Sunday, June 30, 2019

चारोळी

वाटायचं मलाही प्रेम करावंसं, मात्र
काळजाला काही भावलं नाही

बऱ्याचदा निराशा पदरी येते म्हणून
मी काहीच मनाला लावलं नाही

😊 सागरराजे निंबाळकर

चारोळी

सोडल्या असत्या जर आशा आकांक्षा
जगणं काहीसं सोपं झालं असतं

नियतीने धडे दिले असते, तर
जरा लवकर ध्यानी आलं असतं

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, June 29, 2019

चित्र माझ्या संसाराचं

-- चित्र माझ्या संसाराचं --

चुलीवर थापते मी
माझी लाखाची शिदोरी
भाकरीचा चंद्र गोल
जणू आरसा बिलोरी

धूर चुलीचा साहून
काळाकुट्ट झाला हंडा
मनोभावे राबण्याचा
त्याने पाडला पायंडा

रोज मायेने पडते
पीठ बेलण्याची गाठ
माझ्या हाताच्या स्पर्शाने
सुखावते पोळपाट

कैक पिढ्या सांभाळल्या
अशा भिंती ह्या भक्कम
मिळणार नाही पुन्हा
लाखो खर्चून रक्कम

चित्र माझ्या संसाराचं
माझं मीच रेखाटते
नित्य वाहत्या झऱ्याचे
पाणी कधी का आटते?

@ *सागरराजे निंबाळकर*
      उल्हासनगर, ठाणे
       ८८७९८९७७९७

चारोळी

अजूनही कळत नाही मला
व्याख्या आयुष्याची कशी करायची

घट्ट बिलगायचं प्रत्येक क्षणाला की
सर सुखाची ओंजळीत धरायची

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

हृदयाच्या कोण्या एका कोपऱ्यात
मित्रहो, एक खळबळशी माजली

नजरानजर होताच वळचणीवर
जेव्हा ती नववधूसारखी लाजली

😉 *सागरराजे निंबाळकर*

जरतारी पैठणी (लावणी)

-- जरतारी पैठणी द्या मजला राया --

अडवू नका तुम्ही, जाईल हट्ट वाया
जरतारी पैठणी, द्या ना मजला राया !! धृ !!

यौवनाला खुणावितो, गोरा गोरा रंग
सोळा वरीस लोटले, चोळी झाली तंग
वेळीच घाला तुम्ही, आवर ह्या मनाला
नाहीतर कळेल, वार्ता साऱ्या जगाला

शहारलं अंगअंग, मोहरली काया !! १ !!

गोऱ्या गोऱ्या हनुवटी, काळा काळा तीळ
पिरतीचा सोडवू मी, सांगा कसा पीळ
पावसाचे थेंब गार, अंगाला झोंबती
उडणाऱ्या बटा जशा, पारंब्या लोंबती

तुमच्याविना जाईल, सारा जन्म वाया !! २ !!

शोभे तुमच्या नावाचं, गळ्यात डोरलं
नाव माझ्या ईश्वराचं, हाती मी कोरलं
गजरा मोगऱ्याचा मी, केसात माळते
दूर जाता जेव्हा तुम्ही, पत्रास चाळते

सुखांना नजर नको, टळो मोहमाया !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, June 28, 2019

ओठी माझ्या सदा तुझे नाव

----- ओठी माझ्या सदा तुझे नाव -----

ओठी माझ्या येते राणी, सदा तुझे नाव
विसरू कसे मी सांग, आठवांचे गाव !! धृ !!

पाहताच पहिल्यांदा, हरपले भान
शब्द शब्द वाटे तुझा, कोकिळेची तान
हळूच खुणावी मज, डोळ्यांची ही भाषा
पहिल्या प्रेमाच्या होती, पल्लवित आशा

कळेनाच घेते कसा, नजरेने ठाव !! १ !!

जाई, जुई, निशिगंध, गुलाबाची कळी
दूर सारे हळूहळू, दोघातली फळी
पहावे कितीदा तुला, चाफा माळताना
होत गेलो तुझा सारा, मला गाळताना

सुखावती मना सारे, मखमली घाव !! २ !!

प्रेम आपुले हे जणू, स्वर्गातल्या गाठी
जन्म घेतला लाखात, एकमेकांसाठी
भाळी तुझ्या शोभे कुंकू, सौभाग्याचं लेणं
साता जन्माचे सोबती, संसाराचं देणं

गाठेल किनारा आता, प्रपंचाची नाव !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, June 26, 2019

चारोळी

धरा दुःख मांडते जेव्हा नभाकडे
पावसाच्या ही ओलावतात कडा

कोसळतात सरी मग बेधुंद होऊन
साऱ्यांना वाटतो तो आनंदाचा सडा

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

जलतरंगांचं मोहक दृश्य
नेत्रांना सदोदित सुखावतं

जसं हवं असतं आपल्याला
नेमकं तेच अलगद खुणावतं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

आठवणीतला पाऊस माझा
हल्ली तुझ्या दिशेने धावतोय

माझ्या हाती तुरी देणारा
तुझ्या कवेत कसा मावतोय?

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

लपंडाव खेळतो मेघ आणि
लबाड झाल्यात पावसाच्या सरी

वारा ही खेटून जातोय असा
जसं वाटावं कुणी छेडल्यापरी

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

तू सोबत असलीस की वाटतं
पाऊस मनमुराद पडायला हवा

हकीमाचं बघू निवांत तूर्तास
प्रीतीचा आजार जडायला हवा

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

चातकाला पाहिलं की वाटतं
मी ही गावे, पावसाचे गाणे

जलदांचे नृत्य पाहण्या मग
सूर अलवार, छेडती तराणे

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, June 25, 2019

निखळ विनोद

     आमच्या गावात एक विनोद नावाचे सद्गृहस्थ होते ज्यांना गावातली खडानखडा माहिती असायची. आणि गावातला कोणताही पत्ता विचारला तर ते अगदी बरोबर सांगायचे इतका बरोबर की माणूस ज्याच्या घरी जायचं आहे त्याच्या दिवाणखाण्यात देखील जाऊन पोहोचेल.
पण त्यांची पत्ता सांगण्याची शैली न्यारी होती. उजव्या बाजूला जा, डाव्या बाजूला जा असं आपण सांगतो ते त्याऐवजी उजव्या अंगाला, डाव्या अंगाला असं म्हणायचे.

एकदा गावात नवीन आलेल्या समीरने त्यांना सरपंचाचा पत्ता विचारला. विनोद रावांनी नेहमीच्या शैलीत त्यांना सांगितलं इथून सरळ गेलात की उजव्या अंगाला वळा. तिथून दोन मिनिटे चाललं की दोन चाळी लागतील. त्या दोन्ही चाळीच्या मधून बाहेर पडलात की पुन्हा उजव्या अंगाला वळा.

अशी अनेक अंग लक्षात ठेवताना समीर एक अंग चुकला. आणि जिथे उभं राहून पत्ता विचारला होता तिथेच येऊन पोहोचला.

त्याचा थकलेला चेहरा पाहून एका ग्रामस्थाने विचारलं,
"काय हो काय झालं?"

समीर उत्तरला, झालं काही नाही पण एक कळालं की,

*दरवेळी विनोदाच्या अंगाने जाऊन चालत नाही.*

@ *सागरराजे निंबाळकर*

निखळ विनोद

----- निखळ विनोद ते निसटता विनोद -----

     जेव्हा दोन जोडपी एकमेकांसमोर येतात तेव्हा स्त्रिया एकमेकींचे दागिने बघतात तर पुरुष एकमेकांच्या बायका बघत असतात हे तर आपणा सर्वांना माहीत आहेच.
परंतु काल जेव्हा मी आणि माझा मित्र आपापल्या सौं सोबत एकमेकांसमोर आलो तेव्हा मी मित्राच्या डोळ्यात आणि तो माझ्या डोळ्यात बघत होता हे जाणून घ्यायला की, *कोण जास्त दुःखी आहे?*

😀 *सागरराजे निंबाळकर*

Monday, June 24, 2019

प्रत्येकाची हीच कहाणी

-- प्रत्येकाची हीच कहाणी --

_हालचाल नजरेची केवळ_
_अन, मूक झालेली वाणी_
_निरोपाच्या क्षणी असते_
_प्रत्येकाची हीच कहाणी_

_आशा नसते पुनर्भेटीची_
_आठवांचाच काय तो सहारा_
_जसं सगळं अगदी आलबेल_
_मात्र, सतत नजरेचा पहारा_

_देण्यासाठी आणलेलं पैंजण_
_तसंच खिशात राहून जातं_
_जोडावंसं वाटतं तेव्हाच नेमकं_
_देव जाणे का तुटतं नातं?_

_प्रश्न विचारावा कुणाला अशावेळी_
_अन, जाब मागावा तरी कुणाकडे_
_जिभेला दोष द्यावा म्हणतो, पण_
_दातही कुठे स्वीकारतात खडे_

_आठवतो मग सुविचार एखादा_
_एकटे आलो, एकटंच जायचंय_
_धरा तुझी जीवनसंगिनी नाही_
_तुला फक्त, नभावर प्रेम करायचंय_

@ *सागरराजे निंबाळकर*

क्षितिजाची उंची ( षडाक्षरी)

-- क्षितिजाची उंची --

क्षितिजाची उंची
कोणास कळली
मोजायचा यत्न
पंख निखळली

नको अहंभाव
दूषणे देण्याचा
नको अट्टाहास
कवेत घेण्याचा

वाटते ठेंगणे
उंची और काही
साऱ्यांच्याच हाती
सामावत नाही

गुणधर्म त्याचा
प्रत्येकाच्या ठायी
व्हावे वरिष्ठांच्या
सदा लीन पायी

संकटात जशी
वाकती लव्हाळे
साध्या राहणीने
वाढवा जिव्हाळे

गावी जेव्हा जेव्हा
क्षितिजाची गाथा
ऋणात धरेच्या
टेकवावा माथा

@ *सागरराजे निंबाळकर*

व्याख्या आयुष्याची (षडाक्षरी)

-- व्याख्या आयुष्याची --

संसाराची वेल
मातृत्वाची फुलं
हर्षाच्या सरींना
झालं नभ खुलं

साजिरं गोजिरं
रुपडं बाळाचं
अप्रूप साऱ्यांना
सोनेरी काळाचं

जाता पुढे पुढे
घेरती समस्या
कामी येते मग
कर्मांची तपस्या

कोण मित्र आणि
कोण शत्रू येथे
ओळखाया पेच
वेळ संधी देते

टाळूनिया लोभ
योग्य तेच घ्यावे
यथायोग्य मार्गे
ज्याचे त्याला द्यावे

अशीच असते
व्याख्या आयुष्याची
कधी जय कधी
चिंता निकालाची

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

एवढ्यासाठीच मी टाळलं नजरेला
निरोपाच्या क्षणी दाटून येऊ नये

माझ्या आसवांनी रोखली पाऊले
हा आळ कोणी माझ्यावर घेऊ नये

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, June 23, 2019

अकालीच जाणं

----- अकाली जाणं -----

रमत नाही मन अताशा माझं
ह्या बेगडी भौतिक सुखात
ना बापाचं ते खांद्यावर घेणं
ना आई भरवते घास मुखात

चाललीय पायपीट निरंतर परी
रस्ता कुठला ठावूक नाही
हस्तांदोलन करून हसतोय कधी
कधी छळतात क्षण भावूक काही

मित्र म्हणावं तरी कुणाला येथे
साऱ्यांच्याच हाती खंजीर टोचणारा
सारं निभावून नेलं आजवर पण
साहवेना दाह काळजाला बोचणारा

चंद्र, तारे आणून देतो म्हणालो
मात्र, येईपर्यंत थांबली नाही
वेल आमुच्या प्रेमरूपी वृक्षाची
माझ्या मनाजोगी लांबली नाही

वाऱ्यालाच मिठी मारतोय हल्ली नी
कोकिळेला सांगतोय गा एखादं गाणं
श्वास आहेत तोवर घेतो जगून
हाती असतं का आपुल्या अकाली जाणं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

हरवल्या सुखांना आता मी
नेमकं, शोधू कुठे कुठे

पाऊलखुणा पुसट झालेल्या
दिशा बदलतात वारे आडमुठे

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, June 20, 2019

चारोळी

पहिल्यांदा जवळ आली जेव्हा ती
ओठ माझे, काहीसे गांगरले होते

आडोसा काय शोधावा ऐनवेळी
आम्ही चक्क, नभच पांघरले होते

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

जेव्हा निपचित पडलेल्या श्वासांना
हळूवार सरी जागं करतात

काहींना जमतं यथेच्छ भिजणं अशावेळी
काही थेंबांना फक्त, ओंजळीत धरतात

@ *सागरराजे निंबाळकर*

आता राहूद्या एकांती

-- आता राहूद्या एकांती --

मिटलेल्या पापण्यांनी
श्वास सारे केले बाद 
चित्र आता वेगळालं
फक्त एकांताची साद

मंद झाले दिवे आणि
सरतेय रात्र काळी
कोणा कळतो का कधी
प्रारब्धाचा मारा भाळी

आप्तगण जमलेले
सजलेली मृत्यूशय्या
हुंदक्यांच्या बैठकांचा
नाच खोटा ता था थैय्या

जागेपणी माझ्या ज्यांनी
डोळे घट्ट झाकलेले
चढवून पुष्पमाला 
नम्रपणे वाकलेले

इच्छा अपुऱ्या असता
कशी मिळणार शांती
नको मज गोतावळा
आता राहूद्या एकांती

जन्म येथे पुन्हा पुन्हा 
ग्वाही लक्ष योनी देते
जशी लाट सागराची 
पुन्हा किनाऱ्यास येते

@ *सागरराजे निंबाळकर*

विडंबन (तुम्हावर केली मी मर्जी)

-- नका सोडून जाऊ घरदार --
       (विडंबन कविता)

मूळ गीत :- तुम्हावर केली मी मर्जी बहाल

तुम्हा देते आता मी थोडाच मार
नका सोडून जाऊ हे घरदार !! धृ !!

मारताना ठेवून उशी ही डोळ्यावरती
हे नवरोबा आमुचे गयावया का करती
जवळी जावं, धू धू धुवावं, करताच हाहाकार !! १ !!

गोड गोड म्हणू की म्हणू तुम्हाला लबाड
या बसा समोर नी, सांगा हे कुठलं घबाड
घरात असता बायको तुमची, जातो कुठे रविवार !! २ !!

लाडेलाडे सांगता की, देऊ तुम्हा मी चटके
सवतीचा उघडता पिंजरा, लाखो फटके
असाच रहावा धाक साजणा, निघो ना शब्द चकार !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*
       उल्हासनगर, ठाणे

Wednesday, June 19, 2019

चारोळी

पसारा वाटतं आयुष्य जेव्हा अन
स्वप्न सारी विरायला लागतात

सोंग घेतं काळीज तेव्हा झोपण्याचं
डोळे मात्र, सतत काळजीने जागतात

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

एखाद्यावर प्रेम करणं गुन्हा जर
मी माझ्याच नजरकैदेत राहीन

नजरेदेखत ती दुसऱ्याची होताना
आसवांसवे, मूक राहून पाहीन

@ *सागरराजे निंबाळकर*

काव्यस्पंदन चित्रकाव्य

--- दगडाचे ओझे ---

बालकाच्या हाती येते
जेव्हा दगडाचे ओझे
व्यर्थ देवाची किमया
व्यर्थ अल्लाहचे रोजे

पेच हा गरिबीचा की
व्यसनाची सारी बाधा
खेळ खेळण्याच्या वयी
थकतोय जीव साधा

लाखो दगड फोडून
कोरतोय शिल्प न्यारं
परिस्थिती शिकविते
पेलावया जड भारं

डोई रक्तवर्णी ज्वाळा
पाय कोवळे पोळती
वाचा बोबडी बाळाची
सारा हिशोब घोळती

ठाव नाही जाते कुठे
माझी नागमोडी वाट
तरी करतोय सर
रोज अवघड घाट

@ *सागरराजे निंबाळकर*
       उल्हासनगर, ठाणे

चारोळी

श्रावणातल्या सरींनाच बिलगून घेतो
कुणी उरलेलं नाही आलिंगन द्यायला

जशी, लुप्त होतेय आरोळी वाडपीची अन
शिकतोय, आपलं आपणच वाढून घ्यायला

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, June 17, 2019

चारोळी

जेव्हा क्रम बदलतो प्राधान्याचा अन
पर्याय होतो एखाद्याचा, अस्तित्व आपलं

अशावेळी, दोष देऊन चालत नाही
फक्त ओळखायचं असतं काळजातलं

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, June 16, 2019

माहा लाडाचा ह्यो मेघ (अष्टाक्षरी)

-- माहा लाडाचा ह्यो मेघ --

मेघ पावसाळी आज
मह्या शेतामंदी आले
खेळ त्यायचा रोजचा
काया मातीमंदी चाले

पहाटेच्या पारी मेघ
दिसे साजिरा गोजिरा
सांगे धरा ही खुशीने
माहा लाखाचा ह्यो हिरा

येता जाता शेतामंदी
पानं, फुलंही भेटती
झिम्मा फुगडी खेयून
मह्या अंगाले खेटती

येता जाता रोज भेटे
फुफाट्याचा गार वारा
मंग स्पर्शाने त्यायच्या
साऱ्या अंगाले शहारा

कधी हासतो खेयतो
कधी करी धुसपूस
तरी उजवतो रोज
काया आईची ही कूस

सदा राहो त्याही कृपा
माहा लाडाचा ह्यो मेघ
काया आईच्या भाळीची
दाट शोभिवंत रेघ

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, June 14, 2019

चारोळी

वट पौर्णिमेच्या पवित्र सणाला
आता, आधुनिक स्वरूप देऊया

धाग्यादोऱ्यांनी जीव न कोंडता
दर्शन वडाचे, दुरूनच घेऊया

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

झाडा झुडुपांना ही असतो जीव
पानं, फळं, फुलं त्यांची नातीगोती

रक्षण करून अनमोल पर्यावरणाचे
सांभाळूया वनराईचे हिरवेगार मोती

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

वडाला सहज विचारलं एकदा
एकाच जागी इतकी वर्षे कसं जमतं?

म्हणाला, उत्तर तुझ्याकडेच आहे
जसं तुझं मन सातजन्म सावित्रीत रमतं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

केली कत्तल निष्पाप झाडांची
लुटून नेलं, त्यांनी जंगल सारं

ना मायेचा ओलावा, ना चित्त शांत
काय कामाचं, हे आधुनिक वारं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

ओलावल्या नजरांनी पाहावं एखाद्याकडे
हाल असेच काहीसे, वडाचे झालेत

हताश होऊन म्हणतोय पारंब्यांना सरका
आज का होईना, मला पुजायला आलेत

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

आधुनिकीकरणाने फिरल्यात दिशा बहुधा
आजकाल, सागरालाही भेटेना सरिता

वेळ गेली बऱ्यापैकी, तरीही उठा
करा काहीतरी, आपल्या पर्यावरणा करिता

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, June 13, 2019

बेधुंद पावसाळा (आनंदकंद)

बेधुंद पावसाळा जलधार नित्य येते
तेव्हा निसर्ग हसतो फुलतात सर्व शेते

झालो तुझाच आता काही न शेष माझे
गाली खळी तुझीया ग्वाहीच गोड देते

आई कुशीत घेते तेव्हाच सौख्य लाभे
वाटे खरोखरी मज स्वर्गात माय नेते

झाला असेल अफजल हा ही पवित्र तेव्हा
जेव्हा कुलावतांची छाती कवेत घेते

वैरी म्हणे मला जो तो सांगतो कसा हो
बोलू नकोस उलटे पडतील रोज प्रेते

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, June 12, 2019

चारोळी

मातीचा गंध पुलकित व्हावा
जसं वाहतं खळाळतं पाणी

येती ओठावर बळीराजाच्या मग
आपसूक हिरव्या शिवाराची गाणी

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, June 10, 2019

चारोळी

छेडून हृदयीच्या तारा माझ्या
तिने शिकवले विरहाचे गाणे

जसं नोटांच्या रेलचेलीत येथे
कालबाह्य ठरते जपलेले नाणे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

परागंदा झाला आत्मा तरीही
मोजक्या श्वासांवर आमुची सत्ता

ना ठावठिकाणा पुसला कोणी
ना आम्ही, स्वतः सांगतो पत्ता

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

बंद केलेलं जे द्वार हृदयाचं कधीचं
सांगा कोण देऊन गेलं त्यास चावी

शब्दशब्दातून कळला पत्ता त्याचा
जरी पाठवलं पाठवणाऱ्याने निनावी

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, June 8, 2019

चारोळी

रोजचीच सारी तारांबळ तरीही
एक प्रश्न रोज नव्याने पडतो

आपल्याला हवं ते न मिळण्याचा
योगायोग आकस्मिक कसा घडतो

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, June 7, 2019

चारोळी

प्रश्न आला जेव्हा भाकरीचा
प्रेमाने विणलेलं जाळंही तुटलं

नजरेसमोर असूनही लाभ न झाला
सारं केवळ एका, मृगजळाने लुटलं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

ती येत आहे जवळ अताशा
पैंजणाच्या नादावरूनच कळायचं

कसब अवगत होतं तिला हे
एखाद्याला पुरतं, कसं छळायचं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

छळतात वेदना इतरांना जशा
मलाही तसंच छळत होत्या

इतरांना कोडं पडायचं त्यांचं
मला जरा जास्त कळत होत्या

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, June 6, 2019

चारोळी

एका जीवास वाचविण्या जेव्हा
द्यावा लागतो दुसऱ्याचा बळी

नका सांगू मातृत्वाला कधीही
गर्भात, फुल होतं की होतं कळी

# *सागरराजे निंबाळकर* #

निसर्गाचे चक्र (षडाक्षरी)

# निसर्गाचे चक्र #

पर्यावरणाचा
तोल सांभाळण्या
नकोत काहीही
जास्तीच्या मागण्या

थेंबा थेंबाविना
ओढे, नदी - नाले
आसवांसारखे
सारे शुष्क झाले

सूर्य लालबुंद
आग ओकणारा
मानवाचा हट्ट
त्याला टोकणारा

निसर्गाचे चक्र
पूर्ववत व्हावे
फळे, पाने, फुले
सरींमध्ये न्हावे

वेळीच अताशा
जपू निसर्गाला
राहिले न काही
भान मानवाला

निसर्गाचा धागा
एकसवे जोडू
नको स्वार्थापोटी
तू झाडांना तोडू

वृक्षवल्ली देई
साऱ्या जीवा थारा
झाडांना जगवा
एकमेव नारा

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, June 4, 2019

चारोळी

काय वर्णावा तो देखावा अन
कोण जाणे कोणी मला तिथे नेले

मनभावन तरंग पाहून सरींचे
मी लागलीच, जलबिंदूंना जवळ केले

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

विसावल्यात ज्या सावल्या झाडाखाली
काही काळ त्यांना, तसंच राहू द्या

भविष्यात कोण जाणे असतील का झाडे
किमान वर्तमान तरी, डोळे भरून पाहू द्या

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, June 1, 2019

चारोळी

काही अंतर जाताच ध्यानी आलं
चालणारी पावलं रस्ता चुकलीत

जशी भुकेने व्याकुळ वासरं
गाईच्या पान्ह्याला मुकलीत

# सागरराजे निंबाळकर #

चारोळी

लाथाडलं मला काहींनी वेळोवेळी
काहींनी अगदीच जवळ केलं

तरीही संभ्रम काहींना यशाबद्दल
सगळंच कसं मी जिंकून नेलं

@ *सागरराजे निंबाळकर*