Monday, January 28, 2019

कल्याण वृत्त (दुःखाचे गाणे)

वृत्त :- कल्याण

लगावली :- गागागागा ची ३ आवर्तने

तरही गझल :- पहिली ओळ ज्येष्ठ गझलकार ए के शेख ह्यांनी दिलेली. सोयीसाठी शब्दांचा क्रम मागेपुढे.

------- *दुःखाचे गाणे* -------

या दुःखाचे करता येते ज्याला गाणे
सहजी होते त्याचे येथे येणे जाणे

समजत गेलो दुःखाला मी प्रत्येकाच्या
पण कोणीही ऐकेना माझे गाऱ्हाणे

खोट्या चलना भुलले नाही जे जे त्यांना
कामी येते सत्कर्माचे सुंदर नाणे

पैसा अडका तुज देवा मी मागत नाही
पोटासाठी मज थोडेसे द्यावे दाणे

नाही चिंता काही आता वाटे मजला
माझ्या भाळी जेही आहे देवच जाणे

आनंदाने जगणे व्हावे प्रत्येकाचे
सोडा आता आधाराचे ते रडगाणे

सारीपाटाच्या खेळाने उमगत गेले
संयम ठेवत उलटावे शत्रूचे खाणे

भक्तीचा सागर गरजेचा उपवासाला
नाही केवळ केळी आणिक साबूदाणे

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, January 25, 2019

भारताचे गुण गाता

भारताचे गुण गाता, फुलते ही छाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती

शिवराय इथलेच, इथलीच राणी
गुरू गोविंद सांगती, कबिराची वाणी
नामा, जना, ज्ञाना झाले, इथे थोर संत
इथे जन्मल्याची नसे, कधी कुणा खंत

तुकोबांची गाथा सांगे, तू माझा सांगाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती

भीमराव लिहितात, न्यारे संविधान
देऊ सारे मनोभावे, कायद्यास मान
लतादीदी गाती जणू, कोकिळेचं गाणं
सतावतं ए पी जेंचं, अकालीच जाणं

मैत्रीत सांगावी कृष्णा, सुदाम्याची नाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती

कन्याकुमारी पासून, हिमालयी जाऊ
आरती नमाज सारे, एकसुरी गाऊ
होळी, बैसाखी, दिवाळी, गणपती येता
गोडी वाढते म्हणती, तिळगुळ देता

सुखाने नांदती येथे, विविधांगी जाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, January 23, 2019

बाळासाहेब अभंग

बॉम्बे ची मुंबई । झाली ज्यांच्यामुळे
खोल पाळेमुळे । हिंदुत्वाची !! १ !!

एकच साहेब । इथे दणाणले
भाव मनातले । मांडुनिया !! २ !!

श्वास मराठीचा । ध्यास मराठीचा
व्यास मराठीचा । छेदणारा !! ३ !!

थकल्या भागल्या । पाजू बाळकडू
नका अवघडू । लढताना !! ४ !!

छप्पन इंचाची । मर्दानी ही छाती
गीत कैक गाती । मराठीचे !! ५ !!

देऊया वंदना । जयंती निमित्त
खवळावे पित्त । स्वाभिमानी !! ६ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!*

Monday, January 21, 2019

द्वाड वागते नियती

नाही जमत आता मलाही
मैफिलीत, तुझ्या नजरेस टाळणं

एकच मार्ग उरतो, माझ्याकडे मग
एखाद्या कारणाने, स्वतःस गाळणं

बळ एकवटून ठरवतो कधीतरी
थोडंच पण, जरा दुरूनच पाहूया

लालसा नको रोजच्या भेटीची
पुन्हा एकदा, अलिप्तच राहूया

तेवढ्यात आवाज येतो कानी
अजून किती दिवस, असं चालणार

हरकत नाही, नको पाहूस पण.....
खोटी गरळ मनास, किती घालणार

आठवतात मलाही, शपथा आणाभाका
पाहत एकटक, लख्ख चांदण्यात जागणं

माझं तुझं न करता कधीच
फक्त नी फक्त, एकमेकांसाठी मागणं

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, January 20, 2019

सांग विधात्या

दिवास्वप्न होतं की, रात काळी काळी
सांग विधात्या काय, लिहिलं माझ्या भाळी

नाव तुझं गोंदताना, झाला मज त्रास
तूच राया माझा अन, तूच सखा खास
एवढ्यात आटली, अशी कशी माया
तूच होता पांडुरंग, तूच कृष्णराया

बेरंग झाली होळी, अन अंधारी दिवाळी

सांग विधात्या काय.........

येता जाता होतो मज, पावलांचा भास
वाटे मग आहेस तू, इथे हमखास
विरहात तुझ्या, होते लाही लाही
हाल माझे पूस तू, दश दिशांनाही

झालास तू परका, होता माझा कधीकाळी

सांग विधात्या काय.........

पिवळी पिवळी झाली पानं, सुकलेल्या वेली
सुंदरता वसंताची, कोणी कुठे नेली
ह्याच हातांनी जी, फुलविली बाग
निद्रिस्त झाली ती, तिला येईना जाग

हिवाळ्यात लागे, उन्हाची झळाळी

सांग विधात्या काय........

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, January 19, 2019

साऱ्यांनाच कुठे कळते

सहजासहजी मिळत नाही यश
सोसावे लागतात अगोदर चटके

तेव्हा पोहोचतो काळजात आपण
लोक म्हणतात, हा आहे जरा हटके

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, January 17, 2019

चारोळी

आला गेला कितीदा, तरीही
दरवळ तिचा गवसला नाही

काही सांगितलं तिने नजरेने
उरलेलं स्वतःच, समजला काही

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, January 16, 2019

तुटलेली पतंग

तुटलेली पतंग नियतीची
मीच माझ्या हातांनी झेलली
ही अद्वितीय किमया मी
सत्संगाच्या मार्गाने पेलली

दोरा केला कलागुणांचा अन
अपेक्षित तेवढाच हवेत राहिलो
इतरांना कापण्याच्या नादात
कधी ना वादळापरी वाहिलो

कन्नी म्हणजे हृदय आहे माझं
समतोल दोहो बाजूस सारखा
बांधणीत चुकलोच जर का कधी
त्या दिवसाच्या सुखास पारखा

संक्रांतही येते कधीकधी संकटांची
वादळवारे अगदीच पुढ्यात वाढतात
तंगूसापरी धैर्य माझं कणखर म्हणून
कर्म हरेक प्रसंगातून बाहेर काढतात

आत्मारूपी पतंग भिडता गगनाला
बेधुंद बरसतात सुखांच्या सरी
अनुभूती येते दैवी चमत्काराची
वाटतं नित्य विहरावं त्या पतंगापरी

तुटलीच पतंग जर कधी आकस्मिक
आशेचा किरण तिला धरण्या धावतो
जसा संगम होऊन साऱ्या सरितांचा
सर्वांना शेवटाला सागरच पावतो

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

साऱ्याच फुलांच्या नशिबी कुठे देव्हारा
काही पायदळी ही तुडवली जातात

उमलणं, कोमेजणं ही देण नियतीची
नसतं काहीच कोणाच्या हातात

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

नाही सहन होत आता
तुझं सारखं सारखं रुसणं

रंगवून चित्र माझ्या मनासारखं
न सांगताच क्षणात पुसणं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

माझं माझं करता करता
काही ना राहिलं शेष येथे

शिक्कामोर्तब करणार तरी किती
नियती जे द्यायचं तेच देते

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

दोन घडीचा डाव येथे, तरी
झाला पहा, किती पसारा

जगताना तमा गोतावळ्याची
शेवटाला ४ खांद्यांचा सहारा

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, January 15, 2019

चारोळी

साऱ्याच पानाफुलांना लालसा नसते
एखाद्या ओंजळीत विसावा घेण्याची

म्हणूनच, शिकतात अनोखी कला
स्वतः कोमेजून इतरांना गंध देण्याची

@ *सागरराजे निंबाळकर*

हात हाती धरू (सरे मिसरा गझल)

➖➖ *हात हाती धरू* ➖➖
           (सरे मिसरा गझल)

वृत्त :- स्त्रग्विनी (गालगा ४ आवर्तने)

हात हाती धरू चल सखे जावुया
गोडसे जीवनी स्वप्न ते पाहुया

धुंद वेडावल्या आज साऱ्या दिशा
चंद्रमा मी नभी लाजरी तू निशा
तारकांच्या घरी जावुनी राहुया

तू मनीची गझल मी तुझा काफिया
भावना मांडल्या योग्य वृत्तातल्या
ही विधा घेवुनी गोडवा चाखुया

सोबतीला हवी तू मला नेहमी
साथ असता तुझी काय मजला कमी
वाट वळणावरी नेमकी चालुया

तू नदी वाहती मी किनारा तुला
अंत तुज सागरी नेहमी मी खुला
नियम हे आपले बंधने पाळुया

वादळे ही अशी येत असती सदा
प्रेम विश्वास हा सोडणे ना कदा
संशयाला अता यापुढे टाळुया

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, January 14, 2019

किरणप्रभा (भोगी)

------- *गोडवा तिळगुळाचा* -------

संक्रांती सणाबद्दल साऱ्यांना कळू दे
आलिंगन आम्हा तुम्हास नित्य फळू दे !! धृ !!

नकोत भेदाभेद एकमेकांबद्दल
सारूनी राग घडवू दुःखास अद्दल
वाईट प्रवृत्ती अग्निकुंडात जळू दे !! १ !!

सर्जाराजा नी शेतशिवाराची चाकरी
पुरेशी दोन वेळची चटणी भाकरी
फुलव धरा विठ्ठला, नजर वळू दे !! २ !!

गोडवा तिळगुळाचा ओठांवर राहो
बंधुभावाचा झरा स्वच्छ, निखळ वाहो
फुले आनंदाची माझ्या अंगणी गळू दे !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

गझलेच्या दुःखद शेरास वाहवाही मिळाली
तेव्हा उमगलं, लोकांना दुःखही भावतं

म्हणूनच टाळली संमिश्र भावनांची दलदल
ठरवलं मनाजोगं लिहिल्यास कुणाचं फावतं

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, January 13, 2019

चारोळी

माझ्या बंद हृदयाची कवाडं
तिच्या आकस्मिक येण्याने खुलतात

नाव तिचं, मधू आहे मित्रहो
प्राशन करून जिला सारेच डुलतात

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, January 12, 2019

नाव गाजवी पुत्र महू गावाचा
संविधानाचा अधिपती बाबा

गेले आयुष्य कष्टातच सारे
वाहण्यासाठी बंधूतेचे वारे
वर्णभेदाला नव्हता येथे थारा
प्रज्ञा, शील अन करुणेचा नारा
कधी न तुटणारा भारताचा तारा

संविधानाचा अधिपती बाबा !! १ !!

गौरव करूया माझ्या संविधानाचा
तोच ठरेल मान खरा त्याचा
गुण्या गोविंदाने सारे आता जगू
माझं तुझं नको, एकमेकांचं बघू
माझा भारत, साऱ्या जगात न्यारा

संविधानाचा अधिपती बाबा !! २ !!

Friday, January 11, 2019

किरणप्रभा

मोलकरीण झाले, हेच चुकले माझे
समाजाच्या दृष्टीने, सुख हुकले माझे ।। धृ ।।

सांभाळ करते माझ्या, प्रेमळ मुलांचा
पैसा अडका ना, मोह सुवर्ण डुलांचा
संकटात कधी ना, धैर्य झुकले माझे ।। १ ।।

काबाडकष्टात खर्चली, हयात सारी
तरी मी स्वतःस मानते, आनंदी नारी
खोल जाऊन डोळे, ओठ सुकले माझे ।। २ ।।

मान सन्मान तसा, कमी मिळाला मला
थोडक्यात समाधानाची, शिकले कला
कधी ना खंत, क्षण काही मुकले माझे ।। ३ ।।

