Sunday, July 31, 2022

डोळ्यात तुझ्या

रुदकी रुबाईवृत्त क्रमांक ११

गागाल लगागाल लगागागा गा

डोळ्यात तुझ्या वादळ जेव्हा येते
मैदान पुरे तू उधळूनी देते

दैत्यात तुझी दहशत आहे भारी
प्रत्येक क्षणी रूप नव्याने घेते

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, July 28, 2022

निजता आले नाही

~~ निजता आले नाही..

हवे तसे मला जगता आले नाही
खुलायचे तसे खुलता आले नाही

मनात एक अन् दुसरे काही ओठी
चुकूनही असे करता आले नाही

सदैव तृप्तता असते अंगी माझ्या
बळे बळे मला भरता आले नाही

दशोदिशात मी सारे जिंकत गेलो
क्षणास धावत्या धरता आले नाही

सुरेख गायची आई तू अंगाई..
पुन्हा कधी तसे निजता आले नाही

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Wednesday, July 27, 2022

जन्म बाईचा

🌿 जन्म बाईचा..

जन्म बाईचा कठीण
व्यथा कुणाला कळते?
नव्या पालवीकरिता
पान होऊन गळते

तिची सेवा रात्रंदिन
तिला निवृत्ती नसते
अश्रू लपवाया आत
वर बळेच हसते

नऊ मास उदरात
तिने सोसल्यात कळा
होता, आहे, राहणार
तिचा नेहमीच लळा

स्वामी त्रैलोक्याचा होतो
तिच्या चरणात लीन
आशीर्वाद देताना ती
माया करते स्वाधीन

↪️ सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, July 26, 2022

समाजसेविका

बाईसाहेब, बाहेर एक दांपत्य आणि त्यांचा मुलगा उभा आहे. शैक्षणिक मदतीसाठी आलेत. 

पांडू, अरे मला एवढीच कामं आहेत का? त्यांना सांग मॅडम घरी नाहीत.

तिघेही घरी जात असताना मुलाने विचारलं, "पप्पा समाजसेविका म्हणजे काय हो?"

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Sunday, July 24, 2022

शोधतोय अजून

~~ शोधतोय अजून..

"बरं शामराव, तुमचा मुलगा नोकरीला कुठे आहे?, पगार किती आहे?" 

मुलीला आलेल्या स्थळाबाबत मोहनराव चौकशी करत होते.

तेवढ्यात राहुल बाहेरून आला. "हा आमचा मोठा मुलगा, मागच्या वर्षी याचं लग्न झालंय, मुलगी झाली आत्ताच." मोहनराव म्हणाले.

"कुठे आहे नोकरीला?" शामरावांनी प्रतिप्रश्न केला.

मोहनराव म्हणाले, "शोधतोय.. पण अजून काही मिळेना".

😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, July 21, 2022

कशाला

~~ कशाला..

सोसले जे दुःख मी लपवू कशाला
मी स्वतःला आणखी दुखवू कशाला

गाव छोटे पण तरीही शांत आहे
त्यात शहरे मी उगा वसवू कशाला

जीव जातो व्याज भरताना सुखाचे
वाढणारे कर्ज मी थकवू कशाला

एकटे मज वाटते गर्दीतही मग..
मैफली या रोज मी भरवू कशाला

सोडली तू साथ माझी ऐनवेळी
जायचे तर जा तुला अडवू कशाला

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Tuesday, July 19, 2022

जात नाही

~~ जात नाही..

काय चुकते रोज माझे ज्ञात नाही
लोटतो दुःखास पण ते जात नाही

"रोज रचते" डाव नियती आणि म्हणते
आज माझा यात काही हात नाही

कर्ज आहे वेदनांचे त्यामुळे तर..
हासतो मी फक्त वरवर आत नाही

कंठ माझा दाटल्यावर सूर जातो
होय, मी पूर्वीप्रमाणे गात नाही

लाल आहे रक्त माझे अन् तुझेही..
वेगळी मग कोणतीही जात नाही

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, July 14, 2022

मला कळेना

~~ मला कळेना..

ओले करू कितीदा डोळे मला कळेना
केले प्रयत्न लाखो हसणे तरी जमेना

नाते तुझे नि माझे आहे किती अभागी
पावित्र्य त्यातले का कोणासही दिसेना

घेऊ तरी कशी मी शंका अता कुणावर
विश्वास ठेवल्याचे ऋण आजही फिटेना

अडवू नकोस आता घालून गळ मला तू
आधीच पाय माझा काढूनही निघेना

येतो समीप जितके तितकेच दूर जातो
नियतीच खेळ करते कळते तरी वळेना

🌿 सागरराजे निंबाळकर

योग

प्रत्येक हसरा कवी
आतून रडत असतो

योग शब्द जुळण्याचा
सहज घडत नसतो

🌿 सागरराजे निंबाळकर

Saturday, July 9, 2022

आर्जव

~~ आर्जव.. ~~

हळव्या स्वरात, देखील तिच्या
आर्जव होते भरले
मैफल सारी, रंगवण्याला
कारण पुष्कळ ठरले

गळती पाने, पिकलेली अन् 
पुन्हा पालवी येते
खेळून तशी, आवाजाशी
मुरख्या हल्ली घेते

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, July 8, 2022

जीवन म्हणजे

पहिली ओळ
पादाकुलक - १६ मात्रा [८+८]

दुसरी ओळ 
शुद्धसती - १२ मात्रा [८+४]

~~ जीवन म्हणजे.. ~~

जीवन म्हणजे, अत्तर आहे
पटकन उडून जाते
पैसा-अडका, नश्वर असतो
उरते केवळ नाते

सोबत असता, आधाराची
किमया करते माया
होता आले, जरूर व्हावे
एखाद्याची छाया

भूकेल्याला, द्यावी भाकर
तहानलेल्या पाणी
दुखावण्याचा, शून्य फायदा
मधुर असावी वाणी

मदत करावी, शक्य तेवढी
नको अपेक्षा काही
पेराल जसे, तसे उगवते
यावर शंका नाही

डोळ्यादेखत, विरते सगळे
राख शेवटी हाती
कुणास कळते, जाणारे मग
कुण्या दिशेला जाती

ध्यास धरावा, सत्कर्माचा
कुविचारांचे क्षालन
गेल्यावरही, नाव रहावे
असे जगावे जीवन

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
            मो - ८८ ७९८९ ७७९७

Saturday, July 2, 2022

कर्म

~~~ कर्म ~~~

प्रपंच आहे, किती निराळा
कधीच कळले नाही
येत राहिल्या, मनात शंका
उगाच काहीबाही

कर्म आपले, करत रहावे
चिंता सारी वगळत
मिळायचे ते, पडते पदरी
कधी ना कधी नकळत

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, July 1, 2022

विचार बदलू

~~ विचार बदलू ~~

छोट्या-छोट्या, प्रश्नांनीही
होतो जेव्हा गोंधळ
तोल मनाचा, सावरताना
मिटून घ्यावी ओंजळ

क्षमा, याचना, शिक्षा, सुटका
मोठा प्रवास सारा
शांत, संयमी वृत्ती ठेवत
चढू न द्यावा पारा

पुनरावृत्ती, टाळत आता
विचार बदलू थोडे
कठीण असले, जरी कितीही
क्षणात सुटते कोडे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण