Saturday, July 31, 2021

येतो फिरून काशी

🔰 येतो फिरून काशी..

दुःखात रोज माझ्या पडतेय भर जराशी
काबा बघून झाला येतो फिरून काशी

मज़हब कधी कुणाचा वाईट सांगतो का?
थांबा अता गड्यांनो का खेळता जिवाशी

रेषा पुसून गेल्या आले न यश तरी, मग..
ताब्यात घेतला मी तो चंद्र आणि राशी

काट्याकुट्यांमुळे मी वैरी असेनही पण..
मैत्री कमाल करतो बागेतल्या फुलांशी

दुर्लक्ष खूप करतो दिवसा कसेबसे पण..
हितगूज रोज होते रात्रीस वेदनांशी 

गर्दीमुळे निवडला एकांत मीच माझा
'राजे' तुम्हीच सांगा बोलू कसा कुणाशी

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Friday, July 30, 2021

काय कमावलं

🔰 काय कमावलं..

खुशियों की फ़िराक में
होतं नव्हतं सारं गमावलं
सच बताना साहब, आपने
नाव सोडून, काय कमावलं

अशर्फियाँ जरूरी हैं आजकल
वेळेवर त्याच उपयोगी पडतात
रिश्तेदारी की इस दौड़ में
गोष्टी अशा.. नेहमी घडतात

😊 सागरराजे निंबाळकर

Saturday, July 24, 2021

भरवला लाडू

▪️भरवला लाडू..

चिंटूला हवा होता लाडू
पण, पिंकी काही देईना
भोवरा खेळावा वाटलं
त्याला खेळायलाही घेईना

पिंकीच्या अशा वागण्याने
चिंटू आमचा रूसून बसला
गाणं गायलं, गुदगुली केली
तरी तो, हसतोय कसला

काय करावं कळेना, म्हणून
चिंटूला आणून दिला लाडू
चिंटू म्हणाला मी रागावलोय
माझी समजूत नका काढू

काही वेळाने म्हंटला चिंटू
लाडू, पिंकीच्या हातूनच खाईन
तर आणि तरच मी..
उद्या शाळेत जाईन

निरोप दिला पिंकीला
आता, तूच बघ बाई
चिंटूला लाडू खायची
झालीय भलतीच घाई

गंमत करत होते रे..
असं म्हणत पिंकी आली
भरवला लाडू, हसले दोघे
बघता-बघता गट्टी झाली

😊 सागरराजे निंबाळकर

Friday, July 23, 2021

जोड प्रयत्नांची


सहजासहजी मिळत नाही सारं
जोड प्रयत्नांची, द्यावीच लागते

अतिरिक्त परिश्रम नकोत राजे..
नियती फक्त, एवढंच मागते

▪️सागरराजे निंबाळकर

Thursday, July 22, 2021

बघूया

प्राधान्यात नाही मी तिच्या
मला सर्वात शेवटी वेळ देते

बघूया.. साध्या, सरळ रस्त्यावर
ती वळण असं, कितीदा घेते

▪️सागरराजे निंबाळकर

Tuesday, July 20, 2021

जितकं जवळ करावं

शेवटीच मिळतं


विठू भक्तीचा सागर

🚩 विठू भक्तीचा सागर..

विठू माय-बाप माझा
विठू पंढरीचा राजा

वारी नेमाने करतो
नाम आनंदे स्मरतो

रोप तुळशीचे डोई
झालो पालखीचे भोई

ज्ञाना, तुका, नामा, जना
सारे तुझे दयाघना

विठू सामोरी दिसतो
शीण क्षणात पळतो

रूप डोळी सामावून
भक्त जातो सुखावून

चाले वारीत जागर
विठू भक्तीचा 'सागर'

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

विठू कारभारी

🚩 विठू कारभारी..

वारकरी सारे । करतात वारी
विठू कारभारी । पंढरीचा ।।१।।

शेकडो वर्षांची । आहे परंपरा
चालतसे धरा । सोबतीला ।।२।।

वाहे चोहीकडे । आनंदाचा पूर
नाही हुरहूर । जीवा आता ।।३।।

आषाढी वारीचा । महिमाच न्यारा
विठूचा देव्हारा । काळजात ।।४।।

विठू माझा बाप । विठू माझी माय
आता उणे काय । संसारात ।।५।।

युगे अठ्ठावीस । उभा एका जागी
सदा भक्तालागी । तारावया ।।६।।

होतो सदा लीन । अथांग सागर
भक्तीचा जागर । पंढरीत ।।७।।

◾सागरराजे निंबाळकर

Monday, July 19, 2021

घर आईमुळे टिकले होते

चिमटे काढले पोटाला कैकदा
प्रसंगी दागिनेही, विकले होते

घर माझे डगमगणारे, राजे..
केवळ आईमुळे, टिकले होते

▪️सागरराजे निंबाळकर

Saturday, July 17, 2021

माझ्या झोपडीचा थाट

▪️माझ्या झोपडीचा थाट

खाली धरा, वर नभ
हवाहवा सहवास
कधी नव्हती, नसेल
मज महालाची आस

फिका पडेल सहज
पंचपक्वान्नाचा घाट
डोळे दिपवतो राजे..
माझ्या झोपडीचा थाट

✌🏻 सागरराजे निंबाळकर

त्रास खूप होतो

▪️त्रास खूप होतो..

लाख सांभाळले, तरी..
नकळत झाली बाधा
सांगा हकीम साहेब
आता, उपाय एखादा

सौम्य आहेत लक्षणे
मात्र, त्रास खूप होतो
हीच व्यथा प्रेमामध्ये
हल्ली, मांडतोय जो-तो

😇 सागरराजे निंबाळकर

Friday, July 16, 2021

चुकले का माझे

▪️चुकले का माझे..

तारुण्याच्या प्रवाहात
चूक घडली हातून
नको तेवढी यातना
जेव्हा सोसली आतून

तरी मन-काळजाची
झटापट झाली राजे
तोल गेला मग.. यात,
काही चुकले का माझे

😊 सागरराजे निंबाळकर

Wednesday, July 14, 2021

उशिराच कळलं

तिच्या प्राधान्यात नव्हतो मी
हे जरा, उशिराच कळलं

नाव माझं ओठी तिच्या, जेव्हा
फक्त, फावल्या वेळेत आढळलं

😇 सागरराजे निंबाळकर

Tuesday, July 13, 2021

कसं टिकलंय नातं

ज्याचं त्यालाच माहीत, कसं
एका अटीवर टिकलंय नातं

दुर्लक्ष करा लोकांकडे राजे..
ते बोलतील, त्यांचं काय जातं

😎 सागरराजे निंबाळकर

साधं करून जगावं

करावं लक्ष केंद्रित कधी
तर कधी, दुर्लक्ष करावं

कठीण वाटणाऱ्या आयुष्याला
असंच साधं करून जगावं

😎 सागरराजे निंबाळकर

टोलवत राहिला

तिच्या खऱ्याखुऱ्या प्रेमाला
तो फक्त, टोलवत राहिला

प्रेमाचा हा कुरूप चेहरा
मी बऱ्याच आरशात पाहिला

😎 सागरराजे निंबाळकर

Thursday, July 8, 2021

सांत्वनाचे दोन शब्द

⚜️ सांत्वनाचे दोन शब्द

करतात खूप काही 
सांत्वनाचे दोन शब्द
जेव्हा होतं दुःखामुळे
कोणी जागेवर स्तब्ध

सांत्वनाच्या शब्दांमुळे
होते वेगळी किमया
नाही करावी लागत
कोणापुढे गयावया

खोल गर्तेत गेलेला
सांत्वनाने सावरतो
आनंदाचा झरा मग
डोळ्यातून पाझरतो

येत नाही ज्या-ज्या वेळी
पैसा-अडका कामाला
करावया हवे तेव्हा
पाचारण सांत्वनाला

विसरून झाले गेले 
आता सावराया हवे 
मिळतात सांत्वनाने
अनुभव नवनवे 

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Sunday, July 4, 2021

पहिल्याची झाली नाही

जी पहिल्याची झाली नाही
ती, दुसऱ्याचीही होत नसते

कळूनही वळत नाही, राजे..
हीच खरी शोकांतिका असते

▪️सागरराजे निंबाळकर

तारुण्याच्या प्रवाहात

ऐन तारुण्याच्या प्रवाहात
मी तिचा, ती माझी झाली

दूर जाते म्हणताना, जेव्हा..
ती काळजा समीप आली

😊 सागरराजे निंबाळकर

राणी माझी

विरोधकांशी शक्य तितक्यांदा
खेळ मनाजोगे खेळत राहते

जेव्हा-जेव्हा राणी माझी
मला राजाच्या वेशात पाहते

✌🏻सागरराजे निंबाळकर

Friday, July 2, 2021

तिच्या कलाने

नातं टिकवण्यासाठी, शेवटी
तिच्या कलाने घ्यायचं ठरलं

हे दुःख पसरत जाणारं
मीच माझ्या ओंजळीत भरलं

▪️सागरराजे निंबाळकर

हक्काची व्यक्ती गमावली

इतरांची मर्जी राखण्यात तिने
हक्काची व्यक्ती गमावली

ही दौलत पश्चात्तापाची
तिची तिनेच कमावली

😎 सागरराजे निंबाळकर

समजून घेता घेता

समजून घेता-घेता, एकदिवस
मी स्वतःचीच समजूत घातली

उपयोग नाही व्यक्त होऊन...
आतच बरी, वेदना आतली

▪️सागरराजे निंबाळकर

व्यक्त व्हायचा तो

पूर्वी व्यक्त व्हायचा तो...
हल्ली मात्र, एकांतात रडतो

किस्सा तसा साधाच आहे
पण, अनेकांच्या बाबतीत घडतो

▪️सागरराजे निंबाळकर