Sunday, May 31, 2020

जयघोष प्रगल्भतेचा

----- जयघोष प्रगल्भतेचा -----

अजून किती दिवस कुढत बसायचं?
जुन्या चालीरिती पाळत
फेकून द्या साऱ्या प्रतिगामी विचारांना
वेसण घालून वेशीवर
अन होऊ द्या जयघोष प्रगल्भतेचा 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

बळी दिला जातोय कोंबड्या - बकऱ्याचा
हवा तसा पाऊस यावा म्हणून 
लाखो रुपयांची मागणी होतेय
एक रुपया दानपेटीत टाकून
करतोय संघर्ष प्रगल्भतेच्या जोरावर 
अंधश्रद्धेला हाणून पाडण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

कोणी म्हणालं आत्मनिर्भर व्हा 
कोणी स्वदेशीचा नारा देतंय 
आज कळतंय थोडं थोडं 
अडचणीत कोण कुणाला थारा देतंय 
प्रगल्भ व्हा मित्रहो आतातरी 
मनाला संभ्रमातून बाहेर काढण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

कोणाला प्रगल्भ करायला जावं तर 
आपलाच दाभोळकर, पानसरे होतो 
बघूया किती दिवस चालतं हे 
मी लेखणी नव्याने हाती घेतो 
प्रसंगी तोफाही डागू जगण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा 
बाबा केव्हाच सांगून गेले 
पण वाक्य हे आम्ही फक्त 
परीक्षेत पास होण्यापुरते पाठ केले 
घेऊया शपथ संविधानाची
देशात खरा नागरिक घडवण्यासाठी 
तुमच्या - आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी....

@ सागरराजे निंबाळकर

मी अनुभवलेली कृतज्ञता आणि माणुसकी

शीर्षक :- मी अनुभवलेली कृतज्ञता आणि माणुसकी

शब्दसंख्या :- ५९०

     वर्ध्याला आमचा वाडा होता. भाजीमंडईच्या अगदी शेजारीच. देशमुखांचा वाडा म्हणून प्रसिद्ध. आज्जी-आजोबा, माझे वडील आणि त्यांचे चार भाऊ आपापल्या कुटुंबासोबत वाड्यात राहायचे. प्रत्येकाची वेगवेगळी खोली पण रात्रीच्या जेवणाला मात्र सगळे माजघरात एकत्र जमायचे. वाड्याच्या बाहेर भलंमोठं अंगण आणि त्यात एक बगीचा होता.
     
     आम्ही सगळी भावंडं आज्जी आणि आजोबांच्या खोलीत झोपायला असायचो. दोघे रोज नवनवीन गोष्टी सांगायचे त्यामुळे त्यांचा विशेष लळा होता आम्हा सर्व भावंडांना. आजोबांची परिस्थिती त्याकाळी विशेष नसल्याने त्यांनी सर्व मुलांना जेमतेम प्राथमिक शिक्षण दिलं. माझे चारही काका शेती करायचे आणि माझे वडील आमच्या वाड्याशेजारी असणाऱ्या वाण्याच्या दुकानात कामाला होते. माझ्या आजोबांना त्यांच्या मुलांचा विशेष गर्व होता. ते नेहमी म्हणायचे, 'मी पोरांना जास्त बुकं शिकवू शकलो नाही. पण, प्रामाणिक, कष्टाळू आणि निर्व्यसनी म्हणून माझ्या पोरांनी सगळ्या गावात नाव कमावलं. माझ्या सगळ्या सुनापण मला लेकीसारख्याच आहेत.'

     वृद्धापकाळाने आजोबांचं निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी आज्जीही गेली. पुढे चालून भावंडांमध्ये थोड्या कुरबुरी होऊ लागल्या. हळूहळू भांडणं टोकाला गेल्याने वाड्याच्या वाटणीपर्यंत विषय गेला. माझ्या वडिलांनी मुंबईला येण्याचा हट्ट धरल्याने अखेर वाडा विकून आलेले पैसे पाचही भावंडात समसमान वाटून घेतले गेले. आमच्या वाड्यासमोर गवळी नावाचे गृहस्थ राहायचे. त्यांचे दोन तबेले होते त्यांनी वाडा खरेदी केला. 

     मुंबईला आल्यावर काही दिवस आम्ही भाड्याने राहिलो. बाबांना सरकारी नोकरी लागली आणि आमचे दिवस पालटले. बाबांनी स्वतःचं घर घेतलं. मी आणि माझी लहान बहीण शलाका आम्हा दोघांनाही चांगलं शिक्षण दिलं. आज मी एमबीबीएस असून माझं स्वतःचं इस्पितळ आहे. बहीण वकील झाली. सगळं आलबेल आहे पण राहून राहून वाड्याची, आज्जी आजोबांची फार आठवण येते. आज वाडा असता तर...  असा प्रश्न पडतो. 

     एकदिवस धाडस केलं आणि वडिलांजवळ विषय काढलाच ! बाबा, मला आपला गावचा वाडा परत मिळवायचा आहे. तुमचं सहकार्य मला हवं आहे. "त्या वाड्यात आता काय राहिलंय सतीश? तो वाडा अनेक वर्षांपासून बंद आहे. पडझड झाली असेल सगळी. तुला शहरातला ऐशोआराम टोचतोय का?" असं म्हणून बाबांनी नकारघंटा चालूच ठेवली. मीही हट्टाला पेटल्याने शेवटी बाबांनी तयारी दर्शवली. मी एकही पैसा देणार नाही. सगळं तू बघायचं या अटीवर.

     कधी एकदा वर्ध्याला जातोय आणि वाडा पाहतोय असं झालं होतं. जागेचा व्यवहार असल्याने शलाकालाही सोबत घेतलं. गावी पोहोचल्यावर वाडा पाहिला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. गवळी काकांकडे वाड्याची चौकशी करावी म्हणून त्यांच्या घरी गेलो. माझ्या वडिलांना पाहताच म्हणाले "तू विश्वनाथ ना रे, सर्जेरावांचा धाकटा मुलगा." बाबांनी 'हो' म्हटलं. चहापान आणि औपचारिक गप्पा झाल्यावर मी गवळी काकांना वाड्याबद्दल विचारलं. ते म्हणाले "अजून मी विकला नाही कुणाला. पण तू का विचारतोस असं?'' मी त्यांना आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यांनी तात्काळ वाड्याच्या किल्ल्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाले "वाडा तुमचाच आहे. ताब्यात घ्या आणि पुन्हा त्या वास्तूचं नंदनवन करा." 

     इतक्या सहज, कसलाही व्यवहार न करता काकांनी किल्ल्या दिल्याचं आश्चर्य वाटल्याने त्यांना कारण विचारलं. ते म्हणाले, "तुझे आजोबा आणि मी घनिष्ठ मित्र होतो. आज मी जो काही आहे तो तुझ्या आजोबांमुळे. माझे आई वडील लहानपणी गेले. एक मित्र म्हणून, मोठा भाऊ म्हणून तुझ्या आजोबांनी मला सहारा दिला. थोडंफार शिकलो. मिळेल ते काम करत, पैसा साठवत दोन म्हशी घेतल्या. दोन तबेले कधी झाले कळलंच नाही. माझ्या सर्जेरावाचा वाडा दुसऱ्या कुणाकडे गेला असता तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. म्हणून मीच घेतला विकत. हे सगळं त्यावेळी सांगून उपयोगही झाला नसता. सगळ्यांच्या डोक्यात वाटणीचं भूत शिरलं होतं." हे सगळं ऐकत असताना बाबांच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना आणि माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. 

     आपल्याला मदत केलेल्या व्यक्तीबद्दल केवढी ही कृतज्ञता ! गवळी काकांच्या रूपात मला माणुसकी, कृतज्ञपणा जिवंत असल्याचा अनुभव आला. 
इतक्या वर्षांपासून मनाला सलत असलेली गोष्ट आज आनंदात परावर्तित झाली होती. गवळी काकांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्याच हाताने नारळ वाढवून वाड्याचं दार उघडलं. महिनाभर मेहनत घेऊन डागडुजी, रंगकाम, बगीचा सगळं बनवून घेतलं. 

वर्ध्यातही आता मी इस्पितळ बांधलं आहे. नाव दिलंय सर्जेराव इस्पितळ. ज्यांची परिस्थिती नाही त्यांचा इलाज मोफत केला जातो. 
आजोबांच्या मदतकार्याला, गवळी काकांच्या कृतज्ञतेला, मी अनुभवलेल्या माणुसकीला सतत जिवंत ठेवण्यासाठी !

@ सागरराजे निंबाळकर

भारताचे गुण गाता

------- भारताचे गुण गाता -------

भारताचे गुण गाता, फुलते ही छाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती !! धृ !!

शिवराय इथलेच, इथलीच राणी
गुरू गोविंदा सोबती, कबिरांची वाणी
नामा, जना, ज्ञाना झाले, इथे थोर संत
त्याच भूमीत जन्मलो, आम्ही भाग्यवंत

तुकोबांची गाथा सांगे, तू माझा सांगाती !! १ !!

भीमराव लिहितात, न्यारे संविधान
देऊ सारे मनोभावे, कायद्यास मान
लतादीदी गाती जणू, कोकिळेचं गाणं
सतावतं ए पी जेंचं, अकालीच जाणं

मैत्रीत सांगावी कृष्णा, सुदाम्याची नाती !! २ !!

कन्याकुमारी पासून, हिमालयी जाऊ
आरती नमाज सारे, एकसुरी गाऊ
होळी, बैसाखी, दिवाळी, गणपती येता
गोडी वाढते म्हणती, तिळगुळ देता

सुखाने नांदती येथे, विविधांगी जाती !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

चारोळी

प्रसंगी चिमटा काढून पोटाला
ज्याने उजवल्या चार लेकी

डावललं त्याच बापाला आजन्म
दाखवून मृत्युपत्रावेळी एकी

😇 सागरराजे निंबाळकर

Saturday, May 30, 2020

चारोळी

आपलंसं करतेवेळी गेले सारे
माझ्या नकळत मला गाळून

आता काय साधायला आलेत
पश्चातापाचे चार अश्रू ढाळून

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

छळायच्या ज्या बनून आठवणी
मीच पुसल्या त्या पाऊलखुणा

नको तेवढा जीव लावून, जेव्हा
गेला, चार दिसांचा पाहुणा 

➡️ सागरराजे निंबाळकर

Thursday, May 28, 2020

चारोळी

तिच्या जाण्याचं दुःख नव्हतं
एकटं पडण्याची वाटली भीती

होणारच होतं एकदिवस हे
एकतर्फी प्रेम टिकणार किती

🌿 सागरराजे निंबाळकर

Monday, May 25, 2020

चारोळी

आहे प्रत्येकाचे येथे
गुणदोष वेगळाले

कोणी मुकले स्वर्गाला
कोणी वैकुंठी निघाले

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

सूर्य जाता ढगांआड 
सांज ओशाळली जरा 

तिने चोरून पाहिला 
जेव्हा चंद्राचा चेहरा 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

इवल्याशा रोपट्याचे
होत असताना झाड

फुलू द्यावे मनाजोगे
येऊ नये कोणी आड

🌿 सागरराजे निंबाळकर

Sunday, May 24, 2020

हरी तुझी रूपे

------- हरी तुझी रूपे -------

हरी तुझी रूपे । अनादी अनंत 
आम्ही भाग्यवंत । भक्तगण !! १ !!

दशावतारात । केले आगमन  
सृष्टीचे पालन । करावया !! २ !!

मत्स्याच्या रूपात । केले आक्रंदन 
समुद्रमंथन । झाले पहा !! ३ !!

मेरू पर्वताला । आधार देऊन
धरले तोलून । पाठीवर !! ४ !!

वराहावतारी । पृथ्वी उचलली
साऱ्यांना दावली । राजशक्ती !! ५ !!

हिरण्यकश्यपू । राक्षसाचा नाश 
अवतार खास । नृसिंहाचा !! ६ !!

तीन पावलांच्या । जमिनीचा मेळ
अनोखा हा खेळ । बळीसाठी !! ७ !!

केशव माधव । हरी जनार्दन 
विष्णू नारायण । नावे तुझी !! ८ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७

Saturday, May 23, 2020

चारोळी

वाचा असती, जर का व्यथांना
मनसोक्त बोलल्या असत्या त्याही

तेवढाच मिळाला असता त्यांना
थोडक्याशा सांत्वनाने दिलासा काही

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, May 22, 2020

चारोळी

यत्न करूनही लाख
लागला न कधी मेळ

अवघड का इतुका
एका भाकरीचा खेळ

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

काळवेळ पाहून मीही
शिकलो स्वतःला सावरायला

तसा वेळ लागतोच म्हणा
पसारा कोणताही आवरायला

🌿 सागरराजे निंबाळकर

Thursday, May 21, 2020

चारोळी

उपयोग तसा काहीच नाही
काय करू मी आठवणी ठेवून

शक्य असतं तर दिल्याच असत्या
ज्याच्या त्याला, परत नेऊन

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

वर्तमानातून काढून उसंत
पाहिलं भूतकाळाकडे वळून

उच्छाद मांडला आठवांनी
गेल्या, पुन्हा एकदा छळून

😇 सागरराजे निंबाळकर

भेट साजणी

वृत्त :- कलापति (प्रत्येक ओळीत १३ वर्ण)

गालगाल गालगाल गालगाल गा  

यती आठव्या आणि तेराव्या अक्षरावर 

--------- भेट साजणी ---------

प्रेमपत्र रोज रोज, धाडली जरी 
भेट साजणी हसून, एकदा तरी !! धृ !!

प्रीत आगळी जगात, आपुली सये 
दृष्ट तीज कोणतीच, लागता नये 
साजणी तुझेच वेड, लागले मला 
तूच श्वास तूच ध्यास, अंतरातला  

नाव कोरले तुझेच, काळजावरी !! १ !!

काय नेमके मनात, सांगना प्रिये 
पाहण्या मला वळून, थांबना प्रिये 
शल्य फक्त एवढेच, बोचते मना 
जायला नको कधीच, व्यर्थ प्रार्थना 

ठेवते मला कितीक, तू अधांतरी !! २ !!

गारव्यातली पहाट, स्वप्नही नवे
माग साजणी सदैव, जे तुला हवे
घेतले मिठीत आणि, लाजली सखी 
नाव ठेवले तिनेच, रत्नपारखी 

जीव गुंतला तुझ्यात, गोष्ट ही खरी !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर

Tuesday, May 19, 2020

देव आहे चराचरी

-- देव आहे चराचरी --

देवालयी देव नाही 
कुठे शोधू मग त्याला 
प्रश्न इतुका भाबडा 
नित्य पडतो मनाला !! १ !!

इथे तिथे नका शोधू 
देव आहे चराचरी 
फक्त ओळखा तयाला 
योग्य मार्गाने सत्वरी !! २ !!

भुकेल्यास देतो अन्न 
तहानल्या थोडं पाणी
देव मानावे त्यालाच 
हेच सांगे संतवाणी !! ३ !!

कधी काळ देव झाला 
कधी वैद्य देव होतो 
भाग श्रद्धेचा हा सारा 
घेई जाणूनिया जो तो !! ४ !!

चार आणे असो किंवा 
नड लाख रुपयांची 
भरा सढळ हाताने 
ओटी गरजवंताची !! ५ !!

ध्यानीमनी नसताना 
देवापरी जो धावतो 
आशीर्वच त्याचा थेट 
काळजात सामावतो !! ६ !!

देव मानून कर्माला 
मूर्ती होतसे साकार 
देव वसतो तेथेही 
भक्तिभाव निराकार !! ७ !!

