Saturday, November 2, 2019

वसुंधरा

-- सढळ हाताने देई वसुंधरा --

वसुंधरा माझी । पुलकित झाली
गालावर लाली । येता आज !! १ !!

शृंगार अनोखा । हिरवळ सारी
लक्ष योनी तारी । आनंदाने !! २ !!

तीच माय बाप । तिजवीण काही
दुजा मार्ग नाही । सृष्टीलाही !! ३ !!

सढळ हाताने । देई वसुंधरा
सुख चराचरा । सदोदित !! ४ !!

न चुकता येती । सूर्याची किरणे
यथेच्छ फिरणे । धरेसवे !! ५ !!

पेरा मनोभावे । सृजनाचे बीज
करावया चीज । निसर्गाचे !! ६ !!

अंगावरी येती । गुलाबी शहारे
वाहताना वारे । थंडगार !! ७ !!

थांबवाया हवी । जमिनीची धूप
यावया हुरूप । जगण्याला !! ८ !!

काय वर्णावी मी । जैव विविधता
स्तुत्य सोशिकता । धरित्रीची !! ९ !!

जन्म आणि मृत्यू । मातीमध्ये होई
पालखीचे भोई । तिच्या सारे !! १० !!

कुशीत धरेच्या । ओढे, नदी, नाले
सागरा मिळाले । शेवटाला !! ११ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !