साहित्य काव्यगंध समूह आयोजित चारोळी स्पर्धा
परीक्षकीय भूमिका माझ्या मनोगतातून :-
सर्वप्रथम संपूर्ण समितीचे हार्दिक अभिनंदन की आपण एक चांगली स्पर्धा आयोजित केली. आणि विशेष आभार की त्या स्पर्धेचं परीक्षण आपण माझ्याकडे सोपवून विश्वास दाखवला.
चारोळी म्हणजे नेमकं काय?
चारोळीला आपण चार ओळींची कविता म्हणू शकतो. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगण्याचं कसब आपण चारोळी लेखनाने आत्मसात करू शकतो. चारोळी ह्या प्रकाराला खऱ्या अर्थाने झळाळी दिली ती चंद्रशेखर गोखले ह्यांनी १९९०-१९९१ च्या दरम्यान.
चारोळीत व्याकरण, आशय, शब्दकळा, चपखल यमकसंगती आदी बाबींना अनन्यसाधारण महत्व आहे. चारोळी ही ४ ओळींमध्येच लिहिली जावी असा माझा हट्ट आहे. २ ओळीत असल्यास त्याला आपण शेर किंवा शायरी म्हणू शकतो.
स्पर्धेसाठीचा विषय होता *तुझ्यात जीव गुंतला*. हे शब्द ऐकले की साधारण आपला समज असा होतो की, सखीत जीव गुंतला. काही अंशी हे खरं असलं तरी निरनिराळ्या गोष्टीत, व्यक्तीत आपला जीव गुंतत असतो. उदाहरणं द्यायची झाल्यास श्रीमंतांचा संपत्तीत, आई वडिलांचा आपल्या पाल्यात, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा घरून येणाऱ्या चिठ्ठीत इतरही अनेक...!
त्यामुळे एक परीक्षक म्हणून आणि कवी म्हणून मला नाविण्यात जास्त रस असतो. त्याच त्याच प्रवाहात वाहण्यापेक्षा मी वेगळं काहीतरी केलं हा आनंद मला सुखावून जातो.
स्पर्धेत आलेल्या सर्व रचना वाचल्यावर असं लक्षात आलं जवळजवळ ८०% चारोळ्या ह्या सखी सखा भोवती फिरत होत्या. त्यातही शकुंतला आणि दुष्यंतावर विशेष प्रेम दिसलं. दोन तीन चारोळ्यात राधा कृष्ण दृष्टीस पडले. छत्रपतींमध्ये जीव गुंतल्याची एक चारोळी वाचनात आली. विठुराया आणि देहू आळंदीचंही दर्शन घडलं. सैनिक, मातृभूमी ह्यावरही भाष्य करणाऱ्या चारोळ्या वाचण्यात आल्या. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की *मनाच्या खोल डोहात शिरत असताना काळजाचा ठाव घेऊन अंतरात्मा सुखावल्याची प्रचिती आली.* स्पर्धेचा उद्देश एका बाजूने गेला नाही. ह्याबद्दल सर्वांना मनापासून दाद देतो.
मी माझ्या नेहमीच्या शैलीप्रमाणे प्रत्येक रचनेचं वैयक्तिक परीक्षण दिलेलं आहे. जिथे जिथे आवश्यक वाटलं तिथे बोट ठेवलेलं आहे. जिथे सुधारणा सुचवाव्या वाटल्या तिथे माझ्या परीने बदल सुचवले आहेत. जिथे विशेष सांगण्यासारखं काही नव्हतं तिथे छान अशी दाद दिली आहे. त्यामुळे तौलनिक परीक्षण करताना सगळेच छान विजेत्या यादीत ठेवता आले नाहीत.
स्पर्धेदरम्यान काय काळजी घ्यावी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१) आपण निवेदन वाचलेलं आहे की नाही ही खात्री करून घ्यावी आणि त्यानुसार नियमांचं पालन करावं.
२) रचना पाठविण्यापूर्वी व्याकरण, शब्दकळा, यमक संगती योग्य आहे की नाही हे तपासून घ्यावं.
३) रचना लिहिल्याने स्वानंद मिळतो तो महत्वाचा आहेच शिवाय माझ्या रचनेतून मी इतरांना काय देऊ शकतो हा विचार व्हावा.
४) जर स्पर्धेत क्रमांक यावा ही मनिषा बाळगून असाल तर परीक्षकाला काय भावेल, किंवा परीक्षकाला ओळखत असल्यास त्याला काय भावतं तसेच तो कशा प्रकारच्या रचना लिहितो ह्याचा अभ्यास व्हावा.
कोणाकोणाच्या काय काय चुका झाल्या हे परीक्षणात नोंदवलेलं आहेच. तरीही भविष्यात आपण काळजी घेत दर्जेदार रचना आम्हाला वाचावयास उपलब्ध कराव्या ही अपेक्षा.
विजेत्यांचे अभिनंदन 🤝🏻🤝🏻
सहभागीचे आभार 👍🏻👍🏻
आपलाच :- *सागरराजे निंबाळकर*