Wednesday, December 27, 2023

शेवटी

~ शेवटी..

का वाटलो मुलांना मी भार शेवटी
कामास फार आला शेजार शेवटी

आयुष्यभर स्वतःची मी राखली निगा
जडला तरी नको तो आजार शेवटी

उसणे दिल्याप्रमाणे जे प्रेम द्यायची
केले परत तिला ते साभार शेवटी

तू कर्म कर असे की, गेल्यावरी तुला
देतील चार खांदे आधार शेवटी

ताटात वाढते जी कायम मला-तुला 
मानू जरा तिचेही आभार शेवटी

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, November 20, 2023

सुरुवात मी

~ सुरुवात मी

जी न झाली कधी तीच सुरुवात मी
एकटी नांदते रोज दोघात मी

आठवेना अता नाव माझे मला
गुंतले एवढी आडनावात मी

मत जसे मांडले स्पष्ट सर्वांपुढे
येत गेले तशी फार वादात मी

बोलणे मोजके हासणेही विरळ
सांग घ्यावा कसा श्वास शहरात मी

चार भिंतीतल्या गार वाऱ्यामुळे 
गोठते सारखी आतल्या आत मी

"शुक्र" म्हणतो कुणी कोण म्हणतो "शनी"
दाखवावा कुणा नेमका हात मी

खर्च करतोस तू वीस ओळी उगा
मांडतो तेवढे फक्त शेरात मी

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, November 19, 2023

वाचतो मी

~ वाचतो मी..

कोण साधू कोण भोंदू सांगतो मी
माणसांना रोज इतके वाचतो मी

कीर्तनामध्ये शिकवतो मोह टाळा..
अन् घरी येताच नोटा मोजतो मी

प्रेमही तितकेच करतो मी तुझ्यावर
कारणे शोधून जितका भांडतो मी

पेरले जर का कुणी वाटेत काटे 
पाकळ्या समजून त्यावर चालतो मी

वारसा सांगू कशाला मी कुणाचा
मीच माझी जर गझल सांभाळतो मी

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, November 5, 2023

खयाल म्हणजे

~ खयाल म्हणजे..

शेरामधला अर्थ जसजसा बहरत जातो
प्रगल्भतेचा ठसा तसतसा उमटत जातो

किती वाचल्या कविता त्याला महत्व नाही
कोण कोळसा अन् हिरा रसिक ठरवत जातो

गल्लीमध्ये ज्याचा कोणी वाचक नसतो
"गौरव" साधा दिल्लीभर तो मिरवत जातो

विदर्भ, कोकण, नाशिक अथवा पुणे-मुंबई
जो-तो मोठा कवी स्वतःला समजत जातो

माझ्यालेखी खयाल म्हणजे "कोरी पाटी"
मनासारखा येईस्तोवर गिरवत जातो

😇 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, October 29, 2023

लेखाजोखा

~ लेखाजोखा

आयुष्याची धुरा नेमकी
असते कोण्या हाती
उघडे डोळे जाताना अन् 
शेवट ज्याचा माती

श्वासाला जर मुकलो आपण
सांगा उरते काही?
पटकन सारे मिळवायाची
कसली मग ही घाई

अर्धी हाडे झिजल्यावरही
थांबत नाही मानव
मोह म्हणावा मायेचा की
लुकलुकणारे वैभव

एकाजागी बसून घ्यावी
विश्रांतीही थोडी
चिंतन केल्यावरती सुटती
क्षणात एका कोडी

लेखाजोखा आयुष्याचा
राहू असाच मांडत
जरी पेरले काटे कोणी
सुगंध जाऊ सांडत

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, October 20, 2023

एक वहिनी असावी

~ एक वहिनी असावी

माझे लाड पुरवते
हवं नको ते पाहत
रोप वाढाया जोमाने
जसं कामी येतं खत

जरी असली वहिनी
मला आईच वाटते
जेव्हा-जेव्हा ताटामध्ये
भाजी-भाकरी वाढते

घरामध्ये कुठे, काय
तिला ठाऊक असते
तिच्याविना एकाचेही
पान कधी ना हलते

पत्नी, आई, सून, ताई
निभावते सारी नाती
भार अवघ्या घराचा
पेलूनिया एकहाती

मोठी असो किंवा छोटी
एक वहिनी असावी
जिच्या सहवासामध्ये 
गोडी जीवनाला यावी

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Wednesday, October 18, 2023

लेक राजाची

~ लेक राजाची..

गाडी, बंगला सोडून
जेव्हा आली झोपडीत
जणू दान कुबेराचे
माझ्या पडले झोळीत

जीर्ण झालेल्या साडीला
"शालू" म्हणायची राणी
होती खायची आबाळ
फक्त पीत होती पाणी

कष्ट करून अमाप
तिने फुलविला मळा
माझ्या पत्नीने लावला
चक्क दुःखालाही लळा

कमी नाही कसलीही
आज आहे सारं काही
माझा "नारायण" केला
झाली "लक्ष्मी" ती स्वतःही

घेत आनंद आजही
खातो चटणी-भाकरी
लेक राजाची नांदली
एका गरिबाच्या घरी

😊 सागरराजे निंबाळकर

Sunday, October 15, 2023

वेदना बोलते

~ वेदना बोलते..

होय ! हल्ली मला एकटे वाटते
मी मुका राहतो वेदना बोलते

टाळते तू मला एवढे का बरे
सांग माझी अशी कोण तू लागते

तूप रोटी मला अन् स्वतःला शिळे 
जीव आई पहा केवढा लावते

दुःख स्वीकारले भेट मानून मी
रोज दुनिया तरी टोमणे मारते

सर्व सामावते दोन ओळीतही
यामुळे तर मला ही गझल भावते

फक्त जाई-जुई हट्ट होता जिचा
तीच आता कशी? मोगरा माळते

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, September 26, 2023

छान आहे

~ छान आहे 

रंगीत पान आहे
आयुष्य छान आहे

झाली विवाहसंस्था
दोलायमान आहे

राणी स्वभाव अपुला
अगदी समान आहे

आटेल पूर्ण गंगा
इतकी तहान आहे

ख्याती बरीच मोठी
मूर्ती लहान आहे

माया अपार करते
आई महान आहे

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

Wednesday, September 20, 2023

फेरा जन्म मरणाचा

~ फेरा जन्म-मरणाचा

चिंतेपायी जेव्हा जातो
बाप रोज गुत्त्यावर
राख होते काळजाची
आणि मरते नजर

आई उघड्या डोळ्यांनी
सारी दुर्दशा बघते
बळ आणून उसणे
कशीबशी सावरते

बाप बघतो आकाश
एकटक जेव्हा-जेव्हा
मला दिसतो चातक
त्याच्यामध्ये तेव्हा-तेव्हा

त्याच्या मनाजोगं कधी
येत नाही पीकपाणी
ऋतू कोणताही असो
लागू होते आणीबाणी

सावकार दारी येता
त्याला भरते धडकी
कोण जाणे दोर कशी
हाती लागते नेमकी

जातो पिंजरा खोलून
मागे सोडून पिल्लांना
दूर सारावे लागते
मग वह्या, पुस्तकांना

सुरू राहतो असाच
फेरा जन्म-मरणाचा
एकदाही येत नाही
क्षण वाट्याला सुखाचा

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, September 16, 2023

कोण कुणाचा उरला

~ कोण कुणाचा उरला..

नातीगोती नावापुरती
प्यारी केवळ माया
उभा ठाकतो समोर मृत्यू
तेव्हा कळते छाया

श्वास मोजके हाती उरता 
गडबड होते सारी
चक्रामधून नियतीच्या या
नर सुटतो ना नारी

जगून घ्यावे मनासारखे
चिंता हवेत उडवत
भार कशाला प्रौढत्वाचा 
लहान व्हावे नकळत

गाडी-माडी कपडालत्ता
मागे सुटून जाते
मृत्यूसोबत आयुष्याचे
असेच असते नाते 

आत्मासुद्धा अपुला नाही
आहे नश्वर काया
दोन घडीच्या मोहापायी
जीवन जाते वाया

मातीमध्ये प्रत्येकाचा
शेवट आहे ठरला
विसावल्यावर सरणावरती
कोण कुणाचा उरला

🌺 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, August 20, 2023

सोनं चांदी नको राया

~ सोनं-चांदी नको राया
(बैठकीची लावणी)

सोनं-चांदी नको राया, फक्त तुम्ही यावे
घडीभर का होईना, शेजारी बसावे ||धृ||

तुम्हाविना जगण्यात, नाही काही राम
तुम्हीच पंढरी माझी, तुम्ही चारीधाम

गूज मनातले माझ्या, तुम्हाला कळावे ||१||

नथ, राणीहार, ठुशी नकोशी वाटते
जेव्हा आरशासमोर, उभी मी राहते

फुल तरी सांगा राया, कसे मी माळावे ||२||

आठवते रात्रंदिन, शेवटची भेट
गेलात निघून तुम्ही, रागापायी थेट

पुरे की हो राया किती, काळीज जाळावे ||३||

अखेरचे श्वास माझे, मोजती घटका
किस्सा ऐकवा एखादा, हलका-फुलका

डोळे मिटता-मिटता, वैकुंठ दिसावे ||४||

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८७९८९७७९७

Friday, August 18, 2023

विठ्ठल माझा

वृत्त - कल्याण (दोन लघुंचा एक गुरू)

~ विठ्ठल माझा

हिरव्या-हिरव्या शेतामध्ये दिसतो आहे 
विठ्ठल माझा गातो आहे, डुलतो आहे

संभ्रम आहे वारस आता नेमावा का?
मुलगासुद्धा जर बापाला लुटतो आहे

बोजड लिहिणे तत्वामध्ये नाही माझ्या
साध्यासोप्या कविता, गझला करतो आहे

गाळत आले नावाला जे माझ्या कायम
"मक्ता" माझा ओठी त्यांच्या रुळतो आहे

"सरिता-सागर" जोडी जमली ग्रीष्मानंतर
श्रावण हिरवा दोघांनाही फळतो आहे

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, August 17, 2023

बालपण यावे पुन्हा

~ बालपण यावे पुन्हा 

बालपण यावे पुन्हा, मागे परतून
फुलपाखरापरी जे, गेले निसटून ||धृ||

चिंता नव्हती कसली, नव्हते बंधन
धावायचे चोहीकडे, निरागस मन

होतो हळवा मी आता, सारे आठवून ||१||

खाऊसाठी रूपयाची, नोट मिळायची 
झाकली मुठीत तरी, मोठी वाटायची

गोष्टी सांगायची आई, घास भरवून ||२||

पावसात डोलायची, कागदाची नाव
विटीदांडू लगोरीचा, रंगायचा डाव

आता पाहतो केवळ, खिडकीमधून ||३||

आहे देवा तुझ्याकडे, एकच मागणे
यावे खेळायला माझ्या, दारात चांदणे

जगायचे आहे मला, लहान होऊन ||४||

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८७९८९७७९७

Sunday, July 30, 2023

निवांत

~ निवांत बसलो..

विरून गेल्या, आशा साऱ्या
आता निव्वळ, जगणे बाकी
आधाराला, ईश्वर आहे 
पडलो जर का, मी एकाकी

उरात सलते, एक वेदना
तुला न काही, देऊ शकलो
भार जगाचा, घेतो तू.. मी
एकाजागी, निवांत बसलो

@ सागरराजे निंबाळकर

Friday, July 28, 2023

मेहमान

कड़ी धूप समझू इसे या
हलकासा कोई साया है

इस गरीबखाने में आज
ये कैसा मेहमान आया है

@ सागरराजे

Friday, July 21, 2023

दुःखाचे गाणे

~~ दुःखाचे गाणे

दुःखाचेही करता येते ज्याला गाणे
सोपे होते त्याचे येथे येणे, जाणे

समजत गेलो दुःखाला मी प्रत्येकाच्या
पण कोणीही ऐकेना माझे गाऱ्हाणे

खोट्या चलना भुललो नाही जर का आपण
कामी येते सत्कर्माचे सुंदर नाणे

पैसा-अडका माया आहे कुठवर पुरते
जमवा केवळ पोटासाठी काही दाणे

इच्छा, चिंता आता काही उरली नाही
माझ्या भाळी जेही आहे देवच जाणे

खेळत होतो बुद्धीबळ मी तेव्हा कळले
संयम ठेवत उलटावे शत्रूचे खाणे

भक्तीसुद्धा गरजेची या उपवासाला
नाही निव्वळ केळी, काजू, साबूदाणे

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, July 19, 2023

हे केवळ

माझ्या कविता आवडतात तिला
मात्र, मी आवडत नाही

ही अनेकांची शोकांतिका आहे
हे केवळ माझ्यासोबत घडत नाही 

😇 सागरराजे निंबाळकर

Sunday, July 16, 2023

कोई और मिल गया होगा

दिल आया होगा या दिल गया होगा
फुल मुहब्बत का ज्यादाही खिल गया होगा

ऐसेही नहीं बदलते तेवर किसीके
यकीनन तुझे कोई और मिल गया होगा

😊 सागरराजे

Saturday, July 15, 2023

ठेऊ काळजात

~~ ठेऊ काळजात

ऋतू पावसाळी अन्, त्यात तुझी साथ
एकरूप होती जसे, तेल आणि वात ||धृ||

ठेच मला लागते नि, पाणी तुझ्या डोळी
लाखात एक आपली, जोडी साधीभोळी
निरांजन होईन मी, ओवाळण्या तुला
घेऊ सुखाने हिंदोळे, बांधू असा झुला

तुझ्यापाशीच शेवट, तूच सुरूवात ||१||

नको शपथा कुठल्या, नकोत वचने
राणी आपली कायम, जुळतील मने
भांडेल जो आधी तोच, घेईल माघार
अलिखित एक असा, करूया करार

लाख येऊदे संकटे, सोडू नको हात ||२||

तुझ्या माझ्या संसाराची, न्यारीच कहाणी
लिहाया घेतली तर, गाजतील गाणी
जगू स्वच्छंद नेहमी, मोजू नको वय
जीवनी कधी कुठला, नको अभिनय

युगेयुगे एकमेका, ठेऊ काळजात ||३||

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, July 13, 2023

पावसाळा

~~ पावसाळा..

डोळ्यात स्पष्ट दोन्ही दिसतोय पावसाळा
होऊन चिंब इतका भिजतोय पावसाळा

आयुष्य फार थोडे हाती असूनसुद्धा
फुलवून रान सारे जगतोय पावसाळा

प्रेमात काय पडला या गोजिऱ्या धरेच्या
होऊन पार वेडा हसतोय पावसाळा

जावे कसे कळेना सोडून पालवीला 
चिंतेत याच एका झुरतोय पावसाळा

एकीकडे उभा मी एकीकडे दुरावा
पाहून या दरीला रडतोय पावसाळा

@ सागरराजे निंबाळकर

Sunday, July 2, 2023

हल्ली

😊 हल्ली

होता आधी तसा पडेना प्रभाव माझा हल्ली
भरूनही का रिता भासतो तलाव माझा हल्ली

झेलत होतो वादळवारे एकेकाळी सगळी
पण.. लागेना झुळूकेपुढे निभाव माझा हल्ली

दिसू न देता रडायचो मी ठेऊन हसू ओठी
हरवले कसब पडतोय कमी सराव माझा हल्ली

कातडी नव्हे काळीज दिले वाघाचे मी ज्यांना
खटकत आहे शेळ्यांना त्या ठराव माझा हल्ली

शेतीवाडी, जमीनजुमला सर्व पाहिजे आता
विवाहसंस्था कमी करेना दबाव माझा हल्ली

आयुष्य तुला बहाल केले म्हणायची जी पूर्वी..
तिला दिसेना थोडासुद्धा अभाव माझा हल्ली

🫵🏻 सागरराजे निंबाळकर

Friday, June 30, 2023

बा विठ्ठला

~~ बा विठ्ठला

वारीत दुःखाचे | होवो विसर्जन
सुखावूदे मन | बा विठ्ठला ||१||

नाही माझ्या मनी | फार मोठी आस
होऊदे विकास | थोडा-थोडा ||२||

आहे मी विठ्ठला | चुकांचा पुतळा
लावतोस लळा | तरी मला ||३||

शांत होते मन | तुझ्या राऊळात
आधाराचा हात | जणू काही ||४||

नव्हती कधीही | चिंता प्रपंचाची
तुला पाहण्याची | ओढ फक्त ||५||

कळस पाहू की | पाहू मी पायरी
होतसे अंतरी | घालमेल ||६||

सागराच्या लाटा | जशा येती-जाती
तसा तू सांगाती | राहा माझ्या ||७||

🚩 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, June 25, 2023

बातें अनकही

फासले बढ़ चुके हैं दरमियान 
फिक्र भी पहले जैसी नहीं रही

जिक्र कौन कौनसी बात का करें
चलो रहने दो कुछ बातें अनकही

@ सागरराजे 

Sunday, June 18, 2023

कसे ठरवू

~~ कसे ठरवू..

तुलाही वाटते का ते? मला जे वाटते आहे 
असे काहीच नाही तर कशाला लाजते आहे?

तुझ्या प्रेमात पडल्यावर उघड झाले नव्याने की
क्षणिक सारेच तू निव्वळ मला उपभोगते आहे

गझल मी गायली अवघी हसू ठेऊन ओठी पण..
जखम जी आत आहे ती मनाला टोचते आहे

नको सोने, नको चांदी मला द्या भाकरी केवळ
निरागस भूक आशेने जरासे मागते आहे

कुणी म्हणतो गजल याची, कुणी म्हणतो गझल त्याची
कसे ठरवू गझल नक्की कुणावर भाळते आहे

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, June 6, 2023

बाप घ्यावा समजून

~ बाप घ्यावा समजून

भार अवघ्या घराचा
बाप सहज पेलतो
सुख असो किंवा दुःख
बाप खुलून हसतो

त्याच्या तोंडून कधीही
मला आला न नकार
दिले आम्हाला रोखीने
स्वतः राहिला उधार

तोच भिंत मजबूत
तोच छप्पर घराचे
कुणा-कुणाला सांगू मी
मोल बाप असण्याचे

आहे सोबत तोवर
बाप घ्यावा समजून
ज्याने वाढवले आहे
पाणी रक्ताचं करून

बाप पंढरीचा विठू
बाप तुकोबाची गाथा
करू नमन बापाला
पायी टेकवून माथा

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, June 3, 2023

अवघड होते

😇 अवघड होते

पोटामध्ये जेव्हा माझ्या गडबड होते
उठणे-बसणे, खुलून हसणे अवघड होते

लग्नाआधी वाटत होत्या गप्पा ज्या-ज्या
त्या-त्या नंतर नकोनकोशी बडबड होते

विभा वाटली इंस्टावर जी वल्लभ होता
घाई नडते आणि नेमकी पडझड होते

एक अप्सरा केवळ क्षणभर समोर होती
तरी वर्षभर हृदयामध्ये धडधड होते

नजर शेकतो जमेल तिकडे राघोबा पण..
दिसली मैना इतर कुठे की तडफड होते

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

चूक झाली खरी

~~ चूक झाली खरी..

वाचताना तुला चूक झाली खरी
वाटला डोह जो ती निघाली दरी

फार होते तुझे चोचले जीवना
पेच सुटला तुझा प्राण गेल्यावरी 

पाहिजे तेवढे छान होतात का?
शेर गझलेतले रोज लिहिल्यावरी

उंच कळसापरी आस नाही मनी
दे मला भेट तू विठ्ठला पायरी

नाव घेतो तुझे कोण मीरे इथे..
फक्त ध्यानीमनी सावळा श्रीहरी

कर्म समजायचे की म्हणू दुर्दशा?
एकटा बाप अन् चार वाटेकरी

रोज हसणे मला भाग आहे "किरण"
वेदना आतली आत कुढली जरी

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, May 29, 2023

आंदण मिळाले

~~ आंदण मिळाले

रडता न आले हसता न आले
आयुष्य इतके बेरंग झाले

चेष्टाच आहे नशिबी तुझ्यातर..
हासून मिश्किल भटजी म्हणाले

कवटाळले मी ज्यांना उराशी
काट्यांपरी ते घातक निघाले

आयुष्य म्हणजे केवळ पसारा
आहे खरे हे.. उशिरा कळाले 

बापात विठ्ठल आईत रखुमा
नशिबास दोन्ही आंदण मिळाले

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, May 28, 2023

का शरण जाऊ

~ का शरण जाऊ?

बांध फुटला मांडवाला
लेक निघता सासुराला

सोंग असते चौकशीचे 
कोण उत्सुक सांत्वनाला

काळजाचा रोग आहे 
दूर सारा औषधाला

घट्ट मैत्री जर हवी तर..
हात घाला काळजाला

छापणे नाही पुरेसे
वेळ काढा चिंतनाला

मी गझलची कास धरली
अर्थ आला लेखनाला

मीच लिहिले भाग्य माझे
का शरण जाऊ कुणाला?

शिष्य जर ज्ञानी निघाला
श्रेय जाते शिक्षकाला

🫵🏻 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, May 23, 2023

स्पष्टीकरण देता येत नाही

~ कधीकधी आपल्याजवळ उत्तरं असूनही स्पष्टीकरण देता येत नाही..

अडीअडचणी नाहीत असा एकही मनुष्य या भूतलावर नाही.
प्रत्येकाला कुठे ना कुठे ठेच लागतेच.
अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करूनही अडचणी सुटत नाहीत.
अशावेळी धीर देणारे, साथ देणारे, पाठराखण करणारे हात फारच कमी असतात. 

आपण आजवर जेवढं काही यश मिळवलेलं असतं ते केवळ एका अपयशाच्या छायेत झाकोळलं जातं.
आणि इथूनच सुरू होते मूल्यमापन.
तू अमुक केलं असतं तर तमुक झालं असतं.
तुला अमुक सुचलं नाही का?
तुझी बुद्धी गवत चरत होती का? वगैरे, वगैरे..

आपण हे करून पाहूयात का?
मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
असं कोणीही म्हणत नसतं.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण मनातल्या मनातच म्हणता येते अशावेळी.
कारण सद्यस्थिती असतेच अशी की स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न जरी केला तरी त्याला बहाणे, आळस, अहंकार अशी झालर लावली जाते.

घुसमट होते, इच्छा मरते
गढूळ आहे, दुःख खरोखर

प्रत्येकाची, दशा निराळी
कोण चूक अन्, कोण बरोबर

घडलेल्या गोष्टींचे चिंतन करणे क्रमप्राप्त असते परंतु ते करत असताना कोणी दूषणे देऊन खंडन केले तर तो घाव बंदुकीच्या गोळीपेक्षाही मोठा वाटतो.
मदतीचा एक हात अस्मानी संकटांवर मात करू शकतो हे मोजक्यांना कळतं.
अपेक्षा ठेऊन केलेली मदत व्यवहारात गणली जाते.

घासामधला, घास द्यायला
मोठे काही, लागत नाही 

आयुष्याला, नाव वेगळे
याहून दुजे, आहे काही?

सुविचार फक्त कानावर पडून उपयोग नसतो ते आत काळजावर कोरले गेले तरच जीवनाचं सार्थक होतं.

अन्यथा खेदाने म्हणावे वाटते -

नाही माझे येथे काही उशिरा कळले
पर्वा नाही कोणालाही उशिरा कळले

फक्त मानले म्हणजे सारे अपुले नसते
नाव पाहिजे नात्यालाही उशिरा कळले

मित्रहो, खरंय ना हे?

शब्दांकन - सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, May 22, 2023

शेर माझे

~~ शेर माझे..

आसवे गाळली मौनही पाळले
हाय ! दुःखा तुझे केवढे चोचले

योग येतो असा छान केव्हातरी
आज मोजू प्रिये श्वास श्वासातले

मीच माझे मला दुःख आंदण दिले
गोल फिरते जसे पीठ जात्यातले 

एवढ्याने कुठे नष्ट होईन मी
घास तू चांगले बाण भात्यातले

शेर माझे तुला सांग कळतील का?
शोधले जर सतत दोष गझलेतले

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, May 20, 2023

जीव जडला

~~ जीव जडला

प्रेम कळले भांडल्यावर
तू जराशी हासल्यावर

मी कुणाचा कोण माझे
श्वास घेणे सोडल्यावर

चालणे शिकलो सरळ मी
ठेच मोठी लागल्यावर

अक्षरांवर जीव जडला
पुस्तकांना वाचल्यावर

मोकळा संवाद होतो
वेळ थोडा काढल्यावर

आसवे डोळ्यात आली
वेदनांनी घेरल्यावर

काय फेरे काय वचने 
प्रेम सगळे संपल्यावर

@ सागरराजे निंबाळकर

वावर तसाच आहे

लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

(दोन लघुंचा एक गुरू अशी सूट घेऊन)

मनात माझ्या तुझ्या स्मृतींचा
          अजून वावर तसाच आहे
क्षणात हसतो क्षणात रडतो
          हताश सागर तसाच आहे

कसा हसू मी बळेच आता
          चुकूनही भेटलीस जर तू
दिलास आंदण मला दुरावा 
          जसा अगोदर तसाच आहे

निराश केले मला सुखाने 
          जमेल तितके जमेल तेव्हा
उभा तरी मी हसून कायम
          सुखाबरोबर तसाच आहे

विरह तुझा मी सहज पचवला
          गृहीत धरले उभ्या जगाने 
कधी न विझलो अजून जळतो
          तुझ्या समांतर तसाच आहे

गझल म्हणू की अखंड कविता
          तुला कशी सांग हाक देऊ
तुझीच प्रतिमा, तुझाच आशय
          तरल मनावर तसाच आहे

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, May 15, 2023

मुसाफिर

जो है ही नहीं दिल में
वो, जुबां पे कैसे आएगा

मुसाफिर की तरह आया वो
लगता है वैसे ही जाएगा

😇 सागरराजे

Friday, May 5, 2023

शाप गरिबीचा

~ शाप गरिबीचा..

भूक लागली तरीही
पोट होईना नाराज
काय असते सोसणे
मला कळतेय आज

पंचपक्वान्नाचे ताट
गेले नजरेपुढून
शांत केले कसेबसे
गळ जीभेला घालून

शाप गरिबीचा जेव्हा
साथ जन्मभर देतो
योग भूक मारण्याचा
इथे दररोज येतो

कुणा काळजी दाण्याची
कुणी फेकतो सहज
सांभाळता येत नाही 
असा भूकेचा ऐवज

देवा विनवतो तुला
नको देऊ असे पोट
रोज लागते ज्यामुळे
गरिबीला गालबोट

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, May 2, 2023

वृत्त जगतो

~~ वृत्त जगतो..

आत माझ्या धैर्यशाली वाहतो सागर
स्वार मी ऐटीत होतो रोज दुःखावर

डाव सारे ओळखावे वेळच्यावेळी
अन्यथा होतो खुबीने आपला वापर

मी तसाही एक उपरा गाव नसलेला
भार टाकू मी कसा मग फार कोणावर

मी अनामिक झाड आहे सावली देतो
नाव माझं कोण घेतं पान गळल्यावर

मी गझलचे वृत्त जगतो शक्य तितक्यांदा
तृप्त होतो श्वास माझा शेर लिहिल्यावर

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, April 22, 2023

अश्क क्यों आते

अश्क क्यों आते..

तुला पैसा हवा होता हवे होते मला नाते
बताओ दिलरुबा कैसे तुम्हारे साथ हम आते

मला माहीत असते जर तुझ्या डोळ्यात खुपतो मी
हमेशा के लिए दुनियाँ तुम्हारी छोड़कर जाते

तुला मस्जिद, मला मंदिर तुझा अल्ला विठू माझा
अगर ये भेद ना होता हमेशा एक कहलाते

तुझ्या पश्चात घर आई रिकामे वाटते आहे
चले आओ न यूँ रूठो अकेले जी नहीं पाते

फुलांनी घात केल्यावर जवळ केलेत मी काटे
असर है पाक जख्मोंका कलमसे अश्क क्यों आते

💔 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Wednesday, March 29, 2023

तुझ्यासाठी

~ तुझ्यासाठी..

कुणाला आपले मानू कुणाशी हात मिळवू मी
भला, दुर्जन खरे-खोटे कसे अन् काय ठरवू मी

उभा हा जन्म गेला पण.. तुझे अस्तित्व दिसले ना
कसा आशेवरी राहू कशाचे स्वप्न सजवू मी

हवे आहे तुला जे-जे निवड, घेऊन जा सारे
तुझ्यापासून काहीही कशाला आज लपवू मी

मला सांगायचे होते तुला कळलेच नाही ते
धडा मग शक्यतांचा हा कितीदा सांग गिरवू मी

तुला ऐकायचे म्हणजे अनोखी पर्वणी आहे
तुझ्यासाठी गझल, कविता कुण्या चालीत बसवू मी

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, March 27, 2023

शेर गझलेतले

~ शेर गझलेतले..

घाव सारे तुझे आत डोकावले
थांबले ना कधी दुःख डोळ्यातले

भेट होती जरी फक्त वाटेतली
घट्ट झाले किती बंध दोघातले

दे मुहंमद मला अन् तुला राम घे
संपवू भेद चल एकमेकातले

पाहतो विठ्ठला रोज मूर्ती तुझी
डोलताना सहज पीक शेतातले

मानले वृत्त मी जीवनाला जसे..
श्वास झाले जणू शेर गझलेतले 

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, March 24, 2023

फार काही नको

~ फार काही नको

आतल्या आत मी हुंदका दाबला
जीव दुःखास मी एवढा लावला

होत नाही गझल पाळल्याने बहर
शेर अर्थासही पाहिजे चांगला

वाटते जे तुला तेच करतेस तू
वाढतो यामुळे वाद दोघातला

कोणते प्रश्न अन् कोणती उत्तरे..
सोडल्यावर सहज हात हातातला

फार काही नको फक्त ओंजळ हवी
थेंब डोळ्यातला एक झेलायला

▪️ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, January 19, 2023

उरले नाही

~ उरले नाही..

म्हणता यावे, आपले असे
कुणीच आता, उरले नाही 
चिंतन असते, ज्याचे-त्याचे 
देते अनुभव, दुनिया काही

मनापासून, हल्ली कोणी
नाव कुणाचे, कधी न घेतो
एकाहाती, टाळी दे तू
दुसऱ्या हाती, मी फळ देतो

भरती येते, ओसरतेही 
नात्यांमध्ये, क्षणाक्षणाला
शिकेल जो-तो, तरणे सागर
हात देशील, कुणाकुणाला

🌿 सागरराजे निंबाळकर

Wednesday, January 4, 2023

मोफत आहे?

~~ मोफत आहे?

मात्रांमध्ये अडकत आहे
भरभर सारे साधत आहे

आळस आहे, चिंतन नाही
कष्टाला तू टाळत आहे

हट्टापायी वृत्तामध्ये
काना, मात्रा बदलत आहे

तंत्राचे तू स्वागत केले
मंत्राला का? विसरत आहे

सांगाड्याच्या सौंदर्यावर
का तू इतका भाळत आहे

मक्त्यामध्ये नावाला तू
बळजबरीने गुंफत आहे

किसतो आहे गझलेला तू
इतकी का ती मोफत आहे?

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण