आयुष्याची धुरा नेमकी
असते कोण्या हाती
उघडे डोळे जाताना अन्
शेवट ज्याचा माती
श्वासाला जर मुकलो आपण
सांगा उरते काही?
पटकन सारे मिळवायाची
कसली मग ही घाई
अर्धी हाडे झिजल्यावरही
थांबत नाही मानव
मोह म्हणावा मायेचा की
लुकलुकणारे वैभव
एकाजागी बसून घ्यावी
विश्रांतीही थोडी
चिंतन केल्यावरती सुटती
क्षणात एका कोडी
लेखाजोखा आयुष्याचा
राहू असाच मांडत
जरी पेरले काटे कोणी
सुगंध जाऊ सांडत
😊 सागरराजे निंबाळकर, कल्याण