Thursday, April 30, 2020

पुरे तुझे न चोचले


वृत्त :- कलिंदनंदिनी

🌺 पुरे तुझे न चोचले..

तुला पहावया सुखी, अमाप दुःख भोगले
तरी अजून जीवना, पुरे तुझे न चोचले

घडीत ग्रीष्म पोळतो, घडीत मेघगर्जना
कळेचना ऋतू कुण्या, दिशेत आज चालले

तुझ्याविना कसेबसे, जगून घेतले सख्या 
कधी न शल्य मांडले, कुठेच मी उरातले

अनाथ बालकांपरी, असे किती जगायचे
प्रभू कृपेत सौख्य दे, मला पुन्हा घरातले 

कवेत घेतले सदा, जपून आपलेपणा
म्हणून या गुणामुळे, अनेक मित्र भेटले

उरात दाटली व्यथा, छळावया अनेकदा  
न थांबता पुढेच मी, सदैव पाय टाकले

तरंग सागरातले, किनार गाज ऐकती
अबोल मी अबोल तू, निशब्द विश्व आपले

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Wednesday, April 29, 2020

वेळ निवांत मिळाला

------- वेळ निवांत मिळाला -------
             (षोडशाक्षरी)

लाख केले सुतोवाच येथ पर्यावरणाने 
नाही ऐकले कधीही आत्मकेंद्री मानवाने 

एकीकडे विषाणूने केला मृत्यूचा सोहळा 
दुजीकडे निसर्गाने श्वास घेतला मोकळा

जंगलात फिरणारे पक्षी आलेत सामोरी 
दाणे वेचती निवांत मोरांसवे या लांडोरी 

वेळ निवांत मिळाला राघू मैनेच्या जोडीला 
व्हावी चोच रुचकर खाता पेरूच्या फोडीला 

आहे हलकी-फुलकी बनावट शरीराची 
किती सुंदर साळुंकी चोच पिवळ्या रंगाची 

मान उंचावून पाही इवलीशी रानफुले 
खाली धरा खेळावया वर आसमंत खुले 

निर्मनुष्य झाल्या वाटा हिरवाई चोहीकडे 
किलबिल पाखरांची जणू वाजती चौघडे 

भान ठेवा आतातरी यावी बुद्धी मानवाला 
वेळ जायच्या आधीच थोडे जपा निसर्गाला

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

गोष्ट पोलीस मामांची

-- गोष्ट पोलीस मामांची --

गोष्ट सांगतो जगाला
आज पोलीस मामांची,
त्यांनी प्रेमाने केलेल्या
मोठ्या सुंदर कामांची !! १ !!

माझ्या पोलीस मामाची 
आहे मिशी पिळदार,
त्याला पाहून होतात 
चोर भुरटे पसार !! २ !!

मामा चालवितो फक्त 
एक बंदुकीची गोळी,
येते शरण क्षणात 
दहशतवादी टोळी !! ३ !!

ड्युटीसाठी माझा मामा 
उभा राहतो उन्हात,
भुकेलेल्या अन्न देतो 
देशप्रेम काळजात !! ४ !!

माझ्या मामाला मिळाले 
जेव्हा सुवर्णपदक,
आले फळाला प्रयत्न 
त्याने केले जे अथक !! ५ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Monday, April 27, 2020

एक एक सुरावट


--- एक एक सुरावट ---

काळ्या पांढऱ्या रेघांची
जेव्हा, संवादिनी गाते,
एक-एक सुरावट
थेट काळजात जाते !! १ !!

श्रीरंगाच्या बासुरीने
शहारता अंग-अंग,
राधेसवे वृंदावनी
होती गोपिकाही दंग !! २ !!

वीणा लावता छातीशी
गुज मनीचे कळती,
हात आपसूक माझे
तारा छेडण्या वळती !! ३ !!

हरिपाठ ऐकावया
आली मुक्ताई, जनाई,
मृदंगाच्या तालावर
नाचे विठू रखुमाई !! ४ !!

येते जमुनिया जेव्हा
डग्गा-तबल्याची जोडी,
सुखी संसारासारखी
वाढे आयुष्याची गोडी !! ५ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

अक्षय्य तृतीया


------- अक्षय्य तृतीया -------

अक्षय्य तृतीया । मुहूर्त मानाचा 
दक्षिणादानाचा । शास्त्र सांगे !! १ !!

होते पूजा अर्चा । बसवेश्वराची 
परशुरामाची । जयंतीला !! २ !!

महाभारताचे । काम सुरु झाले  
लिखाणास आले । गणपती !! ३ !!

कुंकवाला राहो । हळदीची साथ
सुख जीवनात । नको दुजे ! ४ !!

मृत्तिकेबद्दल । कृतज्ञता भाव 
घेतो बळी नाव । बलराम !! ५ !!

मान पितरांना । मडक्यात वाळा
स्मृतींना उजाळा ! पूर्वजांच्या !! ६ !!

करूया खरेदी । दागदागिन्यांची 
शस्त्रांची, वस्त्रांची। तृतीयेला !! ७ !!

@ सागरराजे निंबाळकर

माझ्या गावचा पार


----- माझ्या गावचा पार -----

गावाकडच्या पारावर जेव्हा
भेटायचो आम्ही सारे मित्र
रंग भरले जायचे आपुलकीचे
उभं राहायचं एकजुटीचं चित्र

प्रपंचाने वेगळं केलं साऱ्यांना
कोणी पुणे, कोणी मुंबई गाठली
मन रमत नाही मायानगरीत
कुणा सांगायची सल मनातली

पत्र येता आईचं, कळवायची
खोटीच ख्याली खुशाली
तिनेही लपवलंच की दुःख
करून, आनंद आमुच्या हवाली

चक्कर होते अध्येमध्ये गावी
योग भेटीचा जुळून येत नाही
भेटलाच कुणी तर म्हणतो
मी ठीक, तुझंच सांग नवं काही

आता पार नाही, झाडही नाही
त्याजागी, बंगला उभा झाला
उत्सुकतेपोटी पाहायला गेलो
मालक, माझाच मित्र निघाला

आदरातिथ्य केलं त्याने, मात्र
बदलली होती त्याची देहबोली
सहज म्हणाला तो, विसर जुनं
नको ठेवू, जखम तशीच ओली

मुळासारखी घट्ट मिठी कालची
आज हस्तांदोलनाने, सैल झाली
गोळा करून आठवांचा पाचोळा
पाऊले आपापल्या दिशेने निघाली

गर्दीत आधुनिकतेच्या हरवला
माझ्या गावचा एकमेव पार
दिसला तसाच कुठे, तर त्यावर
बसेन घटकाभर, पुन्हा एकवार

🌿 सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, April 18, 2020

चारोळी

इवल्याशा पणतीमध्ये जेव्हा
निमूटपणे जळतात वाती

तेव्हाच उजळतं घर सारं
दृढ होतात आजन्म नाती

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, April 17, 2020

चारोळी

व्यर्थ ठरल्या त्या साऱ्या गोष्टी
ज्या मी, मनोभावे केल्या

ती तर माझी झाली नाहीच
जाताना तिने आठवणीही नेल्या

🌿 सागरराजे निंबाळकर

Thursday, April 16, 2020

चारोळी

माझ्या अगोदरच गेलीस तू
इथे मला, एकट्याला टाकून

जसा सुटावा हुकुमाचा एक्का
नकोसं पान, हातात राखून

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

शोधताना गहाळ झालेल्या भावनांना
बरेचदा, हाती अपयश येतं

तसंही समोर येऊन कधी
आळ स्वतःवर कोण घेतं?

🌿 सागरराजे निंबाळकर

Wednesday, April 15, 2020

चारोळी

जर ओळखता आले तुम्हाला 
एखाद्याच्या नजरेतले भाव 

पाया रचून आपुलकीचा  
वसवा तिथे मैत्रीचं गाव 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

कुणाशी काय बोलावं 
सुचत नाही हल्ली 

हे अपयश वाणीचं की 
भावनांची पायमल्ली?

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, April 14, 2020

चारोळी

बाबासाहेबांच्या एका सहीने 
दलितांचा कायापालट झाला 

जेव्हा माता भीमाईने येथे 
घातला प्रज्ञासूर्य जन्माला 

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Monday, April 13, 2020

प्रीतीचे चांदणे

प्रीतीचे चांदणे

आरास दिव्यांची
माझिया मनास भावते
हळूच खुणावते
निशा            !! १ !!

साजशृंगार तुझा
साथीला आभूषणे मौल्यवान 
मानतो भाग्यवान
स्वतःला       !! २ !!

प्रीतीच्या चांदण्यात
झाला मधुचंद्र साजरा
चेहरा लाजरा
सखीचा        !! ३ !!

साथ तुझी
मज लाभली जीवनी
चंद्रास चांदणी
जशी           !! ४ !!

टपोर चांदण्यांचा
पडला अंगणी प्रकाश
उजळला यथावकाश
संसार          !! ५ !!

तळपत्या उन्हात
तुझी शीतल छाया
आपुलकीची माया
सावलीसारखी !! ६ !!

सागर सरितेच्या
पवित्र संगमात न्हाला
प्रीतीच्या चांदण्याला
मनोमिलन      !! ७ !!

तुझ्या येण्याने
गेला पूर्णत्वास प्रण
चांदण्यांचा सण
दशदिशात       !! ८ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Sunday, April 12, 2020

चारोळी

पिठासारखं भरडलं जावं
एवढंच नशीब नसावं बाईचं

एकच विनवणी विधात्या
दे प्रत्येकाला काळीज आईचं

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

काळजाच्या कोपऱ्यात जेव्हा
कोणी निर्माण करतं जागा

त्यांनाच आपलं समजा अन
त्यांच्यासवेच सुखदुःख विभागा

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

विसरणं शक्य असतं तर
तुला, केव्हाच विसरलो असतो

तसा रिवाजच आहे नियतीचा
जो हवा, तोच आपला नसतो

🌿 सागरराजे निंबाळकर

Tuesday, April 7, 2020

कन्या दिलीस पोटी

➖➖ कन्या दिलीस पोटी ➖➖

कन्या दिलीस पोटी आभार मानते मी
कंठात मोतियांचा उपहार मानते मी

सोडून पुत्र जाता सांभाळले मुलीने
जगण्यास तोच आता आधार मानते मी

मातृत्व आज माझे संतुष्ट जाहल्याने
कन्येस गोकुळाचा परिवार मानते मी

प्रेमात आड आले जर का कधी कुणी तर
निष्पाप भावनांचा व्यवहार मानते मी

भरल्या घरात माझ्या नांदो सदैव लक्ष्मी
इतुकाच देवराया संसार मानते मी

शिवबासमान राजा होणे कधीच नाही
रयतेस तारणारा सरदार मानते मी

कविता मनामनाला जोडून ठेवते तर
गझलेस शायरीचा गुलजार मानते मी

🌿 सागरराजे निंबाळकर

Monday, April 6, 2020

चारोळी

काळजाचा एक कोपरा मी
ज्या पक्ष्याच्या नावे केला

जमिनीवर एकटं टाकून मला
तो केव्हाच गगनात गेला

🌿 सागरराजे निंबाळकर

Saturday, April 4, 2020

चांदण्यांची रात आहे (मनोरमा)

-- चांदण्यांची रात आहे --

चांदण्यांची रात आहे
साजनाची साथ आहे

सोबतीने मी तयाच्या
प्रेमगीते गात आहे

तू निरांजन तूच माझी
तेवणारी वात आहे

संकटांना दूर करण्या
संयमाचा हात आहे

साजणीचे चित्र सुंदर
माझिया डोळ्यात आहे

पाहिला मी देव आई
जो तुझ्या चरणात आहे

गर्जतो जो रोज सागर
आज का तो शांत आहे

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, April 3, 2020

समग्र रामायण

------- समग्र रामायण -------

रामाची महती । साऱ्यांनाच ज्ञात
बोध जीवनात । मर्यादेचा !! १ !!

कैकयीच्या होत्या । दोन इच्छा खास
झाला वनवास । चौदा वर्षे !! २ !!

पुत्र भरतास । राजसिंहासन
निघाला लक्ष्मण । रामासवे !! ३ !!

ठेवूनी पादुका । राजगादीवर
केला कारभार । भरताने !! ४ !!

बदलून वेश । धावला रावण
सीतेचे हरण । करावया !! ५ !!

आश्वासले राम । हनुमानावर
सुग्रीव वानर । साथ देई !! ६ !!

नल नि निलाने । लिहिता श्रीराम
रामसेतू काम । झाले पूर्ण !! ७ !!

आले मदतीला । राजा बिभीषण
करण्या दहन । अहंकार !! ८ !!

अंजनीसुताने। केली खाक लंका
विजयाचा डंका । चोहीकडे !! ९ !!

हनुमानापरी । हनुमान फक्त
नाही दुजा भक्त । श्रीरामाचा !! १० !!

ऋषी वाल्मिकींनी । राहूनिया व्यग्र
लिहिले समग्र । रामायण !! ११ !!

@ सागरराजे निंबाळकर