Monday, March 31, 2025

दोन ओळीत मी

आठवांशी तुझ्या बोलतो नेहमी
जीव दुःखास मी लावतो नेहमी

आरतीसारखी पाठ झालीस तू
नाव इतके तुझे घोकतो नेहमी

दाद मागायची वेळ येते जिथे
मैफली मी अशा टाळतो नेहमी

यंत्र नाही खुळ्या बाप आहे तुझा
जो उशाशी तुझ्या जागतो नेहमी

एकमेका जिथे रोज भेटायचो
वाट आता तिथे पाहतो नेहमी

कोणत्याही क्षणी श्वास थांबेल हा
ठाव आहे तरी धावतो नेहमी

पार्वती तूच अन् तूच माझी उमा
काळजाशी तुला ठेवतो नेहमी

येत नाही उगा राबता एवढा
दोन ओळीत मी राहतो नेहमी

~ सागरराजे निंबाळकर

Saturday, March 29, 2025

स्वतःची सावली आहे

जराशी चूक होती पण किती मी भोगली आहे
मला सोडून गेली ती स्वतःची सावली आहे

घराची काय सांगावी अवस्था बाप गेल्यावर
फिकी पडलीय होळी अन् दिवाळी लांबली आहे

तुझ्या पश्चात केला मी स्वतःचा त्याग वरचेवर
तुझे माहीत नाही पण प्रथा मी पाळली आहे

सहज नाही हसू आले कधी ओठांवरी माझ्या
उराशी लेकरागत मी व्यथा सांभाळली आहे

कधी होतेस कविता तू, गझलही वाटते केव्हा
कसा विसरू तुला आई सवय जी लागली आहे

~ सागरराजे निंबाळकर

Friday, March 28, 2025

रोज सुचतेस तू

नेहमीसारखी छान दिसतेस तू
प्रेम कवितेपरी रोज सुचतेस तू

भान सुटले तरी तोल जातो कुठे 
हात माझा असा घट्ट धरतेस तू

बांधला बंगला एक नावे तुझ्या
खंत इतकीच की त्यात नसतेस तू

जीवनाचा खरा अर्थ कळला तुला
दुःख होऊनही गोड हसतेस तू

तोड तू बंधने मोकळी हो जरा 
का उगा आतल्या आत झुरतेस तू

~ सागरराजे निंबाळकर

Thursday, March 27, 2025

कधी न काही

आयुष्य खर्च झाले जमले कधी न काही 
माझ्या मनाप्रमाणे घडले कधी न काही 

ओठात "केरवा" अन् हातात "दौत" होती
वाटायचे लिहावे सुचले कधी न काही

नात्यातला अबोला बोलून खूप गेला
इच्छा असूनसुद्धा टिकले कधी न काही

जळले बरेच काही "जाती" दुभंगल्याने
छायेत विस्तवाच्या विझले कधी न काही

जेव्हा मिठीत दिसली परक्या कुण्या मुलाच्या
कोशात शब्द माझ्या उरले कधी न काही 

पाहून दुर्दशा ही बागेतल्या कळ्यांची 
जाई, जुई, चमेली ठरले कधी न काही

शिवबा, जिजा नि साऊ नावास फक्त येथे
त्यांच्याकडून कोणी शिकले कधी न काही

~ सागरराजे निंबाळकर

Wednesday, March 26, 2025

काय आहे तुझे

~ काय आहे तुझे

कोणती झोपडी कोणता बंगला 
काय आहे तुझे श्वास जर सोडला

वाटले जर कधी एकटे-एकटे
ऐक आवाज तू एकदा आतला

एक नंबर तुझ्या सेव्ह हृदयी जरी
वाजला का कधी? फोन हातातला

ओढही संपली, प्रेमही संपले
वाढला एवढा वाद दोघातला

फक्त सांभाळणे वृत्त नाही पुरे 
यायला पाहिजे राबता चांगला

पाहण्या नेहमी लेकरांना सुखी
राबतो, खंगतो जीव बापातला

आज कळले मला भूक मारून "ती"
काढते वेगळा घास ताटातला

~ सागरराजे निंबाळकर

Sunday, March 9, 2025

उभा जन्म जातो

वृत्त : सौदामिनी 
लगावली : लगागा लगागा लगागा लगा 

~ उभा जन्म जातो 

तसा चेहऱ्याने सुखी वाटतो
कसा काय दुःखात मग राहतो

रडवते तुझे प्रेम अगदी तसे 
गुलाबास काटा जसा टोचतो

मला भेटण्या ती न आली कधी
तरीही तिची वाट मी पाहतो

कितीदा झिजवल्या तुझ्या पायऱ्या
तरी विठ्ठला तू कुठे पावतो

उभा जन्म जातो घडवण्यात हा
मुलांना किती बाप सांभाळतो

~ सागरराजे निंबाळकर

शोध चांगला दुसरा

सराव झाला, आहे आता
तुझ्या दग्याचा राणी
चलनामध्ये, नसलेली मी 
वेचत नाही नाणी

नको बहाणे, नको इशारे
शोध चांगला दुसरा
जुई, मोगरा, गुलाब, चाफा 
सोबत ठेवत हसरा

~ सागरराजे निंबाळकर

कविता, गझला

शब्दांशिवाय, कुणीच नसते
कविता लिहिणाऱ्यांचे
कलियुगातही, टिकले आहे 
नाते युगायुगांचे

रक्तासोबत, शब्द वाहती
धमण्यांमधून ज्यांच्या
रुळल्या ओठी, प्रत्येकाच्या
कविता, गझला त्यांच्या

~ सागरराजे निंबाळकर

Friday, March 7, 2025

स्मित ठेऊनी, ओठी उसणे 
गात राहतो गाणी 
थांबत नाही, काही केल्या 
डोळ्यांमधले पाणी

याचकारणे, जगापासून 
दूर स्वतःला केले 
जाणारा तर, खुशाल गेला 
सुखही माझे नेले 

~ सागरराजे निंबाळकर
टिकली असती, नाती जर का
विश्वासावर थोड्या 
तुटल्या नसत्या, सहजासहजी
कधी कुणाच्या जोड्या

कुणास मानू, इथे आपले
प्रश्न सारखा पडतो
नाती सगळी, निभावण्याचा
विकार जेव्हा जडतो

~ सागरराजे निंबाळकर
~ कुणीच बोलत नाही...

वाऱ्याची मी, गातो कवने  
कापत सगळी झाडे 
गावी माझ्या, उरलेसुरले 
श्वास मोजती वाडे

भार विजेचा, सोसत नाही 
सूर्य वेठीस धरला 
पाण्यासाठी, पावसाजवळ 
तलावसुद्धा रडला

पक्ष्यांनाही, बेघर केले 
घरटी अवघी मोडत 
जनावरेही, निघून गेली 
जंगल मागे सोडत

शिकार झाली, वाघाची अन 
हरीण निपचित पडले 
मनुष्य आहे, किती निर्दयी 
त्यांनासुद्धा कळले

शंख, शिंपले, वाळू, रेती 
मोह कमी ना झाला 
उभी करावी, वाटत आहे 
माडी प्रत्येकाला

सुरू राहिले, सत्र असे जर 
उरेल शिल्लक काही?
दुर्दैवाने, हल्ली यावर 
कुणीच बोलत नाही

~ सागरराजे निंबाळकर, कल्याण 
संपर्क - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, March 6, 2025

उरल्यासुरल्या आठवणींची
सोबत आहे आता
शोधत असतो दशोदिशांना
तुलाच येता-जाता 

कळली जर का वार्ता माझी
अश्रू नकोस गाळू 
विसर मला तू तशीच अगदी
जशी निसटते वाळू 

~ सागरराजे निंबाळकर

Sunday, March 2, 2025

गुन्ह्यात आहे

बघता-बघता परकी झाली
पत्रिका तिची मला मिळाली

घडायचे ते घडून गेले
विसर मला ती सहज म्हणाली...

आठवेल का तिला झोपडी?
नवीन माडी जिला मिळाली

मायानगरी क्षणभर आहे
गर्वाचे घर येते खाली

खिसा रिकामा असतो ज्याचा
नसतो त्याला कोणी वाली 

गुन्ह्यात आहे नाव सखीचे
काढू खटला कसा निकाली

"छावा" कळला ज्याला-ज्याला
त्याला-त्याला ऊर्जा आली

~ सागरराजे निंबाळकर