Sunday, March 31, 2019

जीवनाचा रंगमंच (अष्टाक्षरी)

--- जीवनाचा रंगमंच ---

जीवनाचा रंगमंच
शिकवितो खूप काही
त्याने दिलेल्या ज्ञानाला
साऱ्या जगी तोड नाही

जन्मताच ज्ञात होतं
कोण आई कोण बाबा
तेच देऊ करतात
साऱ्या संस्कारांचा ताबा

मोठे होऊ जसजसे
ताण देते स्मरणिका
येते वाट्याला आपुल्या
रोज नवीन भूमिका

मोकळेपणानं कधी
अवघडल्यासारखं
कधी दुःखाच्या कुशीत
कधी सुखाला पारखं

घडवितो रंगमंच
नानाविध नटराज
शैली आगळी वेगळी
प्रत्येकाचा न्यारा बाज

खेळ असा प्रारब्धाचा
दाखवतो रंगमंच
शेवटाला साथ देतो
साऱ्या आठवांचा संच

*सागरराजे निंबाळकर*
   उल्हासनगर, ठाणे

चारोळी

_माझ्याच घरातले वासे जेव्हा_
     _एकमेकांसवे कुजबूज करू लागले_

_तेच होते धोक्याचे सूतोवाच_
     _जे, विभाजनाचे कारण ठरू लागले_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Saturday, March 30, 2019

चारोळी

_पापण्यातून जेवढं पाणी ओघळतं_
     _तेवढीच काळजाच्या आत होते जागा_

_ज्याप्रकारे, निष्पाप मेण विघळताना_
     _एकटक पाहत असतो, जळणारा धागा_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

आद्याक्षर प कविता

एकाच आद्याक्षरावरून संपूर्ण कविता

आद्याक्षर "प"

परतीचा पाऊस प्रेमाचा

परतीचा पाऊस प्रेमाचा
प्रेमात पुरता पिसाटला
प्राजक्त पडला पायदळी
प्रारब्धी प्रसंग पेचातला

पडलो प्रेमात पहाटेच
पाहतोय प्रेयसीला प्रहरी
प्राशुनी प्रेमप्याले परिपूर्ण
पाहिली प्रेमरूपी पंढरी

पाऊलखुणा पुसटशा पसरती
प्राक्तनाची पाऊले पेलवेना
पाहिले प्रेमास पाठमोरे
प्रेमतरंग पाहूनही पाहवेना

प्रेमळ पौर्णिमेचा पूर्णचंद्र
प्रभंजनी प्रतिक्रिया प्रियेला
परागी प्रेमभुंगा परिमित
पुष्पधन्वा प्रभास प्यायला

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_रंग मेहंदीचा भलताच रंगला पण_
     _माझं अस्तित्व, त्यात कुठेही नाही_

_दोष दरवेळी हातांना कसा द्यावा_
     _वाटताना पानं, आपलंच चुकतं काही_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_*सारेच गुन्हे नोंद झाले आता*_
     _*बहुतेक, होणार मज फाशी*_

_*प्रसंग तसा काही खास नाही*_
     _*मी पाहता, ती लाजली जराशी*_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Friday, March 29, 2019

चारोळी

_रोखून ठेवलेल्या ज्या नजरा_
     _आज अचानक पाणावल्या कशा_

_हे भोग सारे प्राक्तनाचे की_
     _नियतीच्या दरबारी उडालेला हशा_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_साधेच असतात तसे शब्द माझे_
     _मुक्या भावनांना बोलतं करणारे_

_कुणा वाटतात बोचरे काटे जणू_
     _कुणा फुले, ओंजळीत भरणारे_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Thursday, March 28, 2019

चारोळी

_बऱ्याच दिवसांनी सुचलं काहीतरी_
     _म्हंटलं, पटकन येऊन ऐकवावं तुला_

_वाऱ्याने सांगितलं मग हळूच कानात_
     _ती केव्हाच गेली झुलवून आठवांचा झुला_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_उभा असतो मी अजूनही_
     _त्याच वळचणीला विचार करत काही_

_पैंजणांचा नाद घुमल्यावर कळतं_
     _खिशातले वाजलेत, प्रत्यक्षात नाही_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_माझ्याच पावलांनी सोडलं चालणं_
     _दोष मी त्या वाटांना कसा देऊ?_

_त्याच रोज खुणावून म्हणतात_
     _चल आज तुला ध्येयाजवळ नेऊ_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

उस्ताद रुदकी रुबाई वृत्त २

*उस्ताद रुदकी* रुबाई वृत्त क्रमांक २

गागाल लगागागा गागाल लगाल

दुःखास कुणीही दावा चंद्र खुशाल
काढून सुखांची अंधारात वरात

वाटेत अता माझ्याही रोजच थाट
सारेच कवडसे हे माझ्याच घरात

----- *सागरराजे निंबाळकर* -----

उस्ताद रुदकी रुबाई वृत्त १

*उस्ताद रुदकी* रुबाई वृत्त क्रमांक १

गागाल लगागागा गागाल लगा

सारेच फुलूनी आले आज असे
बेभान कशी झाली पाहा धरती

कोणास कळाले सांगा आजवरी
बागेत फुले न्यारी जादू करती

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Monday, March 25, 2019

चारोळी

_*नेमका कुणाला कळाला प्रपंच*_
     _*नेमकं कोण गातं सत्संगाची गाणी*_

_*प्रश्न साऱ्या कर्मांच्या पारड्याचा*_
     _*खेळ खेळतात सुखदुःखांची नाणी*_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_कोरडेच राहिले डोळे शेवटपर्यंत_
     _शेती आसवांनीही झाली नाही_

_किमयागार म्हणून पाहिलं मेघराजाकडे_
     _किमया कधीच कामी आली नाही_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Sunday, March 24, 2019

एकाच आद्याक्षरावरून कविता

----- *आद्याक्षर क* -----

कधी कळालंय का कुणाला
कसं करतात कन्येचं कन्यादान
कठीण काळातही कष्ट करून
कशाला कुणास कुरबुर कानोकान

क्रमशः करताना कोणताही कार्यक्रम
काबाडकष्टांनी करावी कार्यवाही
कमी करतात काहिली काळजाची
काळ्याकुट्ट काळोखातले काजवे काही

काल्पनिक कथा करता करता
किर्तीरूपी कोंदणाची कलाटणी
कितीदा कवटाळावी कायमची
कौटुंबिक कृपाशीर्वादाची कहाणी

केविलवाण्या कलहांवर काढूया
कुशलपूर्वक कृत्याचे कोडे काहीसे
कोट्यावधी कोल्हेकुईच्या केंद्रस्थानी
कांगावे काळरात्रीचे काहीच कळेनासे

------- *सागरराजे निंबाळकर* -------

Saturday, March 23, 2019

चारोळी

_अभेद्य आहे हिंदवी स्वराज्य_
     _सुवर्णाक्षरांनी लिहिलीय त्याची गाथा_

_*छत्रपती शिवाजी* आराध्यदैवत आमचं_
     _शतदा झुकतो, मुजऱ्यास माथा...!_

🚩🚩 *सागरराजे निंबाळकर* 🚩🚩

चारोळी

_ताठ मानेनं जगायला शिकवलं_
     _आई बहिणींचा केला ज्यांनी सन्मान_

_नाव मनामनात कोरलेलं *शिवाजी*_
     _अवघ्या महाराष्ट्राची शिवशाही शान_

🚩🚩 *सागरराजे निंबाळकर* 🚩🚩

चारोळी

नजरेत वाऱ्याचा वेग ज्याच्या
     विजेसारखी तळपते ज्याची तलवार

गडकिल्ल्यांच्या त्या श्रीमंताला
     करावा मुजरा, झुकूनी अलवार.....!

🚩🚩 *सागरराजे निंबाळकर* 🚩🚩

Friday, March 22, 2019

चारोळी

_कितीदा अडवायचं मी स्वतःला_
     _कितीदा सांगायचं, विसर आता सारं_

_धुमश्चक्री उडताना धरा आकाशाची_
     _कुणाचंही नसतं बेभान सुटलेलं वारं_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Thursday, March 21, 2019

चारोळी

_इवल्याशा पणतीनेही होतो उजेड_
      _समाजाला हे, सांगणार कोण?_

_आपणच रोखून पावलं, विचारतो_
     _आमच्या अंगणात रांगणार कोण?_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_लक्तरे टांगून वेशीवर त्यांनी_
     _दाखले दिले, सामाजिक तिढ्यांचे_

_माणसं मोजत राहिली माणुसकी_
     _ठेवून अंधारात भविष्य कैक पिढ्यांचे_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_प्रेमाचाही असावा एखादा कोपरा_
     _हयात सारी ताणतणावात जाते_

_नंतर कुतूहल राहू नये कायमच_
     _बासुरी, इतकी सुरात का गाते?_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

साऱ्यांनाच कुठे जमलं जिंकणं
     अनेकांनी टाकलीत शस्त्र येथे

जेव्हा कळालं नाव तुझं मोहमाया
     तू क्षणात, इथून तिथे नेते

👁‍🗨 *सागरराजे निंबाळकर* 👁‍🗨

Tuesday, March 19, 2019

चारोळी

बऱ्याचदा राहून जातं सांगायचं
     आज एकदाचं टाकतोच सांगून

एकत्र येण्याची वेळ झाली आता
     साऱ्या सीमा एकाचवेळी लांघून

🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺

Monday, March 18, 2019

चारोळी

लाख प्रयत्न केले तरीही
     दृष्टीस पडतात भूतकाळाच्या सावल्या

लाख गयावया करूनही तोच प्रश्न
     आठवणी नेमक्या कुणास पावल्या?

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

सहज विसरणं जाणायचं असल्यास
     एकदा, आईबाबांच्या डोळ्यात पहा

काहीही होऊदे, एकच सांगतील ते
     आमचं जाऊदे बाळा, तू सुखी रहा

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Sunday, March 17, 2019

चारोळी

फक्त एकदाच वळून पाहावं
     एवढीच होती माझी इच्छा

नंतर एकाकीच राहायचं आहे
     सोडवत आठवांचा जीवघेणा पिच्छा

🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺

चारोळी

काय भाकीत करावं आयुष्याचं
     कधी आनंद तर कधी शोककळा

म्हणूनच जगावं साधेपणाने येथे
     जेणेकरून लागो सर्वांनाच लळा

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

तुझ्या ओठांना पाकळ्या म्हणू की
     गालांना म्हणू गुलाबाची फुलं

जेवढा दूर जातो तेवढा जवळ येतो
     काय जादू करतात ही सुवर्ण डुलं

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

वाऱ्यासवे खेळती बटा तुझ्या
     काय हितगुज होतं कोण जाणे

फक्त माझ्याजवळ येताना सये
     सुचतात तुला नानाविध बहाणे

🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺

Saturday, March 16, 2019

चारोळी

शेवटचं पाहून घेऊ म्हणताना
     पुन्हा नव्याने आठवतं सर्व

जसं पाहायला जाताना सूर्यास्त
     सुरू चंद्राचं विलोभनीय पर्व

🌺 *सागरराजे निंबाळकर* 🌺

चारोळी

नकार कळवायचे ओठ तिचे
     डोळ्यातून साफ होकार असायचा

ह्याला प्रेम म्हणत नाहीत म्हणे
     सांगा ह्यावर विश्वास कसा बसायचा

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

वेदनेला जेव्हा कुरवाळतं कोणी
     वाटतं, हीच असावी आपुलकीची माया

सत्कर्म केले जे काही थोडेफार
     ते असे सहजासहजी न गेले वाया

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Friday, March 15, 2019

चारोळी

आव आणून सुखी असल्याचा
     जो तो इथे औपचारिकता पाळतो

जाणायचंच असेल एखाद्याचं दुःख
     बघा, एकांतात किती आसवं गाळतो

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

साऱ्याच वेदना सहन केल्या
     एक सल अजूनही सलते आहे

पोकळ झाले घराचे वासे, मग
     खिडकी ही कुणासाठी हलते आहे

➖ *सागरराजे निंबाळकर* ➖

चारोळी

कोणीही ऐकत नाही, म्हणून
     हट्ट अताशा मी सोडलेत सारे

लव्हाळापरी जगलो अन्यथा
     ऐकतात का कुणाचं बेधुंद वारे

➖ *सागरराजे निंबाळकर* ➖

Wednesday, March 13, 2019

चारोळी

आजही ठेवलंय मी जपून
     सये तुला, हृदयाच्या कुपीत

बाकी सगळं ठाऊकच तुला
     फक्त एवढंच काय ते गुपीत

➖ *सागरराजे निंबाळकर* ➖

Tuesday, March 12, 2019

चारोळी

माझं जाऊदे, महत्वाचं नाही
     तुला पाहून सैरभैर दशदिशाही

तरीही तुझं ते नेहमीसारखंच
     चल हट्ट, तुझं आपलं काहीही

🥰 *सागरराजे निंबाळकर* 🥰

Sunday, March 10, 2019

खेळ दुर्गुणांशी

----- *खेळ दुर्गुणांशी* -----

निंदकाचे घर । शेजारी असता
मिळतात धडे । उठता बसता !! १ !!

कोणी काही सांगो । ऐकावे मनाचे
लाभ होतो त्याने । बोल हे जनाचे !! २ !!

वाढला जो येथे । दुर्गुण त्यागून
प्रचिती सुखाची । येतसे मागून !! ३ !!

राहिला जो नित्य । गुरूंच्या संगती
रंगला तो येथे । आनंदी रंगती !! ४ !!

खेळ दुर्गुणांशी । खेळावा एकदा
राहतो सावध । सत्कर्माने सदा !! ५ !!

सर्वोत्तम वाटे । काळ माझा गुरू
अनुभव देतो । सारे पुन्हा सुरू !! ६ !!

किरण सांगतो । जगण्याची कला
नमस्कार माझा । सागराच्या जला !! ७ !!

------- *सागरराजे निंबाळकर* -------

वसंताच्या स्वागताला (अष्टाक्षरी)

🌧️ _वसंताच्या स्वागताला_ 🌧️


_पाहूनिया वसंताला_

_वाटे विणले रेशीम_

_झाडे हिरवी हिरवी_

_जणू खेळती लेझीम_


_ऋतू वसंत जोडतो_

_काळजाशी घट्ट नातं_

_फुलताच झाडे वेली_

_गाते कोकिळा भरात_


_वसंताच्या स्वागताला_

_पानं, फुलं, वेली उभे_

_स्वागताचे हरेकाचे_

_आपापले मनसुबे_


_कुणी म्हणे वसंताला_

_धरित्रीची चंद्रकोर_

_अपुल्याच अंगणात_

_नाचे थुईथुई मोर_


_वसंताच्या फुलण्याने_

_होती एकजीव सारे_

_खेळ खेळून खट्याळ_

_बट उडविती वारे_


_किती वर्णावी महती_

_गुण सांगू कुणाकुणा_

_अपुलाच वाटे सदा_

_जरी असला पाहुणा_


🌱 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

तिला कसे ओळखावे

_____ *तिला कसे ओळखावे* _____

बऱ्याच अवधीनंतर मज
सुचली एक कविता
हरवलो वेगळ्याच जगात
कविता लिहिता लिहिता

वळचणीवर थांबलेली कोणी
पाठमोरी एक गोरी गोमटी पोर
पाहून हवालदिल झालो
नाव दिलं तिला चित्तचोर

पाठलाग करू लागलो तिचा
तुडवीत काळीभोर माती
अवाक होऊन पानं फुलं
मजकडे एकटक पहाती

बरेच यत्न करूनही
चेहरा पाहायचाच राहिला
गुलाबाचा सुगंध घेऊन
तिच्या पाऊलखुणांवर वाहिला

पुन्हा कुठेतरी भेटल्यास ती
काळीज माझे खाईल हेलकावे
एक प्रश्न अजूनही प्रश्नच राहतो
समोरून पाहता तिला कसे ओळखावे

_____ *सागरराजे निंबाळकर* _____

Saturday, March 9, 2019

चारोळी

केव्हाच झाली दुसऱ्याची ती पण
     अजूनही मला नाकारलेलं नाही

हे एकमेव स्वप्न माझ्या आयुष्यातलं
     जे मी, प्रत्यक्षात साकारलेलं नाही

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

तू असताना समृद्ध होतो मी
     तू नसताना निर्माण झाली दरी

आहे तोवर किंमत नसते
     ही म्हण आज पटली खरोखरी

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

तुझ्याकडे पाहताच सुचतं लिहायला
     कसं?, ते माझं मलाही कळत नाही

कोणाचा जीव जातो आठवणीत
     कोणी म्हणतं, मला कुणीच छळत नाही

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Friday, March 8, 2019

गझल सदृश्य

तुजवाचूनी आठवणींची किरणे आता उरतात कुठे
होते तडफड फक्त तयांची बाकी त्या ही झुरतात कुठे

भांडण तंट्यानी बरबटलेली सारी वस्ती मनुजाची
उमगत नाही प्रेते इतुकी मेलेल्यांची पुरतात कुठे

होती पहाटेस घरी जी सायंकाळी तीच दिसेना
ठाऊक नाही कुणा कळ्या कोमलशा खुडतात कुठे

कसले कुविचार मनी दावायचे वृद्धाश्रम आईबापा
आज कळाले दुर्भाग्याने संसार असे बुडतात कुठे

एकेकाळी होती मानाची एकलव्याची दक्षिणा
विचारावं कुणाला गुरू हे हल्लीचे चुकतात कुठे

आवडले खयाल म्हणूनच प्रेमात असावी कविता
कानी पुसते सांग सागर, शेर असे स्फुरतात कुठे

----------- *सागरराजे निंबाळकर* -----------

Thursday, March 7, 2019

वाट जीवनाची अभंग

------- *वाट जीवनाची* -------

वाट जीवनाची । कुणा कुठे नेते
खूप काही देते । जगताना !! १ !!

जगताना होतो । कैकदा आभास
सारे आसपास । असल्याचा !! २ !!

असल्याचा ताव । नसल्याचा आव
मुखावरी भाव । वेगळाले !! ३ !!

वेगळाले असे । गवसते काय
दोन हात पाय । साऱ्यांनाच !! ४ !!

साऱ्यांनाच कुठे । कळतो हा देव
सुखांची ही ठेव । अनमोल !! ५ !!

अनमोल आहे । जीवनाची वाट
न्यारा थाटमाट । जगण्याचा !! ६ !!

जगण्याचा आहे । एक मूलमंत्र
सत्कर्माचे तंत्र । शिकताना !! ७ !!

शिकताना जगी । शिका खूप काही
काही जात नाही । वाया येथे !! ८ !!

वाया येथे जाते । फक्त एक तत्व
दुष्कर्माचे सत्व । पदोपदी !! ९ !!

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Wednesday, March 6, 2019

सत्तेचा अभंग

_____ *सत्तेचा अभंग* _____

कैक आले येथे । आणि कैक गेले
कोणी काय केले । सांगा आता !! १ !!

साऱ्यांनाच हवी । ती खुर्ची सत्तेची
सुपारी हत्येची । जनतेच्या !! २ !!

गातात मिळूनी । सत्तेचा अभंग
मोजण्यात दंग । देणगी ती !! ३ !!

पद वाटपात । मुख्यमंत्री हरी
बाकी वारकरी । पालखीचे !! ४ !!

रखुमाईला ही । हव्या काही जागा
मंडळाचा धागा । बांधावया !! ५ !!

खेळ असा सारा । इंद्रही पाहती
यथेच्छ नाहती । मनोभावे !! ६ !!

साधावया सारे । करतात युती
लाभे फलश्रुती । सांगडीने !! ७ !!

अशा ह्या खेळात । केंद्रस्थानी सत्ता
आर्थिक सुबत्ता । मिळवाया !! ८ !!

वर्षानुवर्षे हा । होतसे पसारा
मारुनी फवारा । साफ खुर्ची !! ९ !!

_____ *सागरराजे निंबाळकर* _____

चारोळी

सारेच मद्यधुंद मधूशाळेत आज
     तो गरीब निशिकांत तेवढा सुटला

काय केले नेमके आज साकीने
     की मेनकेने टाकलेला डाव कुठला

_____ *सागरराजे निंबाळकर* _____

चारोळी

एक प्रश्न साऱ्यांनाच सतावतो
     या जगी, नेमकं जगायचं कसं

कारण, नियती खेळ खेळते सदा
     नी पदोपदी होतं असतं हसं

_____ *सागरराजे निंबाळकर* _____

चारोळी

नियतीशी देणं न घेणं काही आमचं
     ना आमुच्या श्वासांवर आमची सत्ता

मस्तमौला मुशाफिरांसारखं जगणं माझं
     काय सांगू माझा कायमस्वरूपी पत्ता

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

कैकदा म्हणाली, आता विसर सारं
     पण, एवढ्यात मी कसा सोडू हट्ट

गर्द काळोखात हरवलेलो जेव्हा
     चांदणं होऊन, तिनेच धरलेला हात घट्ट

😊 *सागरराजे निंबाळकर* 😊

Tuesday, March 5, 2019

चारोळी

मधूशाळेतच सरते, रात्र हल्ली
     साकीच सांगते मला माझा पत्ता

दुःखाला झिडकारता तरी येतं
     सुखांवर कशी गाजवावी सत्ता ?

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

स्वप्न दाखवून मला सोनेरी
     संसार तिने, दुसऱ्याच्या नावे केला

कारण विचारणारच होतो तेवढ्यात
     सारं सांगून गेला, चेहरा रडवेला

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Monday, March 4, 2019

चारोळी

फिकी पडली पेयं सारी
     जेव्हा मी प्राशिली मदिरा थोडी

सारेच झिडकारतात दुःखांना
     म्हंटलं आपणच लावावी गोडी

_____ *सागरराजे निंबाळकर* _____

चारोळी

दिवसभर फुलला जो मोगरा डौलात 
     सायंकाळी त्याला पायदळी तुडवला

दुःख कशास, आपण पामर आहोत
     लोकांनी सोयीनुसार सूर्य ही बुडवला

_____ *सागरराजे निंबाळकर* _____

Sunday, March 3, 2019

चारोळी

चार दाणे कमवावे लागतात
     तेव्हा कुठे कळते जगरहाटी

तू फक्त कर्म करत राहा मनुजा
     बाकी सोपव, विधात्याच्या हाती

😊 *सागरराजे निंबाळकर*

Saturday, March 2, 2019

चारोळी

पाऊलं जी डळमळीत झाली
     त्यांनीच पत्करला पुन्हा धोका

उंचावर जाणं सहज शक्य नाही
     त्यासाठी झुलवावा लागतो झोका

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

आईला देवघरात ठेवावं की
     तिच्या चरणी शोधू चारिधाम

लाख संकटे येती नी जाती
     आईच्या वदनाने सारी निष्काम

------- *सागरराजे निंबाळकर* -------