Wednesday, February 23, 2022

जिम्मेदारियोंके बोझसे डटा हूँ जमीन पर साहब,

हल्का होता तो कब का उड़ जाता..

@ सागरराजे निंबाळकर

चुराकर ले जाओ तो

चुराकर ले जाओ तो
मिल जाती है माफी

माँग कर देखो तो
दुनियाँ सुनाती है काफ़ी

🌿 सागरराजे निंबाळकर

जिंदगी के

ज़िंदगी के तजुर्बोंने मुझे
एक बात सिखाई है

असलियत चेहरोंके पीछे की
बड़े पास से दिखाई है

🌿 सागरराजे निंबाळकर

Saturday, February 19, 2022

छत्रपती शिवराय

🚩 छत्रपती शिवराय..

छत्रपती शिवराय, रयतेचे धनी
छबी त्यांची तेजोमयी, कोरलेली मनी ।।धृ।।

शिवनेरी किल्ल्यावर, शिवबा जन्मले
तालमीत जिजाऊंच्या, वाढले, घडले
दांडपट्टा तलवार, चाले विजेपरी
चाल गनिमी काव्याची, केली शत्रूवरी

हिंदवी स्वराज्या त्यांनी, दिली संजीवनी ।।१।।

दूरदृष्टी शिवबांची, शिकविते धडा
आहे अभेद्य आजही, सह्याद्रीच्या कडा
भूमी असो वा सागर, सारीकडे छाप
सिंहगड, जंजिऱ्याचे, वैभव अमाप

वेल विजयाची त्यांच्या, पोचली गगनी ।।२।।

दिला औरंगजेबाला, घरचा आहेर
वाघ नख्यांनी काढला, कोथळा बाहेर
बोटे शाहिस्तेखानाची, क्षणात छाटली
लाल महाली वाढली, भीती पोटातली

अनोखाच शिवबांचा, थाट रणांगणी ।।३।।

परस्त्रीला दिला त्यांनी, मातेचा आदर
ओटी खणा-नारळाची, धाडली तत्पर
होता जखमी मावळा, डोळ्यामध्ये पाणी
हरहर महादेव, नाद करी वाणी

मुजरा कराया त्यांना, लवते अवनी ।।४।।

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Friday, February 18, 2022

त्यागावं लागतं

▪️ त्यागावं पण लागतं..

काय रे सखाराम आजवर तू पांडबाकडे काहीच मागितलं नाही आणि कधी चुकून मागितलंच तरी त्याने दिलं नाही.
मग आज काय झालं असं?

"मागावं लागलं की त्यागावं पण लागतं".
सखा म्हणाला..

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, February 11, 2022

क्रियेला प्रतिक्रिया असते

▪️क्रियेला प्रतिक्रिया असते..

*वात जळते हे खरं असलं तरी पर्यायाने चटका दिव्यालाही लागत असतो.*

कधीकधी आपण स्वतः आपल्या दुःखाचं कारण असतो किंवा कुण्या दुसऱ्यामुळे देखील आपल्याला वेदना होत असतात. "अपराधीपणा" आणि "भावनाशून्यता" या दोन्हीतला फरक आपण समजून घेतला पाहिजे.

जर आपण एखाद्याच्या दुःखाचे कारण असू तर अपराधीपणाची भावना आपोआप निर्माण होते आणि जर होत नसेल तर आपण भावनाशून्य आहोत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही..

"ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही म्हण प्रत्यक्षात आणताना आपल्या वागण्याचा, बोलण्याचा, निर्णयाचा परिणाम एखाद्यावर कशा प्रकारे होऊ शकतो किंवा होतो याचा सारासार विचार करणे गरजेचे आहे.

डोंबाऱ्याचा खेळ होत असताना प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या व्यक्ती त्या-त्या कलेत निपुण असतात पण त्यांना लागणारी सामग्री कमकुवत असेल तर प्रयोग फसण्याची शक्यता असते.

एखाद्याला आपला जीवनसाथी बनवताना, साथ सोडताना, स्पष्ट नकार देताना, निर्णय ऐकवताना, वचन देताना, प्रमाणापेक्षा जास्त आनंद देताना, हाक दिली की तात्काळ साद देताना, मदत करताना, निस्वार्थी राहताना त्यामागच्या परिणामांची उजळणी करणे केव्हाही हितावह !

कोरलेल्या गोष्टी लवकर पुसल्या जात नाहीत हा निसर्गाचा नियम आहे. शिल्पकार तिथे नसला तरी त्याने केलेलं कोरीव काम सतत आपल्या दृष्टीस पडत असतं त्यामुळे ते सुखावह असेल याची काळजी शिल्पकाराने घेतली पाहिजे.

आपल्या चांगल्या गुणांमुळे आपल्या आई-वडिलांची, शिक्षकांची, मार्गदर्शकांची, मित्रमंडळींची, आप्तेष्टांची आणि तत्सम सर्व व्यक्तींची मान उंचावली जाते. तसेच आपल्या केवळ एखाद्या दुष्कृत्याने या सर्वांची मान खाली देखील जाते. त्यामुळे आपल्या क्रियेला काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा विचार किमान एकदा तरी करावा.

बीज पेरलं की उगवतं, खणलं की खड्डा होतो, गडगडाट झाला की पाऊस येतो, शोधलं की सापडतं.

यातली क्रिया कोणती आणि प्रतिक्रिया कोणती वेगळं सांगायला नको..

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

लपवत नाही

अर्धक्षामा : गागागागा गाललगागा

लपवत नाही..

बघतो केवळ बोलत नाही
कारण काही समजत नाही

श्रीमंताला निर्मळ गंगा
गरिबाला ही सवलत नाही

मित्रांना मी जोडत जातो
दुसरं काही कमवत नाही

थोड्याने पण ओंजळ भरते
जास्ती काही लागत नाही

झेलत ओझे खंगत जातो
पण मी नाती तोलत नाही

जे दिसते ते ओळख माझी
पडद्यामागे लपवत नाही

आहे थोडा माज मलाही
पडलेलं मी उचलत नाही

विसरुन सारे हासत जा तू
ओले डोळे बघवत नाही

ठरले आहे जर सगळे, तर..
जा तू, माझी हरकत नाही

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, February 10, 2022

शक्य मात्र आहे..

▪️सोपं अजिबात नाही शक्य मात्र आहे..

*खचायला एखादं कारण पुरेसं ठरतं. मात्र पुन्हा उभं राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.*

माणूस का खचतो? या अवस्थेला येण्यामागे काय कारणे असू शकतात? नैराश्य म्हणजे नेमकं काय? यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येऊ शकतं? हे सगळं सोपं आहे का?

गोष्टी मनाजोग्या घडल्या नाहीत किंवा अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करूनही हाती यश येत नसेल, ज्या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत तिच्यापासून परावृत्त ठेवलं गेल्यास माणूस खचायला लागतो.

खच्चीकरण होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. अपेक्षा ठेवणं चांगलं की वाईट हे त्या-त्या परिस्थितीनुसार सांगता येईल. प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट स्थान असतं तिथून अपेक्षा ठेवण्यात काहीच चुकीचं नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहावं वाटल्यास समुद्राकाठी, निवांत तळ्याकाठी, एखाद्या डोंगरावर जाणं यात काही चुकीचं नाही. पण हीच गोष्ट आपण एखाद्या औद्योगिक वसाहतीत, गजबजलेल्या ठिकाणी शोधत असू तर ती चुकीची अपेक्षा आहे.

अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही परंतु जिथून तिची पूर्तता होऊ शकत नाही तिथे ठेवणं ही महाचूक !

तलावात दगड भिरकावल्यावर पाण्यावर तरंग निर्माण होतात तिथे झऱ्याचा खळखळ आवाज कसा येऊ शकतो?

आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सगळं सुरळीत सुरू असताना अनपेक्षितपणे एखादी गोष्ट घडणे.
यात "मनाची तयारी" ही प्रमुख बाब असते.

परीक्षेच्या निकालात अमुक गुण मिळाले तर आनंद अमुक मिळाले तर दुःख ही आपल्या मनाची तयारी असते. परंतु सर्वच विषयात अनुत्तीर्ण राहिल्यास कितीही कणखर व्यक्ती असू द्या दुःख होणार हे ठरलेलं असतं.

मनातल्या गोष्टी कुठे व्यक्त न करता येणे, व्यक्त केल्यास आपणच दोषी ठरू का? ही भीती असणे, एकाच गोष्टीमुळे मनावर सतत आघात होणे या सगळ्यातून निर्माण होणाऱ्या अवस्थेला "नैराश्य" म्हणता येईल.

या अवस्थेतून बाहेर पडणं शक्य आहे का? सोपं आहे का?

सोपं अजिबात नाही शक्य मात्र आहे.

प्रत्येक व्याधीवर प्राथमिक उपचार म्हणजे "काळ" हे आर्यसत्य आहे. 
हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली की घडलेल्या गोष्टींचा विसर पडायला सुरुवात होते.

ज्येष्ठ कविवर्य श्री. अरुण म्हात्रे यांचा एक मतला यानिमित्त आठवतो.

विसरता येत नाही असे नसतेच काही
मनाला सांधणारे नवे मिळतेच काही

आपलं दुःख, मनातली खंत अशाच व्यक्तीकडे व्यक्त करा जी आपल्याला समजून घेईल, त्यावर योग्य ते मार्गदर्शन करील.
"तमाशा", "हशा" यावरची गोष्ट म्हणजे "आशा".

आशेचा एक किरण वाटेत किंबहुना अंधारात चांदण्याचं काम करतो. आणि मला नाही वाटत की शीतल चांदण्यात कुणासही चटका लागत असेल.

घडलेल्या गोष्टींवर चिंतन-मनन अवश्य करावं उत्खनन मात्र करू नये. आणि केलं तर पुन्हा नवीन गोष्टीच हाताला लागतात ज्या उपयोगाच्या असतील तर उत्तम अन्यथा पुन्हा जैसे थे !

आयुष्यात एक तरी मित्र किंवा मैत्रीण अशी बनवा जी केव्हाही आपल्या हाकेला साद देईल.

माझ्या एका मतल्यामध्ये मी लिहिलं आहे.. 

एक व्यक्ती अशी पाहिजे जीवनी
हाक द्यावी जिला कोणत्याही क्षणी

डोंगर चढायला वेळ लागतो, आजूबाजूच्या दऱ्यांची भीतीही वाटते पण मनात जर निश्चय ठाम असेल की टोकावर जाऊन ध्वज रोवायचा आहे तर वाट सहज सर होते.

"व्यथा" आहे म्हटल्यावर "कथा" होणे स्वाभाविक आहे परंतु तिची "प्रथा" होऊ न देणे आपल्या हातात आहे !

धन्यवाद !

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Wednesday, February 9, 2022

आधार बनूया

🤝🏻 आधार बनूया..

*निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा निचरा झाला तरच ती हलकी होत असते.* मग ते जमिनीतलं पाणी असो, मनातली खंत असो, दुःख असो, वेदना असो वा आशा-अपेक्षांचं ओझं असो.

एखाद्याच्या आनंदात सामील होता आलं नाही किंवा एखाद्याने सामील करून घेतलं नाही तरी चालेल परंतू दुःखात मात्र न मागता आधार अवश्य द्यावा. शरीर कितीही बलाढ्य असलं तरी मन नाजूक असतं.
मनोरा तेव्हाच ढासळतो जेव्हा पाया कमकुवत होऊ लागतो.

काय सतत त्याचं/तिचं सांत्वन करत राहायचं असं काहींचं म्हणणं असतं. "सांत्वन" आणि "आधार" यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. "काळजी नको, मी तुझ्यासोबत आहे" आधाराचं हे एक वाक्यदेखील खूप काही करून जातं.

कधी नाईलाज, कधी हतबलता, कधी भीती तर कधी परिणामांची चिंता यामुळे मनुष्य अस्वस्थ असतो. ठरवून कधीही, कोणीही स्वतःची दुरावस्था करून घेत नसतं. निसरड्या वाटेवरून पाय हा घसरायचाच पण तिथे सावरणारा एखादा हात असेल तर फारसं नुकसान होत नाही..

आधार देत असताना त्याला उपकाराचं वलय लाभणार नाही ही काळजी देखील घेतली पाहिजे. "हे माझ्या वाटणीचं नव्हतंच" हा विचार करून जेव्हा आपण मदत करतो तेव्हा ती निरपेक्ष मदत म्हणून गणली जाते.

आपल्या वागण्याने समोरच्या व्यक्तीच्या भावनांवर काय परिणाम होईल याचा विचारदेखील आपण करायला हवा. आपल्या कठीण काळात ज्या व्यक्तीमुळे गोष्टी सुलभ झाल्या त्या व्यक्तीला नंतर केवळ स्मृतीत ढकलणे योग्य नाही.

समुद्रकिनारी वाळूचा किल्ला बनवल्यावर सागराच्या लाटेने तो जर भुईसपाट झाला तर वाईट वाटण्याचं कारण काय? किनारा त्याचा, वाळू त्याची, लाटही त्याचीच !
आपला किल्ला त्याच्या हद्दीत होता..

एखाद्याला आधार दिल्याने आपलं पुण्य, संचित वाढतं की नाही याबद्दल ठोस माहिती नाही. परंतु त्याचं मनोबल वाढतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो यात मात्र काहीच शंका नाही.

*आजार सृष्टीकडून येतातच आपण आधार बनूया.*

धन्यवाद !

