Wednesday, April 30, 2025

रोज आई

रोज आई दृष्ट माझी काढते
का मला ती जीव इतका लावते

गावखेड्याची असो, शहरी असो
उंच माडी, लांब गाडी मागते

वाटते आभाळ अवघे ठेंगणे
लेक पहिल्यांदाच जेव्हा रांगते 

ती स्वतः खाते शिळे अन् कोरडे
लेकरांना मात्र ताजे वाढते

जे कधी भाग्यात नसते आपल्या
नेमके ते का हवेसे वाटते

एवढ्यासाठी बदलले गाव मी
घर तिचे वाटेत माझ्या लागते

भांडलो दोघे कितीही, नेहमी
मी तिला अन् ती मला समजावते

~ सागरराजे निंबाळकर 

Tuesday, April 29, 2025

डांबू नका कधीही

_डांबू नका कधीही डोळ्यांत आसवांना_
_मिळते उगाच शिक्षा निर्दोष पापण्यांना_

_आई, वडीलसुद्धा वाटून घेतल्यावर_
_उपयोग काय झाला पोसून लेकरांना_

_येऊन सांजवेळी निघती भल्या पहाटे_ 
_करता कधी न येतो मुक्काम चांदण्यांना_

_अंधार दूर करती वाटेतला जगाच्या_
_मिळते तरी कमी का? आयुष्य काजव्यांना_

_शर्यत अटीतटीची झाली न एकदाही_
_बघती ससे तरीही पाण्यात कासवांना_

_घुसमट बरीच होते कुंडीत ठेवल्यावर_
_वाऱ्यासवे फुलू द्या बागेतल्या कळ्यांना_ 

_देतात गारवा जे दुसऱ्यास ऊन झेलत_ 
_आयुष्यभर स्वतः ते मुकतात सावल्यांना_ 

_~ सागरराजे निंबाळकर_

Sunday, April 27, 2025

कोणते चांदणे

कोणती पौर्णिमा कोणते चांदणे
रोज नशिबात जर रात्रभर जागणे 

जीर्ण वाड्यातला कोपरा मी सुना 
भाग आहे मला एकटे राहणे

वेदनेची सवय लागली रोज की..
शक्य होते सहज दुःख सांभाळणे

सांग मांडू कशा भावना नेमक्या
होत नाही कधी आपले बोलणे

ऐकले ना कधी ईश्वराने तुझे
काय असते असे एवढे मागणे

आज घालून गळ वाट अडवू नको 
शक्य नाही मला आणखी थांबणे

मी कुणाचातरी काठ आहे अता 
सागरासारखे थांबवू वाहणे 

~ सागरराजे निंबाळकर

Monday, April 21, 2025

पत्र निनावी

पत्त्यावरती, हल्ली माझ्या
येते आहे, पत्र निनावी
त्यात मागणे, असते केवळ
प्रेमावरती, ओळ लिहावी

नजरेसमोर, एक चेहरा
पटकन तेव्हा, उभा राहतो
लिहिल्यानंतर, निवांत जेव्हा
पुन्हा पुन्हा ती, ओळ वाचतो

~ सागरराजे निंबाळकर 

Monday, April 14, 2025

गझला करतो आहे

आयुष्यावर कविता, गझला करतो आहे 
लिहिण्याजोगा मतला आता सुचतो आहे

रडण्यासाठी मिळतो खांदा आता कोठे?
गरजेपुरते खोटेनाटे हसतो आहे 

घरटे मागे सुटल्यानंतर कळले इतके..
सहवासाला आईच्या मी मुकतो आहे

वार्धक्याच्या उंबरठ्यावर बसल्यावरती
बाबा माझा थोडा-थोडा कळतो आहे

सोपे नाही टिकणे मित्रा युद्धामध्ये
लाखोवेळा हरल्यावरही लढतो आहे

छातीशी धरले ज्याला तो जखमा देतो
किस्सा का हा माझ्यासोबत घडतो आहे 

शाळा करणे मैत्रीमध्ये जमले नाही 
यासाठी तर एकलकोंडा जगतो आहे

~ सागरराजे निंबाळकर 

Saturday, April 12, 2025

कळले नाही

गागागागा गागागागा

लिहिण्याजोगे सुचले नाही
कविता, गाणे जमले नाही 

प्रेमामध्ये हसणे-रडणे
माझ्यासोबत घडले नाही

संसाराच्या चिंतेमध्ये
महिनोमहिने हसले नाही 

संधी होती हातामध्ये
पण पायांना कळले नाही 

विश्वासागत तुटले अगदी
नाते जे तू जपले नाही

श्रीमंतांची नक्कल करणे 
गरिबांना परवडले नाही 

ओझे होते ओठांवरती
डोळ्यांना जे दिसले नाही

आई-बाबा होते तोवर
एकाजागी बसले नाही

साधे-सोपे, जगणे सुंदर
आता काही उरले नाही

~ सागरराजे निंबाळकर

सुखाचा नकाशा

~ सुखाचा नकाशा

गातो, डुलतो "विठ्ठल" 
माझ्या हिरव्या शेतीत
दृश्य पाहून वाटते
जणू आलो पंढरीत

काळ्या मातीचा सुगंध
माझ्या श्वासात भिनतो 
थेंब पावसाचा जेव्हा
रान सारे भिजवतो

गहू, ज्वारी, बाजरीची
पिके आहेत सुखात
पोसूनही साऱ्या जगा 
नम्रतेने वागतात

सर्जा-राजाविना कशी 
शोभा येणार घराला
मुकी असली तरीही
जीव देतात जीवाला

दोन वेळच्या घासाची 
होत नाही परवड
सुरू राहील जोवर
नभातली गडगड

मनाजोगं झाल्यावर
कसा आवळू कासरा 
शेती मायबाप माझी
तीच हक्काचा आसरा

दिस येतात सोन्याचे
फक्त सोडू नये आशा
एका रेषेत नसतो
कधी सुखाचा "नकाशा"

~ सागरराजे निंबाळकर

Wednesday, April 9, 2025

पाहिल्यावर

नेमके भांगात कुंकू पाहिल्यावर
ठेवला आहे दगड मी काळजावर

पापण्यांवर येत गेला भार माझ्या
दुःख हृदयाच्या तळाशी साचल्यावर

वाचल्या नाहीत कविता मग पुन्हा मी
बोलक्या डोळ्यात सगळे वाचल्यावर

लागली चिंता सतावू पाखरांची
गाठण्या घर वेळ इतका लागल्यावर

मारल्या इच्छा कधीच्या मीच माझ्या 
का खुनाचा आळ घेऊ मी कुणावर

~ सागरराजे निंबाळकर

Monday, April 7, 2025

जीव नाही घेतला मी

अत्तरासाठी फुलांचा जीव नाही घेतला मी
शब्द बागेला दिलेला आजसुद्धा पाळला मी 

ज्या वहीमध्ये तुझ्यावर शेकडो आहेत कविता
त्या वहीला वाचण्याचा मोह कायम टाळला मी

येत असतो सारखा तो चेहरा डोळ्यांपुढे या
का नको त्या पाहुण्याला जीव इतका लावला मी

पापण्यांच्या आड तू जो थेंब अश्रूचा लपवला
ओंजळीमध्ये खुबीने नेमका तो वेचला मी 

गंध येतो चंदनाचा ज्यामुळे जखमेस माझ्या
काळजावर नेहमी तो घाव ताजा ठेवला मी

~ सागरराजे निंबाळकर

Thursday, April 3, 2025

पूर्ण झाले मागणे

शक्यतांच्या पावलांवर फार झाले चालणे
थांबवू चोरून आता सांजवेळी भेटणे

जन्मभर मी या उन्हाला जीव आहे लावला
एवढ्यासाठी नकोसे वाटते हे चांदणे

एकटा आहे सुखी मी सोबती कोणी नको
वाटते अवघड कुणाच्या भावना सांभाळणे 

शक्य असते जर तुझ्यावर प्रेम करणे नेहमी
टाळले नसते कधीही जीव इतका लावणे 

भेटली असती कधीची माधवाला राधिका
कोरले नसते कपाळी जर समांतर राहणे

मी तिचा होऊ न शकलो एकदाही जीवनी
हेच होते, हेच आहे एकतर्फी वाहणे 

जे दिले आहेस तेही खूप आहे विठ्ठला 
पंढरी झाली घराची पूर्ण झाले मागणे

~ सागरराजे निंबाळकर

एक व्यक्ती अशी

आग जमिनीतली थांबली पाहिजे
अंबरासारखी सावली पाहिजे

"जात" पाहून जी जात नाही कुठे
एक व्यक्ती अशी आपली पाहिजे

फक्त आणू नका पुस्तकांना घरी
वेळ काढून ती वाचली पाहिजे

स्पष्ट दिसतात व्रण घट्ट धरल्यामुळे 
सोडण्याची सवय लावली पाहिजे

बाप, आई असो वा लिहा प्रेयसी
गीत, कविता, गझल भावली पाहिजे
 
होत नाही बदल वागल्याने बरे
आत वृत्ती तशी चांगली पाहिजे

सांगते सारखी भूक पोटातली
झोप डोळ्यातली टाळली पाहिजे

तू मला "छान" म्हण, "वाह" म्हणतो तुला
लाज थोडीतरी वाटली पाहिजे..

~ सागरराजे निंबाळकर

Wednesday, April 2, 2025

हातात घ्या मशाली

आयुष्य सर्व माझे केले जिच्या हवाली
देऊन दुःख आंदण आली तशी निघाली

आहे सुखात जर ती तडफड बघून माझी
इतक्यात मामला हा काढू नका निकाली

जर जिंकणे "तहाने" आहे कमीपणाचे
मी हार मान्य करतो ठेऊन शस्त्र खाली

जाळून मेणबत्त्या मिळतो प्रकाश केवळ
भेटेल न्यायसुद्धा... हातात घ्या मशाली

डोळ्यात पाहिला मी जेव्हा अथांग सागर
एका क्षणात तेव्हा कळली तुझी खुशाली

~ सागरराजे निंबाळकर