Monday, April 29, 2019

वृत्तबद्ध चारोळ्या

---- चारोळी क्रमांक १ ---

वंशमणि २० मात्रा [८+८+४]

अक्षररूपी बीज पेरता येथे
शब्दकळ्यांची बाग जोमात फुलते

धुंद पाखरू होऊन तीच कविता
काव्यस्पंदनी हिंदोळ्यांवर झुलते

--- चारोळी क्रमांक २ ---

वरदहस्त लाभता माँ शारदेचा
काव्यस्पंदन देतं जगण्याला स्फूर्ती

चांदणं पडतं शब्दांचं चोहीकडे
समृद्ध साहित्याने होते स्वप्नपूर्ती

--- *सागरराजे निंबाळकर* ---
      उल्हासनगर, ठाणे

Sunday, April 28, 2019

चारोळी

_देणे घेणे जमले नाही मज_
     _शेवटी पत्करले, जे वाट्याला आले_

_केवळ मधूशाळा देते दिलासा_
     _म्हणते विसर मित्रा, जे झाले ते झाले_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Saturday, April 27, 2019

चारोळी

_बऱ्याचदा बोलायचं असतं तुझ्याशी_
     _मात्र, शब्द ओठातच अडखळतात_

_जशी वाळू निसटावी हातून अलगद_
     _अन ठसे तयांचे पाण्यात विरघळतात_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

वृत्तबद्ध अष्टाक्षरी (जीवन संगीत)

वृत्त :- पादाकुलक १६ मात्रा [८+८]

-- *आयुष्याच्या संगीताने* --

आयुष्याच्या संगीताने
गातो माझे न्यारे गाणे
सत्कर्माच्या आनंदाने
सोपे होते येणे जाणे

एका हाती घ्यावे द्यावे
ज्याचे त्याचे ज्याला त्याला
जोडू आता नात्यांची ही
साधी सोपी मोठी माला

अंधाराला त्यागूनीया
लावू दारी लाखो वाती
थारा नाही दुःखा येथे
आनंदाने सारे गाती

व्यासंगाच्या वाटांनाही
सांभाळावे लाडेगोडे
संगीताची व्याप्ती मोठी
तालाचेही वाटे कोडे

माझे माझे केले ज्याने
झाला त्याच्या जीवा त्रागा
साध्या मार्गे व्यापावी ही
प्रारब्धाची सारी जागा

सूरांनाही लागो गोडी
वाजू द्यावा सारेगामा
याची देही याची डोळा
पाहू आता चारी धामा

--- *सागरराजे निंबाळकर* ---

Friday, April 26, 2019

शतशब्द कथा (पैंजण)

शतशब्द कथा

                             ----- पैंजण -----

     तिच्या पैंजणांचा आवाज आला की, त्याला तिची चाहूल लागायची. कारण, त्याने ते अगदी प्रेमाने भेट म्हणून तिला दिल्याने तो नेहमीचा आवाज त्याच्या कानात वेगळ्याच ध्वनीलहरी निर्माण करायचा. तसं त्यांचं प्रेम घट्ट असल्याने ध्वनीलहरींचं गुपित त्याने एकदा तिला सांगितलं होतं. कधीकधी ती मुद्दाम दबक्या पावलाने यायचा प्रयत्न करायची पण हा बरोबर हेरायचा.

     काही कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. परंतु तीच पैंजणं अद्यापही तिच्या पावलात असल्याने ती जेव्हा जेव्हा माहेरी यायची ह्याच्या मनाला दिलासा मिळायचा.

नंतर ती अनेकदा माहेरी आली नी गेली पण, ह्याला मात्र काहीच कळालं नाही.
हा चातकासारखी वाट पाहत राहिला.

शेवटी माहित पडलं तिने तिचे पैंजण बदलले आहेत !

@ *सागरराजे निंबाळकर*

शतशब्द कथा (पराधीन)

शतशब्द कथा

                   --- पराधीन ---

     संध्याकाळी कामावरून आल्यावर चहा घेत बातम्या ऐकणे हा त्याच्या आवडीचा कार्यक्रम. निळ्याशार छान पाण्यात स्नान करत साबणाची जाहिरात करणारी सुंदरी गेली. पुढचे चित्र व बातमी पाहून तो अंतर्मुख झाला. पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन चार - पाच किलोमीटर चालत जाणाऱ्या माता, भगिनी, मुलींचे ते चित्रण होते. ही विषमता त्याच्या मनाला डंख करून गेली.

     खरंच नेमकी प्रगती कुठे व किती झाली आहे? आपण नेमके काय केल्याने परिस्थिती बदलेल? अनेक प्रश्न त्याच्या मनाभोवती फेर धरून नाचू लागले. अस्वस्थ होऊन त्याने टीव्ही बंद केला.
का हो?
बरं वाटत नाही का?
तो मूक राहिला.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !
हेच ते आर्य सत्य का?

----- *सागरराजे निंबाळकर* -----
         उल्हासनगर, ठाणे

चारोळी

कुणा उकलले गूढ आयुष्याचे
     कुणा सत्कर्माचे महात्म्य कळले

सुखांचा थांगपत्ता लागत नाही
     साऱ्यांना येथे फक्त दुःखाने छळले

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_दुःखावर लाखो कवने होतात_
     _सुखाची मात्र, व्याख्या माहीत नाही_

_सागराला कवेत घेणं महादिव्य_
     _लावावं डोळ्याला त्यातलंच पाणी काही_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_जगतोय मी रोज जोमाने_
     _आणून फुकाचा आव सारा_

_मृगजळापरी हे जीवन आपुलं_
     _कर्मांचाच काय तो इथे सहारा_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Wednesday, April 24, 2019

चारोळी

उघडउघड होते सुखांची हत्या तरी
     आळ ना कधी, कुणावर घेता येतो

वाट पाहावी लागते योग्य वेळेची
     विधाता त्याला हवा तसाच न्याय देतो

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

मिळेल तेवढं कमीच असतं
     गरज कधी का, कुणाची सरते

ओझं पाठीवर नव्हे मनावर असतं
     जेव्हा रोज रात्री, मधूशाळा भरते

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

सन्मार्गे जगलो आयुष्यभर तरी
     काही न पडले माझिया पदरी

सुखांच्या संमेलनी शेवटचेच स्थान
     जरी असले, लाखो लेख सदरी

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

आज फेटाळला जरी अर्ज सुखाने
     उद्या मीच एकमेव उमेदवार असेन

नियतीशी युती फोल ठरली कैकदा
     आता मात्र, केवळ बहुमताने बसेन

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

वाटेशी करावी लागते सलगी
     जरी खाव्या लागल्या कैक खस्ता

ध्येयाची पायाभरणी अशीच होते
     जी दाखवते आपल्याला योग्य रस्ता

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Tuesday, April 23, 2019

रुबाई

उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १६

गागागा गागागा गागागा गाल

आई बाबांना देतो सारं श्रेय
माझ्या भाळी जे काही आहे आज

श्रीमंती संस्कारांची लाभो नित्य
त्यावर चढवू यश अन कीर्तीने साज

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Monday, April 22, 2019

रुबाई

उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १

गागाल लगागागा गागाल लगा

वारे कुठले आणिक वादळ कुठले 
काहीच कळेनासे झाले मजला

रानात जसा तो पेटावा वणवा
संदेश निरोपाचे आले मजला

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_तिची मेहंदी खूप काही सांगत होती_
     _मला मात्र, कळला नाही त्याचा अर्थ_

_आसवात नाहल्या पापण्यांच्या कडा_
     _बोलण्याचा प्रपंच ओठांचा ठरला व्यर्थ_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Sunday, April 21, 2019

चारोळी

कुंचले जरी तुमचे असले तरीही
     त्यात रंग, आम्हीच भरले होते

नका देऊ नाव कुणाचंही चित्राला
     काढण्या, हातच कारण ठरले होते

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_सहज विचारली उद्रेकाची व्याख्या_
     _नियतीने, माझेच घर जाळून दाखवले_

_एरव्ही मी तटस्थ होतो तटबंदीसारखा_
     _आज मात्र, एका ठिणगीने वाकवले_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_कवटाळायच्या ज्या सावल्या एकेकाळी_
     _आज त्यांनीच उन्हाचा फतवा काढला_

_दोष नेमका कुणाचा काहीच कळेना_
     _बहुदा ऋतुचक्राचा अहंभाव वाढला_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Saturday, April 20, 2019

चारोळी

_रोजचीच उजळणी सारी तरीही_
     _अनुत्तरितच राहिलेत काही प्रश्न_

_कोंडमारा होतो भावनांचा म्हणून_
     _मुक्यानेच साहिलेत काही प्रश्न_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Friday, April 19, 2019

चारोळी

_संयम बाळगला मनाला मारून_
     _मृदु केली ही तळपणारी वाणी_

_इथेच फिरले सारे चक्र आकस्मिक_
     _चालून गेली चलनात नसलेली नाणी_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_काही किल्ल्या हातात ठेवण्या_
     _अगोदर दरवाजे बनवावे लागले_

_कधीकधी चालवावं म्हणतो डोकं_
     _परिश्रम करून कुणाचे भागले_

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Thursday, April 18, 2019

गाऊया सुखाने (षडाक्षरी)

----- *गाऊया सुखाने* -----
        (षडाक्षरी)

गाऊया सुखाने
आनंदाचे गाणे
सोपे होते मग
येथे येणे जाणे

तूच माता पिता
तूच करविता
डोळा पाणी येते
घास भरविता

दिवसागणिक
नाम तुझे घेऊ
सांग बा विठ्ठला
काय भेट देऊ

तूच तारलेस
साऱ्या संकटात
मोक्षाची प्रचिती
तुझ्या राऊळात

लाभो आशिर्वच
उजळावा माथा
जगणे सांगते
संप्रदायी गाथा

@ *सागरराजे निंबाळकर*

Wednesday, April 17, 2019

रुबाई

उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १

गागाल लगागागा गागाल लगा

दरवळत फुलांचा हा शृंगार असा
मोहित करतो साऱ्या सृष्टीस सदा

येताच जवळ का जावे दूर सहज
एकांत पहाण्याची न्यारीच अदा

----- *सागरराजे निंबाळकर* -----

रुबाई

उस्ताद रुदकी रुबाई वृत्त क्रमांक १

गागाल लगागागा गागाल लगा

सारेच तुझ्या हाती सोपवुन सये 
जाईन निघूनीया गुपचूप अता

छळते मजला तू इतुकी रोज स्वतः
वाटे मग सांगावी कोणास व्यथा

----- *सागरराजे निंबाळकर* -----

विरहाची वर्णी (षडाक्षरी)

-- *विरहाची वर्णी* --

सावळा श्रीहरी
येता वृंदावनी
आनंदली राधा
आज मनोमनी

पाहता गोपाळा
वदन फुलले
आठवांचे पहा
झोपाळे झुलले

अनेक दिसांची
विरहाची खंत
बैसल्या मंचकी
निजला निवांत

गोकुळी घुमता
मनोहारी पावा
गोपगोपी  घेती
कृष्णाकडे धावा 

पाहुनी इतुक्या
गोपी भोवताली
होतसे राधेचा
जीव वरखाली

क्षणांच्या सुखाला
करुनी करणी
लागले ग्रहण
दुराव्याची वर्णी

पुन्हा कधी भेट
सवाल राधेचा
परिणाम सारा
प्रेमाच्या बाधेचा

*सागरराजे निंबाळकर*

चारोळी

रोजचेच असतात प्रश्न तरीही
     द्यावी लागतात उत्तरं काहीबाही

म्हणूनच जगतो मी हल्ली असा
     उद्याचं काय ते मला ठाऊक नाही

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

_काहींनी मानलं मुलीला सर्वस्व_
     _काहींना अजूनही किंमत कळाली नाही_

_किमान माझ्या तरी घरात......_
     _एका दिव्यासाठी पणती जळाली नाही_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Tuesday, April 16, 2019

रुबाई वृत्त

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११

गालगा लगागागा गागागा गा

कोणत्याच आभाराचा परतावा
ठेवणार नाही साक्षीला आता

एवढीच माझी खुण होती बहुधा
घाव एकटा, उरला जाता जाता

----- *सागरराजे निंबाळकर* -----

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११

गालगा लगागागा गागागा गा

घालमेल का होते ह्या जीवाची
काय चूक झाली उमगेना काही

आलबेल असल्याच्या सोंगाने ह्या
रोज थांगपत्ता ही लागत नाही

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Monday, April 15, 2019

चारोळी

_दिसेनाशा झाल्यात सावल्या नी_
     _हात सोडून, निघून गेली ती वाट_

_जसा चंद्र गुडूप होता अमावस्येला_
     _चाचपडत शोध घेते एकटीच लाट_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Sunday, April 14, 2019

दुःखास टाळणे (आनंदकंद गझल)

------- दुःखास टाळणे -----

वृत्त :- आनंदकंद

दुःखास टाळणे मज जमले कधीच नाही;
केले प्रयत्न लाखो शमले कधीच नाही !

साऱ्या दिशास आता भटकून पाहतो मी ;
मन उंबऱ्यात माझे रमले कधीच नाही !

चालून मैल लाखो वाटेस वीट आला ;
खंबीर पाय माझे दमले कधीच नाही !

डोळ्यात साठलेल्या पाण्यास पाहिल्यावर
मज गूढ पापण्यांचे गमले कधीच नाही

कोमेजल्या फुलांचे निर्माल्य जाहले पण ;
हे देठ ताटव्यांचे नमले कधीच नाही !

@ *सागरराजे निंबाळकर*

Saturday, April 13, 2019

चारोळी

_जीवनाच्या पडद्यावर वठवून भूमिका_
     _कमवायचा तो जेमतेम पोटापुरतं_

_तरीही दुनियेचा सवाल असायचा_
     _कर्म सोडल्यास तुझ्या हाती काय उरतं_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_परतफेड करेल कधीतरी ती_
     _सोडून दिली केव्हाच ही आशा_

_क्षणभंगुर जीवनात काय सांगावे_
     _कधी गुंडाळावा लागेल गाशा_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_लवचिकता ठेवली नाही कधीही_
     _म्हणूनच ताणण्याचं महत्व कळालं_

_त्याचाच परिणाम असावा बहुधा_
     _भर पावसात, फक्त माझं घर जळालं_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Friday, April 12, 2019

स्त्रीपुरुष (दासी वृत्तबद्ध कविता)

वृत्त :- दासी २४ मात्रा [६+६+६+६]

------- *स्त्रीपुरूष* -------

स्त्रीपुरूष समानता, नांदावी सौख्याने
अभिलाषा मनातली, सांगावी सौख्याने

नाते हे जन्मांचे, राहू दे काळजात
कौटुंबिक आनंदा, भरभरून पाहुयात

मायबाप मानतात, पणतीला एक भेद
परंपरा बरबटल्या, साऱ्यासी हाच खेद

राबतात खांद्याला, हा खांदा भिडवूनी
फुलवतात मळ्यास ह्या, घामाने मढवूनी

संकटात डगमगला, ना कधीच राजा हा
साथ तया राणीची, प्रसंगही ताजा हा

एवढ्यात अशी कशी, आटणार ही माया
सावलीच वाटे मज, तेजोमय ती काया

आशीर्वच आईचा, सदैव मज लाभावा
मायलेक नात्याचा, गौरव तो साधावा

फुललेली फुलराणी, पहावया ही गर्दी
देऊया साऱ्यांना, हर्षाची ही वर्दी

दीपोत्सव करताना, असूदेत दिवा एक
साथीला ज्योतीही, दावूनी भाव नेक

------- *सागरराजे निंबाळकर* -------

Thursday, April 11, 2019

चारोळी

_मुळात प्रश्न तो नव्हताच कधी_
     _ज्याचं उत्तर, मी तिच्याकडे मागायचो_

_तिला वाटायचं वगळावं ह्याला_
     _मी एका भेटीला कैक क्षणात भागायचो_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_मैत्रीची व्याख्या विचारलीच कोणी_
     _सांगा, काळजात जपलेली अमूल्य जागा_

_जसं विरघळताना मेणबत्तीचं अस्तित्व_
     _तक्रार न करता, जळत असतो धागा_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

_सारीच कोडी कशी उलगडणार_
     _एखादं कोडं, सोडून द्यावं लागतं_

_प्रापंचिक गणिताच्या ढिगाऱ्यातून_
     _सुखांना अगदी भागून घ्यावं लागतं_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Tuesday, April 9, 2019

चारोळी

सहज नजर टाकली एकदा
     दृष्टीस पडला, तिचा चेहरा रडवेला

कारण विचारता उत्तरली ती
     ओठांनी यंदा पापण्यांचा घात केला

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Monday, April 8, 2019

चारोळी

_येत नाहीत तिची पत्र अलीकडे_
     _केलंय तिने स्वतःला परंपरांच्या हवाली_

_विचारणा केल्यावर एकच उत्तर देते_
     _कळवू कशी मुक्याने ओठातली खुशाली_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Sunday, April 7, 2019

चारोळी

चोरांना दोष कसा द्यावा राजे
     हल्ली, सावंच लुटतात तिजोरीला

म्हणूनच सताड उघडे दरवाजे
     ताळेबंद करून इवल्याशा मोरीला

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

कशी उजवायची कूस मुलीची
     हीच चिंता सतावत असते बळीला

म्हणूनच हट्ट धरतो तो फुलाचा
     खोडून टाकतो नाजूकशा कळीला

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

चारोळी

काय होतं येथे माझं नी
     काय मी घेऊन जाऊ शेवटाला

घडी दोन घडीच्या डावात
     मिळावेत काही मित्र सांत्वनाला

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Friday, April 5, 2019

चारोळी

_काय जादू केली साकीने अशी की_
     _कोरड्याच आसवांनी वाहिले डोळे_

_काय थांगपत्ता झिंगल्यावर प्रवाहाचा_
     _एकाच दिशेने वाहती दिवाणे भोळे_

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖

Thursday, April 4, 2019

दुष्काळ वृत्तबद्ध कविता

वृत्त- परिलिना २२ मात्रा [६+६+६+४]
        