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Tuesday, February 8, 2022

खरंय ना हे

▪️खरंय ना हे..?

चुकले असेल अपुले काही खरंय ना हे?
क्षमा, याचना सुटका नाही खरंय ना हे?

मला वाटले असेल बहुदा दुःखामध्ये
दिसली नाही खंत जराही खरंय ना हे?

ओघामध्ये सगळे झाले असेलही पण..
व्यक्ती होती शांत, प्रवाही खरंय ना हे?

भरीव होते दिसायला पण.. आत पोकळी
कळला नाही भेद कुणाही खरंय ना हे?

हवे तितकेच घ्यावे-द्यावे सदैव कारण..
विचका करतो एक खडाही खरंय ना हे?

तिला कसा मी दोषी ठरवू जगापुढे या
भरकटलेलो पूर्ण स्वतःही खरंय ना हे?

हाक मारली कधी ना मला "राम" जगाने
का पाळू मग "मर्यादाही"? खरंय ना हे?

लेक म्हणूदे "येते बाबा" बघा मग कसा..
फुटतो पाझर "पुरुषालाही" खरंय ना हे?

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Saturday, February 5, 2022

नाव तुझे

तरही गझल..

सानी मिसरा ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख सर पनवेल यांच्या एका गझलेतून

🌿 नाव तुझे..

हृदयाच्या या चित्रपटावर नाव तुझे
(दिवसाच्या प्रत्येक क्षणावर नाव तुझे)

गेलो असतो परलोकी केव्हाचा मी
लिहिले नसते जर जगण्यावर नाव तुझे

तू होती तोवर होते घरपण आई
उरले केवळ तू गेल्यावर नाव तुझे

गर्दी आहे शेजारी पण काय करू
दिसते आहे रिक्तपणावर नाव तुझे

जिकडे जावे तिकडे होतो भास तुझा
झाडे-वेली, पान फुलांवर नाव तुझे

▪️ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, February 3, 2022

चला येतो

▪️चला येतो..

शामराव, एका स्थळाबाबत बोलायला आलो आहे. पण त्याअगोदर थोडं विचारतो राग मानू नका.

तुमचा मुलगा दिसायला चांगला आहे, निर्व्यसनी आहे, शिकलेला आहे, व्यवहाराची जाण आहे तरी याचं अजून जुळलं का नाही?

"काका माझ्याकडे पैसा नाही" प्रणय पटकन बोलून गेला.

सोपानराव म्हणाले "चला येतो !"

🌿 सागरराजे निंबाळकर

Wednesday, February 2, 2022

प्रेम माझे खरे

▪️प्रेम माझे खरे..!

लाख जपले तरी रोज पडती चरे
कोण सांगेल का काय चुकते बरे

कारणांना जरा सार बाजूस तू
एकदा मान्य कर प्रेम माझे खरे

मांडले मी कधी या जगावेगळे
वाचले फक्त जे सांगती चेहरे

कैद आहे तुझी जर सुखद एवढी
जन्मठेपेसही मग करू साजरे

होत नाही कधी कोरडे हे हृदय
वाहिले जर सदा भावनांचे झरे

हक्क आहे तुझा ये बिलग तू मला
वाटले जर कधी कावरे-बावरे

फार काही नको एक दे ईश्वरा
दीप छोटा भले लख्ख उजळो घरे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
      ८८ ७९८९ ७७९७

पायऱ्या आहेत..

▪️पायऱ्या आहेत..

"आई मी चांगला आहे ना, मग शेजारचे मला खेळायला का घेत नाहीत?" सोहमचा भाबडा प्रश्न.

"बाळा आपल्या घराला उंबरा आहे, त्यांच्या घराला पायऱ्या आहेत !" आई म्हणाली..

🌿 सागरराजे निंबाळकर

भान हरपते

वृत्तबद्ध आठोळी

▪️भान हरपते..

नाम हरीचे, घेता-घेता
भान हरपते राधा
धावत येतो, तिला भेटण्या
कृष्ण मुरारी साधा

पावा घुमतो, होते लीला
प्रेमसरींचा उत्सव
निखळ मनाने, बागडणारे
जसे कोवळे शैशव

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, February 1, 2022

सुचव मला काही

वृत्तबद्ध आठोळी

▪️सुचव मला काही..

उघडी पडते, दुखरी बाजू
शल्य मनाला छळते
असूनही तू, नसते माझी
रोज नव्याने कळते

सहन करावा, कसा दुरावा
उत्तर गवसत नाही
खरंच राणी, सुचव मला तू
उपाय यावर काही

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण