Saturday, December 29, 2018

चारोळी

इतुक्यात नको टाळूस सखये
हाल जीवाचे कुठे परवडतात

नियती हिणवते कैकदा अशाने
अन स्वप्नही माझी टर उडवतात

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

सारीच स्वप्न पूर्ण होत नाहीत
काहींना सहज तडेही जातात

दाद द्यायला हवी मुशाफिरांना
एवढं होऊनही खुलेआम गातात

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

किती शोधू अन कुठे शोधू?
नेहमीच तू हुलकावणी देतेस

साऱ्याच दिशांना कुठे कळतं
तू नेमकी कुठून, कशी येतेस

@ *सागरराजे निंबाळकर*

आम्हास नाव जगज्जेते

काही क्षणांचा अवधी दे फक्त, मी येईन पुन्हा येथे
अर्ध्यावर डाव सोडत नाही, आम्हास नाव जगज्जेते

संकटांची तमा का करावी? सारंच अगदी आलबेल
ना त्रागा जीवाचा आता, ना उरात काही घालमेल
असंच असतं जगणं मुशाफिरांचं, प्रचिती नेहमी येते
अर्ध्यावर डाव सोडत नाही, आम्हास नाव जगज्जेते

झाले कैक प्रयत्न करण्या मलिन, सागराची प्रतिमा
काहींचे धूर्त हल्ले पाठीवर, काहींचा सावध गनिमा
लाट घेते काळजी सागराची, नको ते किनाऱ्यास नेते
अर्ध्यावर डाव सोडत नाही, आम्हास नाव जगज्जेते

थरार साऱ्यांच्या नशिबी कुठे, काही थोडक्यात मुकलेले
पाहून सागराला चकीत सारे, अंबर मुजऱ्यास झुकलेले
भरती ओहोटी नियम निसर्गाचा, ग्वाही नियती देते
अर्ध्यावर डाव सोडत नाही, आम्हास नाव जगज्जेते

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, December 28, 2018

किरणप्रभा

----- आरती श्री स्वामींची -----
           (किरणप्रभा)

जयदेव जयदेव, जय स्वामीराया
येतो शरणागत मी, तुझियाच पाया !! धृ !!

प्रसन्नमुद्रा ऐसी, सकला सुख लाभे
हरुनी साऱ्या चिंता, उभा भक्तांच्या मागे
मिळते संजीवनी, उजळून ही काया !! १ !!

स्वामी स्वामी नामाचे, मज लागले वेड
मंत्राने सुटला माझ्या, जीवनाचा तेढ
नितदिन व्हावे दर्शन, राहावी छाया !! २ !!

आई स्वामी माझे, स्वामीच होतसे तात
पडूनिया पाया, दिवसाची सुरुवात
मनोभावे मग तेही, देती मज माया !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, December 27, 2018

अति लघु कथा

रोजचंच येणं जाणं होतं दारातून तिच्या. एक दिवस ताळेबंद घर पाहिलं आणि माहिती काढली असता कळालं, आमच्या प्रेमाची चुणूक घरच्यांना लागल्याने त्यांनी तिचं लग्न मिळेल त्या पुरुषाशी लावून द्यायचं ठरवलं आणि गाव सोडून गेले.

प्रेमात पुन्हा जातच आडवी आली राव !

---------------------------

आयुष्यभर सर्वांशी प्रामाणिक राहिलो, कधी काही चुकीचं केलं नाही, सगळ्यांना निस्वार्थ मदत केली. एकदिवस मुलाच्या महाविद्यालयीन प्रवेशाकरिता एका ठिकाणी गेलो, (जे माझ्या मित्राचंच होतं) मित्राचं वाक्य ऐकून हडबडलो.
*हे कॉलेज तुझ्या मुलासाठी नाही रे, इथं श्रीमंत लोकं शिकतात*.

सर्व केलं. श्रीमंत व्हायचं तेवढं राहिलं बघा !

-----------------------------

पैसे खर्च करायची ऐपत नव्हती म्हणून मित्रांसोबत फिरायला जाणं टाळायचो, वाढदिवसाच्या मेजवाणीत कधी सामील होत नव्हतो, बाहेरच्या दौऱ्याला नानाविध कारणांनी टाळलं.
अचानक आई आजारी पडली. मुंबईला न्यावं लागणार होतं. काय करावं, कसं न्यावं काहीच कळेना !
तेवढ्यात मित्राची चारचाकी दारात येऊन उभी !

तेव्हा कळालं, ही सगळी मित्रमंडळी खरंच श्रीमंत आहेत.
पैशानेही आणि मनानेही !

@ *सागरराजे निंबाळकर*

किरणप्रभा

नवनव्या संकल्पांसवे आरंभ व्हावा
नववर्षाच्या स्वागताला पणती लावा !! धृ !!

उजळवते घर इवलीशी पणती
हिशोब सुखाचा ना आनंदाची गणती
महती स्त्रीची आता, साऱ्या जगास दावा !! १ !!

कधी होते मोठी कुणाही कळत नाही
ती चाल तुरुतुरु, पुन्हा वळत नाही
राहो सुखात कायम आशिर्वच द्यावा !! २ !!

कशास चालीरीती कशास देणं घेणं
भाग्याने मिळतं असं, नक्षत्राचं लेणं
लाभ कन्यारत्नाचा माझ्या भाळी रहावा !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, December 26, 2018

चारोळी

साऱ्यांनाच कुठे जमतं सये
तुझ्यासारखं नजरकैद करायला

मोजली खोली मी अगदीच संयमाने
तेव्हा शिकलो, खोल डोही तरायला

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

कैकदा उर भरून येतो आईचा
घरदार तुटताना पाहवत नाही

आयुष्यभर हास्यच असतं ओठांवर
अंतिम क्षणी मात्र, राहवत नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

दुःखांशी झालेल्या करारात मी
सुखांसाठी अनाहूत रक्कम मोजली

ना स्वाक्षरी, ना कोणता पुरावा
नियतीने ही योजना अधांतरीच योजली

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, December 25, 2018

चारोळी

प्रवास माझा कुठवर जाणार मला ठाऊक नाही
जाईन आहारी एखाद्याच्या इतका मी भावूक नाही

रिचवितो दोन चार प्याले कधी कधी दुःखात, पण
रोजच बसावं मैफिलीला इतका अजून घाऊक नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

अष्टाक्षरी

----- असा संसार संसार -----
   (वऱ्हाडीतून अष्टाक्षरी)

असा संसार संसार
ऊभा अभायाच्या खाली
काया मातीचा आसरा
मायरानं हायं वाली

माथ्यावर गोंदलेलं
सदा ईथ तीथ जानं
भुकेजलं पोटं गाते
रोज दोरीवर गानं

हिऱ्या पैंजन्या संगती
जिंदगीची मीळकतं
खावू घालते लेकरा
नाह्यी डोया हरकत

सळा सारवना परी
न्यारा मातीचा सुगंध
कोन्या चंचल पायाले
बांधे सास एकसन्ध

लाह्यी ऊन्हात फुटते
वाटे थन्डगार वारा
माह्या डोक्यावर सदा
राही ढगाचा पहारा

जलमलो गरीबीतं
माह्या एवळाचं गुन्हा
तरी मांगते देवाले
हाच जनम म्या पुन्हा

पायी भींगरी लावूनं
सारं जग फिरवलं
माह्यं नशीब नशीब
गरीबीत हारवलं

@ *सागरराजे निंबाळकर*
         उल्हासनगर, ठाणे

Monday, December 24, 2018

चारोळी

का कोणास ठाऊक, पण
मृगजळावर मी नेहमीच भाळतो

वास्तवात हाती काहीच नसतं
तरीही मी खूप काही चाळतो

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, December 23, 2018

किरणप्रभा

त्रास होऊ नये, तू दूर गेल्यानंतर
एवढेच राहो माझ्या तुझ्यात अंतर !! धृ !!

येशील म्हणून, मागे वळून पाहिले
सोबतीला माझ्या, काय शिल्लक राहिले
ठाव घेतो मी आता, तुझाच निरंतर !! १ !!

शोधू कुठेकुठे तुला, कळेना फारसे
हाती येती फक्त, मृगजळाचे आरसे
पुढे जाण्याखेरीज, कोणते गत्यंतर !! २ !!

झालं गेलं, किती सहज बोलून गेली
प्रेमाच्या पारड्यात सारं तोलून गेली
दूर सारण्याचा, तुझा न्याराच मंतर !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, December 22, 2018

किरणप्रभा

----- श्रीपादवल्लभ दिगंबरा -----

मनोभावे करतो मी तुमचीच सेवा
श्रीपादवल्लभ, दिगंबरा, गुरुदेवा !! धृ !!

