आसवांना गाळताना
अंधश्रद्धा पाळताना
आठवांना चाळताना
मोगऱ्याला माळताना
एकमेका भाळताना
वेदनांना साहताना
आठवांना आठवूनी चाळतो मी
गंध येता मोगऱ्याचा भाळतो मी
चालताना आड वाटेने अताशा
सहजतेने आसवांना ढाळतो मी
🌿 *सागरराजे निंबाळकर*
वृत्तबद्ध चारोळी :-
पाहिलेली स्वप्न सारी मोडली मी
संभ्रमाची वाट आता सोडली मी
काय सांगू काय झाले हाल माझे
श्रुंखला ही वादळांची तोडली मी
🌿 *सागरराजे निंबाळकर*
------- थांब थोडा -------
सांभाळलं ज्यांनी ! होते तुझ्या पाठी
फक्त तयांसाठी ! थांब थोडा !! १ !!
उतार वयात ! आधाराची काठी
एकमेकांसाठी ! थांब थोडा !! २ !!
पाहते ती तुला ! अशी एकटक
सावरण्या बट ! थांब थोडा !! ३ !!
घेताना निरोप ! मुद्रा आठवावी
तिच्या ठायीठायी ! थांब थोडा !! ४ !!
वाट पाहे ताई ! हरेक क्षणाला
रक्षाबंधनाला ! थांब थोडा !! ५ !!
टाळ तूच आता ! साऱ्या प्रलोभना
जाण संकेतांना ! थांब थोडा !! ६ !!
साधून सुकर्म ! राहा प्रामाणिक
जगण्या आणिक ! थांब थोडा !! ७ !!
© *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
झाले कसे गुलाबी हे गाल लाल आता
कळले मला अता की जुळणार ताल आता
ठोकाच काळजाचा बघना चुकून गेला
जीवास वेड लावी कमनीय चाल आता
तू सोबतीस नसता मन हे उदास होते
सांगू किती जिवाचे होतात हाल आता
जगणे तुझ्याविना हे झाले अशक्य मजला
हे सांगताच तू ही हसते खुशाल आता
होकार तव मिळाला भलताच खूष झालो
जणु लाभली प्रियेची उबदार शाल आता
हातात हात यावा इतुकेच मागणे का
साराच जीव तुजला केला बहाल आता
ही वाट जीवनाची चालू खुशीत दोघे
राहू तिथे सुखाचा बांधू महाल आता
हसणे तुझे खुशीचे मजला हवे हवेसे
स्वप्नात रंगतो मी सारे त्रिकाल आता
ये सागरास भरती तुजला सखे पहाता
संध्या नभी उधळते बघ ना गुलाल आता
© *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
✨ *गोकुळात गाजे गोपिका* ✨
पाहताच कान्हाला लाजे गोपिका
साऱ्या गोकुळात ही गाजे गोपिका !! धृ !!
फोडूनिया माठ करितो चोरी
थट्टा म्हणावी ह्याला की खेळी अघोरी
बैसला दडून कैसा झाडामागे
द्वाड खोड्या कान्हाच्या यशोदा सांगे
यौवनाच्या बहराला साजे गोपिका
साऱ्या गोकुळात ही गाजे गोपिका !! १ !!
येता गोपिका दारी घेऊन गुन्हे
ठेवले बांधून कान्हा यशोदेने
मांडावी बाजू कशी कुणा कळेना
पाऊले भीतीने कान्हाकडे वळेना
किस्से हे सांगते ताजे गोपिका
साऱ्या गोकुळात ही गाजे गोपिका !! २ !!
वाट अडवितो कान्हा वृंदावनी
पेच पडला आता कसं भरावं पाणी
केल्या विनवण्या तरी कान्हा ऐकेना
कधी म्हणतो ऐसे हे कधी तैसे ना
किणकिण पैंजणांची वाजे गोपिका
साऱ्या गोकुळात ही गाजे गोपिका !! ३ !!
झाली गट्टी एकदाची कान्हासवे
विहरती गोपी जसे नभात थवे
घुमू लागला पावा चोहीकडे
विसरूनी सारे व्हा एक गडे
कान्हा सांगी आयुष्य माझे गोपिका
साऱ्या गोकुळात ही गाजे गोपिका !! ४ !!
© *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
एवढ्यासाठीच पाहिलं डोळ्यात तिच्या
सत्याची तिला देवता मानायचे
वदनांनी हसून दिली पोचपावती
बाकी रहस्य आपले आपणच जाणायचे
© *सागरराजे निंबाळकर*
खेळावं म्हणतो राजकारण
सुखांशी करून आतून युती
बेभरवशाच्या नियतीसवे
साधी, सोपी, सरळ नीती
© *सागरराजे निंबाळकर*
सरले कैक दिवस असेच
लागला ना मनाचा थांगपत्ता
वास्तवाचे विसरून देहभान
रंगवत आठवणींचा कित्ता
© *सागरराजे निंबाळकर*
सडा सारवण पहाटेच्या प्रहरी
दारी रांगोळीची सुबक नक्षी
सुरेल चिवचिवाटाचा गुंजारव
साथीला आनंदाने विहरते पक्षी
© *सागरराजे निंबाळकर*
आगमन गणरायाचे
होते मोठ्या उत्साहात
आनंदाने घराघरात
प्रतिष्ठापना !! १ !!
प्रतिष्ठापना करताना
पूर्व पश्चिमेस मुख
लाभते सुख
घरादाराला !! २ !!
सुखकर्ता दुःखहर्ता
नावे तुझी निरनिराळी
विलोभनिय आगळीवेगळी
देहरचना !! ३ !!
शुभ कार्यारंभी
प्रथम नमन गणेशास
लाभतो आत्मविश्वास
ध्येयपूर्तीस !! ४ !!
आगमन गणरायाचे
आनंदात बागडून मौजेचे
सानथोरांच्या हौसेचे
हर्षोल्हासी !! ५ !!
मनोवेधक आरास
मुकुट शोभे मोरपिसांचा
सुंदर हारतुऱ्यांचा
मखर !! ६ !!
वरदहस्त त्रिलोकी
पुत्र शंकर शाम्भविचा
चौसष्ट कलांचा
अधिपती !! ७ !!
वाहा मनोभावे
शमीपत्र, जास्वंदी, केवडा
महिमा एवढा
आयुर्वेदाचा !! ८ !!
करतो पूजापाठ
माझे दैवत आराध्य
दावूनी नैवेद्य
मोदकांचा !! ९ !!
होते नित्यनेमाने
सांज सकाळी आरती
धूप पंचारती
निरांजनी !! १० !!
विनवणी लंबोदरा
यावे पुन्हा एकदा
राहो सदासर्वदा
आशिर्वच !! ११ !!
© *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
*कसं समजावू साजणी तुला*
*जीव माझा किती तळमळतो*
*आसवांच्या सरितेचा सागर झाला अन*
*तू म्हणतेस फक्त एक अश्रू गळतो*
*सागरराजे निंबाळकर*
➖ *त्यागास शब्द तोकडे* ➖
*तप्त उन्हाच्या झळात*
*झळात थंड सावली*
*सारीच सुखे कवेत*
*कवेत त्याच्या मावली*
*घरादाराकडे लक्ष*
*लक्ष त्याचं चोहीकडे*
*काय वर्णू मी त्यागास*
*त्यागास शब्द तोकडे*
*मित्र, सखा, सवंगडी*
*सवंगडी तो सर्वांचा*
*अनुभवाचा अध्याय*
*अध्याय न्यारा पर्वांचा*
*येता संकटे अमाप*
*अमाप ते मनोधैर्य*
*सद्विवेकाने लाभते*
*लाभते घराला स्थैर्य*
*कसा विचारावा मना*
*मना त्याचा थांगपत्ता*
*गोडी राहो सत्संगाची*
*सत्संगाची नितीमत्ता*
*विनवणी देवाकडे*
*देवाकडे ही याचना*
*अंत आता पाहू नको*
*नको बापास यातना*
*राहो कृपा त्याची जशी*
*जशी सागराची खोली*
*किनारा शुद्ध निर्मळ*
*निर्मळ मधाळ बोली*
© *सागरराजे निंबाळकर*
*लाडका गणपती बाप्पा*
*मला पण हवा मोदक म्हणत*
*उंदीर मामा अडून बसला*
*घट्ट बिलगून बसलेला बाप्पा*
*तो मोदक सोडतोय कसला*
*इवल्याश्या गादीवर त्या*
*बाप्पाची इवलीशी काया*
*मिठी पाहून उंदीर पुटपुटला*
*बहुधा प्रयत्न जाणार वाया*
*लाडीगोडी लावत म्हणाला मामा*
*मला फक्त छोटासा घास दे*
*नको चिंता करू अशी तू*
*आता थोडातरी हास रे*
*बाप्पाची विनवणी करून सुद्धा*
*मिळाला नाही मोदक काही*
*उंदीर मामा रागावला म्हणाला*
*तुझे वाहन होणार नाही*
*शेवटी ठरलं दोघात की*
*मिळून थोडं थोडं खाऊ*
*इकडे तिकडे लक्ष ठेव मामा*
*नाहीतर हळूच यायची माऊ*
*केली सुरूवात मोदक खायला*
*पण तो काही सरता सरेना*
*मामाला वाटायचं जास्त झालं*
*बाप्पा म्हणायचा पोट भरेना*
*संपवून कसाबसा मोदक*
*दोघेही गाढ झोपी गेले*
*पसारा पाहून आई रागावली*
*गुरू आगाव खोडकर चेले*
*अशी आहे एकंदरीत गंमत*
*एका मोदकात एवढ्या गप्पा*
*येतोय लवकरच भेटीला*
*सर्वांचा लाडका गणपती बाप्पा*
© *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
अंदाज ना आला खोलीचा आसवांच्या
गळताना खूप काही सांगत होती
एरव्ही भरधाव धावणारी ती नियती
आज व्याकुळ विरहात रांगत होती
सागरराजे निंबाळकर
दोष कुण्या त्रयस्थाचा नाही
मीच माझी ओळख विसरलो
सामना व्हायचा एकेकाळी लाटांशी
आज एका झंझावातात बिथरलो
सागरराजे निंबाळकर
एवढ्यासाठीच बिलगलो फुलांना
जगताना काट्यांचंही भान राहावं
हृदयाला होणारं अतीव दुःख
मीच माझ्या डोळ्यांनी पाहावं
*सागरराजे निंबाळकर*
कोणत्या तोंडाने जाणार समोर
आईबाबांचे चांगले पांग फेडले
सुखी कुटुंबाच्या वृक्षवल्लीला
वृद्धाश्रमाच्या काट्यांनी वेढले
सागरराजे निंबाळकर