Sunday, March 29, 2020

माय कळलीय आज

-- माय कळलीय आज --

माळरानी चालताना
काटा रुतला पायात
तरी चालतेच माय
भर दुपारी उन्हात

रक्ताळल्या टाचेसंगं
पायपीट अनवाणी
कळ पोचली मस्तकी
तरी नाही डोळा पाणी

साऱ्या वाटे ठिबकले
लाल कण्हेरीचे सडे
तुझ्या सहनशक्तीला
माय मानलं मी गडे

दिस सरता सरता
पहा सुकली जखम
सर केली वाट सारी
विना औषध मलम

नाही लेप, झाडपाला
नाही कोणता इलाज
एका काट्यामुळे मला
माय कळलीय आज

🌿 सागरराजे निंबाळकर

Monday, March 23, 2020

का टाळले तू? (मनोरमा वृत्त)

-- का टाळले तू? --

प्रेम का नाकारले तू?
सांग मज का टाळले तू?

गंध नव्हता जर फुलांना
का तरी मग माळले तू?

आज नयनी चित्र माझे
छानसे रेखाटले तू

वाचताना पत्र माझे
आसवांना ढाळले तू

वाट माझी पाहण्याचे
वचन राणी पाळले तू

पाहिली मी पत्रिका ती
ज्यात मजला गाळले तू

सांत्वनाला येथ माझ्या
लोक का बोलावले तू?

🌿 सागरराजे निंबाळकर

माझ्या माहेरची नाती

-- माझ्या माहेरची नाती --

आठवांच्या येता सरी
जाते मोहरून माती 
बघा लाखात सरस 
माझ्या माहेरची नाती 

प्रातःकाळी होते नित्य 
दारी सडा संमार्जन
अंगणात पूजते मी 
तुळशीचे वृंदावन

फळा फुलांसवे बाग  
किती मजेत डोलते 
आनंदली जाई जुई 
कानी हळूच बोलते 

शीळ घालता वाऱ्याने 
कसा झुलतो झोपाळा 
जशी जोजविते आई 
निजविण्या तान्ह्या बाळा 

सर्जाराजा माझा बाप 
माय गोठ्यातली गाय
ऋणातच राहूनिया 
तिचे वंदिते मी पाय

एकजीव होता असे 
सदा फुलतो संसार 
मला मिळते माहेरी 
माया साऱ्यांची अपार 

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, March 21, 2020

चमकणे काजव्यांचे

-- चमकणे काजव्यांचे --

झाली जवळीक पण
जुळलीच नाही मने
त्रास होता वेदनांचा
पाणावली ही लोचने

कुणी करावे आरोप
कुणी द्यावीत उत्तरे
ज्याचे त्यालाच ठाऊक
काय खोटे काय खरे

संभ्रमित मनाने या
कौल दिला नाही कधी
काय करायचे मग
हाती असून अवधी

पडतील कधी माझ्या
दारी सडे चांदण्यांचे
नमतील त्यानिमित्त
देठ साऱ्या ताटव्यांचे

आले स्वरूप आयुष्या
आल्या गेल्या पाहुण्यांचे
रात्री पुरतेच जसे
चमकणे काजव्यांचे

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, March 20, 2020

काय होते चौकशीने (मंजुघोषा)

------- काय होते चौकशीने -------

जीव जातो येथ जेव्हा काळजीने
काय होते फक्त साध्या चौकशीने

मौज केली टाकले मग कोपऱ्याला
काय केले पाप इवल्या बाहुलीने

सोसली जर पानगळती या सुखांची
दुःख सारे दूर होते पालवीने

लावतो मी ते न चुकता काळजाला
धाडले जे पत्र माझ्या साजणीने

एक झाले कृष्ण राधा प्रेमनगरी
शक्य झाली येथ किमया बासरीने

कर्ज हे फेडीन तुमचं पै न पै मी
द्या पसाभर जोंधळं मज वाजवीने

वेळ येता कोण अपुला कोण परका
छानसे समजाविले या सावलीने

@ सागरराजे निंबाळकर

Monday, March 16, 2020

आठवणी मागे ठेवून

--- आठवणी मागे ठेवून ---

कसं ठसवायचं मनावर
एखाद्याचं अकाली निघून जाणं
शब्द ओठांवर येऊन थांबता
जसं राहतं, अर्धवट गाणं

दरवळणारा सडा फुलांचा
आज वाटतोय पालापाचोळा
शुष्क झाल्या काळजामुळे
अश्रू, पापणीतच झाले गोळा

दिवस सरला कसाबसा
रात्र कशी घालवायची?
तेल काठोकाठ असूनही का?
वात पुन्हा पुन्हा मालवायची

सत्त्वपरीक्षा असावी संयमाची
रात्र सारी, वातीतच सरली
पतन होऊन एका दिवसाचं
हजेरी आयुष्याची नव्याने भरली

जाणारा खुशाल गेला
आठवणी मागे ठेवून
देता आल्या असत्या तर 
नक्कीच दिल्या असत्या
ज्याच्या त्याला परत नेऊन

🌿 सागरराजे निंबाळकर

कोण होतो काय झालो

--- कोण होतो, काय झालो ---

गरिबीने चपराक दिली म्हणून
मला लागला, श्रीमंतीचा लळा
इथेच हरवली माणुसकी माझ्यातली
विसरलो, काय असतो कळवळा

चटणी भाकरीने पोट भरायचं
आता मात्र, झोप ही लागत नाही
माया, ममता गौण झाली
पैशात तोलू लागलो कशालाही

माणसं कवडीमोल ठरली अगदी
नजरेत भरल्या कागदी नोटा
संगमरवरी पायऱ्या वर नेतीलही
बसावयास मिळेल का सारवलेला ओटा

शेळ्या-मेंढ्या अन गायी-म्हशी
माझ्या परिवारातले अनमोल सदस्य
आता सुरक्षा नि चिंतेमुळे
मज कुत्रा पाळण्यात स्वारस्य

कोण होतो, काय झालो
आता काहीच आठवत नाही
अखेर चिंतनातून निष्पन्न झालं
मूठभर मांस चढलंय मलाही

😇 सागरराजे निंबाळकर

Sunday, March 15, 2020

चारोळी

त्रास होतो कधी कधी पण
उपाय त्यावर, नसतो काही

सांगावं तरी कुणाला मग हे
आपलं कोण कळतच नाही

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, March 14, 2020

ओटी तुझी तूच भर

----- ओटी तुझी तूच भर -----

दुसऱ्याला कोसून अर्थ नाही
आपलीच घाई झाली म्हणायची
कळालं आई बापाला एकदाचं
पोर कोपऱ्यात बसून का रडायची

इच्छा आकांक्षा होत्या तिच्याही
स्वप्नांना फुटावी नव्याने पालवी
दुःख कधी झेपलं नाही अन
सुखाची मागणी होती अवाजवी

काय करावं अशावेळी म्हणून
आई बापाच्या कलाने घेतलं
वेळेआधीच फुलणं फुलाचं
निष्पाप कळीच्या जीवावर बेतलं

सोडवणं तिला रूढी परंपरेतून
अखेर, कुणालाही जमलं नाही
देवाघरी गेली ती एवढंच कळालं
बाकी काहीच कळेना कुणालाही

फुटतील टाहो, ओलावतील कडा
याउपर काय केलं कुणी आजवर
माफ कर पोरी पुन्हा एकदा
आता ओटी तुझी, तूच भर

@ सागरराजे निंबाळकर

Friday, March 13, 2020

चारोळी

सुरकुतलाय चेहरा तिचा पण
मनाने अजूनही ताजीतवानी

अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची अमुच्या
एवढीच काय ती कहाणी

😇 सागरराजे निंबाळकर

Thursday, March 12, 2020

चारोळी

आनंद शोधा जरी माहीत नसलं
काय लिहिलंय आपुल्या भाळी

कागदाची का होईना पण चालायची
आपलीही नाव पाण्यात कधीकाळी

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

रस्त्यावरून चालताना सहज
नजर माझी, पावलांकडे वळते

तेही एकत्र चालत नाहीत कधी
शोकांतिका ही उशिराच कळते

@ सागरराजे निंबाळकर