तात, मातृ तुम्ही अखंड विश्वाची माया
स्मरता नित्य लाभे कृपादृष्टीची छाया
मिळो मलाही तुमच्या दर्शनाचा मेवा !! १ !!

कोण कुठून आलो मी, तुमचाच झालो
आनंद सरींमध्ये मी, चिंबचिंब न्हालो
ओठी नाम तुमचं, मनी भक्तीचा ठेवा !! २ !!

लाभतो सहवास तुमचा, ठायीठायी
त्यागून सारी सुखे लीन तुमच्या पायी
वाटे मलाही, त्या गाणगापुरीचा हेवा !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Friday, December 21, 2018

चारोळी

कितीदा रोखतो मी स्वतःला
पाऊलं मात्र तुझ्याकडेच वळतात

ह्यालाच म्हणतात प्रेम बहुधा
ऋणानुबंध कळत नकळत जुळतात

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, December 20, 2018

किरणप्रभा

शब्द शब्द माझे तुझ्या कानी जात होते
भासे कैकदा, गीत डोळ्यांनी गात होते !! धृ !!

हरवली निरागस मैत्री, शोधू कुठे
कधी स्वकीय, कधी परके आडमुठे
डागाळतं नातं, वेगळीच जात होते !! १ !!

विचारावं म्हणतो त्या चंद्र चांदण्यांना
काय म्हणतात अवास्तव मागण्यांना
का नेहमीच? अमावस्येची रात होते !! २ !!

अंबाड्यात सयेच्या, गजरा मी माळतो
लटक्या रागावर, पुन्हा पुन्हा भाळतो
प्रेमात अशीच, न्यारी रितभात होते !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, December 19, 2018

किरणप्रभा

------- *किरणप्रभा* -------

कोणत्या आशेवर जगायचे सांग तू
की आता माझे मीच बघायचे सांग तू !! धृ !!

पावलांच्या पुसट झाल्या पाऊलखुणा
वाटते मज मी चार दिसांचा पाहुणा
भवसागरी, कसे तरायचे सांग तू !! १ !!

ओठ हे निशब्द, अबोल झाल्या नजरा
वर्षे लोटली, तू माळला नाही गजरा
काय, कसे, कधी हे ठरायचे सांग तू !! २ !!

तू नसल्याचं शल्य आजही आहे उरी
विरहगाथा आपुली झाली खरीखुरी
दुःख माझे मी कसे हरायचे सांग तू !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, December 18, 2018

स्वामी समर्थ अभंग

श्री स्वामी समर्थ । नामाची महती
लीलांची गणती । अगणित !! १ !!

औदुंबर वृक्ष । देतो अनुभूती
दुष्कर्मे आहूती । त्याच्याखाली !! २ !!

दत्त दिगंबर । अवतार स्वामी
त्यांचा चारी धामी । आशिर्वच !! ३!!

लीन होता पायी । जन्म होई सार्थ
अर्जुनाचा पार्थ । कृष्ण जसा !! ४ !!

भिऊ नकोस तू । स्वामींचा हा मंत्र
जगण्याचे तंत्र । शिकवितो !! ५ !!

बाळप्पा चोळप्पा । करी नित्य सेवा
सत्संगाचा मेवा । चाखूनिया !! ६ !!

आशिर्वच लाभो । सदा सागराला
येतो जागराला । दरवर्षी !! ७ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, December 17, 2018

मैफिलीत आज माझ्या

----- *मैफिलीत आज माझ्या......!* -----

मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले
काहींनी तळ ठोकला, काही परागंदा झाले ।।धृ।।

छेडले मी सूर जेव्हा, माझ्या हृदयाला भोसकून
अचंबित झाले कैक, काही रडले धाय मोकलून
पाहिले जे स्वप्न मी, क्षणात सारे बेचिराख झाले
मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले !! १ !!

म्हंटलं मांडून प्रश्न, घालू एकेकाच्या हृदयाला हात
हा यक्षप्रश्न नियतीचा की, मेनकेने केलेला घात
ऐकून सवाल माझे, सौंदर्य जळून राख झाले
मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले !! २!!

यातना साऱ्यांच्या, माझ्या तोंडून बाहेर येत होत्या
जखम चिघळल्यावर त्रास होतो, ग्वाही देत होत्या
धडधडले काळीज कुणाचे, कुणाचे थरकाप झाले
मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले !! ३ !!

कळू लागलं हळूहळू, ऐकून मीही पुरता निशब्द
किती अघोरी हे प्रेम, ज्यात होते सारेच कटिबद्ध
फोल ठरला विश्वास, दग्यास झुकते माप मिळाले
मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले !! ४ !!

नका डावलू प्रेमाला इतकं, एवढंच माझं मागणं
आज रात्र पौर्णिमेची, तरी का सुनंसूनं चांदणं
नभालाही पडलं कोडं, नेमके काय पाप झाले
मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले !! ५ !!

भिडली मधू ओठांना, काही प्याल्यांचे तुकडे झाले
पिऊनही चढली नाही, असे कोणते रुपडे ल्याले
तोंडपाठ झाली विरहगाथा, किस्से वारेमाप झाले
मैफिलीत आज माझ्या, दिवाणे लाख आले !! ६ !!

------- *सागरराजे निंबाळकर* -------

चारोळी

विरत गेला श्वास माझा अन
खचत चाललोय मी हल्ली

माझ्यातल्या *मी*पणाला शोधताना
होतेय त्या *तू* ची पायमल्ली

@ *सागरराजे निंबाळकर*

२६ जानेवारी स्पर्धा निवेदन

💫💫✍🏻✍🏻🏵🏵🌿🌿✍🏻✍🏻

सालाबाद प्रमाणे यंदाही त्याच उत्साहात *लेखणी माझी देखणी* समूह *२६ जानेवारी, २०१९ प्रजासत्ताक दिनानिमित्त* आयोजित करत आहे *बहुभाषिक देशव्यापी काव्यलेखन, गीतलेखन स्पर्धा*

💫 *स्पर्धेसाठी विषय :- खुला विषय, बंधन नाही*

💫 *स्पर्धेसाठी बहुभाषिक प्रयोग :- मराठी (प्रमाणभाषा), हिंदी, अहिराणी, वऱ्हाडी, कोकणी, मालवणी आणि आगरी* (एकूण ७ भाषांपैकी आवडत्या भाषेत १ कविता किंवा गीत पाठवू शकता)

💫 *स्पर्धेसाठी रचना पाठवण्याचा कालावधी :- ०१ जानेवारी २०१९ ते १० जानेवारी २०१९*

💫 *स्पर्धेसाठी रचना पाठवण्यासाठी संपर्क :- सागरराजे निंबाळकर*
8⃣8⃣7⃣9⃣8⃣9⃣7⃣7⃣9⃣7⃣
(समूह प्रशासक, स्पर्धा आयोजक, कवी, लेखक)

💫 *स्पर्धा संकलक :- गुरुदत्त वाकदेकर*

💫 *परीक्षक :-*

🏵 *स्पर्धेसाठी ५ नामांकित परीक्षक असतील, पैकी प्रत्येक परीक्षक गुणांकन करेल. पाचही परीक्षकांचे गुण एकत्र करून विजेते निवडले जातील.*

⭕ *स्पर्धेसाठीचे नियम खालीलप्रमाणे* :-

💫 *स्पर्धेसाठीची रचना ही दिलेल्या कालावधीत म्हणजेच ०१ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यानच पाठवावी*

💫 *स्पर्धेसाठीची रचना पाठवताना वर स्पर्धेसाठी असा उल्लेख करून खाली फक्त नाव आणि जिल्हा नोंदवावा*

💫 *स्पर्धेसाठीची रचना ही फक्त आणि फक्त सागरराजे निंबाळकर ह्यांच्या वैयक्तिक क्रमांकावर ८८७९८९७७९७ पाठवावी अन्यत्र पोस्ट केल्यास ग्राह्य नसेल*

💫 *स्पर्धेसाठी केवळ एकच रचना पाठवावी. कवितेत कमीत कमी १६ ते जास्तीत जास्त २४ ओळी असाव्यात*

*जातीधर्मावर टीका करणारी, शिवीगाळ असणारी, कोणाच्या भावना दुखावणारी कविता स्वीकारली जाणार नाही.*

💫 *स्पर्धेसाठी निरनिराळ्या भाषांचं ज्ञान असलेले परीक्षक नेमलेले असून प्रत्येक परीक्षक ५० पैकी गुणदान करेल. प्रत्येक परीक्षकांचे गुण एकत्र करून खालीलप्रमाणे विजेते निवडले जातील*

प्रथम १
द्वितीय १
तृतीय १

उत्तेजनार्थ ५
लक्षवेधी ३

पैकी, *प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना* २४ फेब्रुवारी रोजी, कल्याण येथे *लेखणी माझी देखणी आणि श्री कला मंडळ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित* कवी संमेलनात आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
इतर विजेत्यांना आणि टॉप २० गुणांकन असलेल्या स्पर्धकांना निमंत्रित कवी/ कवयित्री म्हणून संमेलनात निमंत्रित केलं जाईल आणि प्रमाणपत्राने गौरविले जाईल.

*स्मृतिचिन्ह घेण्यासाठी विजेत्याने स्वतः कार्यक्रमात हजर राहावे. पोस्टाने अथवा अन्य कोणत्याही मार्गाने बक्षीस पोच केलं जाणार नाही.*

*विजेता बक्षीस घेण्यासाठी हजर नसल्यास १ महिनाभर ते बक्षीस राखून ठेवलं जाईल. त्यानंतर बक्षीस सुपूर्द करण्यास आयोजक जबाबदार राहणार नाही. विशेष नोंद घ्यावी.*

💫 *सहभाग प्रमाणपत्र मिळणार नाही ह्याची विशेष नोंद घ्यावी*

💫 *स्पर्धेचा निकाल १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता स्पर्धा समूह आणि लेखणीच्या सर्व समूहात जाहीर होईल त्यामुळे स्पर्धा समूहात लिंक ने सामील व्हावं. वैयक्तिक कळवण्यात येणार नाही*

*स्पर्धा समूहाची लिंक खाली देत आहे*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://chat.whatsapp.com/LDhRQox9yF35G8ukm08Dcf

चारोळी

सारंच चित्र बदललंय आता
कोण गातं पहाटेस भावगीतं

आठवतो पहाडी आलाप प्रल्हादाचा
वाटतं, आपणही व्हावं लिहीतं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

महालात सुख लाभलंय कोणा
मला झोपडीतच समाधान लाभतं

प्रेम, वात्सल्य, मायेच्या पैंजणातून
फक्त नी फक्त, आई हेच नाव वाजतं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

डावललं काहींनी मला आयुष्यात
काहीजण स्वतः साथ सोडून गेले

नियती म्हणाली, तुझं तूच बघ आता
यंदाच्या डावात, मी काही नाही केले

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

नसतात काही गोष्टी नशिबात
हट्ट तयांचा कुठवर करायचा

आता विसंबून राहावे कशाला
मार्ग आपला आपणच धरायचा

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, December 16, 2018

आटलं धरणाचं पाणी, कोरड्या झाल्या नद्या
आज गेला कसाबसा, काय व्हायचं उद्या

डोळे पांढरे नभाचे, दुभंगली धरणी
सुखी वनराईला, कोणी केली करणी

विरला हा प्राणवायू, कार्बनच्या थराने
ओझोनही फिका पडला, सूर्य किरणाने

तोल पर्यावरणाचा, सांभाळा मिळूनी
अन्यथा हे प्रदूषण, टाकेल गिळूनी

विनवणी अखेरची, करतो निसर्ग
थेंबेथेंबे नष्ट जिणं, आत्म्याचा विसर्ग

Friday, December 14, 2018

चारोळी

ओलावलेल्या जखमांना आता
हळुवार फुंकर घालायला हवी

तेवढंच बळ मिळतं जगण्याला
वाट गवसते चालायला नवी

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

लटकाच असतो राग तिचा पण
मी समजूत खरीखुरी घालतो

इतकं करूनही ती नामानिराळी
अन पुन्हा माझ्यावरच आळ तो

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, December 13, 2018

संसाराचं गाणं (वंशमणि वृत्त)

----- संसाराचं गाणं -----

वंशमणि (८+८+४)

आठवते का भेट आपुली प्रेमळ
मला घायाळ करणारे ते डोळे
झाला विवाह लाखात एक न्यारा
ओंजळीत ह्या आनंदाचे गोळे

गुंतला जीव एकमेकात कधीच
कधीच आपण आई बाबा झालो
लाभली परी गोंडस लोभस हसरी
सुखाच्या सरित मी चिंबचिंब न्हालो

एका क्षणात होतात वाद आणिक
उलगडतं मग हे भांड्याचं कोडं
मोडली घडी जर चुकून, तर राणी
सावर तू अन ऐकावं मी थोडं

कशाला हवे रुसवे फुगवे सखये
गा कधीतरी संसाराचं गाणं
तुझ्या न माझ्या प्रेमास साक्ष आहे
हर्षोल्हासी हे खणखणीत नाणं

मोठी झाली मुलगी आता अपुली
परक्याचं धन, मन देईना ग्वाही
सानुलं मूल गोजिरं फूल माझं
तिच्यासम तीच दुसरं काही नाही

असंच असतं संसाराचं गाणं
प्रारब्धाच्या खेळात दंग सारे
विसरुन सारी दुःखे चिंता गगनी
वाहती नित्य समाधानात वारे

@ *सागरराजे निंबाळकर*
       उल्हासनगर, ठाणे

Wednesday, December 12, 2018

चारोळी

गर्व होता मला, ज्या सौंदर्याचा
त्यामुळेच आज हाती मधूचे प्याले

खोचून मित्राने आज विचारलंच शेवटी
अरे, त्या नशिल्या डोळ्यांचे काय झाले

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

केले सत्कर्म कैक अन आज
सुखाने आनंदात चिंब न्हालो

क्षणभंगुर आहे आयुष्य मग
का मी उद्याच्या चिंतेस भ्यालो

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

काय आहे सद्यस्थिती माझी अन
काय असेल माझा भविष्यकाळ

मला एकट्यालाच पडत नाही प्रश्न
सर्वांनाच चिंता ही सकाळ संध्याकाळ

@ *सागरराजे निंबाळकर*

Tuesday, December 11, 2018

चारोळी

दोनच क्षण विरहाचे आता
जणू एकेक वर्ष वाटू लागतं

तू नसतानाच ओघळतात अश्रू
एरव्ही हे दुःख, कुठं साठतं?

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

आता कशाला विचार करावा तिचा
गेलीय ना एकदाची, ती मला सोडून

दोष तिला, द्यायचा तरी कसा मित्रहो
आपलंच चुकलं दगडासमोर हात जोडून

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

देवाणघेवाण करायचीच असल्यास
काळजाची अदलाबदल करून बघू

खूप झालं आचार विचारांचं प्रदान
आता एकमेकांच्या दृष्टिकोनातून जगू

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

शल्य नेहमीच राहील उरी माझ्या
तिला आपलंसं करू शकलो नाही

लोकांना चिंता, मी किती वाट बघणार
कसं सांगू मी तसूभरही थकलो नाही

@ *सागरराजे निंबाळकर*

Monday, December 10, 2018

वृत्तबद्ध चारोळी

वंशमणि :- ८+८+४ = २०

घेवून शपथ सत्संगाची मनुजा
जोड तू एक संकल्पाचा धागा

मृगजळापरी सारं काही इथलं
का मग उगाच ह्या जीवाला त्रागा

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

दुःख मिळालं एकहाती मजला
सुख मात्र, मी व्याजावर घेतलं

परतफेड करताना आले नाकीनऊ
सारं काही अगदी जीवावर बेतलं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

वेळीच नाव दे आपुल्या नात्याला
तूच ठरव मी तुझा कोण लागतो?

नंतर खुलासा नको तू मीरा होतीस
अन मी खट्याळ कृष्णासारखा वागतो

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

विश्वास एकाचा सोपवला जातो
जेव्हा कोण्या त्रयस्थाच्या हाती

तेव्हाच होते खरी दंगल मित्रा अन
फुटतं खापर, निष्पापांच्या माथी

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

काळ नेहमीच खुणावतो चालताना
वाटेत तुझ्या, येतील लाख अडथळे

नमस्कार कर ज्ञानी दुनियेला अन
समज, साऱ्यात फक्त आपणच खुळे

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

वाङ् निश्चय केला मी सुखांशी
दुःखाला कन्यादान करायला लावलं

एरव्ही दुनिया नावं ठेवायची सतत
आजचं कृत्य मात्र साऱ्यांनाच भावलं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

हरवते वाट, जेव्हा जेव्हा माझी
काळच माझा सर्वोत्तम गुरू होतो

लीन होतो त्याच्याच चरणाशी अन
अध्याय माझा नव्याने सुरू होतो

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

पाहायचं सर्वकाही खुल्या डोळ्यांनी
ओठांना सांगायचं तुम्ही शांत राहा

ह्या गर्दीत निभाव नाही आसवांनो
धाय मोकलायला आता एकांत पाहा

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

सहन झाला नाही विरह मला
जाण्याने तिच्या, काळीज पुरतं मेलं

मीच काढली मग माझी शवयात्रा
अन दुनियेस अप्रूप हे मी काय केलं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

