Sunday, July 30, 2023

निवांत

~ निवांत बसलो..

विरून गेल्या, आशा साऱ्या
आता निव्वळ, जगणे बाकी
आधाराला, ईश्वर आहे 
पडलो जर का, मी एकाकी

उरात सलते, एक वेदना
तुला न काही, देऊ शकलो
भार जगाचा, घेतो तू.. मी
एकाजागी, निवांत बसलो

@ सागरराजे निंबाळकर

Friday, July 28, 2023

मेहमान

कड़ी धूप समझू इसे या
हलकासा कोई साया है

इस गरीबखाने में आज
ये कैसा मेहमान आया है

@ सागरराजे

Friday, July 21, 2023

दुःखाचे गाणे

~~ दुःखाचे गाणे

दुःखाचेही करता येते ज्याला गाणे
सोपे होते त्याचे येथे येणे, जाणे

समजत गेलो दुःखाला मी प्रत्येकाच्या
पण कोणीही ऐकेना माझे गाऱ्हाणे

खोट्या चलना भुललो नाही जर का आपण
कामी येते सत्कर्माचे सुंदर नाणे

पैसा-अडका माया आहे कुठवर पुरते
जमवा केवळ पोटासाठी काही दाणे

इच्छा, चिंता आता काही उरली नाही
माझ्या भाळी जेही आहे देवच जाणे

खेळत होतो बुद्धीबळ मी तेव्हा कळले
संयम ठेवत उलटावे शत्रूचे खाणे

भक्तीसुद्धा गरजेची या उपवासाला
नाही निव्वळ केळी, काजू, साबूदाणे

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, July 19, 2023

हे केवळ

माझ्या कविता आवडतात तिला
मात्र, मी आवडत नाही

ही अनेकांची शोकांतिका आहे
हे केवळ माझ्यासोबत घडत नाही 

😇 सागरराजे निंबाळकर

Sunday, July 16, 2023

कोई और मिल गया होगा

दिल आया होगा या दिल गया होगा
फुल मुहब्बत का ज्यादाही खिल गया होगा

ऐसेही नहीं बदलते तेवर किसीके
यकीनन तुझे कोई और मिल गया होगा

😊 सागरराजे

Saturday, July 15, 2023

ठेऊ काळजात

~~ ठेऊ काळजात

ऋतू पावसाळी अन्, त्यात तुझी साथ
एकरूप होती जसे, तेल आणि वात ||धृ||

ठेच मला लागते नि, पाणी तुझ्या डोळी
लाखात एक आपली, जोडी साधीभोळी
निरांजन होईन मी, ओवाळण्या तुला
घेऊ सुखाने हिंदोळे, बांधू असा झुला

तुझ्यापाशीच शेवट, तूच सुरूवात ||१||

नको शपथा कुठल्या, नकोत वचने
राणी आपली कायम, जुळतील मने
भांडेल जो आधी तोच, घेईल माघार
अलिखित एक असा, करूया करार

लाख येऊदे संकटे, सोडू नको हात ||२||

तुझ्या माझ्या संसाराची, न्यारीच कहाणी
लिहाया घेतली तर, गाजतील गाणी
जगू स्वच्छंद नेहमी, मोजू नको वय
जीवनी कधी कुठला, नको अभिनय

युगेयुगे एकमेका, ठेऊ काळजात ||३||

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, July 13, 2023

पावसाळा

~~ पावसाळा..

डोळ्यात स्पष्ट दोन्ही दिसतोय पावसाळा
होऊन चिंब इतका भिजतोय पावसाळा

आयुष्य फार थोडे हाती असूनसुद्धा
फुलवून रान सारे जगतोय पावसाळा

प्रेमात काय पडला या गोजिऱ्या धरेच्या
होऊन पार वेडा हसतोय पावसाळा

जावे कसे कळेना सोडून पालवीला 
चिंतेत याच एका झुरतोय पावसाळा

एकीकडे उभा मी एकीकडे दुरावा
पाहून या दरीला रडतोय पावसाळा

@ सागरराजे निंबाळकर

Sunday, July 2, 2023

हल्ली

😊 हल्ली

होता आधी तसा पडेना प्रभाव माझा हल्ली
भरूनही का रिता भासतो तलाव माझा हल्ली

झेलत होतो वादळवारे एकेकाळी सगळी
पण.. लागेना झुळूकेपुढे निभाव माझा हल्ली

दिसू न देता रडायचो मी ठेऊन हसू ओठी
हरवले कसब पडतोय कमी सराव माझा हल्ली

कातडी नव्हे काळीज दिले वाघाचे मी ज्यांना
खटकत आहे शेळ्यांना त्या ठराव माझा हल्ली

शेतीवाडी, जमीनजुमला सर्व पाहिजे आता
विवाहसंस्था कमी करेना दबाव माझा हल्ली

आयुष्य तुला बहाल केले म्हणायची जी पूर्वी..
तिला दिसेना थोडासुद्धा अभाव माझा हल्ली

🫵🏻 सागरराजे निंबाळकर