नका तोलू मापू तिच्या कष्टांना
नका विचारू काय करते आई?
आपल्या आयुष्यात येणारे खाचखळगे
अगदी मायेच्या फुलांनी भरते आई
@ *सागरराजे निंबाळकर*
नका तोलू मापू तिच्या कष्टांना
नका विचारू काय करते आई?
आपल्या आयुष्यात येणारे खाचखळगे
अगदी मायेच्या फुलांनी भरते आई
@ *सागरराजे निंबाळकर*
----- उखाणा क्रमांक १२१ -----
नाव घेण्याचा हट्ट आप्तेष्टांचा
अडवलं, माप ओलांडताना दारी
सुखाची बीजे रोवून मनोभावे
आनंदाचा वटवृक्ष उभारू संसारी
@ *सागरराजे निंबाळकर*
----- उखाणा क्रमांक १२२ -----
सनई चौघडे वाजताच सुरेल
वरात येऊन ठेपली दारात
लक्ष्मीचं नाव घेतो नारायण
सुखशांतीचा वास राहो घरात
@ *सागरराजे निंबाळकर*
----- उखाणा क्रमांक १२३ -----
ठेच लागता त्याच्या पायाला
यावं पाणी हिच्या डोळा
ह्यालाच म्हणायचं असतं संसार
सुखी, समाधानी, आदर्श जोडा
@ *सागरराजे निंबाळकर*
----- उखाणा क्रमांक १२४ -----
माहेर, सासर एकत्र जोडणारा
विवाह, एक अद्भुत केंद्रबिंदू
देऊन साथ आजन्माची एकमेका
सये आपण, गुण्यागोविंदाने नांदू
@ *सागरराजे निंबाळकर*
----- उखाणा क्रमांक १२५ -----
नाव घेण्याचा अंदाज नवनवा
हसऱ्या वदनांना एवढंही पुरतं
नाव जोडलं, तेव्हाच झालो तुझा
आता माझं असं, वेगळं काय उरतं
@ *सागरराजे निंबाळकर*
----- सागराच्या पोटी -----
विठू माझी आई ! विठू माझा बाप
वात्सल्य अमाप ! माझ्यावरी !! १ !!
तोच माझा हरी ! तोच स्वामी सखा
तोच पाठीराखा ! संकटात !! २ !!
कधी राऊळात ! कधी वृंदावनी
कधी इंद्रायणी ! वास त्याचा !! ३ !!
जोडतो मी हात ! पाहता ते रूप
निर्गुण स्वरूप ! मूर्तिमंत !! ४ !!
येशू, राम, अल्ला ! चराचरी वसे
बुद्ध गोड हसे ! विहारात !! ५ !!
शोधताना देव ! करावे सुकर्म
पुण्य, श्लोक, धर्म ! आचरणी !! ६ !!
सारे मावतील ! सागराच्या पोटी
नाम ठेवा ओठी ! हरी हरी !! ७ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
----- उगवली सुंदर पहाट -----
सडा सारवणाने
उगवली सुंदर पहाट
थंडगार लाट
हिवाळ्याची !! १ !!
अर्घ्य घालून
एकंच मागणं दिनकराला
साऱ्या घरादाराला
जपावे !! २ !!
तिखट ठेचा
साथीला गरम भाकरी
सर्जाराजाची चाकरी
नित्यनेमाने !! ३ !!
पाहतो विठूला
मी माझ्याच मळ्यात
अभंगवाणी गळ्यात
हरिपाठासवे !! ४ !!
दिवस मावळताना
वाट घरी परतीची
लाट भरतीची
सागराला !! ५ !!
शेतीमातीचं जगणं
सुखाचे दोन घास
चंदनाचा सुवास
घामाला !! ६ !!
अंगणात पडतं
लख्ख शुभ्र चांदणं
ताऱ्यांसवे जागणं
गप्पागोष्टीत !! ७ !!
अशीच राहो
माझ्या कुटुंबावर माया
कृपादृष्टीची छाया
भगवंता !! ८ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
वृत्त :- विमला
लगावली :- ललगा लगागा
असणे कळाले
नसणे कळाले
जगता सुखाने
हसणे कळाले
थकता जरासे
कसणे कळाले
मिळता दिलासा
बसणे कळाले
जखमा पहाता
डसणे कळाले
झुलत्या बटांनी
फसणे कळाले
@ *सागरराजे निंबाळकर*
माझं म्हणणं काहीच नव्हतं
सर्वकाही तूच ऐकवत गेलीस
एरव्ही स्वप्नात ये जा असायची
आज माझ्या नजरेदेखत गेलीस
@ *सागरराजे निंबाळकर*
जितकी खडतर वाट ध्येयपूर्तीची
तितकाच मजेशीर प्रवास परतीचा
काफियासवे वृत्तात बसवावं कर्माला
सुचतो मग जीवनावर शेर भरतीचा
@ *सागरराजे निंबाळकर*
एवढ्यासाठीच टाळली वाट सुखाची
परतीच्या दिशेला दुःख असतं
कर्माने केलेला घात पाहून
नशीब कधीकधी जोरदार हसतं
@ *सागरराजे निंबाळकर*
आणावं लागतं लटकं हसू मुखावर
बाजार वेदनांचा कुठवर मांडायचा
ह्यासाठीच नमतं घेतलं नियतीपुढे
आरोप नको, हा नेहमी भांडायचा
@ *सागरराजे निंबाळकर*
----- सागराची नदी -----
पुण्य झाले नष्ट ! नाती तकलादू
तोचि संधी साधू ! ओळखावा !! १ !!