प्रत्येकात दिसतील 
नानारुपे ईश्वराची 
जर जाहली जागृत 
संवेदना मानवाची !! ८ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७

Monday, May 18, 2020

चारोळी

आशा-अपेक्षांच्या ओझ्याखाली 
जगणं, राहून गेलं थोडं 

सोडवता आलं असतं, पण 
कधी उमगलंच नाही, हे कोडं

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, May 16, 2020

भाग्य लागते मिळाया

-- भाग्य लागते मिळाया --

भाव मैत्रीतले सारे 
मनी ठेवले जपून 
नाही पडला तयांचा 
मज विसर अजून 

दिसामागे दिस जाता 
मैत्री होत गेली घट्ट 
कसा करू नये मग 
रोज भेटण्याचा हट्ट 

डोळे बोलके तुझे नि 
एक खळी गालावर 
सांग तूच आता मज 
कसे यावे भानावर 

नियमित संवादाने 
कळू लागला स्वभाव 
आपसूक येत गेले 
माझ्या ओठी तुझे नाव 

वाटा मोलाचा तुझाही
माझ्या हळव्या क्षणात 
तूच निशा चांदण्यांची 
तूच सोनेरी प्रभात 

झाल्या काही कारणांनी 
वाटा अपुल्या वेगळ्या
कुठे भेटगाठ मग 
कुठे गप्पा त्या मोकळ्या 

काळ लोटला बराच 
पुन्हा आली तुझी साद 
काय झाले, कसे झाले 
नको आता काही वाद 

भाग्य लागते मिळाया 
अशी मैत्री जीवनात 
बरसोत आता फक्त 
सुखसरी अंगणात 

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

नजरेतूनच व्यक्त झालो व्हायचं ते
ओठांनी फक्त, प्रतिनिधित्व केलं

अंतर राखूनही एखाद्याशी असं
पाहिलंय? इतकं समीप आलेलं

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

इतक्या वर्षानंतरही सये
नातं अपुलं, तसंच राहिलं

हस्तांदोलनागोदर जेव्हा आपण
एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, May 15, 2020

कुणाचे किती

------- कुणाचे किती -------

कुणाचे किती नोंदवू बारकावे 
(कुणी शांत सज्जन कुणी आगलावे)

घरंदाज तू वाटला ना कधीही 
जरी जोडली छानशी आडनावे 

हवन यज्ञ केले बदलल्या न रेखा 
अता हात माझे कुणा दाखवावे 

कधी लागली ठेच वाटेवरी जर 
सख्या वाटते, तू मला सावरावे

उगा शोधते प्रेम चोहीकडे तू 
दिसेनात गालांवरी तुज पुरावे

पसंती तिची मज कधी ना समजली
मनाने उगा घेतले हेलकावे

दिवा मंद केला नि निजलो उपाशी 
भुकेला कसे अन, किती समजवावे

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

तिच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर
दिली मी, साधी सरळ उत्तरे

तरी समाधान झालं ना तिचं
आता अबोलच राहिलेले बरे

😇 सागरराजे निंबाळकर

Wednesday, May 13, 2020

चारोळी

जीवापाड प्रेम होतं कधीकाळी
आज तिला, माझी भीती वाटते

कसं विसरावं तेही कळेना, कारण
दूर व्हायलाही ती, प्रेमानेच सांगते

😇 सागरराजे निंबाळकर

Tuesday, May 12, 2020

आता सावराया हवे

-- आता सावराया हवे --

विसरून झाले गेले 
आता सावराया हवे 
घेण्या आयुष्यात खूप 
अनुभव नवनवे 

कोण अपुला-परका 
वेळोवेळी ओळखावे 
भावनेत कुणाच्याही 
कधी आहारी न जावे 

नको फळाची अपेक्षा 
कर्म करत रहावे 
आहे नियम जगाचा 
ज्याचे त्यानेच पहावे 

नाजूकसे समजून 
फुल लावले छातीला 
त्रास बोचऱ्या काट्यांचा 
झाला निष्पाप पाठीला 

बोध यातून घेतला 
थोडे ठेवावे अंतर 
नाही करावी लागत 
येथ काळजी नंतर 

@ सागरराजे निंबाळकर

Monday, May 11, 2020

शायरी

घंटो तक यूँ सँवरना उसका
अब मुझे, रास आ रहा था

क्या करें पहली बार कोई
दिल के इतने पास आ रहा था

😇 सागरराजे

शायरी

गर मुमकिन होता ज़िन्दगी में
बीते समय को वापस ले आना

करते ज़ुर्रत बचपन में लौटने की
भरकर खुदाको मुँह माँगा जुर्माना

😇 सागरराजे

शायरी

यूँ तो हौसला अफ़जाई कर भी लेते
मगर, कौन सुनता है किसीका कहीं

उसने उस ख़ता का भी जिक्र किया
असल में जो हमनें कभी की ही नहीं

@ सागरराजे

चारोळी

ओठांवर नाव येता येता
तसंच, आत ते विरून जावं

शल्य असं बोचणारं मनाला
कुणाच्या वाट्याला न यावं

🌿 सागरराजे निंबाळकर

Friday, May 8, 2020

चारोळी

कुणाच्या नशिबी काय लिहिलंय
जर कुणाला, ठाऊक असतं

व्यथा, संकटं टाळून क्षणात
मनाविरुद्ध काही घडलं नसतं

🌿 सागरराजे निंबाळकर

Wednesday, May 6, 2020

दत्त दिगंबर

--------- दत्त दिगंबर ---------

औदुंबरी नित्य वसे, दत्त दिगंबर 
मनोभावे पुजतो मी, जुळवून कर !! धृ !!

व्रतभंग करावया, बदलून वेश 
त्रैमूर्तीचा यथोचित, जाहला प्रवेश
अनसूयेने ठेविला, अतिथींचा मान 
घेवोनिया मांडीवरी, केले स्तनपान 

एक होवो त्रिनंदन, मागितला वर 
औदुंबरी नित्य वसे, दत्त दिगंबर !! १ !!

अत्रि आश्रमी जन्मले, बाल दत्तात्रय 
ब्रम्हा-विष्णु-महेशाचा, छान समन्वय 
तीन शिरे, सहा हात, तेजस्वी बालक 
अनसूयासुत झाला, सृष्टीचा पालक 

पहावे कितीदा त्यांचे, रूप मनोहर 
औदुंबरी नित्य वसे, दत्त दिगंबर !! २ !!

माळ-कमंडलु हाती, डमरू, त्रिशुळ
उपासना, अनुष्ठाने, उद्धरिले कुळ 
धेनु, श्वानांचे सान्निध्य, औदुंबरतळी
वत्सल शरणागत, घेतात जवळी 

सेवकांच्या स्मरणाने, धावती सत्वर 
औदुंबरी नित्य वसे, दत्त दिगंबर !! ३ !!

करंजी, गाणगापूर, आणि पीठापूर
नारायणपूरी श्रींचा, वास सर्वदूर 
पादुकांची पूजा-अर्चा, दर गुरुवारी 
दत्तजयंतीची होते, जय्यत तयारी 

कृपाशीर्वादाने माझे, उजळले घर 
औदुंबरी नित्य वसे, दत्त दिगंबर !! ४ !!

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

शोध घ्यावया सुखाचा
मी केली पायपीट दिनरात

पाहिलं नाही मात्र एकदाही
मी डोकावून माझ्या अंतरात

🌿 सागरराजे निंबाळकर

Monday, May 4, 2020

चारोळी

क्षणांची सोबती आहे सावली
कधीतरी तीही जाईल सोडून

कशास लोभ नि खेद मनाला
एखाद्याशी असे नाते जोडून

🌿 सागरराजे निंबाळकर

Sunday, May 3, 2020

नव अंकुर (हायकू)

-- नव अंकुर --

नव अंकुर
फुलले चोहीकडे
आनंदसडे

नव अंकुर
चैतन्य वसंतात
मोद नभात

नव अंकुर
पहा कसा खुलतो
छान डुलतो

नव अंकुर
आणतात निरोप
राहू निकोप

नव अंकुर
होऊन मोठे झाड
झाकी पहाड

नव अंकुर
फुलावे क्षणोक्षणी
गर्द धरणी

नव अंकुर
पक्ष्यांचा गुंजारव
स्वर मधुर

नव अंकुर
पडता नजरेस
शोभा बागेस

-- *सागरराजे निंबाळकर* --

प्रभातवेळी (हायकू)

--- प्रभातवेळी ---

प्रभातवेळी
पक्ष्यांचा गुंजारव
भिजले दव

नित्य न्याहारी
सोनेरी किरणांची
प्रभात सारी

प्रभातवेळी
अध्यात्म, धुंद स्वर
परमेश्वर

प्रभाती रंग
आणतात निरोप
राहू निकोप

प्रभातवेळी
शेणाने सारवण
माझे अंगण

@ *सागरराजे निंबाळकर*

पाऊस धारा (हायकू)

----- पाऊस धारा -----

घनात नित्य
जलदांचा पहारा
पाऊस धारा

ओशाळलेला
चिंब सरींनी वारा
पाऊस धारा

पाऊस धारा
बागेतल्या फुलांना
देती निवारा

पाऊस धारा
चैतन्य वसंतात
मोद नभात

पाऊस धारा
सृष्टीचा आशिर्वच
रक्षा कवच

@ सागरराजे निंबाळकर

माळरानात (हायकू)

-- माळरानात --

माळरानात
चैतन्य साठलेले
पानापानात

चैत्र वैशाख
रानातला वसंत
मनपसंत

माळरानात
पानाफुलांची नक्षी
लपले पक्षी

पाऊस येता
माळरान शहारे
गुंजले वारे

माळरानात
चैत्राचे आगमन
आनंदे तन

इंद्रधनुष्य
माळरानात खुले
झुलले झुले

कळ्या पाकळ्या
माळरानी खुलल्या
कशा भुलल्या

माळ ओसाड
मना खिन्न वाटते
दुःख दाटते

रूप देखणे
किती घेऊ टिपून
वनी पाहून

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, May 2, 2020

चारोळी

ना खंत ना उरला शोक काही
जगतो मनसोक्त हरेक क्षणाला

तसंही वेदनाच होतात, जर
गोष्ट एखादी, लावली मनाला

🌿 सागरराजे निंबाळकर

महाराष्ट्र देशा...

------- माझ्या महाराष्ट्रा....! -------

आज मितीला स्मरून हुतात्म्यांचे बलिदान 
महाराष्ट्र देशा तुझे गातो मी गौरवगान !! १ !!

उभा थाटात सह्याद्री पश्चिमेला महाकाय 
आहे लागून पूर्वेस भामरागडाचे पाय !! २ !!

साताऱ्याच्या कुशीतून कृष्णा कोयना वाहते 
पंचगंगा मंदिर ती खुल्या डोळ्यांनी पाहते !! ३ !!

गोड-आंबट चवीला नागपूरातली संत्री
झाले चव्हाण पहिले यशवंत मुख्यमंत्री !! ४ !!

थंडीमध्ये पांघराया सोलापूरची चादर 
साऱ्या जगात प्रसिद्ध पुणेकरांचा आदर !! ५ !!

कैक जीवांना पोसते मायानगरी मुंबई 
तिच्या सौंदर्यासमोर फिके शांघाय, दुबई !! ६ !!

तुका, निवृत्ती, सोपान, ज्ञाना, नामा, जनाबाई   
गाते ताटीचे अभंग पहा इवली मुक्ताई !! ७ !!

लता, विनोबा, सचिन  झाले भारताचे रत्न
नाव उंचावण्या जगी कामी येती सदा यत्न !! ८ !!

कसे विसरावे कार्य वीर सावरकरांचे 
योगदान हे अमूल्य साऱ्या महामानवांचे !! ९ !!

घरा-घरात शिवबा जन्मा घालते जिजाई 
राहो महाराष्ट्रावर कृपा जगदंबा आई !! १० !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर 
मो - ८८७९८९७७९७