Friday, June 30, 2023

बा विठ्ठला

~~ बा विठ्ठला

वारीत दुःखाचे | होवो विसर्जन
सुखावूदे मन | बा विठ्ठला ||१||

नाही माझ्या मनी | फार मोठी आस
होऊदे विकास | थोडा-थोडा ||२||

आहे मी विठ्ठला | चुकांचा पुतळा
लावतोस लळा | तरी मला ||३||

शांत होते मन | तुझ्या राऊळात
आधाराचा हात | जणू काही ||४||

नव्हती कधीही | चिंता प्रपंचाची
तुला पाहण्याची | ओढ फक्त ||५||

कळस पाहू की | पाहू मी पायरी
होतसे अंतरी | घालमेल ||६||

सागराच्या लाटा | जशा येती-जाती
तसा तू सांगाती | राहा माझ्या ||७||

🚩 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, June 25, 2023

बातें अनकही

फासले बढ़ चुके हैं दरमियान 
फिक्र भी पहले जैसी नहीं रही

जिक्र कौन कौनसी बात का करें
चलो रहने दो कुछ बातें अनकही

@ सागरराजे 

Sunday, June 18, 2023

कसे ठरवू

~~ कसे ठरवू..

तुलाही वाटते का ते? मला जे वाटते आहे 
असे काहीच नाही तर कशाला लाजते आहे?

तुझ्या प्रेमात पडल्यावर उघड झाले नव्याने की
क्षणिक सारेच तू निव्वळ मला उपभोगते आहे

गझल मी गायली अवघी हसू ठेऊन ओठी पण..
जखम जी आत आहे ती मनाला टोचते आहे

नको सोने, नको चांदी मला द्या भाकरी केवळ
निरागस भूक आशेने जरासे मागते आहे

कुणी म्हणतो गजल याची, कुणी म्हणतो गझल त्याची
कसे ठरवू गझल नक्की कुणावर भाळते आहे

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, June 6, 2023

बाप घ्यावा समजून

~ बाप घ्यावा समजून

भार अवघ्या घराचा
बाप सहज पेलतो
सुख असो किंवा दुःख
बाप खुलून हसतो

त्याच्या तोंडून कधीही
मला आला न नकार
दिले आम्हाला रोखीने
स्वतः राहिला उधार

तोच भिंत मजबूत
तोच छप्पर घराचे
कुणा-कुणाला सांगू मी
मोल बाप असण्याचे

आहे सोबत तोवर
बाप घ्यावा समजून
ज्याने वाढवले आहे
पाणी रक्ताचं करून

बाप पंढरीचा विठू
बाप तुकोबाची गाथा
करू नमन बापाला
पायी टेकवून माथा

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, June 3, 2023

अवघड होते

😇 अवघड होते

पोटामध्ये जेव्हा माझ्या गडबड होते
उठणे-बसणे, खुलून हसणे अवघड होते

लग्नाआधी वाटत होत्या गप्पा ज्या-ज्या
त्या-त्या नंतर नकोनकोशी बडबड होते

विभा वाटली इंस्टावर जी वल्लभ होता
घाई नडते आणि नेमकी पडझड होते

एक अप्सरा केवळ क्षणभर समोर होती
तरी वर्षभर हृदयामध्ये धडधड होते

नजर शेकतो जमेल तिकडे राघोबा पण..
दिसली मैना इतर कुठे की तडफड होते

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

चूक झाली खरी

~~ चूक झाली खरी..

वाचताना तुला चूक झाली खरी
वाटला डोह जो ती निघाली दरी

फार होते तुझे चोचले जीवना
पेच सुटला तुझा प्राण गेल्यावरी 

पाहिजे तेवढे छान होतात का?
शेर गझलेतले रोज लिहिल्यावरी

उंच कळसापरी आस नाही मनी
दे मला भेट तू विठ्ठला पायरी

नाव घेतो तुझे कोण मीरे इथे..
फक्त ध्यानीमनी सावळा श्रीहरी

कर्म समजायचे की म्हणू दुर्दशा?
एकटा बाप अन् चार वाटेकरी

रोज हसणे मला भाग आहे "किरण"
वेदना आतली आत कुढली जरी

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण