------- संविधान वाचताना -------
(१४ अक्षरी गीत)
संविधान वाचताना, फुलते ही छाती
काय जादू होती अशी, बाबांच्या त्या हाती !! धृ !!
होवो सुखी बहुजन, हाच एक ध्यास
बॅरिस्टर होण्या केला, अफाट अभ्यास
दोन वेळच्या खाण्याची, होती जेथे भ्रांत
संविधानामुळे तेथे, सुखावला प्रांत
जादूगार लेखणीने, जोडलेली नाती !! १ !!
साधंसुधं काम नव्हे, होती दिव्यदृष्टी
पंचशील, करुणेची, धम्ममय सृष्टी
हळूवार सांभाळत, साऱ्यांच्या भावना
दिन सोनियाचा केला, साहून यातना
आनंदाने उजळल्या, दिस आणि राती !! २ !!
समता, बंधुता आणि, एकतेचा नारा
देत नाही संविधान, अन्यायाला थारा
लोकराज्याची आमुच्या, आहे न्यारी शान
राष्ट्रास सांधणारी ही, घटना महान
गुण्यागोविंदाने नांदो, विविधांगी जाती !! ३ !!
बंदी उठवून केली, सोय संचाराची
अभिव्यक्ती, मतदान, संधी भाषणाची
अन्न, वस्त्रासवे दिला, हक्क शिक्षणाचा
मनोभावे ठेवू सारे, मान कायद्याचा
सुखावला बळीराजा, सुखावली माती !! ४ !!
@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
संपर्क :- ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !