Tuesday, February 23, 2021

हायकू

फिरले पक्षी
घरट्यात माघारी
पुन्हा तयारी

दगडावर
कोरलेली निशाणी
डोळ्यात पाणी

निसटतात
आयुष्याचे तराणे
वाळूप्रमाणे

आभाळमाया
शेतातल्या पिकांची
नांदी सुखांची

▪️सागरराजे निंबाळकर

Sunday, February 21, 2021

संचय, अपव्यय

➖➖ *विचारधन - ७६* ➖➖

ज्या-ज्या गोष्टींचा आपण 'संचय' करत आहोत त्या कालांतराने 'अपव्यय' होणार नाहीत याची काळजी घेणे म्हणजे 'अचूक निर्णयक्षमता'.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, February 20, 2021

बाकी काही नाही

वृत्त :- श्रीलीला

गागागा गागागा गागागा गागागा

▪️बाकी काही नाही...

जमलं तर ये राणी, बाकी काही नाही
गाऊ आपण गाणी, बाकी काही नाही

होतो नात्यामध्ये गुंता जेव्हा-जेव्हा
सांभाळावी वाणी, बाकी काही नाही

हसतो तो दिवसा पण.. छळते त्याला रात्री
डोळ्यामधले पाणी, बाकी काही नाही

कळतो उबदारपणा मायेचा अपुल्या पण..
बोलत नाही प्राणी, बाकी काही नाही

व्यापारी नोटांच्या गर्दीमध्ये 'सागर'
हरवत गेली नाणी, बाकी काही नाही

▪️सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

बारीक गोष्टी, आघात मोठा

➖➖ *विचारधन - ७५* ➖➖

'बारीक-सारीक' गोष्टीच काळजावर 'मोठा आघात' करून जातात !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, February 18, 2021

जेवढं वेचू तेवढंच ओंजळीत पडेल

➖➖ *विचारधन - ७३* ➖➖

जेवढं तुम्ही 'वेचाल', तेवढंच तुमच्या 'ओंजळीत' पडेल !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, February 17, 2021

युती, कुटनीती

➖➖ *विचारधन - ७२* ➖➖

जेव्हा 'युती'मध्ये 'कुटनीती' येते तेव्हा 'रणनीती' आखण्याऐवजी तिथून वेगळं होण्याच्या प्रक्रियेला 'गती' देणं हितावह ठरतं.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Tuesday, February 16, 2021

निराकरण, अनुकरण

➖➖ *विचारधन - ७१* ➖➖

जी व्यक्ती कोणत्याही शंकेचं 'निराकरण' करण्याची क्षमता ठेवते तिचं 'अनुकरण' करायला काहीच हरकत नाही.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Monday, February 15, 2021

खेळ राबत्याचा

▪️खेळ राबत्याचा...

पेरता आले न मजला चार दाणे
ऐनवेळी घात केला पावसाने

जीवनी जर पेच पडला उत्तरांचा
सोडवावे प्रश्न सारे संयमाने

शेंदराचे दगड गोटे बाटले अन्
होत गेला घात नकळत आकसाने

होत नाही ध्येय प्राप्ती फक्त धावुन
सिद्ध केले जिंकणाऱ्या कासवाने

काय कामाची इथे ही यंत्र इतुकी
माणसाला गाळले जर माणसाने

ठेंगणे झाले खरोखर मेघ सारे
गोड पापा मज दिल्यावर नातवाने

खेळ आहे सर्व 'सागर' राबत्याचा
होत नाही गझल केवळ काफियाने

▪️सागरराजे निंबाळकर

आवाका आणि पसारा

➖➖ *विचारधन - ७०* ➖➖

'आवाका' आणि 'पसारा' यातला फरक ज्याला कळतो तोच खरा 'जबाबदार' आणि 'यशस्वी' !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, February 14, 2021

आहारी गेलं की जिव्हारी लागतं

➖➖ *विचारधन - ६९* ➖➖

आपण ज्या गोष्टीच्या 'आहारी' जातो तीच कालांतराने 'जिव्हारी' लागते.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, February 13, 2021

जशास तसे

➖➖ *विचारधन - ६८* ➖➖

सगळीकडे प्रेमाने, नम्रतेने वागून चालत नाही. जिथे आवश्यकता आहे तिथे 'जशास तसं' वागलंच पाहिजे.

समोर वाघ उभा असताना त्याला सोन्या, राजा म्हणून गोंजारायला गेलात तर काय होईल वेगळं सांगायला नको !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Friday, February 12, 2021

दबावाखाली केलेलं काम

➖➖ विचारधन - ६७ ➖➖

दबावाखाली येऊन केलेलं काम आणि बेइमानी करून मिळवलेलं इनाम मनःशांती देत नाही.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, February 10, 2021

बेड्या

▪️बेड्या

एकटाच आलास जगी तू
एकट्यालाच जायचंय वेड्या
का मग विनाकारण पायात
तू अडकवून घेतोस बेड्या

कोणी न ठेवेल स्मरणात
तुझी चार दिसांची मुशाफिरी
वरवरची वाटत असली जरी
शोकांतिका ही आहे गहिरी

सुख, समाधान शोधावं लागतं
दुनिया दुःख न मागताही देते
आलीच दया तर देते दिलासाही
पण त्यावरही दुपटीने व्याज घेते

ठरव अता तुझं तूच वेड्या
जगी या नेमकं काय करायचं
रंगवायची रांगोळी ठिपक्यांची की
शिल्प कोरून वेगळं ठरायचं

▪️सागरराजे निंबाळकर

Tuesday, February 9, 2021

लपलेले अश्रू

पापण्यांआड लपलेले अश्रू
सख्या तुला दिसलेच नाही

याहून वेगळं कारण दुराव्याचं
खरंच तुला हवंय काही?

▪️सागरराजे निंबाळकर

Sunday, February 7, 2021

गुण आत्मसात करता आले पाहिजेत

➖➖ *विचारधन - ६५* ➖➖

एखाद्या गुणवंत व्यक्तीच्या शेजारी दिवसरात्र बसलं म्हणजे त्याच्यातले सगळे गुण आपल्यात उतरले हा अनेकांचा गोड गैरसमज असतो.
बसून उपयोग नाही, ते गुण आत्मसातही करता आले पाहिजेत.

फक्त बसून होत असतं तर तळ्यात बगळ्यांच्या शेजारी कावळेही दिसले असते..

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, February 6, 2021

का शिकावी आणि लिहावी गझल?

▪️का शिकावी आणि लिहावी गझल?

१) गझल हा गेय काव्यप्रकार असल्याने ती वाचून सादर करा किंवा गाऊन सादर करा ती छानच वाटते.

२) गझल या काव्यप्रकारात वृत्त आणि मात्रा सांभाळाव्या लागतात. परिणामी आपल्याला अचूक शब्द योजण्याचा व्यासंग जडतो ज्यामुळे आपल्या शब्दसंपदेत कमालीची वाढ होते.

३) एक गझल पूर्ण होण्यासाठी किमान सहा काफिया म्हणजेच यमक आवश्यक असतात. सहा यमक निवडायचे असल्यामुळे आपल्याला उत्तम यमकांची निवड करता येऊ लागते. आणि जेव्हा आपल्याला चांगले यमक निवडणं जमतं तेव्हा आपली चारोळी असो किंवा कविता असो ती कमालीची उंची गाठते.

४) गझल या काव्यप्रकारात अलामत म्हणजेच गीताच्या भाषेत यती सांभाळावी लागते.
यती म्हणजे वाचताना, गाताना ज्या शब्दांवर थांबावं लागतं ती जागा.

नेमकं कुठे थांबायचं हे जेव्हा आपणास कळतं तेव्हा आपलं सादरीकरण हे उत्कृष्ट दर्जाचं होतं यात काही दुमत नाही.

५) गझल लिहिण्याचं तंत्र आपण महिनाभरात शिकू शकतो परंतु आशयघन शेर सहजासहजी लिहिता येत नाही.
शेरातला आशय कसा चांगला होईल यासाठी आपण चिंतन करायला लागतो. परिणामी आपली प्रत्येक रचना ही तावून-सुलाखून लिहिली जाते.

आणि तावून-सुलाखून आलेली प्रत्येक गोष्ट कशी असते हे वेगळं सांगण्याची आवश्यकता वाटत नाही...

६) गझलेतला प्रत्येक शेर ही दोन ओळींची स्वतंत्र कविता असते.

जेव्हा आपण दोन ओळीत संपूर्ण कविता मांडण्याचं कसब अवगत करतो तेव्हा आपण आशयसमृद्ध होत आहोत असं समजायला हरकत नाही.

७) गझलेत मुसलसल आणि गैर मुसलसल असे दोन प्रकार असतात. पैकी गैर मुसलसल म्हणजे प्रत्येक शेरात वेगळा आशय.

याचा प्रमुख फायदा म्हणजे एकाच गझलमध्ये आपण वेगवेगळा आशय असणाऱ्या पाच कविता लिहू शकतो.

८) आपण जेव्हा कविता सादर करतो तेव्हा शक्यतो कविता संपल्यावर किंवा एखादी ओळ आवडलीच तरच रसिक श्रोत्यांमधून टाळी येते.

परंतु गझलेत असं नाही.
प्रत्येक शेरामागे टाळी येण्याची दाट शक्यता असते.

आता काहींना वाटेल की टाळी मिळते म्हणून गझल हा काव्यप्रकार निवडायचा का? 

तर तसा दृष्टिकोन न ठेवता गझलेमुळे आपणास रसिकांच्या जवळ जाण्याची संधी अनेकदा मिळते हा दृष्टीकोन ठेवावा.

▪️मी कोणी मोठा गझलकार नाही. शिवाय कविता आणि गझल यात भेद करण्याचाही कोणता मानस नाही.

मी अजूनही गझल शिकतो आहे.
ती शिकत असताना मला आवडलेले मुद्दे मांडले आहेत.
इच्छुकांनी गझल अवश्य शिकावी 👍🏻

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

मर्म कळणे हेही नसे थोडके

➖➖ *विचारधन - ६४* ➖➖

एखादी गोष्ट जेव्हा आपण इतरांना सांगतो तेव्हा ती पूर्णपणे आत्मसात करत असू तर आनंदच आहे. पण, नसलो करत तरी त्यामागचं मर्म कळलेलं असतं हेही नसे थोडके !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Thursday, February 4, 2021

निवृत्तीचा उंबरठा

▪️निवृत्तीचा उंबरठा

आधी 'लेक' मग 'नात'
घट्ट धरते अंगठा
भाळी नसतो 'बाईच्या'
निवृत्तीचा उंबरठा

देव मानून पतीला
सेवा अखंड करते
लेकरांच्या पायदळी
पान होऊन गळते

कधी राधा कधी मीरा
कधी नाव रखुमाई
उभी आहे युगेयुगे
एका विटेवर बाई

सारं पेलते खुबीने
तोल कधी ना ढळतो
त्रास अंतरी होणारा
तिचा तिलाच कळतो

एकदाच तिच्या जागी
पाहू स्वतःला ठेवून
काही क्षण का असेना
पण निवृत्ती देऊन

▪️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

मदत, पत, दुमत

➖➖ *विचारधन - ६३* ➖➖

न मागताही प्रत्येकाला सढळहस्ते केलेली 'मदत' समाजात आपली 'पत' वाढवते यात काहीच 'दुमत' नाही !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

माघार आणि हार यातला फरक

➖➖ *विचारधन - ६२* ➖➖

'चूक नसतानाही' घेतलेली 'माघार' आणि 'रणांगणात' शस्त्र असूनही पत्करलेली 'हार' दोन्ही नुकसानदायक.

एकीकडे स्वाभिमान दुसरीकडे प्राण जातो !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Wednesday, February 3, 2021

माझे-तुझे

उला मिसरा ज्येष्ठ गझलकार दिवाकर वैशंपायन यांच्या एका गझलेतून

(माझे-तुझे, माझे-तुझे करण्यात गेला जन्म हा)
सोडून सारे जायचे कळण्यात गेला जन्म हा

मी भोगले जे दुःख ते सांगू कुणाला, अन् कसे
एका विचाराने अशा झुरण्यात गेला जन्म हा

रेखाटले हे चित्र मी मजला हवे होते तसे
पण, रंग द्यावा कोणता सुचण्यात गेला जन्म हा

ओलांडला मी उंबरा ना पाहिले मागेपुढे
बेड्या तरी पायातल्या सुटण्यात गेला जन्म हा

आयुष्य सारे मांडले कवितेत मी तात्काळ पण
साध्यातली साधी गझल लिहण्यात गेला जन्म हा

▪️ सागरराजे निंबाळकर

Monday, February 1, 2021

मराठीचा पुळका

मराठीचा ध्यास (पुळका) घेतलेले खरंच मराठमोळे आहेत का?

     *लेख अगदी बेधडक पद्धतीने लिहिला आहे त्यामुळे ज्याला पटेल केवळ त्यानेच प्रतिसाद द्यावा. अन्यथा वाचून सोडून दिला तरी चालेल.*

     मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, महाराष्ट्रात सगळीकडे मराठी भाषाच बोलली जावी असं बऱ्याच वर्षांपासून ऐकतोय. त्यात काहींना बर्‍यापैकी यश आलं देखील परंतु अजूनही पूर्णतः हा संकल्प सिद्धीस गेलेला नाही.

हे शिवधनुष्य पेलणे एकट्यादुकट्याचं काम नाही हे सर्वांनी मिळूनच केलं पाहिजे तेव्हाच साध्य होईल याची मला कल्पना आहे. मला व्यक्तीशः देखील वाटतं की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. आपली मराठी इतकी वैभवशाली आहे की प्रत्येक मराठी माणसाने त्यातला काही भाग जरी स्वतःजवळ ठेवला तरी तो श्रीमंत होईल.

परंतु प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे किंवा फक्त मराठीत लिखाण केलं पाहिजे हा हट्ट, आग्रह, जबरदस्ती जेव्हा आपण इतरांवर करतो तेव्हा आपण खरंच मराठीचा ध्यास घेतला आहे की हुकूमशाही पद्धतीने आपण ती जतन करत आहोत याबद्दल मला शंका वाटते.

आणि म्हणूनच मला विचारावसं वाटतं की मराठीचा ध्यास अर्थात पुळका घेतलेल्यांना खरंच मराठमोळं म्हणावं का?

काही गमतीशीर किस्से इथे मी सांगतो जे माझ्या बाबतीत घडलेले आहेत.

१) एकदा एका सरकारी आस्थापनेत गेलो होतो. तिथे एक अर्ज लिहून द्यायचा होता जो मराठीतच लिहायचा होता. तिथे चुकून जन्मतारीख मी इंग्रजीत लिहिली. समोर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला मी विचारलं साहेब हे चुकून इंग्रजीत लिहिलं गेलं आहे. चालेल की पुन्हा नवीन अर्ज लिहून देऊ?
तर ते म्हणाले नाही चालणार, नवीन अर्ज लिहावा लागेल. तशी आपली *पॉलिसी* आहे. 😊

२) मराठी भाषा दिनानिमित्त काही ठिकाणी शोभायात्रा निघते, कार्यक्रम होतात. एका कार्यक्रमात मी काहीजणांना बोलताना ऐकलं की, *हॉलच्या मिडलला* उभा राहा जरा आणि बघ *बॅनर* बरोबर लागलाय का?
*स्टेजच्या* सगळ्या *लाईट्स* चालू कर आणि माझा एक *फोटो* घे. 😊

३) मराठी शाळांची होत असलेली दुरावस्था पाहावत नाही असं म्हणणारे माझे काही स्नेही, युवा शिक्षक पुढे असंही म्हणतात. २० तारीख आली. अजूनही *सॅलरी क्रेडिट* झालेली नाही. *गव्हर्नमेंट* काय करतं *डोन्ट नो* ! 😊

४) आदल्या दिवशी कविसंमेलनात व्यासपीठावरून मराठी भाषेची गौरवगाथा गायलेल्या व्यक्तीला जेव्हा दुसऱ्या दिवशी मी संपर्क करतो आणि नमस्कार सर अशी सुरुवात करतो तेव्हा समोरून आवाज येतो "सर नंतर बोलतो, *ऑफिसमध्ये* आहे जरा *वर्कलोड* जास्त आहे." 😊

५) आत्ता काल-परवाचा एक ताजा किस्सा. एका राष्ट्रीय संस्थेच्या (त्यांच्या नजरेत राष्ट्रीय) व्हाट्सअप समूहात फक्त मराठी भाषेत बोलावे आणि लिहावे हा कट्टर आग्रह धरला जातो. तिथे एका गझलवर मी अभिप्राय दिला "वाह क्या बात है". मला वैयक्तिकवर सूचना आली की तुम्ही दिलेला अभिप्राय हिंदी आहे कृपया अभिप्राय मराठीतच देत जावा. 
उस्फूर्तपणे दाद देतानाही अगोदर भाषा लक्षात घ्यावी मग अभिप्राय द्यावा हे समीकरण मला अतिशयोक्ती वाटलं.

गंमत म्हणजे सूचना करणाऱ्या व्यक्तीने मला एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक पाठवला होता जो त्यांच्याकडे चक्क इंग्रजीत जतन केलेला आहे. *माझ्याशी संभाषण करताना तीन ते चार इंग्रजी शब्द त्यांनी वापरले*. मी जेव्हा त्यांना विचारलं की हे कोणते मराठी शब्द? 
तेव्हा उत्तर मिळालं की समूहात बोलताना, लिहिताना आम्ही मराठीतच लिहितो इथे वैयक्तिक असल्याने मी असे शब्द वापरले आहेत. 😊

मी जेव्हा म्हटलं की मला न पटलेल्या गोष्टी मी समूहात लिहीन त्यानंतर मी रजा घेईन. अशी जाचक बंधनं असणाऱ्या संस्थेत, समूहात मी राहू शकत नाही. तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही असं लिहू शकत नाही. तत्पूर्वी तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोला आणि मी वरिष्ठांशी बोलण्याच्या अगोदरच माझ्या बाबतीत तिकडे बातमी पोहोचवली गेली होती. मी जसा त्यांच्या वरिष्ठांना संदेश पाठवला तसं त्यांनी मला तात्काळ ब्लॉक केलं. 😊

अशी वरिष्ठ मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही खरोखर मराठमोळी आहेत का हे तपासण्यासाठी मी फेसबुकवर थोडी तपासणी केली. तर तिथे मला दिसलं की मराठमोळ्या (?) असणाऱ्या व्यक्तींचं फेसबुक प्रोफाईल संपूर्णतः इंग्रजीत आहे !

६) अनेकांना लघुशंका, विष्ठा असे शब्द उच्चारण्यात संकोच वाटतो. लॅटरीन, वॉशरूम, बाथरूम असे हायप्रोफाईल शब्द वापरले की आपलं राहणीमान उंचावलं असा एक गोड गैरसमज त्यांच्या मनात कायम असतो.

शिकायला इंग्रजी शाळा आणि नोकरीसाठी सरकारी मराठी शाळा ही आजच्या तारखेतली शोकांतिका आणि हव्यासाचं उत्तम उदाहरण आहे.

मी स्वतः ज्ञानपीठ पुरस्कार विजेता किंवा मराठी भाषा तज्ज्ञ नाही. परंतु कोणत्या गोष्टीचा कुठे अतिरेक करावा किंवा करू नये याचं भान मला आहे.

वरील सर्व किस्से आणि एकंदरीत अनुभव घेतल्यावर मला एक म्हण नेहमी आठवते आणि ती म्हणजे "लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण".

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभिमान असतो आणि निश्चित असायला हवा. परंतु तो अभिमान, इतरांसाठी जाचक अट किंवा बंधन किंवा अतिरेक किंवा अतिशयोक्ती तर होत नाही ना याचं देखील भान प्रत्येकाला असावं असं माझं वैयक्तिक मत आहे.

आपल्या मातृभाषेचा नक्कीच अभिमान असावा आणि आपण शक्यतो तिचं जतन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे हे जरी खरं असलं तरी आपल्या भोवताली असणाऱ्या इतर भाषांना नाकारून चालणार नाही. अशी कोणतीही व्यक्ती नाही जिला इतर भाषेतील व्यक्तींचा, इतर भाषेचा, तिथल्या परंपरांचा आधार घेतल्याशिवाय काही करता येईल.

आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की संस्था छोटी असो वा मोठी तिथे जर आपल्या कर्तृत्वाला वाव मिळणार असेल तरच पद स्वीकारावं. कुणाच्या हातातली बाहुली बनून काम करण्यात काहीच अर्थ नसतो.

तर मित्रहो मराठी भाषेचा अभिमान जरूर बाळगा परंतु त्याची अतिशयोक्ती करू नका या एका छोट्या विनंतीसह इथेच थांबतो !

धन्यवाद !

▪️सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७