Tuesday, August 31, 2021

एकांताची छटा

◼️ एकांताची छटा

एकांतात मज । स्फुरतात ओळी
होते जोडगोळी । अक्षरांची ।।१।।

एकांतात होते । चांगले चिंतन
स्थिरावते मन । एकाजागी ।।२।।

चारचौघांमध्ये । हसतो माणूस
गाळतो टिपूस । एकांतात ।।३।।

दुःख खूप जेव्हा । साचते मनात
वाटतो एकांत । जवळचा ।।४।।

एकांतात भेट । घेतात युगुल
होऊन मश्गुल । प्रेमामध्ये ।।५।।

मन थाऱ्यावर । जर का नसले
रडले, हसले । सारखेच ।।६।।

घेतली परीक्षा । एकांताने खूप
बदलून रूप । वेळोवेळी ।।७।।

रेखाटावी कशी । एकांताची छटा
सुख, दुखवटा । सारे त्यात ।।८।।

एकांत म्हणजे । अदृश्य वावर
अथांग "सागर" । भावनांचा ।।९।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

आयुष्य म्हणजे

◼️आयुष्य म्हणजे..

जमेल तेवढे । मजेत राहावे
नको हेलकावे । चिंतेमध्ये ।।१।।

आयुष्य म्हणजे । वेलांटी, उकार
मात्रा, अनुस्वार । सत्कर्माचा ।।२।।

वास्तव जगावे । नको बडेजाव
बुद्धीचा अभाव । दाखवी जो ।।३।।

करायचे आहे । म्हणोनिया केले
सारे व्यर्थ गेले । असे नको ।।४।।

व्हावयाचे जे-जे । होतच असते
थांबत नसते । कधी काही ।।५।।

करू नये कधी । फळाची लालसा
दावी जे आरसा । स्वीकारावे ।।६।।

प्रपंच म्हणजे । नागमोडी घाट
"सागराची" लाट । वर खाली ।।७।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, August 30, 2021

तपासून घ्यावे

◼️तपासून घ्यावे

कुणी काय केले । नको हा विचार
मनाचा विकार । होतो मग ।।१।।

जर होत गेले । मनाजोगे सारे
वाहतील वारे । हवे तसे? ।।२।।

कराव्यात गोष्टी । दुर्लक्षित काही
नाही जरासाही । राम ज्यात ।।३।।

किमान एकदा । तपासून घ्यावे
मग व्यक्त व्हावे । संयमाने ।।४।।

नको आहे जर । पदोपदी ठेच
सोडवावा पेच । चातुर्याने ।।५।।

दृष्टीस पडता । आशेचा किरण
कराव्या दहन । शंका साऱ्या ।।६।।

भरती-ओहोटी । "सागराचा" खेळ
ठराविक वेळ । चालणारा ।।७।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

केल्यानेच होते

◼️केल्यानेच होते

एका पारड्यात । तोलू नये कधी
मिळणारी संधी । दरवेळी ।।१।।

होते कष्टामुळे । प्रयत्नांचे चीज
संचारता वीज । उत्साहाची ।।२।।

कच खाण्यापूर्वी । करावा विचार
पत्करावी हार । त्यानंतर ।।३।।

कधी सुख तर । कधी दुःख येते
अनुभूती देते । संघर्षाची ।।४।।

केल्यानेच होते । साध्य खूप काही
मार्ग कोणताही । नाही सोपा ।।५।।

खोल खूप आहे । सुखाचा "सागर"
फक्त वरवर । पोहा त्यात ।।६।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Sunday, August 29, 2021

निखळले मोती

---- निखळले मोती ---

आपलासा वाटत असताना
क्षण निसटून जातो हातून
वरवर भक्कम दिसणारा
तुटलेला असतो आतून

चिंतेपायी तोल घसरतो
नकळत, कठोर होते वाणी
सहज मग निघून जातं
डोळ्यातून नितळ पाणी

लाही लाही काळजाची
जाणवती ग्रीष्माच्या झळा
हेच कारण असावं बहुदा
त्याला लावेना कुणी लळा

थेंब टपोरे विरहाचे
झोडपून काढती काया
हात सोडता कुणीच नाही
डोळ्यांवर करण्या माया

मुक्कामाची इच्छा असताना
सुख, निरोप घेऊन जातं
पाहुण्यापरीच ते शेवटी
जरी, घनिष्ट असलं नातं

परतून येईल कधीतरी
मज आस एवढी होती
जप करताना निखळले
मालेतून सारे मोती

@ सागरराजे निंबाळकर

नंदलाला

🔰 नंदलाला..

द्वापारयुगात । जन्म त्याचा झाला
श्याम नंदलाला । यशोदेचा ।।१।।

केले लाख यत्न । घेण्या त्याचे प्राण
आठवे संतान । देवकीचे ।।२।।

गोंडस सावळा । अति सुकुमार
आहेत अपार । लीला त्याच्या ।।३।।

कैक नावे त्याची । गोपाल, केशव
मुरारी, माधव । वासुदेव ।।४।।

कर्ण सुमधुर । ऐसा त्याचा पावा
लाभतो विसावा । ऐकताना ।।५।।

चालविला त्याने । अर्जुनाचा रथ
सन्मार्गाचा पथ । दाखवाया ।।६।।

महाकाव्य दावी । विष्णू अवतार
दैत्यांचा संहार । करावया ।।७।।

कृष्णाचे चरित्र । लिहितात व्यास
शब्द शब्द खास । गीता ऐसी ।।८।।

गोकुळाचा गर्व । अध्यात्माचा पर्व
लीन जेथे सर्व । कृष्ण माझा ।।९।।

🔰 सागरराजे निंबाळकर

श्रावण हिरवा

-----   श्रावण हिरवा   -----

पंचांगानुसार । महिना पाचवा
श्रावण हिरवा । चोहीकडे ।।१।।

ऊन-पावसाचा । घालूनिया मेळ 
चालतसे खेळ। सरींमध्ये ।।२।।

असते कोवळे । श्रावणाचे ऊन
जरा जवळून । झेला तया ।।३।।

स्वार्थ-परमार्थ । साधणारे व्रत
चाले अविरत । श्रावणात ।।४।।

श्रावण मासात । होऊ पुण्यवान
करूयात दान । गरिबांना ।।५।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

हीच करुण कहाणी

सुख असो वा दुःख
डोळ्यात तरळते पाणी

कुचंबलेल्या भावनांची
असते हीच करुण कहाणी

😇 सागरराजे निंबाळकर

Saturday, August 28, 2021

सारे हरजाई

ना "दिप" जला ठीक से
ना "रोशनी" मेरे काम आयी

किसी एक से क्या ख़फ़ा होना
जब हो, सारे के सारे हरजाई

🔰 सागरराजे

Thursday, August 26, 2021

कळेल नंतर

🔰 कळेल नंतर..

तिला आता पूर्वीसारखी
माझी गरज नाही राहिली
कुण्या त्रयस्थाकडून नव्हे
गोष्ट ही, मी स्वतः पाहिली

हळूहळू का होईना, पण
नात्यात तिने, वाढवलं अंतर
काय कमावलं, काय गमावलं
तिचं तिलाच, कळेल नंतर

ना रुसवा, ना फुगवा
ना आता, तक्रार काही
दुःख विरहाचं यापुढे
मी सोसणार नाही

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, August 25, 2021

हेच राहील खरं

बिनकामाच्या गोतावळ्यापेक्षा
कधीही, एकटं राहिलेलं बरं

कितीही नाकारलं तरी, राजे..
हेच होतं, हेच राहील खरं

🔰 सागरराजे निंबाळकर

Tuesday, August 24, 2021

अबोल्याचं कोडं

🔰 अबोल्याचं कोडं

काही बोलायच्या आधी
माझं, ऐकून घे थोडं
नाही सुटत सहज
कधी अबोल्याचं कोडं

गुंता झाला खरा, पण..
आता सोडवाया हवा
सुरू करण्या परत
भाग संवादाचा नवा

😊 सागरराजे निंबाळकर

Friday, August 20, 2021

ही खंत ना एकट्याची

🔰 खंत ना एकट्याची

दिवसागणिक साठवलेले
मनात असते बरेच काही
लाख प्रयत्नांती सुद्धा
जे ओठांवर येत नाही

ही "खंत" ना एकट्याची
प्रत्येकजण जातो यातून
चेहरा पडतो कुणाचा, तर..
कुणाला पोखरते आतून

सहन करत वेदना लाखो
स्मित ओठांवर ठेवतो
हलका का होईना, जेव्हा
किरण आशेचा तेवतो

प्रतिकूल परिस्थितीतही
नेटाने, जमून येते सारे
मात्र, त्यासाठी अगोदर हाती
घ्यावे लागतात निखारे

इच्छा जर असेल दांडगी
जलमय होते शुष्क सरोवर
ठरवता आले पाहिजे फक्त
ज्याचे त्याला चूक, बरोबर

😊 सागरराजे निंबाळकर

Thursday, August 19, 2021

खो देऊन गेला वारा..

कधी न कळले कसा अचानक
खो देऊन गेला वारा

धावत सुटल्या आठवणी मग
गतकाळामागे दुबारा

😇 सागरराजे निंबाळकर

वाहून जातात अश्रू..

कधी वाहून जातात अश्रू
तर कधी डोळ्यातच साचतात

कौतुक त्यांचं व्हायलाच हवं
जे घालमेल ही सहज वाचतात

😊 सागरराजे निंबाळकर

Tuesday, August 17, 2021

तितका मजेत नाही

🔰 तितका मजेत नाही..

हल्ली मला कुणीही समजून घेत नाही
मी वाटतोय जितका तितका मजेत नाही

पादाकुलक असो वा सारंग, मंजुघोषा
गझलेत मी भरीचा संकेत देत नाही

जीवन जगा मजेने घेताय श्वास जोवर
नियती कधीच काही सांगून नेत नाही

साकीस दुःख माझे कळते म्हणून जातो
बाकी तसा पिण्याचा रंगीन बेत नाही

ज्या मैफलीत "सागर" रमलो अफाट आपण
त्यासारखी मजा या शाही सभेत नाही

🔰 सागरराजे निंबाळकर

दौत पांडुरंग माझा

-- दौत पांडुरंग माझा --

कधी आसूड ओढते
कधी माया हळुवार
खचलाच धीर कधी
देते लेखणी आधार ।।१।।

लेखणीच्या बळावर
कैक शिखरे गाठली
उंची माझ्या अक्षरांची
इंचा-इंचाने वाढली ।।२।।

जर वाटले एकटे
तीच येते सोबतीला
कशा वर्णाव्या शब्दात
तिच्या अगणित लीला ।।३।।

आज आहे जे-जे काही
लेखणीची देण सारी
"दौत" पांडुरंग माझा
"टाक" पंढरीची वारी ।।४।।

ऋण माझ्या लेखणीचे
कधी फिटणार नाही
माझ्या डोईवर तिचा
आशीर्वच बारमाही ।।५।।

@ सागरराजे निंबाळकर, ठाणे

टीप :- "टाक" म्हणजे लाकडी लेखणी

Saturday, August 7, 2021

जखम प्रवाही

वृत्त :- जलौघवेगा

लगालगागा लगालगागा

🔰 जखम प्रवाही..

कुणास कळते कुणास नाही
अशीच असते जखम प्रवाही

पडेल जे-जे करेन सारे
हळूच मागे करून बाही

कुठेच नाही निभाव माझा
कुणास देऊ उगाच ग्वाही

सदैव जगतो हसतमुखाने 
म्हणून भरल्या सलग इजाही

जबाबदारी जिच्या शिरावर
उसंत द्यावी जरा तिलाही

तसाच आहे उभा जरी तो
गळून पडले बरेच काही

कधीच सोडू नकोस 'आशा'
मिळेल 'सागर' 'किरण' तुलाही

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर