Wednesday, June 29, 2022

गझल, रुबाई

गझल रुबाई, अभंग ओवी
काय काय मी गाऊ

कविता झाली, बहीण माझी
अक्षर आहे भाऊ

🌿 सागरराजे निंबाळकर

Monday, June 27, 2022

कळले ना

~~~ कळले ना ~~~

कळले ना मनातले, कुणास काही
ही शोकांतिका तशी, नवीन नाही

असते जे घडायचे, तसेच घडते
गेला जन्म एवढे, कळायलाही

का मी मौन पाळले, बघून सारे
नाही अर्थ लागला, कधी तुलाही

प्रिय जे सर्व त्यागले, तुझ्याचसाठी
धाडस लागते असे, करायलाही

आकांक्षा मनातली, जिवंत आहे
कारण एवढे पुरे, जगायलाही

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८७९८९७७९७

योद्धा

~~ दिशा वाकती ~~

कधी वेदना, कधी सुखाचे
येणे-जाणे असते
धैर्य ठेवणे, अशा प्रसंगी
कमी जणांना जमते

हरूनही जो, जिद्द आपली
कधीच सोडत नाही
करण्या मुजरा, योद्ध्याला त्या
दिशा वाकती दाही

🚩 सागरराजे निंबाळकर

Friday, June 24, 2022

अलक

~~~ अलक ~~~

सदा, तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे येतोस का रे बाबा?

साहेब, आत्ता लगेच नाही जमणार.
तासाभराने येऊ शकतो.

अरे बाबा ५०० ऐवजी १००० घे पण लगेच चल.

"साहेब ५०० मध्येच येईन पण माझ्या घोड्यांना जेवू घातल्यावरच" !

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, June 21, 2022

बेडी

~~~ बेडी ~~~

विषय नको तो, जेव्हा नकळत
चर्चेमध्ये आला
इसम मनाने, असून सच्चा
खजील पुरता झाला

परंपरांची, बेडी पायी
अशीच अडकत जाते
जणू असावे, दुःखासोबत
युगायुगांचे नाते

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, June 17, 2022

अनुभव

~~~ अनुभव ~~~

झळ दुःखाची लागता
सैरभैर होते मन
पडू यातून बाहेर
द्यावे स्वतःला वचन

सुखदुःख आयुष्यात
काही क्षणांचे सोबती
कधी स्मित ओठांवर
कधी डोळे पाणावती

वाटेमध्ये जे-जे येते
गोड मानूनिया घ्यावे
सारे आपलेच कर्म
दोषी कुणाला मानावे

आज इथे, उद्या तिथे
काय नेम जीवनाचा
शिकवतो खूप काही
अनुभव प्रत्येकाचा

शोधू नये पळवाट
तोंड द्यावे संकटांना
नियतीही मनोभावे
दाद देते विजेत्यांना

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
             मो - ८८ ७९८९ ७७९७

Saturday, June 11, 2022

रंग एकतेचा

🫱🏻‍🫲🏻 रंग एकतेचा..

भीक मतांची मागाया
नेते जाती दारोदारी
कधी आमिष नोटांचे
कधी गुत्त्याची सवारी

वीज, रस्ता, पाणी आणू
देती खोटी आश्वासने
निवडून आल्यावर
बंद होतात दालने

नाले साफ केल्याने का
शुद्ध होते अंतर्मन?
सेवा करू जनतेची
कोण पाळतो वचन 

एका माळेतले मणी
"बाण" असो वा "कमळ"
"पंजा" वैरी "घड्याळाचा"
नाही "इंजिनात" बळ

तंटा दिवसा नि रात्री
एका ताटात जेवती
बरळून काहीबाही
विष जातीत पेरती

दादा, भाऊ, आप्पा, नाना
कुणी बनतोय दूत
लाखो गुन्हे करूनही
यांची इज्जत शाबूत

लज्जा सोडून दिलेली
रोज बदलतो बाप
यांच्या कुळाला कायम
आहे विभक्तीचा शाप

योग्य जागा आता यांना
तूच दाव मतदारा
पीक नासके कधीच
नको पेरूस दुबारा

सुजलाम सुफलाम
होऊदेत सारा देश
रंग लावू एकतेचा
नको बदलता वेष

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
            मो - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, June 9, 2022

शर्यत आहे

~~~ शर्यत आहे ~~~

जीवन म्हणजे शर्यत आहे
जो-तो केवळ धावत आहे

गेले मागे गाव कधीचे
वारा मजला सांगत आहे

आई रखुमा, विठ्ठल बाबा
दोन्ही माझे दैवत आहे

लिहिला जावा शेर असाही
मैफल ज्याने गाजत आहे

हिंदू, मुस्लिम बांधव माझे
या, सगळ्यांचे स्वागत आहे

पणतीमध्ये दोन कुळांना 
उजळवण्याची ताकत आहे

शर्ती साऱ्या का गरिबांना ?
श्रीमंतांना सवलत आहे

हत्ती, घोडे, उंट शिपाई
"राजाची" ही दौलत आहे

मातीमध्ये शेवट होतो
अन् तू मजले चढवत आहे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
            मो - ८८ ७९८९ ७७९७

Wednesday, June 8, 2022

झाले गेले

गांधर्वी - गागागागा गागागा

झाले गेले विसरावे
आयुष्याला सांधावे

काटे झाले सवयीचे
फुल मी केव्हा तुडवावे

झोळी असता इवलीशी
जास्तीचे का मागावे

खेळी होती अपुल्यांची
दोषी कोणा मानावे

झाडांनाही मन असते
झडण्यापूर्वी बिलगावे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
           मो - ८८ ७९८९ ७७९७

Sunday, June 5, 2022

वेदना आतली

कादंबरी - गालगागा गालगा

वेदना ही आतली
ऐनवेळी जागली

गंध थोडा घेतला
भूक सारी भागली

तू पराभव टाळला 
लाज माझी राखली

आज उरली का कुठे
नीतिमूल्ये चांगली

शिक्षणाची दुर्दशा
मान खाली वाकली

काय चुकले नेमके
का अशी तू वागली

एक वणवा पेटला
केवढी झळ लागली

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, June 3, 2022

मानत गेलो

अर्धक्षामा : गागागागा गाललगागा

अपुले सगळे मानत गेलो
का मी इतका वाहत गेलो

कोणी नसते संकटकाळी
अनुभवल्यावर सांगत गेलो 

सगळे काही नश्वर आहे
का मग इतके मागत गेलो

करण्याजोगे पुष्कळ होते
पण मी केवळ पाहत गेलो

करण्या कायम मुक्त फुलांना
काटे सारे वेचत गेलो

चुकला नाही सूर्य कुठेही
आपण झाडे तोडत गेलो

जागोजागी फक्त दिखावा
मोहाला मी टाळत गेलो

अपुला-परका भेद कशाला
माणुसकी मी पेरत गेलो

मृत्यूवरचा राग खरा पण..
जन्माशी मी भांडत गेलो

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
       मो - ८८ ७९८९ ७७९७