कशाला हवी ती ! दुष्कर्म संगती
डाव ते रंगती ! अशांतीचे !! २ !!
माझ्या वावरात ! कांदा मुळा भाजी
यावी सुखा माजी ! तृप्त होण्या !! ३ !!
पाहू तिहिलोकी ! वैभव संपन्न
सद्गुण नावीन्य ! चराचरी !! ४ !!
काय सांगावा मी ! त्याचा थांगपत्ता
सत्कर्माचा कित्ता ! गिरवावा !! ५ !!
सावळ्या हरीला ! विनवितो नित्य
दर्शन अलभ्य ! द्यावे आता !! ६ !!
घेत जावे कधी ! देत जावे कधी
सागराची नदी ! सांगतसे !! ७ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
----- डोईजड झाली अंधश्रद्धा -----
मंदिरात घंटारव पुजाऱ्यांचा
मस्जिदीत बांग देतसे मुल्ला
सांगा कोणास कळला देव
कोणी पाहिला प्रत्यक्ष अल्ला
कापून मुक्या जीवांना खुलेआम
का खेळतो आपण रक्ताची होळी
दिव्याच्या हट्टापायी जाळल्या पणत्या
रितीच राहिली मातृत्वाची झोळी
नावं बदलली काहींनी आपली
काहींच्या हातात गंडे दोरे
विश्वास ठेवून कर्मावर थोपट दंड
मानवा आता तरी शहाणा हो रे
काय कोडं मिरच्या, बाहुल्यांचं?
काय करतात नेमकं टाचण्या?
इस्पितळासारखी रांग लागते
फक्त नी फक्त चेहरा वाचण्या
मिटत चालल्यात हस्तरेखा साऱ्या
तरीही त्यातच नशीब शोधतो
राहू, केतू, मंगळाची करता शांती
साडेसातीने मात्र शनि कोपतो
कोण ऐकतं महिला समित्यांचं
कोणास ठाऊक निर्मूलनाची शाखा
विज्ञानावर डोईजड झाली अंधश्रद्धा
मित्रहो, वाकता येईल तितकं वाका
असावी श्रद्धा कर्मात आपापल्या
तेव्हाच समृध्दी म्हणेल शुभं भवतू
प्रवास सुरू राहिला अंधश्रद्धेसवे तर
गंतव्य स्थान आपुलं, केवळ मृत्यू
व्हावं निर्मूलन आता वेळीच मित्रहो
डोईजड व्हायला नको अंधश्रद्धा
आपण फक्त पाहत राहायचो अन
निघून जायचं हातचं, बघता बघता
@ *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
वृत्त :- व्योमगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
----- कित्येकवेळा -----
स्त्रीमनाच्या क्रंदनाला ऐकतो कित्येकवेळा
नाखुशीची गर्भहत्या पाहतो कित्येकवेळा
जिंदगी बरबाद केली समजते मज मद्यपाने
का तरीही तीच मदिरा चाखतो कित्येकवेळा
देव जागा राहतो अन पाहतो चुपचाप सारे
चोर राती दानपेटी फोडतो कित्येकवेळा
फास नाही घेतला दैना जरीही फार झाली
तीच शेती नांगरूनी राबतो कित्येकवेळा
देवतांचे प्रस्थ झाले सज्जनांचे अस्त झाले
दुर्जना लोटांगणे मी घालतो कित्येकवेळा
थोर त्या राजा शिवाजी संस्कृतीच्या रक्षकाला
आदरे मुजरा कराया वाकतो कित्येकवेळा
सांगताना दुःख अपुले आज मज "सागर" म्हणाला
माणसांची घाण मी स्वीकारतो कित्येकवेळा
@ *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
केव्हाच सजला महाल सारा अन
केव्हाच गर्दी जमली अवतीभवती
निमित्त जुगलबंदी शब्द अक्षरांची
साद काळजाला साधीसुधी नव्हती
@ *सागरराजे निंबाळकर*
वृत्त :- मदनरंग
६+६+६+५ = २३
वाटे मज ओवाळुन टाकावा जीव हा
हलवावे हळूवार त्या सुवर्ण डुलांना
भय नाही काट्यांचे मज आता जराही
काळजात जपतो मी मऊ मऊ फुलांना
किती किती सांगावं आणि काय कुणा मी
