Monday, May 29, 2023

आंदण मिळाले

~~ आंदण मिळाले

रडता न आले हसता न आले
आयुष्य इतके बेरंग झाले

चेष्टाच आहे नशिबी तुझ्यातर..
हासून मिश्किल भटजी म्हणाले

कवटाळले मी ज्यांना उराशी
काट्यांपरी ते घातक निघाले

आयुष्य म्हणजे केवळ पसारा
आहे खरे हे.. उशिरा कळाले 

बापात विठ्ठल आईत रखुमा
नशिबास दोन्ही आंदण मिळाले

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, May 28, 2023

का शरण जाऊ

~ का शरण जाऊ?

बांध फुटला मांडवाला
लेक निघता सासुराला

सोंग असते चौकशीचे 
कोण उत्सुक सांत्वनाला

काळजाचा रोग आहे 
दूर सारा औषधाला

घट्ट मैत्री जर हवी तर..
हात घाला काळजाला

छापणे नाही पुरेसे
वेळ काढा चिंतनाला

मी गझलची कास धरली
अर्थ आला लेखनाला

मीच लिहिले भाग्य माझे
का शरण जाऊ कुणाला?

शिष्य जर ज्ञानी निघाला
श्रेय जाते शिक्षकाला

🫵🏻 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, May 23, 2023

स्पष्टीकरण देता येत नाही

~ कधीकधी आपल्याजवळ उत्तरं असूनही स्पष्टीकरण देता येत नाही..

अडीअडचणी नाहीत असा एकही मनुष्य या भूतलावर नाही.
प्रत्येकाला कुठे ना कुठे ठेच लागतेच.
अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करूनही अडचणी सुटत नाहीत.
अशावेळी धीर देणारे, साथ देणारे, पाठराखण करणारे हात फारच कमी असतात. 

आपण आजवर जेवढं काही यश मिळवलेलं असतं ते केवळ एका अपयशाच्या छायेत झाकोळलं जातं.
आणि इथूनच सुरू होते मूल्यमापन.
तू अमुक केलं असतं तर तमुक झालं असतं.
तुला अमुक सुचलं नाही का?
तुझी बुद्धी गवत चरत होती का? वगैरे, वगैरे..

आपण हे करून पाहूयात का?
मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
असं कोणीही म्हणत नसतं.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण मनातल्या मनातच म्हणता येते अशावेळी.
कारण सद्यस्थिती असतेच अशी की स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न जरी केला तरी त्याला बहाणे, आळस, अहंकार अशी झालर लावली जाते.

घुसमट होते, इच्छा मरते
गढूळ आहे, दुःख खरोखर

प्रत्येकाची, दशा निराळी
कोण चूक अन्, कोण बरोबर

घडलेल्या गोष्टींचे चिंतन करणे क्रमप्राप्त असते परंतु ते करत असताना कोणी दूषणे देऊन खंडन केले तर तो घाव बंदुकीच्या गोळीपेक्षाही मोठा वाटतो.
मदतीचा एक हात अस्मानी संकटांवर मात करू शकतो हे मोजक्यांना कळतं.
अपेक्षा ठेऊन केलेली मदत व्यवहारात गणली जाते.

घासामधला, घास द्यायला
मोठे काही, लागत नाही 

आयुष्याला, नाव वेगळे
याहून दुजे, आहे काही?

सुविचार फक्त कानावर पडून उपयोग नसतो ते आत काळजावर कोरले गेले तरच जीवनाचं सार्थक होतं.

अन्यथा खेदाने म्हणावे वाटते -

नाही माझे येथे काही उशिरा कळले
पर्वा नाही कोणालाही उशिरा कळले

फक्त मानले म्हणजे सारे अपुले नसते
नाव पाहिजे नात्यालाही उशिरा कळले

मित्रहो, खरंय ना हे?

शब्दांकन - सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, May 22, 2023

शेर माझे

~~ शेर माझे..

आसवे गाळली मौनही पाळले
हाय ! दुःखा तुझे केवढे चोचले

योग येतो असा छान केव्हातरी
आज मोजू प्रिये श्वास श्वासातले

मीच माझे मला दुःख आंदण दिले
गोल फिरते जसे पीठ जात्यातले 

एवढ्याने कुठे नष्ट होईन मी
घास तू चांगले बाण भात्यातले

शेर माझे तुला सांग कळतील का?
शोधले जर सतत दोष गझलेतले

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, May 20, 2023

जीव जडला

~~ जीव जडला

प्रेम कळले भांडल्यावर
तू जराशी हासल्यावर

मी कुणाचा कोण माझे
श्वास घेणे सोडल्यावर

चालणे शिकलो सरळ मी
ठेच मोठी लागल्यावर

अक्षरांवर जीव जडला
पुस्तकांना वाचल्यावर

मोकळा संवाद होतो
वेळ थोडा काढल्यावर

आसवे डोळ्यात आली
वेदनांनी घेरल्यावर

काय फेरे काय वचने 
प्रेम सगळे संपल्यावर

@ सागरराजे निंबाळकर

वावर तसाच आहे

लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

(दोन लघुंचा एक गुरू अशी सूट घेऊन)

मनात माझ्या तुझ्या स्मृतींचा
          अजून वावर तसाच आहे
क्षणात हसतो क्षणात रडतो
          हताश सागर तसाच आहे

कसा हसू मी बळेच आता
          चुकूनही भेटलीस जर तू
दिलास आंदण मला दुरावा 
          जसा अगोदर तसाच आहे

निराश केले मला सुखाने 
          जमेल तितके जमेल तेव्हा
उभा तरी मी हसून कायम
          सुखाबरोबर तसाच आहे

विरह तुझा मी सहज पचवला
          गृहीत धरले उभ्या जगाने 
कधी न विझलो अजून जळतो
          तुझ्या समांतर तसाच आहे

गझल म्हणू की अखंड कविता
          तुला कशी सांग हाक देऊ
तुझीच प्रतिमा, तुझाच आशय
          तरल मनावर तसाच आहे

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Monday, May 15, 2023

मुसाफिर

जो है ही नहीं दिल में
वो, जुबां पे कैसे आएगा

मुसाफिर की तरह आया वो
लगता है वैसे ही जाएगा

😇 सागरराजे

Friday, May 5, 2023

शाप गरिबीचा

~ शाप गरिबीचा..

भूक लागली तरीही
पोट होईना नाराज
काय असते सोसणे
मला कळतेय आज

पंचपक्वान्नाचे ताट
गेले नजरेपुढून
शांत केले कसेबसे
गळ जीभेला घालून

शाप गरिबीचा जेव्हा
साथ जन्मभर देतो
योग भूक मारण्याचा
इथे दररोज येतो

कुणा काळजी दाण्याची
कुणी फेकतो सहज
सांभाळता येत नाही 
असा भूकेचा ऐवज

देवा विनवतो तुला
नको देऊ असे पोट
रोज लागते ज्यामुळे
गरिबीला गालबोट

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, May 2, 2023

वृत्त जगतो

~~ वृत्त जगतो..

आत माझ्या धैर्यशाली वाहतो सागर
स्वार मी ऐटीत होतो रोज दुःखावर

डाव सारे ओळखावे वेळच्यावेळी
अन्यथा होतो खुबीने आपला वापर

मी तसाही एक उपरा गाव नसलेला
भार टाकू मी कसा मग फार कोणावर

मी अनामिक झाड आहे सावली देतो
नाव माझं कोण घेतं पान गळल्यावर

मी गझलचे वृत्त जगतो शक्य तितक्यांदा
तृप्त होतो श्वास माझा शेर लिहिल्यावर

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण