !! २ !!

सत्संगाची लागो गोडी
प्रचितीही यावी थोडी
पुण्यश्लोकाची ही होडी
तरो भवसागरी !! ३ !!

बोला राम कृष्ण हरी
संत समागमा परी
वास राहावा सत्वरी
माझिया झोपडीत !! ४ !!

विनवितो हा सागर
करेन भक्ती जागर
मी तुमचाच पामर
घ्या मज सांभाळून !! ५ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

कुठे विरली ती नाती

------- *कुठे विरली ती नाती* -------

साऱ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत माझ्या हाती
मी जागलोय केवळ तुझ्यासाठी कैक राती !!धृ!!

वचनं दिली, शपथा दिल्या दिलं सर्वकाही
तरी मनास तुझिया शांती लाभलीच नाही
का घेते असे आढेवेढे समजावशील का
प्रश्न पडतो कधीकधी तू दुरावशील का

असेच क्षण आता अनेकदा येती नी जाती
मी जागलोय केवळ तुझ्यासाठी कैक राती !!१!!

काय संबंध नी काय एकमेकांचे लागतो
ऐकता शब्द वाटते का हल्ली असे वागतो
ह्याच तळहातांनी पेललेला मी भार सारा
सुखे वाचावीत म्हणूनच दिलेला पहारा

कुठे हरवले शब्द कुठे विरली ती नाती
मी जागलोय केवळ तुझ्यासाठी कैक राती !!२!!

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

काहींवर स्वाक्षरी केली, न पाहता
अद्याप बाकी काही करार नियतीचे

सदासर्वदा सुख कसं लाभणार हो
पाहावेत कधीकधी थरार नियतीचे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

साऱ्याच आशांना तुडवून पायदळी
न जाणे, कोणतं स्वप्न उभं केलं.....

वाटलं काही भव्यदिव्य दिसेल, पण
मुलाने चक्क आश्रमाजवळ नेलं....!

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

मेहंदीने गर्द रंगलेला हात तिचा
नाव माझं, कुठं दिसलं नाही...

विचारल्यावर काय म्हणाली पहा
जे पुसणार, ते मीच लिहिलं नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

नदीच्या प्रवाहात जाऊन मिळतो
एक स्वच्छ, लखलखता झरा.....

संकटातही जो लढतो धैर्याने......
न डगमगणारा बापमाणूस खरा..!

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, February 11, 2019

चारोळी

ज्यांना जमलं ते प्रत्यक्ष भेटून गेले
उरलेले नंतर सरणावर आले होते

औपचारिकता पाळली साऱ्यांनी
एकालाही ठाऊक नाही काय झाले होते

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

साऱ्याच गोष्टी कशा करायच्या नावे
काही मी राखून ठेवल्यात हाताशी

जेव्हापासून कळाली प्रेमाची मोहमाया
घनिष्ठ झाली वरवरची ओळख घाताशी

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

वादळांना वाटलं शमलो मी, पण
लढा माझा अजूनही सुरू आहे

धैर्य आहे माझा सहप्रवासी अन
काळाला मी मानलं गुरू आहे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

बऱ्याचदा कळवलं मी प्रियेला
निरोप तिजपर्यंत गेला नाही

मी समजलो विसरली असावी पण
वाङनिश्चय तिनेही केला नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

कितीही संकटं येवो
तळहातावर झेलते आई

भार साऱ्या घरादाराचा
गिरीधरासम पेलते आई

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, February 7, 2019

चारोळी

बऱ्याचदा घालून जुलुमी अटी
नियतीने फेटाळला माझा करार

मी ही ठरवलं वागूया सागरासारखं
दाखवूया भरती ओहोटीचा थरार

@ *सागरराजे निंबाळकर*

किरणछंद सराव

बाजार भरला खपव सारे खोटे खरे
मतलबी जगात साधेपण नव्हे बरे

खोटे खरे खपव सारे भरला बाजार
साऱ्यांना जडला आधुनिकतेचा आजार

भरला बाजार खपव खरे खोटे सारे
एकाचं काढून दुसऱ्या देणे न्यारे वारे

बाजार भरला खपव सारे खरे खोटे
सत्कर्म करा दुष्कर्माने नेहमीच तोटे

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, February 6, 2019

किरणछंद सराव

फुलांचे बोलणे कळता रडाया लागलो
मीच कारण त्या दुःखाचं का असा वागलो

रडाया लागलो कळता फुलांचे बोलणे
आपल्या भल्यासाठी मुक्या जीवास तोलणे

रडाया लागलो फुलांचे बोलणे कळता
घाव कोणता त्यांच्या जिव्हारी भळभळता

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

मनाला समजावतो कैकदा मी
काही कोडी सोडून दिली तरच सुटतात

आता विश्वास बसत नाही कोणावरही
लोक, हस्तांदोलनाने काळीज लुटतात

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

दुःखाचं येणं जाणं असतं हल्ली
त्याचाही पाहुणचार करावा लागतो

नाही धरला हात त्याचा की म्हणतो
जाऊदे तू आता पूर्वीसारखा कुठे वागतो

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, February 3, 2019

चारोळी

वरवरच्या वाटत असल्या जरी जखमा
त्या, खोलवर कुणीतरी रुजवल्यात

असंच नाही लाभलं, सुख आनंदाचं
यातना, वेदना हुंडा देऊन उजवल्यात

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, February 2, 2019

आई चारोळी

प्रश्न येतो जेव्हा, साऱ्या घरादाराचा
भिंतीसारखी भक्कम उभी असते आई

ईश्वराच्या प्रयोगशाळेतलं अनोखं मिश्रण
ज्यावर चालतं रोजच संशोधन काही

@ *सागरराजे निंबाळकर*

सागराची नौका

------- *सागराची नौका* -------

जीवनाची नौका । सागरी तरावी
ओंजळी भरावी । सुख दुःखे !! १ !!

सत्कर्म संगती । जगण्याचा मंत्र
आचरावे तंत्र । हरेकाने !! २ !!

प्रत्येकास येथे । लावुनिया लळा
आलिंगन गळा । द्यावे नित्य !! ३ !!

द्वेष, लोभ, माया । सारुनिया दूर
आनंदाचा सूर । लावू सारे !! ४ !!

कैक जीवांसाठी । सागरी किनारा
असतो निवारा । सांजवेळी !! ५ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, February 1, 2019

सराव गझल

नानानाना नानानाना नानानाना नानाना

जीवन माझे याच प्रमाणे दुसऱ्यांच्या कामी यावे

जन्म घेतात फुलं

कशा गर्भार राहतात कळ्या नी
कधी जन्म घेतात फुले
तसंच काहीसं जगणं माझं
साथीला शेतशिवाराचे झुले

मशागत करतो नांगराने मी
खत बियाणं खोलवर रुजवून
विनवणी मेघराजाला बरस थोडा
काळ्या आईची कूस उजवून

रानोमाळी पसरता सुगंध, वाटे
खुणावतेय कोणीतरी वेळ हेरून
किणकिण ऐकू येते अध्येमध्ये
सर्जा राजाच्या पैंजनाला घेरून

दोन वेळची चटणी भाकरी अन
रात्री चादर नभाची, पांघरायला
पुन्हा तेच चक्र पहाटेच्या प्रहरी
साथीला सर्जा राजा नांगरायला

जास्त काही मागणं नाही माझं
शेतशिवार हिरवाईने नटून रहावं
आळविता राम कृष्ण हरी राऊळी
पांडुरंगाने माझ्या, मजकडे पहावं

@ *सागरराजे निंबाळकर*