Monday, May 31, 2021

संयमाची परिभाषा

⚜️ संयमाची परिभाषा

काय असते नेमकी
संयमाची परिभाषा
तोल जाण्याअगोदर
आखलेली एक रेषा

जर घडत असेल
अघटित खूप काही
त्यात संयमासारखा
कोणताच मार्ग नाही

खोली खाचखळग्यांची
नित्य संयमाने मोजू
सारासार विचारांती
सारे यथायोग्य योजू

वेगेवेगे धावताना
संयमाचा थांबा घ्यावा
काम होण्या सुरळीत
वाव विश्रांतीला द्यावा

पाळल्यास खूप काही
नाहीतर शून्य सारे
कष्टप्रद झेलावया
संयमाचे द्वाड वारे

▪️ सागरराजे निंबाळकर

कारणांची यादी

⚜️ कारणांची यादी

विसंबून राहू । नये कुणावर
होते अनावर । दुःख मग

संकटात खरी । अपेक्षा असते
नेमके नसते । तेव्हा कोणी

बोलघेवड्यांचे । खोटे पाठबळ
होते खळबळ । ऐनवेळी

प्रश्न एक मात्र । कारणांची यादी
भोवळ एखादी । वाटे जणू

आश्वासनांवर । थोडेच भागते
पाहावे लागते । ज्याचे त्याला

एकमेका साह्य । फक्त नावासाठी
प्रत्यक्षात गाठी । काळजात

एकटे आलोत । एकटे जायचे
आहे सोडायचे । सारे इथे

केला कायमचा । निश्चय मनाशी
कुणाच्या दाराशी । नको जाया

▪️ सागरराजे निंबाळकर

Saturday, May 29, 2021

मुहब्बत हमारी

हमनें बेग़म समझा उसे
वो हमें इक्का समझती रही

मुहब्बत हमारी बरसो तक
कुछ यूँही उलझती रही

😇 सागरराजे

Friday, May 28, 2021

स्वर घुमले चौफेर

⚜️ स्वर घुमले चौफेर...

ध्यानीमनी नसताना
आला राधेचा सांगावा
माझ्यासाठी शेवटचा
तुम्ही वाजवा ना पावा

थक्क होऊन बसलो
एकाजागी क्षणभर
एका ठिणगीच्या पायी
जसं जळतं वावर

लाख सांभाळले तरी
तोल नकळत गेला
क्षण शेवटचा तोही
तिच्या नावावर केला

स्वर घुमले चौफेर
डोळा साठवून पाणी
हीच आहे जन्मोजन्मी
राधा कृष्णाची कहाणी

▪️सागरराजे निंबाळकर

Thursday, May 27, 2021

एक गोरी-गोरी नार

😀 एक गोरी-गोरी नार

करतोय रात्रंदिन
बाबू तिचाच विचार
जशी आली तशी गेली
एक गोरी-गोरी नार ।।धृ।।

झाल्या मेसेंजरवर
एक तासभर गप्पा
तिने भरला तुडुंब
याच्या हृदयाचा कप्पा

एका क्षणात बाबूने
दिले सारे अधिकार ।।१।।

हळूहळू गप्पा आता
होऊ लागल्या खाजगी
तिच्या सातबाऱ्यावर
जणू याचीच मालकी

जाऊ लागला पुढेच
बाबू घेईना माघार ।।२।।

पुढे टाकत पाऊल
आले व्हाट्सअपवर
इमोजीच्या पावसाने
केला भलता कहर

कल्पनांचे इंद्रधनू
घेऊ लागले आकार ।।३।।

प्रश्न भाबडा बाबूचा
तुझ्याविना कसा राहू
एकमेका शोनू आता
फक्त व्हिडिओत पाहू

उगवला एकदाचा
मुखचंद्र निर्विकार ।।४।।

व्हिडिओने काळजाचे
सारे हलले विभाग
थेट मस्तकात गेली
तळपायातली आग

अडकून जाळ्यामध्ये
झाली बाबूची शिकार ।।५।।

◾सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Tuesday, May 25, 2021

काळजावर दगड ठेवला

⚜️ काळजावर दगड ठेवला.... 

     सागर आणि प्रांजल वाणिज्य शाखेत अकरावीला एकाच वर्गात होते. (कोचिंग क्लास) प्रांजल दिसायला खूप सुंदर असल्याने सगळ्यांना ती पाहताक्षणीच आवडायची. मग सागर सर्वांहून वेगळा कसा ठरणार? त्यालाही ती आवडली. तिच्याशी बोलायचा, मैत्री करायचा मोह त्याला अनेकदा झाला पण ती मितभाषी होती शिवाय ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत वर्गात यायची, त्यांच्याशीच बोलायची आणि त्यांच्यासोबतच घरी जायची. त्यामुळे पाहता-पाहता अकरावीचं संपूर्ण वर्ष गेलं पण हाती यश काही आलं नाही. 

     आता सागरची घालमेल वाढू लागली होती. त्याने निश्चय केला. काहीही झालं तरी यावर्षी प्रांजलशी मैत्री करायचीच. इंग्रजीचे प्राध्यापक श्री. पाटील सर शिकवलं की प्रश्न विचारत असत. त्यांचा हट्ट असायचा की उत्तरं स्वतःच्या शब्दात आणि इंग्रजीतच द्यायची. उत्तरं देण्यात सागर आघाडीवर असल्याने पाटील सरांचा तो लाडका विद्यार्थी होता. बुक कीपिंग विषयातही अकाऊंटमध्ये सागरचा विशेष हातखंडा होता. वर्गात कुणाला काही अडचण आली की ते सागरला हक्काने विचारायचे. अशा काही गुणांमुळे सागर हळूहळू प्रकाशझोतात येऊ लागला होता. 

     महाविद्यालयात सर्वांना उपक्रम दिले जातात. असाच एक उपक्रम प्रांजलला मिळाला. उपक्रमात संदर्भासाठी "गांधीयुग" नावाचं पुस्तक तिला हवं होतं. 
महेंद्र वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी होता. तो आपल्याला नक्कीच मदत करेल असं वाटल्याने प्रांजलने क्लासच्या ब्रेकमध्ये त्याच्याकडे मदत मागितली. परंतु स्वभावाने अगदी मितभाषी आणि अभ्यास एके अभ्यास हेच ध्येय असणाऱ्या महेंद्रने मदत करण्यास असमर्थता दर्शवली. "कुठे या मुलींच्या चक्करमध्ये पडायचं" असं मनातल्या मनात बोलून तो पुढे जाणार तितक्यात समोर त्याला सागर दिसला. प्रांजल, "सागरच्या कॉलेजला खूप मोठी लायब्ररी आहे, याअगोदर त्याने मला दोन पुस्तकं पण आणून दिलीत". तू त्याला सांग, तो नक्कीच आणेल पुस्तक. असं सांगून त्याने सागरच्या कोर्टात चेंडू टोलवला आणि निघून गेला. 

     सागर त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात दंग होता. अकरावीत सागरशी आपण एक शब्दही बोललो नाही. अचानक त्याच्याकडे मदत कशी मागायची असा संकोच मनात बाळगून ती दहा मिनिटे सागरकडे पाहत राहिली. ब्रेक संपला सगळे आत गेले. शेवटी कशीबशी हिंमत करून क्लास सुटल्यावर प्रांजलने लांबूनच सागरला आवाज दिला. सागरने पटकन मागे पाहिलं. पण प्रांजल आपल्याला कशाला बोलवेल असा विचार करून तो आणखी पुढे जाणार तितक्यात प्रांजलने आणखी एकदा आवाज दिला. आता मात्र सागर थांबला. तरी त्याने खात्री म्हणून प्रांजलला विचारलं, "मलाच बोलावतेय ना तू?" तिने होरे असं म्हणताच सागरला आनंद झाला. "प्रांजलने आज मला आवाज का दिला असेल?, काय बोलायचं असेल तिला?" अशा विचारात सागर गढून गेला. तितक्यात 'ऐकना' असा आवाज ऐकून तो भानावर आला. 

     औपचारिकता म्हणून थोडं इकडचं तिकडचं बोलून प्रांजलने विषयाला हात घातला. पुस्तकाची मदत तीही माझ्याकडे? असा प्रश्न सागरला पडला. कारण प्रत्यक्षात सागरचं कॉलेज अगदीच छोटं होतं आणि तिथे लायब्ररी वगैरे काही नव्हती. पण ज्याअर्थी ही आपल्याकडे आली आहे त्याअर्थी कोणीतरी माझं नाव सांगितलेलं आहे याची त्याला खात्री झाली. मैत्री करण्याची ही छान संधी आहे असं समजून सागरनेही "हो हो आणेन ना" असा तीर सोडला. पुस्तक आणायचं कसं आणि कुठून हे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरू झालं. शेवटी पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर दादरहून त्याने पुस्तक आणलं आणि प्रांजलला दिलं. 
पुस्तकासाठी आतूर असलेल्या प्रांजलला पुस्तक पाहून इतका आनंद झाला की तिने सागरला चक्क मिठी मारली आणि तू आजपासून माझा बेस्टफ्रेंड आहेस असं ती म्हणाली. "आंधळा मागतो एक डोळा" ही म्हण सागरला खरी वाटू लागली. 

     प्रांजलच्या उपक्रमाला महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळाला. ही आनंदाची बातमी तिने सर्वात अगोदर सागरला सांगितली. प्रांजलच्या आयुष्यात आपल्याला एक हक्काचं स्थान मिळालं आहे अशी जाणीव सागरला होऊ लागली. इंग्रजी असो किंवा बुक कीपिंग येणाऱ्या अडचणी प्रांजल सागरला हक्काने विचारू लागली. कळत नकळत सागर तिच्या प्रेमात पडला. प्रांजलही आपल्या प्रेमात आहे की फक्त निखळ मैत्री याबद्दल मात्र त्याला संभ्रम होता. अनेकदा त्याला वाटायचं की आपल्या मनातलं प्रांजलला सांगावं. पण, प्रांजल खूप मोठ्या घरची होती. तिचे बाबा पोलीस खात्यात होते. आपल्या मनातलं ऐकल्यावर ती चिडली आणि बाबांना सांगितलं तर? याचीही त्याला भीती वाटायची. शिवाय आपण गरीब आहोत, ती कुठे आपण कुठे असं म्हणून तो टाळायचा. 

     एखाद्या दिवशी प्रांजल क्लासला आली नाही की सागरचं मन लागत नव्हतं. सागरचा छोटेखानी अपघात झाला होता तेव्हा क्लासच्या मित्रमंडळींसोबत प्रांजलही त्याच्या घरी गेली होती. तेव्हा नकळत तिच्या डोळ्यात आलेले अश्रू सर्वांनी हेरले होते. सागर आणि प्रांजलची होत असलेली जवळीक पाहून क्लासमध्ये त्यांना चिडवणं सुरू झालं. प्रांजलला या सगळ्याचा अजिबात राग येत नव्हता. मात्र हे सगळं कुठेतरी थांबायला हवं असं सागरला वाटायचं. 
एकेदिवशी कापऱ्या आवाजात सागर प्रांजलला म्हणाला, "क्लास सुटल्यावर गार्डनमध्ये भेटशील का? मला थोडंसं बोलायचं आहे." तिनेही पटकन होकार दिला. आणि ठरल्याप्रमाणे भेट झाली. पंधरा मिनिटे झाली पण सागर मूळ विषयावर काही येईना. "तू बोलतोस की मी जाऊ?" असं प्रांजलने म्हंटल्यावर त्याने हिंमत केली आणि मनातलं सगळं सांगितलं. 

     "मी तुला माझा जवळचा मित्र मानते हे खरं आहे पण, प्रेम वगैरे कधी मनात आलं नाही रे !" तुझं प्रेम नाकारण्याचं ठोस कारण माझ्याकडे किमान आत्तातरी नाही. मला थोडा वेळ दे विचार करायला. मी सांगेन तुला. असं बोलून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. दोन आठवडे झाले तरी प्रांजलचं काहीच उत्तर नाही म्हणून सागरने स्वतःच पुन्हा विषय छेडला. तेव्हा प्रांजलने नम्रपणे नकार दिला. सागरनेही कारण विचारण्याचं धाडस केलं नाही. मी तिच्या पात्रतेचा नाही असं गृहीत धरून त्याने विषय सोडून दिला. सागरचं मन दुखावलं होतं पण जे आपल्या नशीबात आहे ते आपल्याला मिळेल असं तो स्वतःलाच समजवायचा. 

     पूर्वीच्या तुलनेत आता दोघातलं बोलणं कमी झालं होतं. प्रेम व्यक्त करून आपण मैत्रीही गमावली की काय असा प्रश्न सागरला सतावू लागला. एक-दोन महिन्यांनी प्रांजलने सागरला भेटीचं निमंत्रण दिलं. सागरने कारणं सांगून भेट टाळायचा प्रयत्न केला पण, "तू आला नाहीस तर माझ्याशी कधीच बोलू नकोस." असं प्रांजलने दटावल्यावर भेटीस राजी झाला. यंदा प्रांजलने पुढाकार घेतला आणि म्हणाली, "मी पुन्हा एकदा विचार केला तुझा आणि मला तुझं प्रेम कबूल आहे." प्रांजल थट्टा करतेय असं सागरला वाटलं. पण तुझी शपथ रे असं ऐकताच त्याचा विश्वास बसला. हवं असलेलं प्रेम मिळाल्याने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. 

     शिक्षण संपलं, दोघांना नोकरी लागली. दोघातलं प्रेम जवळपास सहा वर्ष टिकून होतं . पण, आजही सागरला दोन्ही कुटुंबातली आर्थिक दरी, राहणीमान भीती घालायचं. किती दिवस असं अधांतरी राहायचं. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आपण घरच्यांशी बोलूया असं सागरने सुचवलं. तिलाही हे पटलं. काहीही झालं तर तू माझी साथ देशील ना प्रांजल? असं सागरने विचारलं. मी तुझी साथ आजन्म देईन असं प्रांजलने म्हंटल्यावर सागरला खूप बळ मिळालं. दोन दिवसात आपण बाबांना भेटून सगळं सांगूया असं ठरलं. 

     रविवारची सुट्टी गाठून प्रांजलने सागरला घरी बोलावलं. बाबांना फक्त इतकंच माहीत होतं की कोणीतरी मित्र येणार आहे घरी. सागर बंगल्याच्या दारात उतरला तेव्हा तो आलिशान बंगला, भलामोठा बगीचा, पोहण्यासाठी बांधलेला छोटासा स्विमिंग पूल हे सगळं पाहून त्याचं मनोबल पुन्हा कमी होऊ लागलं. आलोय खरा पण बोलायचं कसं? असं म्हणत "येऊ का काका?" असं विचारत सागर घरात आला. हॉलमध्ये अंथरलेले गालिचे, मऊ-मऊ सोफे, ४५ इंचाचा टीव्ही, जिन्यावरच्या संगमरवरी पायऱ्या, चार फूट उंच झुंबर सगळं नेत्रदीपक. एवढ्या मोठ्या घरच्या मुलीला बाबा आपल्या घरी पाठवतील का अशी शंका त्याला येऊ लागली. बाबांनी प्रांजलला आवाज दिला. "तुझा मित्र आलाय प्राजू" ये बाहेर. प्रांजलने दोघांना एकमेकांची ओळख करून दिली. बाबाही सागरची चौकशी करत होते. काय करता? कुठे राहता? घरी कोण-कोण असतं? प्राजूला कसं ओळखता? वगैरे वगैरे... 

     नाश्ता, चहा झाला. प्रांजलने खाकरत सागरला इशारा केला बोल आता. काका, मी आणि प्रांजल गेली सहा वर्षे एकमेकांवर प्रेम करतोय. आता आम्हाला लग्न करायचं आहे. मी प्रांजलचा हात मागायला आलोय. सागरचं हे बोलणं ऐकून प्रांजलचे बाबा ताडकन उभे राहिले. तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची असं म्हणून त्यांनी सागरची कॉलर धरली. सगळं पाहून प्रांजलही घाबरली. तुला जेवढा पगार आहे तेवढे पैसे मी माझ्या कुत्र्यावर खर्च करतो. तुझ्या किचनएवढं माझं बाथरूम असेल. माझ्या मुलीने आजवर जे-जे मागितलं ते सगळं मी तिला दिलं आहे. तुला एखादी गोष्ट तिने मागितली तर दहावेळा विचार करशील. तुझी लायकी काय तू बोलतो काय. श्रीमंतांच्या पोरींना प्रेमात पाडायचं आणि नंतर रंग दाखवायचे. बरंच घालून पाडून बोलत होते प्रांजलचे बाबा. 
"प्रांजल तू सांग ना बाबांना. मी असा नाहीये ते." असं सागर बोलला पण प्रांजल फक्त रडत राहिली. 
तू माझी साथ देशील म्हणालेलीस, आपलं प्रेम खरं आहे, तू बोलत का नाहीस? प्रांजल बोल ना गं. सागर एकतर्फी बोलत राहिला पण प्रांजलने ऐनवेळी कच खालली. *"बाबांनाच मान्य नाही, मग मी तरी काय करू?"* एवढं बोलून ती रडत रडत आतल्या घरात गेली. तिच्या बाबांनी थोबाडीत मारून शेवटी सागरला घराबाहेर काढलं. आणि धमकीही दिली. माझ्या मुलीच्या वाटेला जाशील तर जेलमध्ये सडवेन. 

     जिच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं तिने ऐनवेळी साथ सोडल्याने सागर खूप खचला. आपलं प्रेम खरं नव्हतं का? एखाद्या व्यक्तीला सांभाळणं, सुख देणं एवढीही आपली पात्रता नाही का? पैसा म्हणजेच सगळं का? असे कितीतरी प्रश्न सागरच्या मनात घोळत होते. एवढं सगळं झाल्यावरही प्रांजलचा एकही फोन नाही, भेट नाही हे पाहून त्याने काळजावर दगड ठेवला आणि प्रांजलशी यापुढे कसलंही नातं ठेवायचं नाही असा निर्णय घेतला.

     हे सगळं प्रकरण झाल्यावर साधारण वर्षभरात प्रांजलच्या बाबांनी एका उद्योगपती मुलाशी तिचं लग्न लावून टाकलं. लग्नाला वर्ष होत आलं तरी पती आपल्याला पत्नीसारखं वागवत नाही, कधीकधी दोन-दोन दिवस घरी येत नाही, व्यवस्थित बोलत नाही हे सगळं प्रांजलने बाबांच्या कानावर घातलं. यावर लवकरच तोडगा काढायला हवा म्हणून दोन्ही कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती आणि प्रांजल व तिचा पती दिनेश असे सगळे चर्चेला बसले. असं का करत आहात? काही चिंता वगैरे आहे का? असं दिनेशला विचारलं पण त्याने सगळी उडवाउडवीची उत्तरे दिली. औपचारिकता म्हणून यापुढे मी व्यवस्थित वागेल असं त्याने सांगितलं. परंतु दोन आठवड्यांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. यावेळी मात्र प्रांजलच्या बाबांनी कारण शोधून काढायचा निश्चय केला. 

     खोलवर तपासणी केली असता दिनेशचे त्याच्या ऑफिसमधल्या सेक्रेटरीशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. दोन-दोन तीन-तीन दिवस तो घरी येत नव्हता त्याचंही कारण मिळालं. मित्रांसोबत तो दारूच्या पार्ट्या करीत होता. हे सगळं जेव्हा प्रांजलला कळलं तेव्हा तिने ज्या नजरेने बाबांकडे पाहिलं तिचा रोख बाबांना कळला.
श्रीमंती, पैसा, ऐशोआराम या सगळ्यापायी प्रांजलचं आयुष्य बाबांनी पणाला लावलं होतं.
सागर आपल्या मुलीसाठी योग्य होता असं बाबांना वाटू लागलं. पण आता उशीर झाला होता.

     रितसर सोडचिठ्ठी घेऊन दिनेश आणि प्रांजल वेगळे झाले. बाबा प्रांजलला घेऊन घरी आले. मुलीला सांभाळणं त्यांच्यासाठी जड नव्हतं परंतू पाहुणेमंडळी, ओळखीपाळखीत कोणत्या तोंडाने झालेला प्रकार सांगायचा ही चिंता त्यांना खात होती.
आलेला दिवस ढकलायचा म्हणून प्रांजल जगत होती.

     प्रेयसी म्हणून तिला सागरकडून खूप प्रेम मिळालं होतं परंतू एक पत्नी म्हणून ज्या सुखाची अपेक्षा तिला होती ती मात्र दिनेशकडून पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे ती आता बैचेन होऊ लागली होती. राहून राहून तिला जुने दिवस आठवायचे.
सागरने अजूनही लग्न केलं नव्हतं. सागर आपल्याला माफ करेल, पुन्हा स्वीकारेल या भाबड्या आशेने तिने सागरचा संपर्क शोधून काढला.
सागरला फोन केला. जवळपास तासभर ती तिचं दुःख ऐकवत राहिली आणि सागर ऐकत राहिला काहीही न बोलता.
तू बोलत का नाहीस सागर? असं जेव्हा प्रांजल म्हणाली तेव्हा सागरने उत्तर दिलं, *"नियतीलाच मान्य नाही, मग मी तरी काय करू?"* आणि फोन ठेवला.

सागरने काळजावर दगड ठेवला. तेव्हाही, आजही !

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, May 24, 2021

वैद्य ना भेटला चांगला

⚜️ वैद्य ना भेटला चांगला

चेहऱ्यावर तुझ्या पाहिले मी मला
सांग शिकली कुठे तू सये ही कला

भेटणे रोज जर शक्य नव्हते तुला
जीव वेड्यापरी का उगा लावला

दाखवू मी कुणा आतली वेदना
एकही वैद्य ना भेटला चांगला

राज्यकर्ते तसे खूप झाले इथे
घेतला ना कुणी अंश शिवबातला

विश्व अवघे सुखी पाहिजे जर 'किरण'
सोडवूया तिढा एकमेकातला

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Sunday, May 23, 2021

का हवे दाखले

⚜️ का हवे दाखले

का हवी कारणे का हवे दाखले
ज्ञात आहे तुला दुःख जर आतले

शब्द पडले कमी उमगले मग मला
चेहरा वगळता सर्व मी वाचले

भावनाशून्य तू काय कळते तुला
बोलणे हे तिचे खोलवर लागले

तू मला टाळते मी तुला टाळतो
यामुळे वाढले वाद दोघातले

जात नाही कधी तोल प्रेमात या
खाचखळग्यातही भान जर ठेवले

◼️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Saturday, May 22, 2021

गेलो आपापल्या वाटे

⚜️ गेलो आपापल्या वाटे...

पाहिले मला अन्
ती हळवी झाली थोडी
भेटीच्या क्षणावर मग
केली आसवांनी कुरघोडी

काय बोलावे नेमके
सुचत नव्हते काही
योगायोगच म्हणावा लागेल
असे नेहमी होत नाही

सावरलो कसेबसे दोघेही
गोष्टी इकडच्या तिकडच्या झाल्या
तेवढ्यात कानांवर दोघांच्याही
ओळखीच्या हाका आल्या

हसलो मंदमंद, घेतला निरोप
गेलो पुन्हा, आपापल्या वाटे
प्रेमाच्या वाटेवर परंपरांचे
आम्हीच निवडले होते काटे

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Friday, May 21, 2021

ढाळली आसवे

ढाळली आसवे आणि गेले घरी
शेवटी राहिली मोकळी पायरी

स्वप्न साकारले जिद्द ठेवून मी
रोखले, वेढले संकटांनी जरी

लाख केले जवळ दूर जाते तरी
हीच प्रेमातली खंत आहे खरी

हेरले जायचे चारचौघातही
दुःख होते तिचे एवढे भरजरी

कोणते प्रश्न अन् कोणती उत्तरे
एकमेका असे दूर केल्यावरी

एक असतो विषय भावना वेगळ्या
कोण लिहितो खुले कोण अल्पाक्षरी

मोकळे बोलणे प्रांत नाही तुझा
सोस तू आतली चेंगरा चेंगरी

वाटले जर मला एकटे-एकटे
ठेवतो मी तुझे पत्र छातीवरी

कालपर्यंत जी खेळली अंगणी
आज सोडून ती दूर गेली परी

📧 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

हळवा आहे थोडा

⚜️ हळवा आहे थोडा...

पटकन ओले होतात डोळे
तसा तो, हळवा आहे थोडा
दगडी काळजाच्या दुनियेमध्ये
त्याला विचार करून सोडा

तक्रार नको मग पुन्हा
हा क्षणाक्षणाला रडतो
हा आजार संसर्गाचा पण
अगदी काहींनाच जडतो

😊 सागरराजे निंबाळकर

Saturday, May 15, 2021

नको खोटे हावभाव

चोख वठवू भूमिका
नको खोटे हावभाव

कोण किती जगणार
नाही कुणालाच ठाव

🌱 सागरराजे निंबाळकर

तुझ्या मंजूळ स्वराने

⚜️ तुझ्या मंजूळ स्वराने..

जेव्हा-जेव्हा सये तुझी
बट ढळते हळूच
दडलेल्या भावनांची
तेव्हा होते आगेकूच

मग वाटते नेहमी
तुला चोरून पाहावे
काही काळ का होईना
तुझ्या स्वप्नात राहावे

विसरून सारे जग
फक्त तुझ्यात रमतो
योग दुग्धशर्करेचा
कधी कधीच जमतो

गढलेलो असताना
अचानक येते भान
तुझ्या मंजूळ स्वराने
जेव्हा सुखावती कान

🌱 सागरराजे निंबाळकर

Wednesday, May 12, 2021

सतावते एक भीती

🌱 सतावते एक भीती

येथे दिवसागणिक
सतावते एक भीती
दिन माझ्या आयुष्याचे
आता उरलेत किती

कोणी नसतो कुणाचा
सारे क्षणांचे सोबती
जुळावया चार ओळी
जसे यमक योजती

🌱 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Tuesday, May 4, 2021

किसीको याद करता हूँ

किसीको याद करता हूँ
तो कोई याद आता है

यहीं अंदाज है मेरा
जो सबको पास लाता है

🌿 सागरराजे निम्बालकर

दिल को सुकून

देखता हूँ जब भी तुझे माँ
दिल को सुकून सा मिलता है

ये वो फुल है जो सिर्फ और सिर्फ
किस्मतवालों के दर पे खिलता है

🌿 सागरराजे निम्बालकर

थोडंसं धाडस

🌱 विचारधन - १०१ 🌱

थोडंसं धाडस आपल्याला खूप पुढे नेतं हेदेखील धाडस केलं तरच कळतं !

🌿सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, May 3, 2021

सुखाचा सागर

▪️सुखाचा सागर 

संकटात जो-जो | करतो मदत 
मानावी सोबत | त्याची खरी

घासातला घास | दुसऱ्याला देणे 
आशीर्वाद घेणे | सोपे नाही 

समृद्धीत कोणी | मागतो का काही 
तरी नाही नाही | ओठांवर 

यादीमध्ये मित्र | आहे लाखो जरी 
मात्र वेळेवरी | कोणी नाही 

पडलो आपण | जर का एकटे 
झेलावी संकटे | योद्ध्यापरी 

बोलघेवड्यांना | करा हद्दपार 
शेवटाला चार | पुरे खांदे 

नको गोतावळा | उगा व्यर्थ सारा 
देतो का सहारा | कोणी कधी 

करायला हवा | नेमका संचय 
जीवनी अभय | राहावया 

आशेचा 'किरण' | शोधतो पामर 
सुखाचा 'सागर' | तरावया 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - 8879897797

श्वास आहे तर

▪️श्वास आहे तर...

श्वास आहे तर | आहे सर्वकाही 
त्याच्यापुढे नाही | काही मोठे 

श्वासांवर नाही | कुणाचीही सत्ता 
आर्थिक सुबत्ता | असो किती 

निसटतो जेव्हा | शेवटचा श्वास 
थांबतो प्रवास | आयुष्याचा 

श्वास निरंतर | चालतो जोवर
नसावे अंतर | नात्यांमध्ये 

जेव्हा हळूहळू | मावळते आशा 
निर्वाणीची भाषा | येते ओठी 

सार्थकी लागावा | शेवटचा श्वास 
हाच एक ध्यास | ठेवू सारे 

जीवनाची नौका | किनाऱ्याला लागो 
भाग्य सारे जागो | निजलेले 

आपोआप घेतो | पोटात 'सागर'
श्वासांची घागर | रिक्त होता 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - 8879897797

मन माझे

▪️मन माझे...

हळूवार हृदयाची
उघडली मी संदूक 
जपलेल्या आठवांनी 
केले क्षणात भावूक 

कुठे घेऊन जातील 
नाही आठवांचा नेम 
कधी भंगती अपेक्षा
कधी नकळत प्रेम 

सारे ठाऊक असून 
मन कुणाचे ऐकते 
वेगेवेगे धावताना 
एकाजागी विसावते

पाठ टेकली धरेला 
केली नभाची चादर 
क्षणार्धात मन माझे 
पोहोचले चंद्रावर 

स्वप्न ठेवता उशाशी 
झोप लागली क्षणात 
चालू होता उगाचच 
किती गोंधळ मनात 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

थोडे ठेवतो अंतर

▪️थोडे ठेवतो अंतर 

नका विचारू त्यावेळी 
काय वाटते जीवाला 
जेव्हा क्षणात निरोप
द्यावा लागतो कुणाला 

तसा सोबती कायम 
येथ नसतो कुणीही 
मनाजोगे वाटताना 
होते काहीही, कधीही 

कधी सांगावा एखादा 
कधी भेट अचानक 
काय बोलावे कुणाला 
जो-तो मर्जीचा मालक 

चालताना नकळत 
सुटलाच कधी हात 
कैक होतात जखमा 
खोलवर काळजात 

म्हणूनच आता मीही 
थोडे ठेवतो अंतर 
होत नाही मग त्रास 
हात सुटल्यानंतर 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

किस्सा आठव एखादा

💚 किस्सा आठव एखादा 

जर झाली एकांतात 
तुला आठवांची बाधा 
तुझ्या-माझ्या भेटीतला 
किस्सा आठव एखादा 

नको विचारू यामुळे 
काय होईल नेमके 
एक गोष्ट मात्र खरी 
तुला वाटेल हलके 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

कस आतून लागतो

💚 कस आतून लागतो 

सांगू नेमकी कुणाला 
माझी जीवघेणी व्यथा 
दोन ओळीत संपते 
इतुकीच माझी कथा 

नानारंगी पात्र सारी 
माझी मीच निभावतो 
हावभाव बदलाया 
कस आतून लागतो 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

असा एखादा करार

💚 असा एखादा करार 

चार भिंतींच्या आतलं 
जेव्हा चोहीकडे जातं 
खऱ्या अर्थाने तेव्हाच 
होतं विस्कळीत नातं 

याच कारणे करूया
असा एखादा करार 
पुढे येईल जो आधी 
तोच घेईल माघार  

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

घर होईल गोकुळ

💚 घर होईल गोकुळ 

नको नेऊस टोकाला 
तुझ्या-माझ्यातला वाद 
सौख्य अपुल्या जीवनी 
ठेवू आजन्म नाबाद 

सुख असो किंवा दुःख 
वाटा दोहोंचा सारखा 
घर होईल गोकुळ 
जशी कृष्णाची द्वारका

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

उभा राहिलो थाटात

💚 उभा राहिलो थाटात 

संकटात ऐनवेळी 
बंद झाली सारी दारं 
हाच होता नियतीचा 
छुपा पहिला प्रहार 

मात करून त्यावर 
उभा राहिलो थाटात 
प्रसवून जीवघेण्या 
वेदनांना उदरात 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

तुझी कळेल खबर

💚 तुझी कळेल खबर 

दूरदेशी गेली तरी 
वाट आजही पाहतो
एकजीव झाल्यावर 
कोण वेगळे राहतो 

भेट व्हावी तुझी-माझी 
पुन्हा त्याच वाटेवर 
त्यानिमित्त का होईना 
तुझी कळेल खबर 

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

तिच्या असीम त्यागाने

💚 तिच्या असीम त्यागाने

तिच्या असीम त्यागाने
सुखावलं घरदार
तीच भावना हळवी
तीच भक्कम आधार

दाह सोसत दिव्यात
जशा तेवतात ज्योती
आई माझी साधीसुधी
तंतोतंत तशी होती

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Sunday, May 2, 2021

खूप तुटतो आतून

💚 खूप तुटतो आतून

घट्ट धरलेला हात
जेव्हा अर्ध्यात सुटतो
तेव्हा खंबीर मनुष्य
खूप आतून तुटतो

याचसाठी नात्यामध्ये
ठेवा इतके अंतर
शक्य होईल सहाया
त्रास जेवढा नंतर

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर