Friday, December 31, 2021

ओळी अशा

कारणच नाही म्हंटल्यावर
तक्रारी कुठे उरतात

ओळी अशा तोडक्यामोडक्या
मला कधीतरी स्फुरतात

🌿 सागरराजे निंबाळकर

Sunday, December 26, 2021

उरला न वाली

🎯 उरला न वाली

झळा ग्रीष्माच्या झेलून
काया कणखर झाली
सुख-दुःख सांगावया
कुणी उरला न वाली

चोहीकडे फिरूनही
कुठे दिसेना वसंत
घेता आला न जवळ
जेव्हा पडला पसंत

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, December 24, 2021

मातीमध्ये

▪️मातीमध्ये शेवट होतो

आधार हवा होता जेव्हा
तेव्हाच तिने, पाठ फिरवली
सल छोटीशी, असेल ही पण..
दिमाखात मी, रोज मिरवली

कळेना मला, कुणास दावू
जखम आतली, भळभळणारी
कुठे राहिली, "जमात" शिल्लक
दुःख पाहून, हळहळणारी

साद दिली मी, ज्याला-ज्याला
हासून फक्त, निघून गेले
तहानलेले, विहंग सारे
कोण कसा मग, भरेल पेले

जमवली जरी, लाख संपदा
मातीमध्ये, शेवट होतो
माहीत जरी, आर्यसत्य हे..
गुरफटलेला, आहे जो-तो

🎯 सागरराजे निंबाळकर

Wednesday, December 22, 2021

आपापला प्रांत

▪️आपापला प्रांत..

घासातला घास । देता येतो ज्याला
ज्ञात खरी त्याला । माणुसकी ।।१।।

आधार शब्दांचा । फक्त धीर देतो
तात्पुरता नेतो । शांततेत ।।२।।

प्रवास सोबत । हातामध्ये हात
तीच खरी साथ । संकटात ।।३।।

कळतो माणूस । संकटात खरा
आटताना झरा । मदतीचा ।।४।।

जो जसा वागेल । तसा प्रतिसाद
खोटा आशावाद । नको उगा ।।५।।

जमाना भल्याचा । उरलेला नाही
माया, प्रेम काही । कुठे आहे? ।।६।।

गोतावळ्यापेक्षा । चांगला एकांत
आपापला प्रांत । पाहू आता ।।७।।

🎯 सागरराजे निंबाळकर

Tuesday, December 21, 2021

सुख म्हणजे काय असतं

▪️सुख म्हणजे नक्की काय असतं?

सागर सुख आणि दुःख नेमकं कसं सांगता येईल रे?

स्नेहा विचारत होती.

"सुख" ही जाहीर सभा आहे तर "दुःख" निवडणूक.

सभेत लाखोंची गर्दी होते पण प्रत्यक्ष निवडणूकीत मतदान किती असतं हे सांगायची आवश्यकता आहे का..?

सागर सांगत होता..

🎯 सागरराजे निंबाळकर

गाऱ्हाणं

▪️गाऱ्हाणं..

"काय रे शैलेश, एरव्ही तुझ्या रचनांवर भरभरून बोलणारे आज अगदी शांत का होते?"

सुयशने विचारलं.

यावेळी मी गाणं नाही "गाऱ्हाणं" मांडलं होतं !

शैलेश उत्तरला..

🎯 सागरराजे निंबाळकर

Saturday, December 18, 2021

पहिला नमुना

दार मोडकं, गळकं छप्पर
डोळ्यामध्ये, गंगा-यमुना

धुंदीमधल्या, दुःख सरींचा
असाच असतो, पहिला नमुना

▪️सागरराजे निंबाळकर

Friday, December 17, 2021

गोडवा हवा

पुढे जायचे असल्यास मुखी गोडवा हवा
याच कारणे शोधत आहे मी मार्ग नवा

"कळपात रहा" सुचवले मला ज्याने-त्याने
उठता-बसता मिळते जिकडे फुकट वाहवा

कविता लिहिल्या लिहिल्या गझला जमतील तशा
मनात स्मरून कधी सूर्य तर कधी चांदवा

उपासमारी कायम असते नशिबी माझ्या
भुकेवर पुन्हा बोलू.. सध्या, दिवे मालवा

विकला आहे ऐंशी टक्के देश तसाही
त्यावर फतवा लाज स्वतःची स्वतः वाचवा

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, December 13, 2021

भोळे शंकर

"उमा" मी, तुम्ही.. भोळे "शंकर""
तुम्हीच "श्रद्धा" तुम्हीच ईश्वर

गोकुळ होते चक्क झोपडी
लेक धावते जेव्हा घरभर

बाप आतून शहाळ असतो
वाटला जरी वरून कणखर

सिंचन केले घामाचे मी..
असेच नाही फुलले वावर

हलका-फुलका कुणीच नाही
असते ओझे.. प्रत्येकावर

हसली जाई, लाजली जुई
हात तिचा मी मागितल्यावर

विकार जडतो मधुमेहाचा
प्रमाणात जर नसली "साखर"

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Saturday, December 11, 2021

राया

▪️कुडी नि पैंजण आणा राया..

नका दाखवू, खोटी माया
कुडी नि पैंजण, आणा राया ।।धृ।।

सांजसकाळी, झुरते दारी
कुठे हरवली, आहे स्वारी
दर्शन तुमचे, होण्या स्वामी
शोधत असते, युक्ती नामी

खुल्या मनाने, निवांत अगदी
बसा मंचकी, मज ऐकाया ।।१।।

लाजेने मी, किती अवघडू
हात राजसा, नका न पकडू
येईल कुणी, सोडा ना मज
उगा हेरता, अलगद सावज

बरी नव्हे ही, घाईघाई
ठेवा संयम, प्रेम कराया ।।२।।

घडायचे जे, घडून जाते
भक्कम राहो, अपुले नाते
उमा मी, तुम्ही.., भोळा शंकर
हवाय मजला, गणेश लवकर

संकटातही, टिकून राहू
शिरी असू दे, तुमची छाया ।।३।।

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

प्रत्येकाची अडचण

पहिली ओळ
पादाकुलक - १६ मात्रा [८+८]

दुसरी ओळ 
शुद्धसती - १२ मात्रा [८+४]

▪️प्रत्येकाची अडचण..

नाइलाजात, एक पाऊल
असे उचलले गेले
दुखवत ज्याने, नातीगोती
खूप दूरवर नेले

संघर्षाची, साथ लाभली
चढ-उतारही आले
एकाजागी, विसावल्याने
चिंतन बरेच झाले

प्रश्नचिन्हात, गुरफटलेली
अंतरातली गडबड
तोल नव्याने, सावरताना
पुन्हा एकदा पडझड

अशीच असते, थोडी-थोडी
प्रत्येकाची अडचण
कधी दुःख तर.., कधी खुल्याने
आनंदाची उधळण

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Thursday, December 9, 2021

मुक्या व्यथांना

▪️मुक्या व्यथांना..

व्यथा बदलते, रूप नेहमी
कधी निरूत्तर, कधी बोलकी
भोई पुरता, खचून गेला
इतकी अवजड, नको पालखी

भेद असावे, हलके-फुलके
नको खोलवर, कृष्ण सावली
प्रश्न शेवटी, सतावतो मग..
दृष्ट सुखांना, कुणी लावली

काय करावे, कसे करावे
प्रश्न जरी हा, ज्याचा-त्याचा
नकळत होतो, उद्रेक आणि..
मुक्या व्यथांना, फुटते वाचा

सोपे करून, सहज ओळखा
मनात आहे, काय नेमके
भेद पडतील, गळून सारे
दिसू लागेल, एकसारखे

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Wednesday, December 8, 2021

द्वार मनाचे

▪️द्वार मनाचे..

सरले अंतर, नकळत अवघे 
प्रवास सारा, मजेत झाला 
आठवणींनी, भरून ओंजळ
कुबेर डोलत, कुठे निघाला

हाक मारली, तरी न त्याने
कधी पाहिले, फिरून मागे
जाता-जाता, करून गेला
निपचीत पुन्हा, नशीब जागे

द्वैत म्हणू की, चंचलतेचा
शाप भोगतो, निर्मळ वारा
क्षणात इकडे, क्षणात तिकडे
एकाजागी, नाही थारा

असो ! नव्याने, जाऊ चालत
यात्री आपण, या विश्वाचे
गाठीभेटी, सहज होतात
खुले ठेवता, द्वार मनाचे

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, December 2, 2021

उतराई होऊ कसा

🌺 उतराई होऊ कसा..

तुझ्या मायेची सावली
दाह संपवते सारा
वाटे, तुझ्या पोटी आई
जन्मा यावे मी दुबारा

तूच देवकी, यशोदा
तूच विठू, रखुमाई
उतराई होऊ कसा..
तुझ्या ऋणातून आई

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Wednesday, December 1, 2021

द्यावे झोकून

🌺 द्यावे झोकून..

लाख येवो अडसर
चालू ठेवावी प्रगती
स्वयं परीक्षण होता
गुंग होत नाही मती

खेळ यशापयशाचा
चालू असतो नेहमी
द्यावे झोकून स्वतःला
काही पडू नये कमी

🌿 सागरराजे निंबाळकर