Monday, December 30, 2019

साधासुधा जरी मी (आनंदकंद)

------- साधासुधा जरी मी -------

साधासुधा जरी मी आरोप लाख झाले
सारेच पुण्य माझे मग अडचणीत आले

मज दुःख होत नाही पण शल्य मात्र आहे
सारे स्वकीय माझे परके कसे निघाले

आई तुझ्या मिठीने एकांत दूर पळतो
मी भाग्यवान आहे मज सौख्य हे मिळाले

भुर्दंड या सुखांवर निर्व्याज दुःख आहे
आयुष्य खर्च झाले तेव्हा कुठे कळाले

हा खेळ सावल्यांचा खेळू कुठे कुठे मी
मी धावलो जिथेही ढग सोबती पळाले

संसार मोडलेला जोडू कसा किती मी
बैचेन हात माझे अन पाय पण गळाले

बापास काय कळते अंदाज ना मुलांना
पाहून खिन्न त्याला काळीज हे जळाले

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, December 28, 2019

चारोळी

पुन्हा एकदा गदारोळ झाला
त्यातच गेली ती मजला गाळून

वाव नव्हता मैफिलीत म्हणून
पाहत राहिलो फक्त मौन पाळून

😇 सागरराजे निंबाळकर

चारोळी

पुन्हा स्वैर व्हावं लाटांवर
अन पुन्हा हरवावं स्वतःला

तेवढाच काय तो दिलासा
उरलाय माझ्या भाबड्या मनाला

😊 सागरराजे निंबाळकर

Friday, December 27, 2019

न्हाली दवात धरती (अष्टाक्षरी)

-- न्हाली दवात धरती --

दृश्य मनोहारी पहा
न्हाली दवात धरती
गुणगान तिचे नित्य
माझ्या अधरांवरती

फळे, फुले, पानं, वेली
चिंच, डाळिंब, शहाळं
फुललेली वनराई
येथे सदा सर्वकाळ

दऱ्याखोऱ्यातून जातो
मार्ग नव्हे साधा सोपा
निसर्गाची कृपा दावी
मज इवलासा खोपा

खाली धरती सुंदर
वर अथांग आभाळ
लेकरांना पोसताना
होते कधी का आबाळ

शालू हिरवा नेसता
काय वर्णू नवलाई
स्वागताला चाफा अन
सोबतीला जुई, जाई

अशा या धरेचे सदा
आशिर्वच मजवर
माथा झुकतो चरणी
जुळवून दोन्ही कर

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

पुन्हा जगावे नव्याने (षोडशाक्षरी)

➖➖➖ पुन्हा जगावे नव्याने ➖➖➖

येता जाता आठवांचा भरतोय रोज मेळा
घाईमध्ये जे जे झाले आठवावे किती वेळा

पुन्हा कधीतरी जाऊ मन गाजवते सत्ता
मला सांगेल का कोणी आठवांचा योग्य पत्ता

भार तुझ्यावर सारा तरी तुला दुःख नाही
किती करावे कौतुक मज उमगेना काही

घडो सेवा नित्य देवा आठवते बालपण
चुकलेच माझे थोडे शोधताना चार क्षण

दिस आले सोनियाचे धाडा सांगावा साजणा
चिल्या पिल्यांची ही शाळा जसा हालतो पाळणा

माझे विठोबाचे मनी भक्तांसाठी तळमळ
दर्शनाने लाभे मज पूर्व संचिताचे फळ

माझे माझे करताना होते मोकळेच हात
बचावलो थोडक्यात होत असताना घात

झाले गेले विसरावे पुन्हा जगावे नव्याने
साकारले चित्र जसे विहंगाच्या त्या थव्याने

🤗 सागरराजे निंबाळकर

Thursday, December 26, 2019

चारोळी

आजही पाहतो जेव्हा तुला
डोळ्यात येतं टचकन पाणी

कोण म्हणतं आई सांग ना
चलनात नाहीत जुनी नाणी

😊 सागरराजे निंबाळकर

चारोळी

देणे घेणे नित्य होत राहिले
जगण्याचं तेवढं राहून गेलं

वार्धक्याच्या उंबरठ्यावर उमगलं
अरेच्चा हे मी काय केलं

😊 सागरराजे निंबाळकर

Tuesday, December 24, 2019

आपण राजा राणी

-- आपण राजा राणी --

पाहून मला प्रेमात पडावं
इतुका तर मी सुंदर नाही
तरी मला स्थान हृदयात
आश्चर्य वाटलं डोळ्यालाही

कोण होतो, काय होतो
कधी, कसा तुझा झालो
तुझं स्मित चांदण्यापरी
ज्यात चिंब चिंब न्हालो

भेट काही क्षणांची आपुली
आज जगण्याचा ध्यास झाला
गाळू नकोस चुकूनही कधी
तुझ्या डोळ्यातल्या मोत्याला

नाव जरी नसलं नात्याला
आहोत आपण राजा राणी
तू वाहती नदी निर्मळ सये
मी न आटणारं सागराचं पाणी

🤗 सागरराजे निंबाळकर

Monday, December 23, 2019

रुबाई

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक १

गालगा लगालगा लगागाल लगा

सोसल्या कितीतरी झळा मी पण का
काळजी सतावते अता रोज मला

विसरलोय युद्ध भावनांचं मी की
शांतचित्त अंतरात नव्हतीच कला

----- *सागरराजे निंबाळकर* -----

तुझ्या येण्याने (मुक्तछंद)

➖➖ तुझ्या येण्याने ➖➖

तुझ्या येण्याने आयुष्यात आनंद आला.
जसा खिन्न पडलेल्या वहीत एक कवडसा यावा 
आणि त्यासोबत आलेल्या मंद झुळुकेने 
पानांची हालचाल व्हावी.

तसा मी निराश नव्हतोच कधी पण,
आस असतेच ना काही गोष्टींची
तसंच काहीसं वाटायचं तू यावंस !

तुझं येणं म्हणजे..
वसंताचं आगमन
चांदण्यांचं आकाश भ्रमण
बालकाचं निरागस मन
कोकिळेचं मधुर गुंजन

सारं काही अगदी सुखावणारं.
उशीवर डोकं टेकताच गाढ झोप लागावी इतकं सहज.

ऋतू बदलतात त्याप्रमाणेच दिवस पालटले.
माझ्यापेक्षाही कोणा दुसऱ्याची आर्त हाक
परमेश्वराजवळ पोहोचली असावी,
म्हणूनच त्याने प्रसाद म्हणून त्याच्या ओंजळीत तुला स्थान दिलं.

सागर आहे तेवढाच असतो.
फक्त भरती ओहोटीच्या वेळी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं तशीच काहीशी अवस्था असते हल्ली माझी.

कधी सुखाच्या सरींनी किनारे ओलावतात
कधी अश्रूंच्या येण्याने कडा पाणावतात
कधी शंख शिंपले खुणावतात
तर कधी लाटांचं रौद्र रूप पाहून
आपली माणसं दुरावतात.
चाललाय हा अजब खेळ
नियतीच्या मनाप्रमाणे माझ्या मनाविरुद्ध.

आत्ताही तुझं येणं होत असतं कधीकधी पण,
आता तू कवडसा बनून न येता
विरहाची एक दाहक झळ वाटावी तशी वाटतेस.
आता पानांची हालचाल नाही चलबिचलता वाढते.

तुझ्या येण्याने हा शब्द जरी कायम असला तरी
त्यातली भावनेची मात्रा कुठेतरी कमी जास्त होतेय.
म्हणूनच आता मला कसलाही छंद बाळगण्याची इच्छा नाही
त्याचा परिणाम मी मुक्त होतोय.
कायमचा !

तुझ्या येण्याने
तुझ्या येण्याने....!

🤗 सागरराजे निंबाळकर

Sunday, December 22, 2019

चारोळी

अनेकांना लावलं छातीशी पण
भाव आपलेपणाचा जाणवला नाही

आदान प्रदानात व्यत्यय किंवा
मेल्या असाव्यात संवेदना काही

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, December 20, 2019

कृष्ण माझा

➖➖ कृष्ण माझा ➖➖

द्वापारयुगात । जन्म त्याचा झाला
श्याम नंदलाला । यशोदेचा !! १ !!

केले लाख यत्न । घेण्या त्याचे प्राण
आठवे संतान । देवकीचे !! २ !!

गोंडस सावळा । अति सुकुमार
आहेत अपार । लीला त्याच्या !! ३ !!

कैक नावे त्याची । गोपाल, केशव
मुरारी, माधव । वासुदेव !! ४ !!

कर्ण सुमधुर । ऐसा त्याचा पावा
लाभतो विसावा । ऐकताना !! ५ !!

चालविला त्याने । अर्जुनाचा रथ
सन्मार्गाचा पथ । दाखवाया !! ६ !!

महाकाव्य दावी । विष्णू अवतार
दैत्यांचा संहार । करावया !! ७ !!

कृष्णाचे चरित्र । लिहितात व्यास
शब्द शब्द खास । गीता ऐसी !! ८ !!

गोकुळाचा गर्व । अध्यात्माचा पर्व
लीन जेथे सर्व । कृष्ण माझा !! ९ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

हर्षोल्हास (अष्टाक्षरी)

➖➖ हर्षोल्हास ➖➖

येता पहिला पाऊस
बाळंतीण झाली धरा
आनंदाच्या बातमीने
हर्षोल्हास चराचरा

फळे, फुले, पाने, वेली
पहा किती सुखावली
गोड गोजिरा निसर्ग
मज देणगी लाभली

निसर्गाच्या सान्निध्यात
आनंदले सारे जण
हर्षोल्हास भलामोठा
देतो इवलासा कण

हर्ष यावा जीवनात
जशा पावसाच्या सरी
एक एक थेंब वाटे
लाखो आनंद लहरी

कैक मार्गाने जीवनी
लाभे प्रत्येकास हर्ष
खतपाणी देता जसा
नित्य नेमाचा उत्कर्ष

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Wednesday, December 18, 2019

बालपणीचं निरागस प्रेम

🤗 *बालपणीचं निरागस प्रेम* 🤗

_वाऱ्याची झुळूक यावी एखादी_ 
 _तसंच, तुझं येणं असतं हल्ली_ 
 _तरी ना खेद त्याचा कारण_ 
 _वाऱ्याशिवाय का बहरते वृक्षवल्ली_

 _विसरलोच कधी आठवण काढायला_ 
 _तुझं ते हक्कानं दटावणं_ 
 _मनधरणी करायची अन म्हणायचं_ 
 _पुरे आता, बरं नाही सतावणं_ 

 _आठवतंय मला आजही स्पष्ट_ 
 _बालपणीचं ते निरागस प्रेम_ 
 _शुभ्र झरा भावनांचा वाहता_ 
 _आकंठ बुडूनही वाटणं जेमतेम_ 

 _काळाच्या ओघात सुटले हात_ 
 _आकस्मिक आपण दिशाहीन झालो_ 
 _नजरानजर एके दिवशी आपसूक_ 
 _पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात आलो_

 _व्याख्या बदललेली नात्याची आता_ 
 _जवळ असूनही एक अदृश्य अंतर_ 
 _आरोप नसतो करायचा अशावेळी_ 
 _काही कोडी सुटत जातात नंतर_ 

 _दुरावा वाढल्याने प्रेम वाढतं पण_ 
 _यंदा तसं काही झालं नाही_ 
 _दरवेळी स्वच्छंदी कसं राहणार_ 
 _असतात पंखांना ही सीमा काही_ 

 _हरकत नाही, व्हायचं जे झालं_ 
 _राहशील जिथेही आनंदात रहा_ 
 _कधी पाय ओले कर किनाऱ्यावर_ 
 _तर कधी सागरात मनसोक्त नहा_

🤗 *सागरराजे निंबाळकर*

चारोळी

फुटलेल्या कांकणाच्या साथीने
सांग, सये तू जगणार कुठवर

आज चित्र वेगळं असतं, जर
त्यादिवशी थांबली असतीस क्षणभर

😌 सागरराजे निंबाळकर

Monday, December 16, 2019

चारोळी

जसं मेण वितळताना हळूहळू
त्यासवे जळत असतो धागा

नेमकी तशीच काहीशी आई
तुझी, माझ्या हृदयातील जागा

🤗 सागरराजे निंबाळकर

Saturday, December 14, 2019

देणे घेणे (षडाक्षरी)

_-- देणे घेणे --_

 _देणे घेणे व्हावे_
_नित्य नियमाने_
_चांगले वाईट_
_शोधा ज्याचे त्याने_

_कुणा हवे धन_
_तर कुणा शांती_
_चालना दे मना_
_बसून एकांती_

_दृढ होते नाते_
_शुद्ध विचाराने_
_बाधा नको काही_
_दिल्या घेतल्याने_

_जा खोल गाभारी_
_नको फक्त घेणे_
_मातृ, पिता आणि_
_संस्कारांचे लेणे_

_ठेव सदा येथे_
_रिकामी ओंजळ_
_दान देता नको_
_फुकाचा गोंधळ_

_शेवटाला हाती_
_काही नाही राजा_
_का करतो मग_
_उगा गाजावाजा_

@ _सागरराजे निंबाळकर, कल्याण_

चारोळी

आई तुझ्या कुशीत निजल्यावर
कसलीच भीती, राहत नाही

तुझं मातृत्व अमूल्य आहेच, पण
माझंही असावं पूर्वसंचित काही

🤗 सागरराजे निंबाळकर

Friday, December 13, 2019

चारोळी

असं काही खुणावलंस तू
सये, मला चारचौघात

माझा न राहिलो मी
वाहिलो प्रेमाच्या ओघात

🤗 सागरराजे निंबाळकर

Thursday, December 12, 2019

खेळ नियतीचा

-- खेळ नियतीचा --

खेळ नियतीचा कळतो कुणाला
जरी पाहिले, नियम तपासून

कसा उसळतो चेंडू वास्तवाचा
पाहायचं फक्त आ वासून

-------------------

धावलो भौतिक सुखाच्या पाठीमागे
जशी खेळतात अंगणात लंगडी

नंतर उमगलं हा खेळ नव्हे साधा
इथे असते प्रत्येकाला स्पर्धा तगडी

--------------------

जाळीत टाकावा चेंडू ज्याप्रमाणे
त्याप्रमाणे पुण्य माझे मी साठवले

तेव्हा कुठे मिळाला जन्म मानवाचा
विधात्याने पुन्हा मज येथे पाठवले

----------------------

जरा उसंत मिळता संकटातून
दुःखे मला, खो देत राहिली

उरल्या ताकदीनिशी धावताना पुन्हा
वाताहत माझ्या डोळ्यांनी पाहिली

@ सागरराजे निंबाळकर

भौतिक सुखाच्या बेड्या

-- भौतिक सुखाच्या बेड्या --

ना मंदिरातली पूजा फळली
ना मजला रोजे कामी आले
काळ सर्वोत्तम गुरु असतो
त्यापुढे कुणाचे काय चाले

माझं माझं करता करता
हाती असलेलं सारं गमावलं
श्वास तेवढे चालताहेत बरोबर
बाकी उमगेना मी काय कमावलं

सांगत होते पादचारी येता जाता
आतातरी थांबव मुशाफिरी वेड्या
पिंजरा अदृश्य असेल नियतीचा
भौतिक सुखाच्या पडतील बेड्या 

हसण्यावारी नेलं सारं तेव्हा
आज आसवांचा बांध फुटतो
तसा नेम नसतोच सोबतीचा 
चालता चालताही हात सुटतो

एकटं पडल्यासारखं होतं कधीकधी
जरी लाखोंचा गराडा अवतीभवती
नेकीने चालत राहायचं अशावेळी
कर्म देतात नेमकी पोचपावती

शेवटी मातीतच जायचं आहे
फक्त, बोल तेवढे राहतात
काहींना उघड्या डोळ्यांनी दिसतं
तर काही अंतर्मनातून पाहतात

@ सागरराजे निंबाळकर

चारोळी

मनाला आवरता आवरता माझ्या
तोल नको तितका ढळला

वाताहत झाली स्वप्नांची मग
अर्थ वेदनेचा जवळून कळला

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

महत्व जाणलं नाही वेळेचं
म्हणूनच बहुदा ही वेळ आली

फुल समजून स्पर्श केला ज्याला
ती काही काळाने बाभळ झाली

🤗 सागरराजे निंबाळकर

Wednesday, December 11, 2019

माय लेकराची नाळ

-- माय लेकराची नाळ --

भ्रूणहत्या करताना
कंप सुटेना हाताला
काय वाटत असावं
इवल्याशा त्या जीवाला

विधात्याने जोडलेली
माय लेकराची नाळ
येऊ द्यावे जन्मा येथे
एक निरागस बाळ

अडगळ आहे का मी?
येतो विचार मनात
बंध दृढ सलोख्याचे
होते गहाळ क्षणात

आले जर जन्मा कधी
मीच दिवा नि पणती
पारावार ना हर्षाला
नाही सुखांची गणती

सांग खरेच होती ना
आई तूही कधीकाळी
ऐकू येत नाही का गं
माझी आर्त ही किंकाळी

जास्त मागत नाही मी
फक्त एक दान द्यावे
भ्रूण पोटी न मरता
सुखरूप जन्मा यावे

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

अस्तित्वाचा गंधार

------- अस्तित्वाचा गंधार -------

जेव्हा एकटं एकटं वाटायचं अन
नव्हतं कुणी पुसायला डोळे
काय होईल माझं अताशा
यायचे भीतीने पोटात गोळे

चालायचो लख्ख प्रकाशात तरीही
डोळ्यांपुढे असायचा काळाकुट्ट अंधार
जाई, जुई, निशिगंधाच्या गर्दीत
हरवलेला माझ्या अस्तित्वाचा गंधार

सतावणारे प्रश्नावर प्रश्न आणि
उत्तरांची निशब्द राहण्याची भूमिका
चालत राहायचं निरंतर अशावेळी
सोबतीला असतेच पायवाट श्रुतिका

आधाराची पर्वा करावीच कशाला
निराधारांचे पण चालतातच श्वास
दाह सोसला एकदा वास्तवाचा की
होत नाहीत मृगजळासम आभास

आर्यसत्य उमगलं निरोपाच्या क्षणी
एकटा आलेलो नि एकटंच जायचंय
कोणी होवो न होवो आपुलं येथे
आपण मात्र साऱ्यांचे व्हायचंय

🍃🍃 सागरराजे निंबाळकर 🌿🌿

Tuesday, December 10, 2019

चारोळी

चारोळी १ :-

निरोपाच्या क्षणी तुझे डोळे सये
कोण जाणे इतुके का भरले होते

जणू जगलीस चार दिवस फक्त
तरी, आयुष्य त्यातच सरले होते

चारोळी २ :-

शोध घेताना अस्तित्वाचा माझ्या
मी कमावतोय जेमतेम पोटापुरतं

तरी सारे विचारतातच मजला
सांग ना, तुझ्या हाती काय उरतं

चारोळी ३ :-

नजरेत तुझ्या स्थिरता नसते हल्ली
खरंच तुझं, हरवलंय का काही?

पेच एवढ्यासाठीच पडला मजला
जे तुझ्या ओठी तेच डोळ्यात नाही

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

हरवलंय काही कसं म्हणावं
तुझं अस्तित्व चराचरात आई

तूच माझे कौतुकाचे बोल अन
तूच निजवणारी सुखद अंगाई

🤗 सागरराजे निंबाळकर

Sunday, December 8, 2019

घडतोय मी नव्याने (आनंदकंद)

दाबून हुंदक्यांना रडतोय मी नव्याने
हो रे खरेच आता घडतोय मी नव्याने

दरबार आसवांचा हसण्यास वाव नाही
जुलुमी प्रथेस असल्या नडतोय मी नव्याने

लवकर उपाय शोधा जालीम औषधांचा
खोटा हकीम बनुनी जडतोय मी नव्याने

खेचून पाय माझे होईल काय आता
दिवसागणिक शिखर जे चढतोय मी नव्याने

गोटात ऐकले की आलास का पुन्हा तू?
पदरी कुणाकुणाच्या पडतोय मी नव्याने

चटक्या शिवाय मिळते येथे कुणास काही?
युद्धात भाकरीच्या लढतोय मी नव्याने

@ सागरराजे निंबाळकर

Saturday, December 7, 2019

चारोळी

सहजता होती ज्यांच्या वागण्यात
आज अचानक बदलला त्यांचा वावर

घबाड हाती लागलंय कोणतं की
नावे झालीय एखादी मालमत्ता स्थावर

🤗 सागरराजे निंबाळकर

Thursday, December 5, 2019

चारोळी

मला नकोय स्वैराचार हवेतला
मी माझ्या, पायांवर आहे समाधानी

सगळं मिळालं मजला येथे, जेव्हा
मी लिहिली, दुःखांवरही गाणी

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

आपली माणसं सोबत नाहीत
नेमकं, काय केलं तू उजागर?

थेंबांना जमवण्याच्या नादात वेड्या
तुझ्या हातून निसटला सागर

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

दगड ठेवून काळजावर कर मान्य
नको ठेवू ओलीस, निष्पाप नजर

प्रेम असल्याने जाणवतंय अस्तित्व
तसा तो, केव्हाच झालाय गैरहजर

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

माझ्या झोपडीत यायचं असल्यास
सूर्यालाही यावं लागतं वाकून

करून टाक मन मोकळं एकदाचं
आता नको संवाद, हातचं राखून

🌿 सागरराजे निंबाळकर

चारोळी

काय फायदा रोषणाईचा सये, जर
उजेडात राहूनही दिसतोय अंधार

पावलांच्या आवाजाचा हट्ट कशाला
पुरे नाही? माझ्या अस्तित्वाचा गंधार

🤗 सागरराजे निंबाळकर

Wednesday, December 4, 2019

भावतो श्रीरंग (१४ अक्षरी गीत)

----- गोकुळात मज भावतो श्रीरंग -----

साऱ्या गोकुळात मज, भावतो श्रीरंग
रातदिन होते त्याच्या, भक्तीमध्ये दंग !! धृ !!

मीरा भाग्याची की राधा, कळेनाच काही
प्रेम ऐसे दुजे जगी, पाहिलेच नाही
कृष्णा वाजवितो पावा, हरपून भान
गोड कवनांची माला, व्यापते कमान

राधेकृष्ण जप मुखी, वाटतो अभंग !! १ !!

गोपिका विनवी कान्हा, सोड माझी वाट
वाट पाहतोय तेथे, यमुनेचा काठ
हट्ट त्याचा इतुकाच, द्यावे मज लोणी
फुटलेल्या माठाविना, जाते कधी कोणी

सताविण्याचा कान्हाने, बांधलाय चंग !! २ !!

साऱ्या गोकुळाचा आळ, कान्हा आहे द्वाड
खोड्या करून लपतो, यशोदेच्या आड
एकीकडे गाते मीरा, मनसोक्त गाणी
दुजीकडे राधेच्याही, डोळ्यामध्ये पाणी

प्रेमा तुझे पाहिले मी, विविधांगी रंग !! ३ !!

 सागरराजे निंबाळकर 

Sunday, December 1, 2019

चारोळी

आग्रह केला असता, तिने जर
खरंच सुचलं असतं थोडं काही

मी लिहीत राहिलो आनंदात पण
तिच्या ओठांवर, होकारच नाही

🤗 सागरराजे निंबाळकर

हसरी फुलपाखरे (१४ अक्षरी गीत)

--------- शोभा बगीचाची --------
          (१४ अक्षरी गीत)

हसरी फुलपाखरे, शोभा बगीचाची
छाटू नका पंख त्यांचे, विनंती नभाची !! धृ !!

खेळण्याच्या वयी जिथे, पडतात कष्ट
पाळंमुळं संस्कारांची, होती तिथे नष्ट
खताविना राहू नये, फुलं सुकुमार
वेलींनाही मग त्यांचा, वाटतो आधार

घेऊ द्यावी मनाजोगी, झेप विश्वासाची !! १ !!

दुडूदुडू धावताना, लागलेली ठेच
इवलासा जीव कसा, सोडवेल पेच
ध्यानी मनी नसताना, होते बाळ मोठे
कधी लाभ होतो कधी, भलेमोठे तोटे

पोखरते काळजाला, काळजी बाळाची !! २ !!

छकुल्याचे नाव दुजे, बाल कामगार
विटा, दगड नि माती, त्याचे आरमार
लढाया लढाई रोज, येतो रणांगणी
फुल कुठे भाळी त्याच्या, काटेच अंगणी

थांबवावे दुष्टचक्र, गरज काळाची !! ३ !!

बालपण देगा देवा, कसे म्हणू आता
कलियुगात अशा ह्या, तरते का गाथा?
वाट खाच खळग्यांची, करू मखमली
संजीवन देता फुलं, नव्याने जन्मली

मनसोक्त लाभो तया, साथ संवादाची !! ४ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
संपर्क :- 8879897797 / 9324749792

Friday, November 29, 2019

दोष कसा देऊ माझ्या संचिताला (१४ अक्षरी गीत)

---- दोष कसा देऊ माझ्या संचिताला ----

दोष कसा देऊ मीच, माझ्या संचिताला
कसं पाठवू माघारी, माझ्या साजणाला !! धृ !!

भेट होते कधीतरी, मिळतो एकांत
हितगुज चाले मग, किनारी निवांत
आणाभाका शपथा नि, हाती देत हात
हरवून भान सारे, पाहू नयनात

लवते अताशा कुठे, पापणी डोळ्याला !! १ !!

संसाराच्या महालात, झालो राजा राणी
एक मुखाने गायली, आयुष्याची गाणी
जन्म गोजिऱ्या कृष्णाचा, झाला गोकुळात
मावेनाच आज माझा, हर्ष गगनात

पोटा पाण्याने धाडले, दूरच्या देशाला !! २ !!

बाळ बोबड्या बोलाचे, रांगाया लागले
पत्राद्वारे दिले तुम्ही, संस्कार चांगले
तुम्हाविन राया माझी, अंधारी दिवाळी
येत जावा अध्येमध्ये, तुम्ही कधीकाळी

दाबू कुठवर सांगा, मीही हुंदक्याला !! ३ !!

दिसा मागे दिस गेले, निरोप न आला
वेळ साधून काळाने, घातलेला घाला
साहवेना मज आता, कांकणाचा भार
असा कोणता मजला, जडला विकार

फुलांनीच केला वार, माझ्या काळजाला !! ४ !!

🌿🍃 सागरराजे निंबाळकर 🍃🌿

Thursday, November 28, 2019

चारोळी

जमतात काही गोष्टी सरावाने
प्रयत्न आपण सोडायचे नाहीत

कठीणच असतं मिळवणं हवं ते
मात्र, रस्ता ज्याचा त्याला माहीत

@ सागरराजे निंबाळकर

संविधान वाचताना (१४ अक्षरी गीत)

-------    संविधान वाचताना    -------
            (१४ अक्षरी गीत)

संविधान वाचताना, फुलते ही छाती
काय जादू होती अशी, बाबांच्या त्या हाती !! धृ !!

होवो सुखी बहुजन, हाच एक ध्यास
बॅरिस्टर होण्या केला, अफाट अभ्यास
दोन वेळच्या खाण्याची, होती जेथे भ्रांत
संविधानामुळे तेथे, सुखावला प्रांत

जादूगार लेखणीने, जोडलेली नाती !! १ !!

साधंसुधं काम नव्हे, होती दिव्यदृष्टी
पंचशील, करुणेची, धम्ममय सृष्टी
हळूवार सांभाळत, साऱ्यांच्या भावना
दिन सोनियाचा केला, साहून यातना

आनंदाने उजळल्या, दिस आणि राती !! २ !!

समता, बंधुता आणि, एकतेचा नारा
देत नाही संविधान, अन्यायाला थारा
लोकराज्याची आमुच्या, आहे न्यारी शान
राष्ट्रास सांधणारी ही, घटना महान

गुण्यागोविंदाने नांदो, विविधांगी जाती !! ३ !!

बंदी उठवून केली, सोय संचाराची
अभिव्यक्ती, मतदान, संधी भाषणाची
अन्न, वस्त्रासवे दिला, हक्क शिक्षणाचा
मनोभावे ठेवू सारे, मान कायद्याचा

सुखावला बळीराजा, सुखावली माती !! ४ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
        संपर्क :- ८८७९८९७७९७

चारोळी

कोण लागतो मी तुझा?
हा प्रश्न जेव्हा तू केलास मला

तेव्हाच ओळखलं कौशल्य उसणं
ही तुझी स्वतःची नाहीच कला

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

सुरुवात तुझ्यापासून अन
शेवटही तुझ्याजवळ माझा

तू राणी ह्या काळजाची
मी तुझ्या आयुष्याचा राजा

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

मोकळ्या मनाने संसार करूया
नकोच ही वचनाची बाधा

मी कृष्ण मुरारी तुझा अन
सये तू, माझी प्रेमळ राधा

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

विश्वास ठेव प्रेमावर माझ्या
मी तुझाच आहे माझे राणी

शपथ घेतलीस ना माझ्यासवे
मग का अशी बदलते वाणी

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

व्याकुळलेल्या मनावर तुझ्या
नको कधीच विरहाचा घाला

तू आल्याची खात्री झाली
जेव्हा पैंजणांचा आवाज आला

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

एकदा आगमन केलं मैफिलीत
तरी किती ही, वाहवाही झाली

आत्ता कुठे रंगेल खेळ प्रेमाचा
सये तू इतुक्यात कुठे निघाली

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

बळी पडण्याची भाषा प्रेमात
सये, बिलकुल शोभत नाही

मी घेतला तोच अर्थ ना? की
तुझं दुसरंच आहे, प्रयोजन काही

🥰 सागरराजे निंबाळकर

चारोळी

तू होतीस म्हणून आलो इथवर
तुझ्याशिवाय काहीच शक्य नाही

मी जगतोय छत्रछायेखाली तुझ्या
लाभो उदंड आयुष्य, आई तुलाही

🤗 सागरराजे निंबाळकर

चारोळी

डोकावून पाहता हृदयी तुझ्या
मज दिसला, आसवांचा पूर

काय कारण सांग नेमकं
नको काळजाला माझ्या हुरहूर

🤗 सागरराजे निंबाळकर

Wednesday, November 27, 2019

निरांजनातील वाती (१४ अक्षरी गीत)

-------   निरांजनातील वाती   -------

निरांजनातील वाती, नित्य जळतात
वेदना तयांच्या सांगा, कुणा कळतात !! धृ !!

जरी दिसत असला, इवलासा धागा
आहे अस्तित्व त्याचेही, द्यावी त्याला जागा
नको तेवढे साहतो, चटके जिव्हारी
तरी लख्ख उजळतो, प्रत्येकाच्या द्वारी

वाटा अंधाऱ्या अताशा, दूर पळतात !! १ !!

जोडी पणती दिव्याची, किती गोड वाटे
सुख फुलासम जरी, तुडविले काटे
साथ तेलाची लाभता, ओल्या होती वाती
वारा बिलगतो जसा, बसता एकांती

फुलवाती मनाजोग्या, छान वळतात !! २ !!

निजतात खुशालीने, मालवून वात
दृश्य पाहून साठते, दुःख काळजात
प्रकाश देऊनी साऱ्या, अंधारच भाळी
येऊ नये कधी अशी, कुणावर पाळी

रात्री जळणे दिवसा, अश्रू ढळतात !! ३ !!

🌿🍃 सागरराजे निंबाळकर

Tuesday, November 26, 2019

चारोळी

पुन्हा येणं होणार नाही म्हणत
नकळत, दारात पाय अडखळलेला

ओठांवर हसू उसणं आणलेलं मात्र
प्रत्यक्षात चेहरा नको तितका पडलेला

🌹 सागरराजे निंबाळकर

मज कळलेच नाही

-- मज कळलेच नाही --

सुटणार कधी कसे
माझ्या आयुष्याचे कोडे
पुरे पुरे म्हणताना
गेले राहूनिया थोडे

पाप पुण्य तोलताना
हाती न्यायाचा तराजू
साक्षीदार मी माफीचा
कशी मांडू माझी बाजू

आशा आकांक्षांचं ओझं
जड झालंय मलाही
लवलेश हसण्याचा
माझ्या ओठांवर नाही

टाळतात सुखं जेव्हा
होते जखम उरात
डबडबलेले डोळे
तरी मी गातो सुरात

ओठ शिवलेले अन
डोळे घट्ट मिटलेले
व्याज भरत राहिलो
जरी कर्ज फिटलेले

मोजतोय घटका मी
आता शेवटच्या काही
कसे जगावे जीवन
मज कळलेच नाही

@ सागरराजे निंबाळकर

Monday, November 25, 2019

चारोळी

वाटलं लाजल्याने पाहत नसावी
प्रत्यक्षात मात्र, मला टाळत होती

माझं अस्तित्व जास्तीचं आहे सांगून
माझ्या नकळत, मला गाळत होती

🌹 सागरराजे निंबाळकर

चारोळी

प्रयत्न करतो विसरण्याचा मात्र
राहून राहून आठवतो भूतकाळ

वाट पाहण्यात तुझी अताशा
सरतेय माझी सांजसकाळ

🍃 सागरराजे निंबाळकर

Sunday, November 24, 2019

चारोळी

जखम होते काळजाला जेव्हा अन
डोळ्यातून आसवांचा, बांध फुटतो

तेव्हाच स्फुरतं वाक्य दर्दी एखादं
माझ्यासारखा लिहिण्याची मजा लुटतो

🍃 सागरराजे निंबाळकर

Saturday, November 23, 2019

सागराचा वाटा (षोडशाक्षरी)

---------      सागराचा वाटा      ---------

येता जाता हट्ट तिचा, आणा बाजूबंद राया
क्षण आनंदाचा ऐसा, कसा जाऊ देऊ वाया

नथ नाकात शोभते, पायी चांदीचे जोडवे
नितदिन गातो आता, माझ्या सयेचे गोडवे

कसा वर्णावा कळेना, थाट न्यारा डोरल्याचा
लाजताना होतो भास, नजरेने ओढल्याचा

घेता कुशीत प्रियेला, आड येते एक बट
करंगळी होते सज्ज, उधळाया तिचा कट

गुज साधता डोळ्यांनी, ओठ करती इशारा
मधुचंद्र साधावया, देती चांदण्या पहारा

ओठ ओठात गुंतता, सखी होते लालबुंद
विसरून सारे भान, होतो दोघेही बेधुंद

शंख, शिंपले जन्माया, आहे सागराचा वाटा
कुणा कळते किनारी, कशा आदळती लाटा

🍃🍃 सागरराजे निंबाळकर 🍃🍃

चारोळी

राहतील सीमेत आखलेल्या
बळ इतुकेच, पंखांना द्यावे

सारेच फितूर येथे, राजे
आता नाव कुणाकुणाचे घ्यावे

🍃 सागरराजे निंबाळकर

Friday, November 22, 2019

चारोळी

मुळावर घाव घालून विचारते
वेलींचं आता, काय करायचं?

शांत राहणं पसंत करतो अशावेळी
काही बोलून, वेगळं का ठरायचं

😊 सागरराजे निंबाळकर

चारोळी

कोणाचा आहे सागर नेमका?
आपापसात भांडत राहिल्या लाटा

शंख, शिंपले गिणतीत नव्हतेच
लक्षातही न आला पाण्याचा वाटा

🍃 सागरराजे निंबाळकर

Wednesday, November 20, 2019

महिलांचे योगदान (१४ अक्षरी गीत)

--------- महिलांचे योगदान ---------

महिलांचे योगदान, समाजाला तारी
तीच चारिधाम तीच, पंढरीची वारी !! धृ !!

जिजाऊने घडविला, स्वराज्याचा छावा
मीरा गाताना वाजतो, गोकुळात पावा
बहिणाई गाते नित्य, जात्यावर गाणी
भल्या भल्यांना पाजते, लक्ष्मीबाई पाणी

कधी साधीभोळी कधी, अष्टभुजा धारी !! १ !!

लतादीदी आहे माझी, सुरिली कोकिळा
नर्मदेच्या आड येता, मेधा घाली खिळा
झाली प्रतिभा संपन्न, राष्ट्रपती येथे
इंदिराही सांगे मग, आम्हीच विजेते

खांद्याला खांदा लावूनी, चालतेय नारी !! २ !!

कल्पना गेली आकाशी, उंच झेप घ्याया
अनाथांची माय सिंधू, काय वर्णू माया
आया, बायांनो, लेकींनो, सावित्रीस स्मरा
रमाईच्या आठवांनी, जोडू दोन्ही करा

झेंडा उंच रोवताना, फुंकली तुतारी !! ३ !!

माधुरीचा अभिनय, लाखाची पर्वणी
सुरेखा पुण्याची जणू, शुक्राची चांदणी
आनंदीच्या पावलांचा, वैद्यकीय ठसा
चालवू असाच पुढे, कर्तृत्वाचा वसा

संस्कृतीचं लेणं शोभे, वस्त्र जरतारी !! ४ !!

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Tuesday, November 19, 2019

चिंता नकोच गझले (आनंदकंद)

--------- गझलेस माझ्या ---------

गझलेस येथ माझ्या जे जे हवे मिळाले
जेव्हा रसिक स्वराने हे मंत्रमुग्ध झाले

शेरात काफिया अन खासा रदीफ घेता
सजली लगावली ही सौंदर्य छान आले

सांभाळ शब्द कारण देतात घाव न्यारे
असतात जे फुलासम होतात तेच भाले

समजून घेतला मी ज्यांचा सदा इशारा
मत स्पष्ट मांडता मी अनभिज्ञ ते निघाले

चिंता नकोच गझले मिळणार काय ह्याची
सारे तुझेच आहे करतो तुझ्या हवाले

🍃 सागरराजे निंबाळकर

Sunday, November 17, 2019

गझले तुझ्या नशेने (आनंदकंद)

--------- गझले तुझ्या नशेने ---------

झाले असेल माझ्या हातून पाप काही
का याचना क्षमेची मंजूर होत नाही

संसार एकट्याने झाला कधी कुणाचा
जर मी असेन राजा राणी म्हणा तिलाही

आयुष्य पास होण्या लाखो दिल्या परीक्षा
नापास होत गेलो वार्षिक कधी तिमाही

सोडून हात माझा गेलीस का अशी तू
केली कधीच नाही पर्वा प्रिये जराही

शेतात थेंब माझ्या येतो कधीतरी, पण
डोळ्यात आसवांचा हा पूर बारमाही

वृत्तात गझल रचण्या दमछाक फार होते
भलतेच कसब लागे वाटे तशी सजाही

गझले तुझ्या नशेने बेधुंद जाहलो मी
पर्वा मला न त्याची बदनाम मी तसाही

🍃 सागरराजे निंबाळकर

चारोळी

वास्तवाचे निखारे हाती घेऊन, जे
काट्याकुट्यातून वाट सर करतात

त्यांनाच सलाम करते दुनिया अन
आदर्श त्यांचे सहज नजरेत भरतात

🍃 सागरराजे निंबाळकर

Saturday, November 16, 2019

चारोळी

टाळलं तिने बरेचदा मला, मात्र
नाव माझं विसरू शकली नाही

ओठांना दटावून शांत केलं तिने
पण, मन ऐकतं का कधी काही

🥰 सागरराजे निंबाळकर

Friday, November 15, 2019

चारोळी

कितीदा टाळायचं नजरेला तुझ्या
कितीदा मी रस्ता वेगळा धरायचा

त्यागाला प्रेम म्हणालेलीस तू अन
आता आरोप, तू असं का करायचा?

🍃 सागरराजे निंबाळकर

चारोळी

दाह होईल काळजाला नकळत अन
ओलावतील जेव्हा पापण्यांच्या कडा

कळेल मग काय नातं होतं आपुलं
लागेल तेव्हा माझ्या अस्तित्वाचा छडा

🍃 सागरराजे निंबाळकर

Thursday, November 14, 2019

लाखात एक माझी गोड परी (१४ अक्षरी गीत)

----- लाखात एक माझी गोड परी -----

दिसते लाखात एक, माझी गोड परी
गातो कवने मी जिची, अशी छंदाक्षरी !! धृ !!

नाव लाडक्या परीचे, ठेवले प्रचिती
लक्ष्मी सोन पावलांची, भाग्योदय किती
बोबड्या ह्या बोलातून, शब्द आई बाबा
क्षणार्धात घेतलेला, काळजाचा ताबा

माझ्या आनंदाची तीच, खरी मानकरी !! १ !!

सांग कधी बांधायचा, पत्त्यांचा बंगला
खेळ लपाछपीचा हा, कितीदा रंगला
घरी येताना आणता, लेमनची गोळी
घट्ट बिलगली मला, राणी साधीभोळी

कधी रागावते कधी, बळेच मस्करी !! २ !!

वेळ देत नाही मज, हीच तिची खंत
ऐक लाडे प्रपंचाला, नाही कधी अंत
देत जाईन यापुढे, वेळ हवा तसा
या धावून पटकन, मांडीवर बसा

रुसवा फुगवा बाळा, सोड आतातरी !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Wednesday, November 13, 2019

चारोळी

एरव्ही अंतर राखूनच, बोलणारी ती
आज चक्क, मला बिलगून रडत होती

तरीही मिठी न मारू शकलो, कारण...
घटना ही, निरोपाच्या क्षणी घडत होती

🍃 सागरराजे निंबाळकर 🍃

Tuesday, November 12, 2019

अवकाळी पाऊस (मुक्तछंद)

➖➖ अवकाळी पाऊस ➖➖

माहीत होत्या काही गोष्टी तरीही,
पर्वा न करता पुढे जात राहिलो.
ढग दाटलेले असताना छत्री न घेण्याचा हट्ट जसा...

ध्येय समोर दिसत होतं पण,
पूर्ण तयारीनिशी आलेलो नसल्याने माघार घ्यावी लागली.
श्वास चालू असतो पण घटका शेवटची असते तसंच काहीसं !

कधी खचून जायचो तर कधी वाटायचं,
पुन्हा एकदा प्रयत्न करून पहावा.
अवकाळी असला म्हणून काय झालं,
पाऊस तर आला !

सगळंच जर मनाजोगं झालं असतं तर,
काही मागायची आवश्यकताच नसती.
म्हणूनच विसरलो काही गोष्टी.
जन्म दिल्यावरही आई आणि बाळ मोठं झाल्यावरही आई, आईच असते तसं !

पुन्हा एकदा चालू लागतो त्या वाटेवर,
कोणी ओळखीचं भेटेल म्हणून, पण....
पाऊस असला तरी अवकाळी असतो तो.
नेहमी थोडेच येतो !

😊 सागरराजे निंबाळकर