Sunday, October 31, 2021

वैभव दिवाळीचे

🔰 वैभव दिवाळीचे

नको हेवेदावे | घडवू समेट
दिवाळीची भेट | हीच खरी ||१||

करंजीप्रमाणे | राहो वाणी गोड
नको तडजोड | संवादात ||२||

कधी रवा, कधी | बेसनाचा लाडू
फराळाला वाढू | आनंदाने ||३||

शंकरपाळीचा | अनोखा आकार
जपतसे फार | एकात्मता ||४||

चिवडा, चकली | मुक्त आणि गोल
सांभाळती तोल | जिव्हेचा या ||५||

जिथे-जिथे आहे | दाट अंधकार
लावू हातभार | प्रकाशाचा ||६||

चराचरामध्ये | करू दीपोत्सव
टिकवू वैभव | दिवाळीचे ||७||

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, October 30, 2021

पारख स्वतःची

▪️पारख स्वतःची..

पारख स्वतःची | स्वतःच करावी
उजवी ठरावी | बुद्धिमत्ता ||१||

आत्मपरीक्षण | नसेना का चोख
नको उगा रोख | वाममार्गे ||२||

निधड्या छातीने | करावा सामना
फळते कामना | संकटात ||३||

एक दार बंद | खुले होते दुजे
अपयश खुजे | संधीपुढे ||४||

बांधू नये कधी | कळपाचे घर
माथा उजागर | तात्पुरता ||५||

▪️सागरराजे निंबाळकर

Friday, October 29, 2021

सांभाळावा तोल

▪️सांभाळावा तोल

कुणाला सांगावी | मनातली खंत
नसते उसंत | क्षणभर ||१||

अवस्था मनाची | दयनीय फार
नको ते विकार | बळावले ||२||

होते जेव्हा-जेव्हा | चिंतामुक्त मन
ठेंगणे गगन | होते सारे ||३||

संयम थोडासा | थोडेसे चिंतन
करते हवन | वेदनेचे ||४||

संकटात खरा | सांभाळावा तोल
विचार सखोल | करोनिया ||५||

▪️ सागरराजे निंबाळकर

Thursday, October 28, 2021

सरले अंतर

विचार जुळले, हवे तसे अन्
दोघांमधले, सरले अंतर

क्षण हा आला, आनंदाचा
बराच अवधी, गेल्यानंतर

▪️सागरराजे निंबाळकर

Monday, October 25, 2021

वावर त्यांचा

बदलत आहे, ऋतूंप्रमाणे
वावर त्यांचा, क्षणाक्षणाला

कशी पेरणी, करू अता मी
नांगरून या, विश्वासाला

▪️सागरराजे निंबाळकर

Sunday, October 24, 2021

दबला आहे जो तो

दबला आहे, नकळत जो-तो 
आकांक्षेच्या, ओझ्याखाली

चारचौघात, बळेच हसणे
अन् एकांती, अश्रू गाली

▪️ सागरराजे निंबाळकर

Saturday, October 23, 2021

सुरेल गाणे

ज्याचा-त्याने, ओढत जावा
रहाटगाडा, आनंदाने

लय सापडते, जगण्याची अन्
जीवन होते, सुरेल गाणे

▪️सागरराजे निंबाळकर

Friday, October 22, 2021

सत्य कळले मला

🔰 सत्य कळले मला..

शेवटी-शेवटी सत्य कळले मला
कोण होता कटू कोण आहे भला

कौतुकाला जरी ओठ शिवले तिचे
संग्रही ठेवते टोमणा चांगला

शांततेने घरी नांदले सौख्य जर..
मोडकी झोपडी वाटते बंगला

प्यायल्याने मला होत नाही नशा
सोबती स्वर हवा एक दुःखातला

रोज भजतो नमो नाइलाजात मी
स्वावलंबी खरा भक्त वाटायला

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Thursday, October 21, 2021

कुणी कुणाचा नाही

प्रसंग येता, कळते वास्तव
कुणी कुणाचा, नाही येथे

उघडे डोळे, हात मोकळे
सोबत केवळ, माती येते

▪️सागरराजे निंबाळकर

Wednesday, October 20, 2021

झाली घाई

🔰 झाली घाई..

ओवाळणीत, दिलं मी सर्व
केवळ एका, हट्टापायी
इथेच बहुदा, चुकलं माझं
नको तेवढी, झाली घाई

उत्साहाचा, शाप जणू हा
वळून कधी न, जातो मागे
केविलवाणा, प्रयत्न सारा
जोडावयास, कच्चे धागे

▪️सागरराजे निंबाळकर

Tuesday, October 19, 2021

प्रवास माझा

संपत नाही, प्रवास माझा
बरेच अंतर, आहे बाकी

साथ पाहिजे, ध्येय गाठण्या
कुठवर चालू, मी एकाकी

🔰 सागरराजे निंबाळकर

तेच नेमके होते भाळी

कधी न दिसले, डोळ्यांना जे
तेच नेमके, होते भाळी

म्हणून बहुदा, पौर्णिमेतही
रात्र वाटते, मजला काळी

▪️सागरराजे निंबाळकर

Saturday, October 16, 2021

मधूशाळेत

मधूशाळेत, जो-तो रमतो
आहे इतके, दुःख खरोखर?

प्रत्येकाची, दिशा वेगळी
कोण चूक अन्, कोण बरोबर

▪️सागरराजे निंबाळकर

Thursday, October 14, 2021

हिंडलो खेळलो

🌿 कर रहा हूँ सबर..

हिंडलो, खेळलो मी जिथे आजवर
अजनबी क्यों हुआ एक दिन वो शहर

भेटण्याचे वचन द्यायची रोज ती
एक अर्सा हुआ पर न आयीं खबर

आज असत्या जवळ हाक देण्यापरी
चंद खुशियाँ सभी ढूँढ पाता अगर

आज किंवा उद्या याच आशेवरी
मुद्दतोंसे यहाँ कर रहा हूँ सबर

पाहिजे जर तुला अर्थ मौनातला
ध्यान से देखना शायरोंकी कबर

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Wednesday, October 13, 2021

घेतो सवलत

अधूनमधून, दुःखाकडून
घेतो सवलत, थोडी-थोडी

संचय होतो, आनंदाचा 
आयुष्याला, येते गोडी

🌿 सागरराजे निंबाळकर

Tuesday, October 12, 2021

मी तयार नाही

वाटेमध्ये, आयुष्याच्या
रोज गवसते, नवीन काही

वेचून सर्व, घेण्याइतपत
अजूनही मी, "तयार" नाही

▪️सागरराजे निंबाळकर

Monday, October 11, 2021

वसंत झाले जगणे

वसंत झाले, जगणे आणिक
ओंजळ माझी, भरून गेली

किमया न्यारी, सुखावणारी
नियतीने या, पटकन केली

🌿 सागरराजे निंबाळकर

Sunday, October 10, 2021

वार गुलाबी

वार गुलाबी, जखम सुगंधी
सारं अगदी, जुळून आलं

जेव्हा-जेव्हा, प्रेमामध्ये
मन हे माझं, हळवं झालं

😊 सागरराजे निंबाळकर

एक कवडसा

बगल देऊन, अंधाराला
एक कवडसा, आला दारी

योग असावा, शुभ एखादा
सूर्याची मज, घडली वारी

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, October 8, 2021

अश्रू ओघळणारे

सरी वाटल्या, जणू बेधुंद
अश्रू गाली, ओघळणारे

क्वचित मिळतात, वाटेमध्ये
दुःख आपले, ओळखणारे

▪️सागरराजे निंबाळकर

Wednesday, October 6, 2021

बरेच काही

कधी न खुलून, बोलू शकलो
मनी साचले, बरेच काही

प्रयत्न केले, लाख तरीही
जे ओठांवर, आले नाही

▪️सागरराजे निंबाळकर

Monday, October 4, 2021

योग्य तेवढं

▪️योग्य तेवढं..

कलाकाराला मानधन आणि लेकीला आंदण योग्य तेवढं दिलंच पाहिजे.

लेकीच्या लग्नात पैसे कमी दिले म्हणून वाजंत्री आणि वस्तू साध्या दिल्या म्हणून सासरकडची मंडळी कशी नाराज होती हे सांगताना माधवराव बोलून गेले.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

तोल जातो

▪️तोल जातो..

"जास्त डोकावल्यानेही तोल जातो बरं का.."

प्रकाश सतत प्रणिताचा मोबाईल तपासायचा, हा नंबर कुणाचा, ह्याने मेसेज का केला? अशी विचारणा करायचा, कुठे निघालीस? अशा नानाविध प्रश्नांना कंटाळून काडीमोड घेण्यासाठी आल्यावर परांजपे वकील दोघांना म्हणाले !

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Sunday, October 3, 2021

मन हे वेडं

एकसारख्या, दुःखाचं या
कारण जर का, कळलं असतं

हसलो असतो, खुलून मीही
मन हे वेडं, झुरलं नसतं

▪️सागरराजे निंबाळकर

Friday, October 1, 2021

दाणापाणी शोधत

सरली अवघी हयात माझी
दाणापाणी शोधत-शोधत

तरी न कळले पोट उपाशी
काय नेमके होते बोलत

▪️सागरराजे निंबाळकर