Friday, February 28, 2020

नक्कीच चुकलंय काही

-- नक्कीच चुकलंय काही --

ती दिसते येता जाता
पण, बोलत मात्र नाही
दोघांपैकी कुण्या एकाचं
नक्कीच चुकलंय काही

दोन शब्द बोलावेत फक्त
रागे भरले, तरी चालेल
प्रखर असला सूर्य जरी
सायंकाळी आपसूक मावळेल

गर्दीत एकटं पडायला होतं
एकांतात भरतो आठवांचा मेळा
योगायोग म्हणता येणार नाही
असं घडलंय अनेकवेळा

दोन पाऊलं मी पुढे आलो
ती इंचभर ही पुढे आली नाही
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या
दिलजमाई मात्र झाली नाही

मर्यादा होती वाकण्यालाही
म्हणूनच थांबलो एका हद्दीनंतर
फूटभर दुराव्याने निर्माण केलं
मैलोनमैल न सरणारं अंतर

😇 सागरराजे निंबाळकर

Monday, February 24, 2020

वेदना खुणावतेच (वृत्तबद्ध गीत)

अक्षरगणवृत्त - कलापति
अक्षरे – १३  (यति ८,५)
गण – र ज र ज ग
मात्रा – २०
लगावली - गालगाल गालगाल गालगाल गा

------- वेदना खुणावतेच -------

मोद आज काळजास वाटला जरी
वेदना खुणावतेच रोज अंतरी !! धृ !!

साम दाम दंड भेद क्रोध माळतो
का उगाच दुःख रोज तू उगाळतो
हेत आपुला जरी न साध्य जाहला
सांग फक्त या सुखात कोण नाहला

संतसंग आचरून धाव सत्वरी !! १ !!

रोजच्या विवंचनेत दाह भेटला
चालतोय मीच येथ मार्ग एकला
ठेच लागली तरी न वाट सोडली
वेदनेत गीत गात नाळ जोडली

रीत हीच जीवनात पाळतो खरी !! २ !!

चांगले जगी दिसेल योग्य पाहता
भक्तिभाव काळजात नित्य वाहता
खंत बाळगू नकोच मार्ग एवढे
मोगरा जुई गुलाब गंध केवढे

एक एक दीपमाळ लाव तू घरी !! ३ !!

@ सागरराजे निंबाळकर

Friday, February 14, 2020

चारोळी

नेहमीच समजावलं मी मनाला
कैकदा त्याने, माझं ऐकलंही

सांगितलं जेव्हा, करायचंय राजा
हृदयात एखाद्याच्या, घर आपलंही

🤗 सागरराजे निंबाळकर

Monday, February 3, 2020

आठोळी सखा

पैशाने श्रीमंत नव्हता तो, मात्र
जमेल ते माझ्या नावे करायचा
अश्रूंनाही मोल होतं माझ्या, जेव्हा
थेंब नि थेंब तो ओंजळीत धरायचा

प्रत्येकाच्या भाळी नसतं हे सुख
सखा असा मिळायला भाग्य लागतं
मांडीवर डोकं ठेवून शांत निजला
देह पण, नावे करून गेला वाटतं

😊 सागरराजे निंबाळकर

Saturday, February 1, 2020

व्याख्या आयुष्याची

-- व्याख्या आयुष्याची --

संसाराची वेल
मातृत्वाची फुलं
हर्षाच्या सरींना
नभांगण खुलं

साजिरं गोजिरं
रुपडं बाळाचं
अप्रूप साऱ्यांना
सोनेरी काळाचं

जाता पुढे पुढे
घेरती समस्या
कामी येते मग
सत्कर्म तपस्या

कोण मित्र आणि
कोण शत्रू येथे
ओळखाया पेच
वेळ संधी देते

टाळूनिया लोभ
योग्य तेच घ्यावे
यथायोग्य मार्गे
ज्याचे त्याला द्यावे

अशीच असते
व्याख्या आयुष्याची
कधी जय कधी
चिंता निकालाची

@ *सागरराजे निंबाळकर*