कवी सागरराजे निंबाळकर
लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
Monday, July 21, 2025
मोडके घरदार आहे
मोडके घरदार आहे
फाटका संसार आहे
साजरा करतो न कोणी
तोच मी सणवार आहे
पाहता घायाळ होतो
ती असा शृंगार आहे
चूल झाली वेगळी अन्
पेटला परिवार आहे
राहतो डोईवरी जो
बाप तो आधार आहे
पावसाळा वाटतो पण..
आसवांची धार आहे
काळजावर तू दिलेला
घाव हिरवागार आहे
~ सागरराजे निंबाळकर
वाट कुठली चालतो
वाट कुठली चालतो आहोत आपण
का चुकीचे वागतो आहोत आपण
शांतता नांदायची जेथे सुखाने
आज तेथे भांडतो आहोत आपण
लावण्यासाठी दिवा वंशावळीचा
कैक वाती जाळतो आहोत आपण
जो विठू वसतो तुझ्या माझ्यात वेड्या
त्या विठूला शोधतो आहोत आपण?
लाल आहे रक्त सगळ्यांचे तरीही
वेगळे का? वाटतो आहोत आपण
थांबणे एकाठिकाणी शक्य नाही
रोज इतके धावतो आहोत आपण
हात हलवत यायचे अन् जायचेही
काय मागे ठेवतो आहोत आपण?
~ सागरराजे निंबाळकर
गोठून थेंब गेले
गोठून थेंब गेले डोळ्यांत आसवांचे
झालेत लाड माझ्या हातून यातनांचे
असली जरी कितीही सोज्ज्वळ दिसायला ती
उध्वस्त फार केले जीवन तिने मुलांचे
होतेय वाढ झटपट इतकी कशी कळेना
आहे तरी कितीसे आयुष्य वेदनांचे
छळतो मनास माझ्या हा प्रश्न एवढा की..
जाळून कोण जातो घर रोज सावल्यांचे
करतो गुन्हा खुल्याने जामीन घेत सुटतो
उरले न भय कुणाला सज्ञान कायद्यांचे
झाला क्षणात नाही खारट उगाच सागर
केलेत रोज प्राशन अश्रू नद्या-नद्यांचे
~ सागरराजे निंबाळकर
उत्तरे देशील का
उत्तरे देशील का सगळी खरी
कोणताही आळ मग आला तरी
घेतले असते जगाशी वैर मी
प्रेम जर असते तुझे माझ्यावरी
एकदा का संपली एकादशी
विठ्ठला तू कोण? कुठली पंढरी
तोडण्यासाठी प्रथांची साखळी
एकदा ओलांड तू ही पायरी
देव सगळ्यांना हवे असतात पण..
जायचे नसते कुणा देवाघरी
~ सागरराजे निंबाळकर
लाल आहे रक्त
लाल आहे रक्त सगळ्यांचे तरी
का मिटेना जात धर्मांची दरी
थोपवू अश्रू कसे मी आज हे?
लाडकी माझी निघाली सासरी
राधिका झालीस माझी तू प्रिये
पण.. मला होता न आले श्रीहरी
आसवांना वाट थोडी देत जा
एवढी घुसमट अशी नाही बरी
प्रश्न होते खूप सोपे अन् सरळ..
उत्तरे तू टाळली सगळी खरी
मेणबत्त्या नेहमी का जाळतो
एकदा पेटव मशालींना घरी
~ सागरराजे निंबाळकर
Thursday, July 10, 2025
जडलाय जीव माझा
जडलाय जीव माझा बागेतल्या फुलावर
ग़ज़लेत शेर काही सुचतात रोज ज्यावर
डोळ्यांत डांबलेले होते बरेच अश्रू
सुटकेस पात्र झाले दुःखास भोगल्यावर
कंपूत दाद त्यांच्या मिळणे अशक्य आहे
त्यांच्यातल्या गुरूचा गंडा न बांधल्यावर
शंका चुकूनसुद्धा घेऊ नकोस आता
देऊन हात हाती विश्वास ठेवल्यावर
झाली मुकी नि बहिरी नाती क्षणात सारी
नाणी खिशातली या जोरात वाजल्यावर
आले भरून डोळे आनंद फार झाला
स्वप्नातल्या घराला प्रत्यक्ष पाहिल्यावर
जाईल "मी"पणाची वरच्या स्वरात बाधा
दिवसागणिक स्वतःचे गुणगान गायल्यावर
~ सागरराजे निंबाळकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)