दुनियेला ज्ञात तुझे सारे हे तराने
वाटे मज कधीकधी एकटाच मी तुझा
हळूहळू दिसले मग लक्ष लक्ष दिवाने
@ *सागरराजे निंबाळकर*
💫 *काळजाशी बोलतो सागर किनारा* 💫
वृत्त :- मंजुघोषा
गालगागा ची ३ आवर्तने
*ऐकतो माझ्या भल्याचा रोज नारा*
*सद्विचारांचाच होतो रोज मारा .....!*
*वेदनांचे फक्त येथे पीक येता*
*पेरली मी आसवे येथे दुबारा .....!*
*फेकतो जो तो इथे त्या आकड्यांना*
*दाखवा पाहू यशाचा सातबारा .....!*
*नाव घेतो त्या विठूचे मी सदोदित*
*तोच जिवलग तोच बुडत्याचा सहारा .....!*
*कोण आहे येथ माझे काय सांगू*
*आवरावा आपला आपण पसारा .....!*
*कैक रात्री जागलो मी पौर्णिमेच्या*
*झोप येते पाहता तो एक तारा .....!*
*भोगतो मी दुःख सारे प्राक्तनाचे,*
*भेटला ना मज कधी तो तारणारा ....!*
*समजते भाषा अता त्या गुंजनाची*
*काळजाशी बोलतो "सागर" किनारा ....!*
@ *सागरराजे निंबाळकर*
नको नकोशा झाल्या वेदना
कळाला यातनांचा अर्थ खरा
सांधायचं जितक्या वेळा मायेने
तेवढ्याच वेळा काळजाला चरा
@ *सागरराजे निंबाळकर*
तिच्या माझ्यातला अलिखित करार
साथ जन्मोजन्मी अशीच द्यायची
सांगताच मी व्हायचो गुलाब तिचा
ऐकताच ती माझी चाफेकळी व्हायची
@ *सागरराजे निंबाळकर*
तिच्या माझ्या संवादातले ते
आजचे शेवटचे शब्द होते
संपूर्ण देह बोलत होतं काहीतरी
डोळे मात्र अगदीच स्तब्ध होते
@ *सागरराजे निंबाळकर*
इवल्याशा शंख, शिंपल्यांपायी
तू सागराला डावलत गेलीस
ना लाट नशिबी, ना दव पानांवरलं
मग तू नेमकी कोणाची झालीस?
@ *सागरराजे निंबाळकर*
🌹 मैत्रीच्या पलीकडे, प्रेमाच्या अलीकडे 🌹
_काय नातं होतं आपुलं_
_काय एकमेकांचे लागायचो_
_सुखदुःखात साथ देऊन_
_दिल्या वचना जागायचो_
_कसे जुळाले ऋणानुबंध नात्यात_
_आपल्या दोहोंनाही ठाऊक नाही_
_कधी खळखळून हसलो आपण_
_कधी लाभले क्षण भावुक काही_
_मैत्रीच्या पलीकडे प्रेमाच्या अलीकडे_
_स्वच्छ, सुंदर, निर्मळ झालं नातं_
_तारा छेडल्या हृदयाच्या अशा काही_
_जणू मंजूळ कोकिळेच्या स्वरात गातं_
_लख्ख पडावं चांदणं सागरी किनारी_
_आनंदाच्या चांदण्या नभात साठतील_
_*झुंजूमुंजू* होईल पहाटेच्या प्रहरी_
_आठवणी *सागराच्या लाटेवर* साठतील_
_नातं हे आपुल्या गूढ मैत्रीचं_
_दिवसेंदिवस असंच खुलावं_
_तू माझी, मी तुझा होऊन सदा_
_हर्षोल्हासाच्या झोपाळ्यात झुलावं_
@ *सागरराजे निंबाळकर*
कुठवर सोसायचा भार आसवांचा
कुठवर जगायचं हलाखीचं जीणं
मरणाचं ओझं झालं नाही कधी
जगण्याने मात्र खचलो रात्रंदिन
@ *सागरराजे निंबाळकर*
काय, कसं, किती लिहावं
हरेक क्षण दीपोत्सव दिसतो
फक्त एका पणतीची गरज
पहा गरीबही किती सुखात हसतो
एवढ्यासाठीच नाकारलं सुखांना
निरोप घेताना खूपच दाटून येतं
असतात कारणे हतबलतेची काही
अन्यथा आयुष्य कोण रेटून नेतं
@ *सागरराजे निंबाळकर*
विरून गेलेत क्षण सारे केव्हाच
विरून जातील साऱ्या आठवणी
वाटतं अश्रूंना वाट करून द्यावी
तेवढ्यात आड येते एक पापणी
@ *सागरराजे निंबाळकर*