ज्येष्ठ गझलकार मसूदभाई पटेल यांनी दिलेल्या ओळीवरून तरही गझलचा एक प्रयत्न :-
~~ भेटीस फक्त एका..
(शहरात रोज वणवण फिरतो तुझ्या अजूनी)
भेटीस फक्त एका मुकतो तुझ्या अजूनी
साऱ्या जगात आहे तू वेळ वाटलेली
यादीत मात्र मी या नसतो तुझ्या अजूनी
मी कृष्ण सावळा अन् तू राधिका मयूरी
वृंदावनात पावा घुमतो तुझ्या अजूनी
समजू नको मला तू परका कधीच राणी
आयुष्य रोज नावे करतो तुझ्या अजूनी
येशील तू पुन्हा ही आशा मनात भोळी
दारात वाट पाहत बसतो तुझ्या अजूनी
समशेर चालवाया आले किती नि गेले
शिवबा पराक्रमाला स्मरतो तुझ्या अजूनी
आवाज हुंदक्यांचा केला हळू जरी तू
डोळ्यात रोज "सागर" दिसतो तुझ्या अजूनी
▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण