सारंकाही करून तिच्या नावे
मी निघालो रिकाम्या हाती
घर उजळत असलं दुसऱ्याचं तरी
एकत्रच जळतात तेल आणि वाती
@ सागरराजे निंबाळकर
काळजालाही बरं नसतं हल्ली
ताप भावनांचा येतो नी जातो
फुंकरीच्या पट्ट्या निरुपयोगी ठरल्या
आता हृदयाच्या हकिमास बोलावून पहातो
@ सागरराजे निंबाळकर
आसवांना फिकीर होती पापण्यांची
म्हणूनच, वाहण्यावर आवर घातला
गालास वाटलं, मिटला प्रश्न एकदाचा
मात्र, ओठांनाच ठाऊक वावर आतला
@ सागरराजे निंबाळकर
चेहऱ्याचं कौतुक केलं साऱ्यांनी तिच्या
डोळ्यांखालचे अश्रू मात्र दिसले नाहीत
एवढा भार असूनही स्मितहास्य ओठी
जगण्याचं गणित न्यारं तिलाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
खास होतो तिच्यासाठी एकेकाळी
आज बदललंय तिचं प्राधान्य
जसं धावून बरेचदा मृगजळापाठी
आपण गमावतो हातातलं असामान्य
@ सागरराजे निंबाळकर
ओठ थरथरायचे माझे कित्येकवेळा
ती मात्र, नजरेतूनच सारं बोलायची
पेच हा नेहमीचाच झाला होता
ही गाठ नेमकी कशी खोलायची?
@ सागरराजे निंबाळकर
_काय झालं ठाऊक नाही, पण_
_अचानक तिच्या हालचालींना वेग आला_
_बट सारताना लाजली ती किंचितशी_
_तिथेच नजरेचा खळीशी अपघात झाला_
@ सागरराजे निंबाळकर
निरोप देताना तिला शेवटचा
ओठातून शब्द आलेच नाहीत
डोळे म्हणाले आम्ही झरत होतो
ओठाला काय झालं त्यालाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
रमतो भूतकाळात आठवत कैकदा
कुणी कुणी माझ्यासाठी काय केले
येतो भानावर, ऐकून ते शब्द मग
पहा, ह्यालाही रिकाम्या हातीच नेले
@ सागरराजे निंबाळकर
मोजक्या श्वासांवर सत्ता ज्याची
मृत्यूही त्याला मुभा देतो
कर्मांचा निकष असतो अशावेळी
आपण आळ उगा वेळेवर घेतो
@ सागरराजे निंबाळकर
तुडवून स्वप्न पायदळी मी
वास्तवाचा विस्तव हाती घेतला
इथेच ओळख झाली भुंग्यांची
गळून पडता गुलकंद कवेतला
@ सागरराजे निंबाळकर
-- सूत्र सुखी जीवन का --
शाख़ बलखाती हुई
वेगे धावणारे वारे
देखो मौसम सुहाना
मना खुणावती सारे
चहकती चिड़ियाँ भी
भल्या पहाटे जागती
रहें आबाद दुनियाँ
दान ईश्वरा मागती
दूध, घी खाके यहाँ का
झालो लहानाचे मोठे
पूजे नितदिन गौ को
वाटे आपलेसे गोठे
अंगड़ाई लेती धूप
अन खळाळतं पाणी
चल दिए रोटी लिए
ओठी शिवाराची गाणी
देख खेत हराभरा
फिटे पारणं डोळ्यांचं
नहीं पता कूटनीति
साधं जगणं भोळ्यांचं
यूँही चले सिलसिला
काय वेगळं मागू मी
सूत्र सुखी जीवन का
कुणा कुणाला सांगू मी
@ *Sagarराजे निम्बालकर*
पत्रे लिहीत राहिलो मी
ती फक्त वाचत राहिली
जशी जळणाऱ्या दिव्यावर
काजळी साचत राहिली
@ सागरराजे निंबाळकर
शेकडो पाने फाडली मी
तेव्हा कुठे सुचल्या दोन ओळी
संयमाचं भान राखलं अक्षरांनी
कारण, लेखणी होती साधीभोळी
@ सागरराजे निंबाळकर
वेदनांवर फुंकर घालताना
एक चूक घडली माझ्या हातून
वरवर केले मी इलाज सारे
किंचितही डोकावलं नाही आतून
@ सागरराजे निंबाळकर
दोन शब्द तळहातावरचे
कथा लिहायला पुरेसे ठरले
वाचन केलं पायाखालच्या जमिनीने
ऐकताना नभाचे डोळे भरले
@ सागरराजे निंबाळकर
दोष त्या थेंबांचा नव्हता कदापी
त्यांनी पुरवले फक्त जिभेचे चोचले
संदर्भ वेदनांचा होता भावनांशी
स्पष्टीकरण मात्र, काळजाला टोचले
@ सागरराजे निंबाळकर
ओलावतील जेव्हा कडा पापण्यांच्या
त्यांना हवं तेवढं वाहू दे
आरोप नको हुंदक्यांना दाबल्याचा
ओघळण्याचा पुरावा तेवढा राहू दे
@ सागरराजे निंबाळकर
ओलावल्या नजरांनी पाहणं तिचं
नकळत काहीतरी सांगत होतं
हक्काचं माणूस दुरावू नये
फक्त एवढंच मागत होतं
@ सागरराजे निंबाळकर
घ्यावं लागतं कलाने कधीकधी
कुठे अधिक तर कुठे व्हावं उणा
कशाला रुसवा, फुगवा करता
हरेक इथे चार दिसांचा पाहुणा
@ सागरराजे निंबाळकर
-- सुखाचा नकाशा --
धरा दावते अताशा
नव्या नवतीचे रंग
बळीराजा सुखावण्या
तिने बांधलाय चंग
खत, बियाणे साथीला
झाली पेरणी, कापणी
करतोय तोही कष्ट
होवो सफल आखणी
डुलू लागले मौजेने
शेत शिवाराचे झुले
धुंद सरी कोसळून
होता आसमंत खुले
दिस येतात सोन्याचे
फक्त सोडू नये आशा
एका रेषेत नसतो
कधी सुखाचा नकाशा
@ सागरराजे निंबाळकर
अडकलोय कोणत्या गर्तेत नेमका
माझं मलाही काहीच कळत नाही
एक ओल आहे अजूनही जपलेली
म्हणूनच माझं काळीज जळत नाही
@ सागरराजे निंबाळकर
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपणापैकी अनेकांनी व्हाट्सअप, फेसबुक, दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या. सगळ्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार !
'कविता तुमची आमची' समूह प्रशासक ह्यांनी त्यांच्या समूहात मला शुभेच्छा दिल्या आणि तिथल्या अनेक सदस्यांनीही दिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार.
सर्वात पहिली लेखी शुभेच्छा मिळाली ती विक्रम पाटील ह्यांच्याकडून तर पहिली दूरध्वनी शुभेच्छा मिळाली अनिल सांगळे ह्यांची.
सगळ्यात जास्त शुभेच्छा मिळाल्या साहित्यक्षेत्रातून. आनंदाची बाब आहे. पण एक चिंतन ही इथे करावं लागेल की, एका गोष्टीत नावलौकिक मिळवत असताना दुसऱ्या गोष्टींकडे कमी लक्ष दिलं जातंय का? आपली मित्रमंडळी, आपले आप्तगण आपल्याला विसरले की आपण त्यांच्यापासून दूर गेलो? समतोल राखण्यासाठी काय करावं?
फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून शेकडो शुभेच्छा येत असताना दूरध्वनी वरून केवळ ३ शुभेच्छा याव्यात. यांत्रिकीकरणाचा किती हा दुष्परिणाम !
डिजीटायझेशन मुळे माणसं जवळ आल्याचा दावा आपण करतोय पण हा दावा खरा की खोटा चिंतन ज्याचं त्यानेच करणं योग्य आहे.
हे फक्त माझंच दुःख आहे असं नव्हे तर ही समस्या प्रत्येकाची आहे. एक विनंती ह्यानिमित्ताने करू इच्छितो की, किमान दोन मिनिटं का होईना एकमेकांशी बोलत चला. कारण वाचणं आणि ऐकणं फरक आहे. चिऊची काऊची गोष्ट वाचण्यात मजा आहे पण कोकिळेची तान ऐकण्यातच खरी मजा.
साहित्याच्या सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास फक्त कविता वाचून जेवढा आनंद होत नाही त्याहून जास्त सादरीकरण पाहून होतो. प्रल्हाद शिंदे, बाबूजी ह्यासारख्या अनेकांची गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत. का? ती आपल्या कानावर पडली आणि आपसूक ओठी रुळून पाठ झाली.
नात्यात दरी पडण्या अगोदरच संभाषणाची इतकी झाडं लावा की त्याने नटलेल्या हिरवाईने मन प्रसन्न व्हावं. रोज काही क्षणासाठी का होईना तेथे बसायची इच्छा व्हावी.
पूर्वी माझी अनेक मित्र मंडळी मला दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायची परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात इतका मश्गुल झाला आहे की दोन मिनिटं फोनवर बोलण्या इतपत देखील त्यांच्याकडे वेळ नाही. हा यांत्रिकीकरणाचा परिणाम देखील आहे. आपलं प्राधान्य बदलणं ही देखील एक बाब आहे ह्यामागे. अर्थात याबद्दल काही राग नाही कारण ही वेळ माझ्यावर ही येऊ शकते पण सांगावसं वाटतं, वेळीच सावरूया !
तर एकंदरीत आजचा दिवस तसा साधासुधाच गेला. विशेष असं काही नव्हतं. फक्त आपल्याला कोणी शुभेच्छा दिली आणि काय लिहिलं आपल्याबद्दल हे वाचण्याची उत्सुकता हेच काय ते वेगळेपण !
काव्यात्मक, वर्णनात्मक, दोन वेगळे शब्द लिहून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं विशेष कौतुक आणि आभार देखील !
कारण एखाद्याविषयी दोन शब्द लिहिण्यासाठी तो माणूस जाणून घ्यावा लागतो तेव्हाच त्याच्याबद्दल दोन शब्द मांडता येतात. आणि अनेकांनी मला जाणून घेतलं ह्याचा आनंद आहे.
आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं असं मी म्हणणार नाही. कारण एकूण किती वर्षे आयुष्य हे मला थोडेच ठाऊक आहे. ☺️
त्याजागी आणखी एका वर्षाने अनुभवी झालो असं म्हणेन.
२०१९ हे साल साहित्यिक कारकिर्दीत नक्कीच चांगलं गेलं आहे आत्तापर्यंत. आणि यापुढेही जाईल कारण आपल्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद नेहमीच पाठीशी आहे ह्यात दुमत नाही. काही काळ आजारपणात गेला परंतु त्यातही आपण सर्वांनी आपुलकीने केलेली विचारपूस आपली काळजी करणारे अनेक आहेत ही ग्वाही देऊन गेलं. आर्थिक अडचणी ही अनेक आल्या. त्यातही अनेकांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या ऋणात राहणेच योग्य.
आपल्या सदस्या हर्षदा जोशी ह्यांनी आजवरचा साहित्य प्रवास, भविष्यातली उद्दिष्टे, संकल्प ह्याबाबत मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार थोडंसं :-
आजवरचा साहित्य प्रवास एका वाक्यात सांगायचा झाला तर २८ जुलै २०१९ रोजी प्रकाशित होणारी ३ पुस्तकं.
भविष्यात अनेक उद्दिष्टे आहेत. पैकी महत्वाचं म्हणजे प्रत्येक काव्यप्रकारात ५० रचना असणारं किमान एक पुस्तक आपल्या हातून लिहिलं जावं. साहित्यिकांसाठी जो मासिक काव्यवाचन कार्यक्रम सुरू केला आहे त्याचे किमान १०० कार्यक्रम व्हावेत. 'सूर अनोख्या मैफिलीचा' कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात मिळून ५०० प्रयोग व्हावेत. आणि इच्छा आहे की, साहित्य क्षेत्रात पहिला पुरस्कार स्वीकारताना आईने व्यासपीठावर येऊन आपल्याबद्दल दोन शब्द बोलावेत. ज्या व्यक्ती आपल्या पाठीशी ठाम उभ्या आहेत, एका हाकेवर धावून येतात त्यांनी अनेक बक्षिसं मिळवावी. ते निंबाळकरांसोबत असतात ऐवजी ते आणि निंबाळकर सोबत असतात असं वाक्य लोकांच्या ओठी असावं. (मित्रांचीही स्वतःची ओळख असावी)
संकल्प :- वेळेनुसार योग्य ते निर्णय घेणे, काही गोष्टींपासून अलिप्त राहणे, मातोश्रींच्या इच्छा पूर्ण करणे.
ज्येष्ठ कवयित्री ज्योती वैद्य शेटे ह्यांनी आज 'काव्यराजे' पदवी दिली. तिचाही आदरपूर्वक स्वीकार !
आपण सर्व असंच प्रेम करत राहा ह्या विनंतीसह थांबतो.
संवाद होतच राहतील !
आपलाच :- सागरराजे निंबाळकर
-- संस्कारांची जाण --
आलं आभाळ भरून
येता पावसाची स्वारी
थेंब टपोरे टपोरे
विसावती माझ्या दारी
गंध ओलेत्या मातीचा
साऱ्या अंगणी रांगावा
जसा धाडलेला कोणी
मज मायेने सांगावा
सत्कर्माचे फळ भाळी
लिहिलेले ज्याचे त्याचे
डोळा आनंदाचे अश्रू
होता भले एखाद्याचे
काळी आई माझ्यासाठी
हिरे माणकांची खाण
तिला जपू जीवापाड
ठेवू संस्कारांची जाण
@ सागरराजे निंबाळकर
छातीत ह्या फुलांनी केलेत वार लाखो
सांगू कसे कुणा मी आहेत भार लाखो
का एकटा असा मी गर्दीत येथल्या ह्या
गेले कुठे अताशा माझेच यार लाखो
@ सागरराजे निंबाळकर
जमलंच तर एक कर फक्त
जाताना मागे वळू नकोस
वसंताची पालवी खुणावतेय तुला
पुन्हा ग्रीष्मासारखी गळू नकोस
@ सागरराजे निंबाळकर
तीच माझे हृदय आणिक तीच माझे श्वास आता
नित्य तिजवर भाळण्याचा घेतला मी ध्यास आता
ऐकले मी पैठणीचा छंद तिजला लाख प्यारा
माळताना मोगरा मग वाटते का खास आता
वेड साऱ्या लावलेले श्रावणाच्या पालवीने
हे खरे ना की मलाही होत आहे भास आता
@ सागरराजे निंबाळकर
शारदेची भव्य मूर्ती दावणारा किरण माझा
वाट चुकल्या योग्य वेळी पावणारा किरण माझा
खात होती हेलकावे नित्य येथे नाव माझी
त्याच लहरींनी किनारी लावणारा किरण माझा
ध्यान त्याचे श्वास झाले आवडीचे मौन बाबा
गोड वाणी आणि साऱ्या भावणारा किरण माझा
ज्ञान ज्योती तेवणारी आज त्याचे शिष्य लाखो
शांत चित्ती आसमंती मावणारा किरण माझा
कोण अपुले कोण परके ओळखाया लागलो मी
संकटी माझ्या अताशा धावणारा किरण माझा
@ सागरराजे निंबाळकर
➖➖ पंढरीची वारी ➖➖
पंढरीची वारी पायी नित्य नेमाने करतो
मुखी राम कृष्ण हरी नाम आनंदे स्मरतो
पायी दिंडीत चालण्या लाखो वैष्णवांचा मेळा
रूप साजिरे विठूचे मज दिसे लाखो वेळा
ज्ञाना, तुका, नामा, जना सारे पालखीचे भोई
तुळशीचे वृंदावन इथे भगिनींच्या डोई
कशा डौलात डोलती हाती भगव्या पताका
मुखी माऊली माऊली देती एकमेका हाका
सान थोर भेद नाही सारी त्याचीच बालके
छत्र त्याचे वाटे मज उंच आभाळा सारखे
विठू दिसता सामोरी एक टिपूस गळतो
दिसभर चालूनही शीण क्षणात पळतो
मूर्ती सावळ्या विठूची डोळी घेता सामावून
साधा सोपा मंत्र मग नाही दुजा नामाहून
किती सांगावे अप्रूप मंदिराच्या कळसाचे
सुखावती नेत्र जसे दोन क्षण विसाव्याचे
देण्या निरोप भक्तांना विठू येतो वेशीवर
पुण्य वाढते वारीने ओंजळीत पसाभर
बोल त्याचे निरोपाचे पाणी पापणीत दाटे
जड होऊन पाऊले जाती आपापल्या वाटे
@ *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
८८७९८९७७९७
----- भाव हा भक्तीचा -----
(६-६-६-४)
भाव हा भक्तीचा । सर्वोत्तम पाया
माझा विठुराया । विटेवरी !! १ !!
विठू सम दुजा । भगवंत नाही
दश दिशांनाही । ओढ त्याची !! २ !!
युगे अठ्ठावीस । उभा एका जागी
सदा भक्तालागी । तारावया !! ३ !!
विठू माझा बाप । विठू माझी माय
आता उणे काय । संसारात !! ४ !!
नामस्मरणात । वैष्णवांचा मेळा
पाहू किती वेळा । याची डोळा !! ५ !!
प्रतिक्षा भेटीची । तोडून शृंखला
दिस उगवला । सोनियाचा !! ६ !!
राम कृष्ण हरी । जयघोषी दंग
अवघाची रंग । एक झाला !! ७ !!
जळी, स्थळी, काष्ठी । माझ्या ध्यानी मनी
एका जनार्दनी । राही विठू !! ८ !!
जोड द्यावी कर्मा । शुद्ध सत्व गुणे
दुःख व्हावे उणे । सत्संगाने !! ९ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
उल्हासनगर, ठाणे
------ राम कृष्ण हरी -----
(६-६-६-४)
राम कृष्ण हरी । साधा सोपा मंत्र
जगण्याचे तंत्र । शिकवितो !! १ !!
शिकवितो तुका । नामा, ज्ञाना, जना
शांती लाभे मना । राऊळात !! २ !!
राऊळात सारे । दंग वारकरी
अवघी पंढरी । जल्लोषात !! ३ !!
जल्लोषात टाळ । मृदुंगाचा नाद
मनामना साद । श्रीहरीची !! ४ !!
श्रीहरीची सेवा । केली मनोभावे
पाविजे स्वभावे । प्रत्येकाला !! ५ !!
प्रत्येकाला येथे । मिळतो स्वानंद
सुखाचा तो कंद । जगताना !! ६ !!
जगताना नित्य । शिकावे अध्यात्म
संतांचे महात्म्य । चिरकाल !! ७ !!
चिरकाल जेथे । विठूचा निवास
जीवाचा विकास । होतो सदा !! ८ !!
होतो सदा लीन । अथांग सागर
भक्तीचा जागर । पंढरीत !! ९ !!
@ सागरराजे निंबाळकर
-- आत्मा पांडुरंगा --
टिळा चंदनाचा
शोभे किती भाळी
टाळ देई येथे
चिपळ्यास टाळी !! धृ !!
येता जाता होतो
मज तुझा भास
वाटे मग आहे
तूच आसपास
तुझ्या दर्शनाने
आमुची दिवाळी !! १ !!
रूपे तुझी किती
सावळ्या श्रीरंगा
कोणी म्हणे विष्णू
आत्मा पांडुरंगा
कधी वास्तव्यास
विशाल आभाळी !! २ !!
आनंद लाभला
वारीत चालता
तुळशीची माळ
गळ्यात घालता
झालो मीही तुझा
आता तुझी पाळी !! ३ !!
@ सागरराजे निंबाळकर
------- काय होते......! --------
नुसतेच एक नाते जाळून काय होते
संदर्भ आठवांचे गाळून काय होते
करतेस हट्ट का तू प्रेमात पैठणीचा
बघ फक्त मोगरा हा माळून काय होते
हे शल्य आठवांचे सांगून रोज थकले
विरहात पत्र सारी चाळून काय होते
कानात पैंजणांचा घुमतोय नाद जेथे
हाकेस रोज तेथे टाळून काय होते
हे भोग प्राक्तनाचे सांगे ललाटरेषा
ह्या मृगजळी सुखांवर भाळून काय होते
@ *सागरराजे निंबाळकर*
-- मैत्री माझी निसर्गाशी --
खेळ खेळून तऱ्हेचे
मैत्री निसर्गाशी करू
झिम्मा फुगडी खेळता
हात त्याचा घट्ट धरू
तोच देतो खानपान
तोच हक्काचा आसरा
सूर्य वाटतो रागीट
चंद्र दिसतो हासरा
पहा झोकात कशा ह्या
जाई, जुई फुलतात
ज्वारी, गव्हाच्या लोंब्या ह्या
माळरानी झुलतात
उंच गगनाला भिडे
सारे विहंगम थवे
इंद्रधनू दाखवितो
रंग किती नवनवे
बारा मासात येतात
ऋतू तीन वेगळाले
बरसता चिंब सरी
ढग हळूच पळाले
गाते मंजूळ स्वरात
माझी गुणाची कोकिळा
वेड जीवाला लावतो
मोरपंख निळा निळा
मैत्री माझी निसर्गाशी
निभावतो मनोभावे
खाली धरा वर मेघ
त्यानं केलं माझ्या नावे
@ सागरराजे निंबाळकर
-- माझं सासर माहेर --
माझ्या माहेराची शान
माझी कनवाळू आई
तिचे हसरे वदन
जशी फुले जुई, जाई !! धृ !!
मिठी सुटेनाच काही
तिने जवळ घेताना
लाखो हुंदके दाटले
तिला निरोप देताना
होते लाडाची छकुली
आज झाले, मोठी बाई !! १ !!
सासऱ्यांनी हाक देता
मज वाटे बाबा आले
प्रेम सासूचे पाहून
त्यांची मुलगीच झाले
एकजीव झालो आम्ही
जशी लेखणीची शाई !! २ !!
दुवा मायेच्या नात्यांचा
माझं सासर, माहेर
कैक सुखाच्या क्षणांचा
मला मिळाला आहेर
ऋण साऱ्यांचे एवढे
कशी होऊ उतराई !! ३ !!
@ सागरराजे निंबाळकर
कोण, कसं भाळेल कुणावर
कधी लागतो का थांगपत्ता?
राजांचे रंक झाले काही येथे
गाजवताना सौंदर्यावर सत्ता
🌿 सागरराजे निंबाळकर
------- रूप ईश्वराचे -------
रूप ईश्वराचे । इथे चराचरी
ओळखा सत्वरी । ज्याचे त्याने !! १ !!
तूच अल्ला आणि । तूच एकदंत
अवघा सुपंथ । एक होता !! २ !!
नको दुजाभाव । कोणी थोर सान
द्यावा मानपान । एकमेका !! ३ !!
ठेचाळता पाय । किंचाळते वाणी
दुजा डोळा पाणी । आपसूक !! ४ !!
करा ऐसे कर्म । कीर्ती दिगंतात
स्थान अनंतात । वेगळाले !! ५ !!
किरण कृपेची । संगती लाभता
देवाचा चाहता । होई जो तो !! ६ !!
भरती ओहोटी । नित्य येते जेथे
वास्तव्यास तेथे । सागर हा !! ७ !!
सागरराजे निंबाळकर
-- काय अपराध झाला --
काय अपराध झाला
मज कळेनाच काही
प्रेम सखीचं बहुदा
माझ्या नशिबात नाही
तिच्या जवळ न जाता
दुरूनच पाहायचं
पत्र निनावी लिहून
अनामिक राहायचं
तिच्या माझ्या प्रेमामध्ये
काही व्याधी आड आल्या
योजलेल्या गोष्टी माझ्या
कुणा दुसऱ्याच्या झाल्या
साऱ्या पत्रांवर माझ्या
नाव मित्राने टाकलं
आरवत्या कोंबड्याला
जसं सूर्याने झाकलं
हल्ली फिरतात दोघे
जसे राघू आणि मैना
कशी सांगावी कुणाला
माझ्या काळजाची दैना
दोष मित्राला का देऊ
चूक माझी आहे सारी
डोक्यावर घेतली मी
नको तेवढी ही यारी
😀 सागरराजे निंबाळकर
--- माझी लाडाची छकुली ---
माझी लाडाची छकुली
पहा, झाली किती मोठी
मांडवात भरा तिची
खणा नारळाने ओटी
तुझी पाऊले इवली
आज जातील सोडून
जप माहेर सासर
दुवा नात्यांचा जोडून
सासऱ्याला म्हण बाबा
सासू होते मग आई
ऋणातच राहा त्यांच्या
नको होऊ उतराई
तुझा आणि जावयांचा
जोडा लक्ष्मी नारायण
नित्य नेमाने कर तू
सत्कर्मांचे पारायण
दीर तुझा मोठा भाऊ
ताई नणंद धाकली
त्यांच्या निखळ प्रेमाने
शान नात्यांची राखली
ध्यानी ठेव सदोदित
वाढो लौकिक घराचा
तूच दीप तूच वाती
आशिर्वच ईश्वराचा
@ सागरराजे निंबाळकर
उल्हासनगर, ठाणे
८८७९८९७७९७
------- सारे जमीन जुमले ------
वादात ठार झाले सारे जमीन जुमले
आगीत गार झाले सारे जमीन जुमले
हृदयात ठेवलेले मूर्ती म्हणून ज्याला
का आरपार झाले सारे जमीन जुमले
एकांत रोजचा हा सांगून आज गेला
गर्दीत भार झाले सारे जमीन जुमले
वाहून रोज ओझे नापाक ह्या पिढ्यांचे
बेजार पार झाले सारे जमीन जुमले
गाठीस बांधताना सारेच येथ अनुभव
निष्णात फार झाले सारे जमीन जुमले
@ सागरराजे निंबाळकर
-- मला भेटतो निसर्ग --
निसर्गाच्या कुशीमध्ये
माझं फुलतं शिवार
तोच कर्ता धर्ता आणि
तोच मायेची किनार
जाई, जुई, निशिगंध
चाफा, मोगरा सुगंधी
निसर्गाच्या सान्निध्यात
नित्य फुलण्याची संधी
दरी खोऱ्यातून येथे
पाट पाण्याचे वाहती
सुखावले चराचर
चिंब सरीत नाहती
खाली नटलेली धरा
वर अथांग आकाश
घेण्या मिठीत साऱ्यांना
पुढे येती बाहुपाश
मला भेटतो निसर्ग
येता जाता दारोदारी
भाजी भाकरी कष्टाची
वाटे लाखाची न्याहारी
🌿 सागरराजे निंबाळकर
----- पहिला पाऊस -----
येता पहिला पाऊस
बाळंतीण झाली धरा
आनंदाच्या बातमीने
हर्षोल्हास चराचरा
किती करावं कौतुक
कसे पुरवू डोहाळे
नभ पहावया हट्ट
कधी निळे कधी काळे
नाव बाळाचं ऐकून
अचंबित झाल्या सरी
माझा पहिला पाऊस
नित्य भरतो घागरी
जेवू घालाया पावसा
पंच पक्वान्नाचा घाट
जाई, जुईची रांगोळी
गर्द हिरवाई पाट
सारं खाऊन तृप्तीची
त्यानं दिली की ढेकर
माझं एकच मागणं
सुखी राहावी लेकरं
असा पहिला पाऊस
येवो साऱ्यांच्याच भाळी
सुखावून दूर गेला
होता माझा कधीकाळी
@ सागरराजे निंबाळकर
_पाणी यावं आईच्या डोळ्यात_
_ह्याहून मोठं दुःख नाही_
_कारण विचारायचं नसतं अशावेळी_
_पाहावं आपलंच चुकलंय का काही_
@ सागरराजे निंबाळकर
-- प्रश्न म्हणा किंवा खंत --
कटू सत्य आहे पण
अनेकांच्या येतं भाळी
प्रेमी युगुलांना त्यांनी
डावललं कधीकाळी
कुणा हवं होतं कुंकू
कुणा फक्त चुडा हाती
प्यारी फक्त रीत येथे
विसरून सारी नाती
पर जातीची म्हणून
तिला टाळलं साऱ्यांनी
तडा जाताच भिंतींना
सजा भोगावी वाऱ्यांनी
प्रेम केलं मनोभावे
एवढाच गुन्हा झाला
एक मताने निर्णय
करा बेदखल त्याला
प्रश्न म्हणा हवं तर
किंवा म्हणा ह्याला खंत
अशा जाचक रितींचा
कोण करणार अंत?
@ सागरराजे निंबाळकर