------ सांग कसे दुष्काळा विसरू -----

भूकेने हातावर, ओघळले अश्रू
भगवंता सांग कसे, दुष्काळा विसरू

का करतो रोजचीच, कुरघोडी निसर्ग
बांध कुठे उरले? नी पाण्याचा विसर्ग

जगू कसे? काहीही उमगेना आता
सतावते ही चिंता, मज येता जाता

एवढ्यात हरवलीत, अशी कशी नाती
आडदांड भेगांनी, विस्कटली माती

इतुकं हे करूनही, रिकामीच झोळी
चाऱ्याविन उपाशीच, जनावरं भोळी

रूसलाय मेघराज, सुकलेले डोळे
काळजीत उठलेले, उदरी हे गोळे

सावकार आवळतो, कर्जाच्या गाशा
धुसर धुसर होते मग, उरलेली आशा

कोवळ्याच वयात मी, उजवील्या पोरी
वाढवणं कसंबसं, वाटे मज चोरी

ठेवूनी पिढ्यातला, गहाण हा वाडा
ओढतोय रोज रोज, प्रापंचिक गाडा

फुलो मळा भरभरून, हेच स्वप्न बघतो
कसाबसा शेतकरी, जीवन हे जगतो

अंधकार भरलेला, जीवनात सारा
झोंबणार कायम हा, दुष्काळी वारा

----- *सागरराजे निंबाळकर* -----
         उल्हासनगर, ठाणे

चारोळी

----- स्पर्धेसाठी चित्रचारोळी -----

_अमानुष वृक्षतोड करून मानव_
     _लिहितोय धरेची करुण कहाणी_

_तळपत्या उन्हात सावली करताना_
     _आईच्या डोळ्यातून बरसलं पाणी_

----- *सागरराजे निंबाळकर* -----
         उल्हासनगर, ठाणे

Wednesday, April 3, 2019

चारोळी

*एवढीच उंची दे देवा मजला*
     *जमिनीला टेकावेत हे हात पुन्हा*

*विश्वासघात नको काळजाचा*
     *ना कधी भावनेला मारण्याचा गुन्हा*

----- *सागरराजे निंबाळकर* -----

हजरत इस्लाम सहर इश्कआबादी रुबाई वृत्त ४

हजरत इस्लाम सहर इश्कआबादी रुबाई वृत्त ४

गागाल लगागाल लगालगा लगाल

साधेपण जपले जगतात ह्या म्हणून
वाटेत मिळाले मजला कितीक मित्र
मानून अपुले मज लावतात जीव
तेजोमय नाते गणले असे पवित्र

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Tuesday, April 2, 2019

वृत्तबद्ध चारोळी

वृत्तबद्ध चारोळी :-

शुभगंगा [८+८+६]

एवढ्यात का गाळलेस तू अश्रूंना
लढाई तुझी ही संपलीय सांग कुठे

चिंता नकोच अता जराही कशाचीच
टाक उडवून सारे वारे आडमुठे

----- *सागरराजे निंबाळकर* -----

Monday, April 1, 2019

चारोळी

कधी जीव लावते ती तर
     कधी बहाणे करून टाळते

नेमकं काय समजावं मी
     ती खरंच माझ्यावर भाळते?

➖ *सागरराजे निंबाळकर* ➖

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक १

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक १

गालगा लगालगा लगागाल लगा

तू उगाच बंद ठेवले ओठ सये
नेत्र सांगतात आज न्यारीच कथा

का कुणास ठाव काय झाले मजला
वाढली क्षणात काळजाचीच व्यथा

----- *सागरराजे निंबाळकर* -----

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक १

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक १

गालगा लगालगा लगागाल लगा

नेहमी तुझ्याच आठवांशी सलगी
एवढेच माझिया मनाला कळते
कोण सांगणार आठवण रोज नवी
नेमकी कधी कशी कुणाला छळते

----- *सागरराजे निंबाळकर* -----

चारोळी

दुराव्यानेच प्रेम वाढत जातं
     शिकत आलो मी हेच आजवर

कलियुगात थोडं वेगळं चित्र
     घडी दोन घडीनंतर सारेच नश्वर

➖➖ *सागरराजे निंबाळकर* ➖➖