पौर्णिमेच्या चंद्रास सहज विचारलं मी
एवढ्या चांदण्यात, नेमकी कोणती तुझी

उत्तरला तो, जी मला आपलं मानेल अन
जिच्या साधेपणासमोर सौंदर्यवती खुजी

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

कळाला नाही व्यभिचार दुनियेचा
मी साऱ्यांशीच हस्तांदोलन केलं

आज उमगलं निवांत बसल्यावर
कोणी, कधी, कुठल्या वळणावर नेलं

@ *सागरराजे निंबाळकर*

Sunday, December 9, 2018

चारोळी

कुणास दोष द्यावा मी आता
नाणं आपलंच खोटं असावं

रहाटगाड्यात हरवतो मग वाटतं
नियती अन कर्माचं साटंलोटं नसावं

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, December 8, 2018

मोजू नकोस लाटा गझल

----- मोजू नकोस लाटा -----

वृत्त :- आनंदकंद

मोजू नकोस लाटा, येतील त्या निरंतर
येतील वादळेही, येथे अती भयंकर

तोऱ्यात येथ आले, गेले कितीतरी पण
स्मरणात राहिले ते, होते खरे कलंदर

जा प्रेम डावलूनी, माझे खुशाल सखये
पण आश्रयास माझ्या, येऊ नकोस नंतर

सोडून जायचे रे, येथेच सर्व काही
सांगून स्पष्ट गेला, राजा इथे सिकंदर

स्वप्नात काय दिसले, होते विचित्र सारे
पण जागता उमगले, होते तयात अंतर

गड कोट खूप येथे, मी पाहण्यास गेलो
साऱ्यात भावला मज, तेजोमयी पुरंदर

पाहून सागराला, सारे चकीत झाले
मुजऱ्यास वाकलेले साक्षात भव्य अंबर

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

पैंजणांची झंकार तुझ्या, राणी
हळुवार मला खुणावू लागली

एवढे दिवस मी चिंतेत होतो
आता मात्र आशा दुणावू लागली

@ *सागरराजे निंबाळकर*

Thursday, December 6, 2018

चारोळी

मितभाषी होतो मी कायम
स्पर्शाने तिच्या बोलकं केलं

माथ्यावरचं ओझं अवघडल्याचं
आज अचानक हलकं झालं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

परवडायचा नाही राजा तुला
साजशृंगार महालाच्या राणीचा

आत्ता म्हणतेय राहीन झोपडीत
काय भरवसा बदलत्या वाणीचा

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

भेदणं काळजाला एकमेव उद्देश
साधंसुधं आता, मी ही लिहीत नाही

सारंच वहीत कैद नसणार माझं
येईल थोडंसं पुस्तकातही काही

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

सारून तिच्या बटेस अलगद
माळला मी मोगऱ्याचा गजरा

कोणीतरी म्हणालं पहा राजाराणी
अन अवाक झाल्या साऱ्यांच्या नजरा

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

लोकांचं काय घेऊन बसलात
माझे तरी, मला कुठे पावले?

मी एकरूप राहिलो तत्वांशी
दुनियेने मज न्यारेच रूप दावले

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

भावनांच्या द्वंद्वगीतांना मी
एकटाच उत्तर देत होतो

भान काळजाचं चोरलं सखीने
आळ मात्र स्वतःवर घेत होतो

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

सारलं मला अलगद बाजूला
कळालं नाही नेमकं काय चुकलं

चाललो मैलोनमैल खडतर वाटेवर
ध्येय मात्र, एका पावलाने हुकलं

@ *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

जाळल्या मी ज्या स्मृती हातांनी
झळ त्यांची काळजाला लागते

सारं काही करतोय मनाजोगं तरी
नियती माझ्याशी असं का वागते

@ *सागरराजे निंबाळकर*

बालानंद - मात्रावृत्त

वृत्त :- बालानंद (८+६ = १४)

सारे करून पाहावे
सत्यास मात्र जागावे

अमूल्य आहे संभाजी
कार्य तयाचे जाणावे

वाटलेच जर कधी तुला
न लाजता तू मागावे

झाली आता माझी तू
उखाण्यास का लाजावे

बघता गोकुळ सुख लाभे
खेळ इथेही रंगावे

हवेच काही मोठे जर
त्या सागरास लांघावे

@ *सागरराजे निंबाळकर*