Tuesday, March 17, 2026

डोळ्यांतल्या खाणाखुणा

डोळ्यांतल्या खाणाखुणा ओठांवरी येतील का
तोडून सारी बंधने स्वच्छंद तू जगशील का

आयुष्यभर मी पोसल्या जखमा उरी वेड्यापरी
आतातरी हासायची मज कारणे मिळतील का

मी बाभळीचे झाड अन् नाजूक तू चाफेकळी
अंतिम क्षणी थोडा तुझा दरवळ मला देशील का

होते जिथे घर आपले माझ्या-तुझ्या स्वप्नातले
सांधायला "नाती" तिथे तू एकदा येशील का 

जमते कुठे मांडायला सगळे मला हृदयातले
मी अक्षरे होईन तू कविता, गझल होशील का

सागरराजे निंबाळकर

Sunday, August 24, 2025

माणसे वाचली

माणसे वाचली
नाटकी वाटली

का लपवतोस तू
वेदना आतली

पूर्ण होईल का
गोष्ट स्वप्नातली

आज पाडू पुन्हा
भिंत दोघांतली 

भोगली वंचना
पावलोपावली

मांडली पाहिजे
खंत आपापली

जाळते पूर्णतः
आग डोळ्यातली

~ सागरराजे निंबाळकर

Monday, July 21, 2025

मोडके घरदार आहे

मोडके घरदार आहे
फाटका संसार आहे

साजरा करतो न कोणी
तोच मी सणवार आहे 

पाहता घायाळ होतो
ती असा शृंगार आहे

चूल झाली वेगळी अन् 
पेटला परिवार आहे

राहतो डोईवरी जो
बाप तो आधार आहे

पावसाळा वाटतो पण..
आसवांची धार आहे

काळजावर तू दिलेला
घाव हिरवागार आहे

~ सागरराजे निंबाळकर 

वाट कुठली चालतो

वाट कुठली चालतो आहोत आपण
का चुकीचे वागतो आहोत आपण

शांतता नांदायची जेथे सुखाने
आज तेथे भांडतो आहोत आपण

लावण्यासाठी दिवा वंशावळीचा
कैक वाती जाळतो आहोत आपण

जो विठू वसतो तुझ्या माझ्यात वेड्या
त्या विठूला शोधतो आहोत आपण?

लाल आहे रक्त सगळ्यांचे तरीही
वेगळे का? वाटतो आहोत आपण

थांबणे एकाठिकाणी शक्य नाही
रोज इतके धावतो आहोत आपण

हात हलवत यायचे अन् जायचेही 
काय मागे ठेवतो आहोत आपण?

~ सागरराजे निंबाळकर

गोठून थेंब गेले

गोठून थेंब गेले डोळ्यांत आसवांचे
झालेत लाड माझ्या हातून यातनांचे

असली जरी कितीही सोज्ज्वळ दिसायला ती
उध्वस्त फार केले जीवन तिने मुलांचे

होतेय वाढ झटपट इतकी कशी कळेना
आहे तरी कितीसे आयुष्य वेदनांचे

छळतो मनास माझ्या हा प्रश्न एवढा की..
जाळून कोण जातो घर रोज सावल्यांचे 

करतो गुन्हा खुल्याने जामीन घेत सुटतो
उरले न भय कुणाला सज्ञान कायद्यांचे

झाला क्षणात नाही खारट उगाच सागर 
केलेत रोज प्राशन अश्रू नद्या-नद्यांचे

~ सागरराजे निंबाळकर 

उत्तरे देशील का

उत्तरे देशील का सगळी खरी
कोणताही आळ मग आला तरी

घेतले असते जगाशी वैर मी
प्रेम जर असते तुझे माझ्यावरी

एकदा का संपली एकादशी
विठ्ठला तू कोण? कुठली पंढरी 

तोडण्यासाठी प्रथांची साखळी
एकदा ओलांड तू ही पायरी

देव सगळ्यांना हवे असतात पण..
जायचे नसते कुणा देवाघरी

~ सागरराजे निंबाळकर 

लाल आहे रक्त

लाल आहे रक्त सगळ्यांचे तरी
का मिटेना जात धर्मांची दरी

थोपवू अश्रू कसे मी आज हे?
लाडकी माझी निघाली सासरी

राधिका झालीस माझी तू प्रिये
पण.. मला होता न आले श्रीहरी

आसवांना वाट थोडी देत जा
एवढी घुसमट अशी नाही बरी

प्रश्न होते खूप सोपे अन् सरळ..
उत्तरे तू टाळली सगळी खरी

मेणबत्त्या नेहमी का जाळतो 
एकदा पेटव मशालींना घरी

~ सागरराजे निंबाळकर

Thursday, July 10, 2025

जडलाय जीव माझा

जडलाय जीव माझा बागेतल्या फुलावर
ग़ज़लेत शेर काही सुचतात रोज ज्यावर

डोळ्यांत डांबलेले होते बरेच अश्रू
सुटकेस पात्र झाले दुःखास भोगल्यावर

कंपूत दाद त्यांच्या मिळणे अशक्य आहे
त्यांच्यातल्या गुरूचा गंडा न बांधल्यावर

शंका चुकूनसुद्धा घेऊ नकोस आता
देऊन हात हाती विश्वास ठेवल्यावर

झाली मुकी नि बहिरी नाती क्षणात सारी 
नाणी खिशातली या जोरात वाजल्यावर

आले भरून डोळे आनंद फार झाला
स्वप्नातल्या घराला प्रत्यक्ष पाहिल्यावर

जाईल "मी"पणाची वरच्या स्वरात बाधा
दिवसागणिक स्वतःचे गुणगान गायल्यावर

~ सागरराजे निंबाळकर

Saturday, June 21, 2025

भाव माझे

भाव माझे तुला सांग कळतील का
अंतरी एकदा फक्त बघशील का?

वेदनेचा असा लागल्यावर लळा 
मोकळे-ढाकळे रोज हसशील का?

मुक्त करतो तुला पाखरासारखा
उंच उडण्यास तू सज्ज होशील का?

चातकासारखी वाट पाहीन मी 
थेंब होऊन तू तृप्त करशील का?

तोल गेला कधी जर नको तेवढा
हात माझा प्रिये घट्ट धरशील का

सारते दूर भय कूस आई तुझी 
तू पुन्हा एकदा जन्म देशील का..

~ सागरराजे निंबाळकर 

Sunday, May 25, 2025

वस्तीत माणसांच्या

शोधू नका मला या वस्तीत माणसांच्या
आलोय दूर अगदी शोधात काळजांच्या 

घेऊन रोज फिरतो झोळीत जो उन्हाळे
राहील का कधी तो छायेत सावल्यांच्या 

मैलोनमैल फिरते चिमणी दशोदिशांना
ठेवावयास दाणे चोचीत पाखरांच्या

आणू नकोस उसणे ओठांवरी हसू तू
दिसतात स्पष्ट धारा डोळ्यांत आसवांच्या

स्वीकार दुःखसुद्धा केले हसून कायम
रडलो न एकदाही आशेत मी सुखांच्या

गेलाय जन्म माझा काट्यांत एवढा की
रमलो कधीच नाही बागेत मी फुलांच्या

~ सागरराजे निंबाळकर