Sunday, September 29, 2019

शेवटाला कविताच माझी

शेवटाला कविताच माझी !
         (दशाक्षरी)

वाहवत जातो कधीकधी
ताबा मनावर नाही आता
कोणा विचारू कारण येथे
व्यस्ततेचा आव येता जाता

हवं तेव्हा जवळ करून
नंतर बाजूला सारायचं
रीत न्यारी आहे ही जगाची
जीवंतपणीच मारायचं

फार काही नको होतं मला
फक्त छोटेखानी आस होती
माझीच राहावी ती सदैव
जी जवळ आणि खास होती

काय होतं मनात नेमकं
तिचं तिलाच ठाऊक सारं
स्मित बळेच आणून ओठी
गणित जुळवायची न्यारं

त्रास होऊ लागला साऱ्याचा
कुठवर सहावी उपेक्षा
घेतला निर्णय टोकाचा नी
रोखल्या मीच माझ्या अपेक्षा

कोडं उलगडलेलं नाही
मात्र स्पष्ट झालं आहे चित्र
शेवटाला कविताच माझी
एकमेव जिवलग मित्र

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

विस्कटलेली घडी आयुष्याची
सांग मित्रा, कशी बसवू आता

त्यांनी तर साफ दुर्लक्ष केलंय
माझ्या नजरेला कसं फसवू आता

@ सागरराजे निंबाळकर

येत जा तू पितृपक्षा (मंजुघोषा)

------- येत जा तू पितृपक्षा -------

हे खरे ना? की फुकाचे भास होते ;
का इथे हे कोंडलेले श्वास होते.....!

काक स्पर्शा का उगा मी दोष देऊ ;
मरण येता तेच माझे खास होते...!

पिंड शिवण्या लाख केले यत्न त्यांनी
प्रक्रिया जी शेवटाला त्रास होते....!

पाहिले मज आणि गेल्या आड नजरा ;
बेगडी हा शोक ज्यांचे ध्यास होते.....!

सांगताना हर्ष होतो पितृपक्षा ;
येत जा तू कैक जीवा आस होते....!

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, September 28, 2019

चारोळी

सोडून दिलंय मी आता हट्ट करणं.

किनारा सागराचा, वाळू सागराची तरीही त्यात कोरलेलं नाव त्याची जवळची 'लाटच' पुसून जाते.

😊 सागरराजे निंबाळकर

Thursday, September 26, 2019

चारोळी

चर्चा आता आम्हा दोघांची मित्रहो
चारचौघात सहज होऊ लागली आहे

काळीज आणि डोळे बोलतात तिचे
ओठांनी मात्र कमालीची जागली आहे

😊 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

काही सीमारेषा आखून मीच थोडंसं लांब राहणं पसंत केलं.

सगळ्यांनाच जवळ केलं की गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

☺️ सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 25, 2019

चारोळी

ती जेवढी सजते, त्याहून जास्त
माझ्या लेखणीला सजावंसं वाटतं

सौंदर्याने घायाळ करण्याचं श्रेय
बघूया नेमकं कोण, कसं लाटतं

😘 सागरराजे निंबाळकर

चारोळी

विसरून सारे रुसवे फुगवे
तिने पुन्हा एकदा जवळ केलं

नका विचारू पारावार आनंदाचा
काळीज तिने नव्याने चोरून नेलं

😊 सागरराजे निंबाळकर

Tuesday, September 24, 2019

थोडक्यात

झाल्या काही चुका आपल्याच हातून. दोष इतरांना कसा द्यायचा?

घर रंगवताना रंगारीच्या सल्ल्याप्रमाणे रंगवलं. कोणता रंग माझ्या डोळ्यांना सुखावतो हे त्याला थोडेच माहीत होतं.

😊 सागरराजे निंबाळकर

Saturday, September 21, 2019

थोडक्यात

ढगांचं सावट होतं तोवर सगळं आलबेल होतं. पण, जसजसं ऊन आलं तिच्या सावलीमागे आणखी एक सावली दिसली.

तिच्या वाटेतून बाजूला झालो.

तिने कुतूहलाने विचारलंच झालं ते झालं पण तुला कसं माहीत पडलं?

तिला फक्त एवढंच बोललो...

त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणे शक्य आहे.

(अर्थ खोल आहे पण समजला तरच मोल आहे)

😊 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

गर्वाने म्हणाली होती अरे जा. तुझ्यासारखे हजारो मिळतील.
मिळालेही !

पण, जेव्हा जेव्हा ती दुःखात होती तिचं सांत्वन मात्र झालं नाही.

शेवटी, डोकं टेकवायला खांदा मिळणं आणि मायेची ऊब असलेल्या मिठीत शिरणं फरक असतो की नाही !

😊 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

बरं झालं ठेच लागली ते !
आई गं म्हणून मी बोलता झालो.
डोळे पुसण्यासाठी माझे हात सरसावले.
क्षणभर का होईना एका जागी बसलो.

अन्यथा, आंधळ्या विश्वासाने पोलिओ डोस पाजण्याची वेळ समीप आलीच होती.

😊 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

यमकांना आजवर मी जीवापाड जपलं.
पण, हल्ली मला मुक्तछंद ही जमायला लागलाय.

कारण कोणीतरी सांगून गेलं, शक्य नाही.
आता एकटं जगायला शिक !

🍃 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

तिच्या दारातून जाताना पाय रक्तबंबाळ झाले पण,
एक अवाक्षरही काढू शकलो नाही.

कारण,
काचेचा चुरा झालेल्या बांगड्या मीच भेट म्हणून दिल्या होत्या.

🍃 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

मैफिलीत फर्माईश आली. असं काही ऐकवा ज्याने काळीज हलेल.

मी *दगाफटका* नावाची गझल ऐकवली साहेब.

दगा झाल्यावर जो फटका बसला तेव्हाच काळीज हललं.
(किमान माझं तरी)

🙂 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

दुःखाला वाट करून देता यावी म्हणून कवी झालो पण...

दुःखांची विल्हेवाट लावणं आजतागायत जमलं नाही 😌

🍃 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

मनातलं ओळखता आलं नाही किमान चेहरा वाचावा ही अपेक्षा होती.
कारण,

हसता हसता ओघळणारे अश्रू आनंदाश्रूच असतील असं नाही !

😌 सागरराजे निंबाळकर

थोडक्यात

त्यांनी लायकी दाखवली म्हणून नाराज होऊन थोडेच चालेल.

आम्हीच आमची *पायरी* विसरून मैत्रीच्या *कट्ट्यावर* जाऊन बसलो होतो.

😢 सागरराजे निंबाळकर

चारोळी

अपेक्षांच्या धक्क्यातून सावरताना
वास्तव हळूवार माझ्या समोर आलं

थांबलो तिथेच मग हतबल होऊन
क्षणभर पुढचं काहीच दिसेनासं झालं

😌 सागरराजे निंबाळकर

Friday, September 20, 2019

चारोळी

भाळून रंगीबेरंगी फुलांवर माळ्याने
जिंदगानी सारी बागेच्या नावे केली

एक मात्र तो विसरलाच नेहमी
छाटल्या जातात झुकणाऱ्या वेली

😌 सागरराजे निंबाळकर

चारोळी

सावल्यांच्या प्रेमापायी उन्हास बिलगलो
इथेच थोडंसं चुकल्यासारखं वाटलं

एरव्ही हसू म्हणून चेहऱ्यावर झळकणारं
आज अचानक डोळ्यात कसं दाटलं

😌 सागरराजे निंबाळकर

चारोळी

समजून घ्याव्या लागतात काही गोष्टी
सारंच खुलेआम बोलायचं नसतं

लावली जरी इभ्रतीची श्रेणी आपुल्या
आपण मात्र, कोणास तोलायचं नसतं

😊 सागरराजे निंबाळकर

Thursday, September 19, 2019

चारोळी

साकीचा काय दोष मित्रहो?
मलाच जरा जास्त झाली होती

पहिलं की शेवटचं उमगेना, पण
घरपर्यंत सोडवायला आली होती

☺ सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 18, 2019

चारोळी

नका विचारू हालहवाल मजला
सारं त्यांच्याच तर मनाजोगं होतंय

लाख प्रयत्नांती मी हात टेकले
ठरवू दे त्यांनाच काय खरंय काय खोटंय

😀 सागरराजे निंबाळकर

तू अजून प्रेमात पडलेला नाही

-- अजून तू प्रेमात पडलेला नाही --

तिच्याशिवाय हल्ली मजला
सुचेनासं झालंय खूप काही
एवढं असूनही ती म्हणते.....
अजून तू प्रेमात पडलेला नाही

चर्चा चोहीकडे झाली आमची
अर्थ अनेकांनी मनाजोगे लावले
ती ही विचार करू लागली मग
नेमके त्यामुळेच माझेही फावले

धाडस करून विचारलं शेवटी
सांग सये, काय तुझ्या मनात
नाव द्यावं आपुल्या नात्याला की
प्रतिमा आहे तशी राहू दे जनात

उत्तर टाळलं तिने शिताफीने
मात्र, स्मितहास्य सारं सांगून गेलं
हवंहवंसं वाटणारं प्रेम आता
दोहोंनी एकमेकांच्या नावे केलं

राग येतो कधी लटका तिला तर
कधी अल्लडपणे जवळही घेते
दुराव्यानंतर नातं घट्ट होत जातं
रोज नव्याने मजला खात्री देते

तर असं आहे चित्र एकंदरीत
रंग ज्यात दिलखुलास खुलतात
रोपट्याचं वृक्षात रूपांतर होतं
वेली ज्याच्या अंगणात झुलतात

🥰 सागरराजे निंबाळकर

Monday, September 16, 2019

चारोळी

कशाला करू मी फुकाची चिंता
सारं काही खुल्या पुस्तकाप्रमाणे

सूर जुळायचे तेव्हा जुळतीलच
तूर्तास लिहितो शांत, शीतल गाणे

😊 सागरराजे निंबाळकर

Saturday, September 14, 2019

चारोळी

काय अन कशी देणार उत्तरं नेमकी?
प्रश्न जेव्हा जेव्हा आपल्यांनीच केले

चलबिचल झालं मन तेव्हापासून
कळेनाच, असे काय हिरावून नेले?

🙂 सागरराजे निंबाळकर

Friday, September 13, 2019

चारोळी

ओढ नेमकी कशाची होती?
ना तिला ना मला कधी कळालं

नकळत पडलो प्रेमात एकमेकांच्या
पाऊल तिच्याकडे अलगद वळालं

🥰 सागरराजे निंबाळकर

Thursday, September 12, 2019

चारोळी

बोलणं माझं तसं नित्याचंच पण
का कोण जाणे, तिला खटकलं

आत्ता कुठे स्थिरावलेलं काळीज
आज मग, पुन्हा एकदा भटकलं

😊 सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 11, 2019

चारोळी

मोजक्या श्वासांवर सत्ता गाजवून
ज्यांना दिव्यत्वाची प्रचिती आली

ताब्यात आलं मन त्यांच्या सदैव
प्रतिज्ञा संयमाची सुफळ संपूर्ण झाली

☺ सागरराजे निंबाळकर

Tuesday, September 10, 2019

चारोळी

ओघाओघात निघालेले शब्द सारे
साकीच्या काळजाला लागून गेले

क्षणाचा का होईना दिलासा मिळतो
पाहून ते अर्धवट भरलेले पेले

😊 सागरराजे निंबाळकर

Monday, September 9, 2019

चारोळी

नका विचारू अताशा मजला
काय होते तिचे शेवटचे शब्द

पापणी हलली फक्त नावापुरती
अन्यथा सगळं जागीच स्तब्ध

☺ सागरराजे निंबाळकर

चारोळी

मोजून घाव सारे काळजावरचे
हिशोब तिने एकेकाचा चुकवला

दुःखाचं व्याज न मागता दिलं
सुखाचा हिस्सा तेवढा थकवला

☺ सागरराजे निंबाळकर

Thursday, September 5, 2019

चारोळी

नशीब काय वाचणार मी म्हणून
थोडीशी पुस्तकं वाचून बघितली

अंगठे बहाद्दर शिक्का निघून गेला
किमया कळाली मजला सहीतली

☺ सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 4, 2019

सुखकर्ता दुःखहर्ता

➖➖ सुखकर्ता दुःखहर्ता ➖➖

हेत जीवनाचा । कळला ना कधी
असूनी अवधी । हाती कैक !! १ !!

धावलो मी फक्त । सुख सोयींमागे
विश्रांतीचे धागे । उसवूनी !! २ !!

धन परक्याचे । मज माझे वाटे
परिश्रमा फाटे । देऊनिया !! ३ !!

भार अपेक्षांचा । वाहता वाहता
निमूट पाहता । कोंडी झाली !! ४ !!

चांगले वाईट । सांगावया आता
आला बुद्धिदाता । धावूनीया !! ५ !!

टेकवितो माथा । तुझ्या चरणाशी
लाव काळजाशी । मज आता !! ६ !!

विनवितो तुज । तूच सुखकर्ता
तूच दुःखहर्ता । सकलांचा !! ७ !!

☺️ सागरराजे निंबाळकर