@ *सागरराजे निंबाळकर*

कविता गझल

--- *लिहून पाहीन मी सारं* ---

कविता यमकात होती म्हणून
वाटली असावी मिळतीजुळती
गझलेच्या शेरास वाह मिळाली
न पाहताच, जखम भळभळती

कविता लयीत नसेलही पण
ओततो मी भाव त्यात, सारे
वृत्तात लिहिताना हाती घेतले
मात्रा, लगावलीचे जळते निखारे

स्वरांचा काफिया करताना मी
चपखल यमकात कमी पडतो
वाटते मग कविताच भली अन
पुन्हा तिथेच, येऊन अडतो

काय हरकत आहे म्हणतो मी
सगळ्या प्रकारे लिहून पाहायला
कष्ट, जिद्द, उत्सुकता पुरेशी
रसिकांच्या काळजात राहायला

घ्या शपथ माझ्यासारखी तुम्हीही
एका प्रवाहात वाहण्यात मजा नाही
ठराविक ठप्पा लागून हयात गेली
ह्यासारखी दुसरी कोणती सजा नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

संक्रांत येतेय

------- *संक्रांत येतेय* -----

यंदाच्या संक्रांतीला मलाही करावासा वाटतोय
हळदी कुंकवाचा कार्यक्रम..
मान सन्मानाचं गडद कुंकू तिच्या कपाळी लावून आणि
सुरक्षिततेच्या नावाची पिवळी हळद तिच्या भाळी लिहून !

वाण म्हणून देईन वचन तिला.
माझ्यासहित तमाम पुरुषांना आपल्या संस्कृतीचं महत्व सांगून भानावर राहण्याचं.

जमलंच तर खेळेन मंगळागौर ही....
ती खचत असताना तिला सावरणारी अन
परंपरेच्या उठाबशा काढत असताना भ्रामक कल्पनांना आवरणारी !

औपचारिकता म्हणून तीळ न देता,
एखाद्या प्रसंगाने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आलं
तर, हसताना तिचे लाडवासारखे दिसणारे गाल पाहून म्हणेन आवर्जून मी ही

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.....!

बघा, जमलंच असं काही तुम्हालाही तर..

*संक्रांत येतेय.....!*

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

तसं मी बोलणार नव्हतोच कधीही
पण माझा अगदीच नाईलाज झाला

तिनेच सांगावं मला, जाता जाता
कसा निरोप घ्यावा, शेवटच्या क्षणाला

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

आत्ता कुठे शिकले होते
अश्रू माझे, तरळायला

तेवढ्यात ओठांचा गदारोळ
काय झालं बरळायला

@ *सागरराजे निंबाळकर*

छत्रपती

------- *शिवराय छत्रपती* -------

स्वराज्याचे अधिपती । शिवराय छत्रपती
रयतेच्या सभोवती । रक्षणास तत्पर ।। १ ।।

झोळी साऱ्यांचीच रीती । शत्रूस एकच भीती
गनिमी काव्याची नीती । करे सळो की पळो ।। २ ।।

शब्द पाळला वाचेचा । स्त्रीला सन्मान मातेचा
सुसंस्काराच्या गाथेचा । अध्याय जिजाऊचा ।। ३ ।।

गालबोट कधी नाही । पुसावे दशदिशाही
कशी होती शिवशाही । आमुच्या शिवबाची ।। ४ ।।

पुन्हा यावे शिवराय । दिसे ना अन्य पर्याय
विशाल सुवर्णकाय । इतिहास दावाया ।। ५ ।।

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, January 10, 2019

चारोळी

आजच मिळालं पत्र तिचं, अन
वाचताना अश्रूंचा बांध फुटला

एकंच प्रश्न सतावतो अजूनही
खऱ्या प्रेमाला, हा न्याय कुठला?

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

मृगजळामागे धावता धावता
दिला प्रारब्धाने, सुखद झटका

जसं धीरगंभीर होऊन पाहता
कळतो मला, तुझा राग लटका

@ *सागरराजे निंबाळकर*

आई बाबा अभंग

----- आई बाबा माझे -----

आई बाबा माझे । जगी नाही तोड
मुखी नाम गोड । सदोदित ।। १ ।।

त्यांची कृपाछाया । त्यांचेच संस्कार
होती सोपस्कार । बालपणी ।। २ ।।

त्यागाची महती । वात्सल्याचे शिल्प
आईस विकल्प । नाही कुठे ।। ३ ।।

समर्पण भाव । ज्याच्या ठायीठायी
माथा त्याच्या पायी । टेकवितो ।। ४ ।।

दोहोंविना माझे । जगणे निष्कर्म
करतो सत्कर्म । सेवेने मी ।। ५ ।।

जन्मोजन्मी लाभो । हेच आई बाबा
आयुष्याचा ताबा । त्यांच्याकडे ।। ६ ।।

अथांग सागरी । गवसली नाती
फुललेल्या वाती । तेजोमयी ।। ७ ।।

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, January 9, 2019

रोखून श्वास मी पेटणारी आग झालो
लढता लढता वादळाचा भाग झालो !! धृ !!

सूर माझे अताशा हे निनादू लागले
स्वर भेदणारे काळजावर डागले
मैफिलीत मी आळविणारा राग झालो !! १ !!

सोंग घेतलेल्याला कसे जागे करावे
प्रयत्नांची शिकस्त, तरी उणे ठरावे
कधी चांदणं कधी पहाट जाग झालो !! २ !!

कोडे आयुष्याचे कधी कुणास कळते
ठेच लागताच जखम भळभळते
रित्या ओंजळीने अमूल्यसा त्याग झालो !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

कधी कधी एकटं असण्याचा त्रास होतो
तेवढाच आल्हाददायी प्रवास होतो

Tuesday, January 8, 2019

चारोळी

मी ही पाहिलं होतं, एक स्वप्न........
तळपत्या उन्हात, थंडगार सावलीचं

कोणीतरी म्हंटलं हा खेळ मालमत्तेचा
त्यासमोर मोल नाही एका पावलीचं

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, January 7, 2019

चारोळी

साऱ्यांनाच कुठे जमतं मित्रहो
वीण मनाची, घट्ट करायला

बालपणी हे उमगत नव्हतं अन
आता वय नाही, हट्ट करायला

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

खोल मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी
आज मी, सहज डोकावून पाहिलं

आई नामाचा गुंजारव ऐकू आला
मन माझं, तिथेच गुंतून राहिलं

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, January 5, 2019

चारोळी

तशी, पाहतेस तू साधंसुधंच
तरीही काळजाला जातात चरे

जेव्हा कळालं तूही येतेस मैफिलीत
विचार येतो, स्वतःस गाळलेले बरे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

वेदनेने त्रस्त झालेलं नशीब
परिसंवादात चक्क भांडत होतं

अदखलपात्र गुन्हा होऊ नये म्हणून
कर्मही आपली बाजू मांडत होतं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

मोजक्यांनाच कळते डोळ्यांची भाषा
तुला कळाली सये, बरं वाटलं

हात तुझा हाती तप्त उन्हात पण
जणू पडलेलं चांदणं, खरं वाटलं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

तूच म्हणतेस ना मला लाजायला होतं
पाहिलं तू की काळजात वाजायला होतं

तशी साधीच आहे आपुली प्रेमकहाणी
पण ऐकली कोणी की गाजायला होतं

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, January 4, 2019

किरणप्रभा सूर्यग्रहण

जेव्हा चंद्र हा सूर्य पृथ्वीच्या मध्ये येतो
त्याला आपण सूर्यग्रहण नाव देतो

सूर्यग्रहणाचे हे तीन प्रकार खास
कंकणाकृती, खग्रास आणि खंडग्रास
देखावा आपणास तेजोवलयी नेतो

चंद्राच्या मागे जातो सूर्याचा काही भाग
दुर्बिणीने पहावा तो इवलासा डाग
खगोलप्रेमींच्या पर्वणीस पाविजेतो

ग्रहण म्हणजे सापेक्ष स्थानांचा खेळ
घालून मनाजोगा अंधश्रद्धांचा मेळ
वैज्ञानिक दृष्टिकोनास कवेत घेतो

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, January 3, 2019

चारोळी

नका करू पंचनामे, ह्या प्रेतांचे
मागवू नका, आत्महत्येचे पुरावे

घट्ट बिलगलेले हात पाहूनच कळतं
सहन झाले नसतील, प्रेमात दुरावे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

जाणार नव्हतो, तुला सोडून पण.....
माझा अगदीच नाईलाज झाला होता

नाही लढू शकलो मी, रूढी परंपरांशी
कारण सागर तुझा अगदीच भला होता

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

नभांगणाच्या सूर्य, चंद्र, ताऱ्यांनो
सांगा ना, कुठे हरवलंय माझं प्रेम

का होते दरवेळी, शिकार माझीच
का धरते नियती, माझ्यावरच नेम

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

एक संग्रह तर, सहज निघेल
आठवतात तुझे इतुके किस्से

प्रस्तावनेची भुरळ पडेल मनोगताला
अन होतील संग्रहाचे, वाचनीय हिस्से

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

जात होतो सहज, त्याच वाटेवरून
दृष्टीस पडले, तुझ्या पावलांचे ठसे

लागलीच निघालो, तिथे न थांबता
स्वतःला सोडवले आठवातून कसेबसे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

जावू नये कधीच कुणालाही
अर्ध्या वाटेत एकटं सोडून

हाती काहीच उरत नसतं
डाव असा सरसकट मोडून

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

ओठांची मिटून, घट्ट पाकळी
तुझं डोळ्यातून मंदमंद हासणं

जसं अनुभवण्या धुंद चांदरातीला
चांदण्यांचं चंद्राला लडिवाळ ग्रासणं

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, January 1, 2019

चारोळी

वाटतं, परवडतो वैरीही एकवेळ
छळून त्याला तू, नजरकैदेत नेला

आत्ता कुठे सुरू झालेला अध्याय
लागलीच त्यालाही कालबाह्य केला

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

खरंच केलास हात मैत्रीचा पुढे तर
का मग, वैऱ्याची भूमिका निभावतेस

जगतोय मी मुशाफिरांसारखं तरी
का सुखांना माझ्यापासून हिरावतेस

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

एवढ्यानेच येतो नात्यात दुरावा
आधी मी की, आधी त्याने बोलावं

कशाला हवेत हेवेदावे मित्रहो
द्वार हृदयाचं दोहोंनी खोलावं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

कशाला करू मोह मृगजळाचा
*हाती ज्याने काहीच उरत नाही*

काळजाचे पापुद्रे झालेले असतात
*ओठी मात्र, छे छे मी झुरत नाही*

@ *सागरराजे निंबाळकर*

आठवणी आजही येतात

--- *आठवणी आजही येतात* ---

वर्षामागून वर्षे सरत चाललीत
तिच्या आठवणी आजही येतात
गर्दीतही एकटं पडायला होतं मग
न जाणे, मला नेमकं कुठे नेतात?

आरोप प्रत्यारोप करावेत आता
असं नातं आमच्यात उरलेलं नाही
ठिसूळ झालंय झुरून झुरून तरी
बेवारस म्हणून, कदापि पुरलेलं नाही

विसरून जातो कधीकधी अगदीच
प्रश्न पडतो, हिला मी कुठे पाहिलं?
हतबल ही होतो, आठवून सारं
हातात माझ्या, असं काय राहिलं?

पुढे आलेलो असतो आयुष्यात
क्षण एखादा, पुन्हा मागे खेचतो
काही ओळी तिच्यासाठीच होत्या
का मग मी, शब्दफुलांना वेचतो?

दरवर्षी ठरवलेला असतो संकल्प
यंदा पुन्हा एकदा ठरवूनच टाकतो
छाटून टाकायचा तो वृक्ष मुळासकट
जो आठवणींच्या हिंदोळ्यांनी वाकतो

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

यंदाही नवीन वर्षाचं स्वागत
मला तसंच करावंसं वाटतं

जसं त्यागून लोभ, माया, मत्सर
सुखांना ओंजळीत भरावंसं वाटतं

@ *सागरराजे निंबाळकर*