Thursday, September 30, 2021

खुला किनारा

वृत्त :- पादाकुलक ८+८

⚜️ खुला किनारा..

हलत-डुलत बघ लाटेसंगे
किनाऱ्यावरी पोचते नाव
पाचू हिरवा, नारळ बागा
मनात भरते विहंगम गाव

पवन घालतो शीळ सारखी
जिकडे-तिकडे खुला किनारा
वैभव अवघे गडकिल्ल्यांचे
तटबंदीचा खडा पहारा

संथगतीने पाण्यामध्ये
होडी होते खाली-वरती
समीप येता शंख शिंपले
पुन्हा अचानक येते भरती

शिवणापाणी खेळत-खेळत
मजेत डुलतो घननिळ सागर
संध्यासमयी किनाऱ्यातल्या
वाळूमध्ये त्याचा वावर

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

टिकते नाते

आधारावर थोडथोडक्या
एखाद्याचे टिकते नाते

खंत ही जरी क्षणभर असली
आयुष्य पूर्ण यातच जाते

▪️सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 29, 2021

मिळते जागा निर्माल्याला

वृत्त :- पादाकुलक ८+८

⚜️ मिळते जागा निर्माल्याला

कधी न कळले कसे अचानक
दोघांमध्ये पडले अंतर
भेटीगाठी झाल्या जेव्हा
तब्बल एका दशकानंतर

अगदी तशीच टिकून होती
खुणवा-खुणवी नजरेमधली
संवादाची जरी नव्याने
झाली असली अदलाबदली

नाही नाही म्हणता म्हणता
रंगत गेल्या गप्पा-टप्पा
कोरडवाहू हृदयाचा मग
तुडुंब भरला क्षणात कप्पा

क्षणिक अशा या विश्वामधून
भानावरती आलो थोडे
गुंतून पडू असे वाटता
नजरेदेखत सुटले कोडे

असे मिळाले पुन्हा एकदा
वळण वेगळे आयुष्याला
कोपऱ्यात का होईना पण..
मिळते जागा निर्माल्याला

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

भावना प्रवाही

अंतर जरी असलं एकमेकांमध्ये
स्पर्शाविनाही कळतं, बरंच काही

नजरेच्या संभाषणातून जेव्हा..
ओसंडून वाहतात भावना प्रवाही

▪️सागरराजे निंबाळकर

Tuesday, September 28, 2021

सुखाची परिभाषा

⚜️ सुखाची परिभाषा

कळलीच नाही कधी
मज, सुखाची परिभाषा
याच कारणे नियती
दाखवत राहिली आशा

कळूनही उपयोग नाही
उशीर आता, फार झाला
अपेक्षेनंतर आल्यावर
कसा जवळ घेऊ सुखाला

▪️सागरराजे निंबाळकर

Saturday, September 25, 2021

प्रपंच सागर

⚜️ _प्रपंच 'सागर'_

_ओझे अपेक्षांचे । पेलवत नाही_
_खंत बारमाही । ज्याची-त्याची ।।१।।_

_पुरेसे ठरते । छोटेसे कारण_
_दुःखाची लागण । होण्यासाठी ।।२।।_

_मार्ग शोधल्यास । होते चिंता कमी_
_संयमाची हमी । द्यावी फक्त ।।३।।_

_कधी-कधी तर । असूनही सारे_
_मनात निखारे । तणावाचे ।।४।।_

_जर केला घट्ट । मनाशी निर्धार_
_पळती आजार । दूर सारे ।।५।।_

_आपल्या सोयीने । सारे होत नाही_
_मोजकेच काही । येते हाती ।।६।।_

_प्रपंच 'सागर' । आहे खूप खोल_
_सांभाळावा तोल । पोहताना ।।७।।_

▪️ _सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर_

तीव्रता वेदनांची

चारचौघांमध्ये जेव्हा
अश्रू आवरता येत नाहीत

तीव्रता वेदनांची त्यावेळी
ज्याची त्याला माहीत

▪️सागरराजे निंबाळकर

दुःख हलके झाले

शब्द दोन-चार, सांत्वनाचे
जेव्हा, माझ्या कानी आले

प्रज्वलित होऊन ज्योत आनंदाची
दुःख कापरागत हलके झाले

▪️सागरराजे निंबाळकर

Wednesday, September 22, 2021

उजळोत स्नेह ज्योती

⚜️ स्नेह ज्योती

वेळ लागतोय खरा
वाट पाहूयात जरा ।।१।।

नित्य संयमाचे धडे
नेती ध्येयप्राप्तीकडे ।।२।।

नको उथळ स्वभाव
उगा डागाळते नाव ।।३।।

योग्य त्याची कास धरू
थोडे पण, छान करू ।।४।।

नाही आवडत बोल
तर हवे ज्ञान खोल ।।५।।

स्वतःचेच गुणगान
नको फुकाचा सन्मान ।।६।।

मने राहू नये कोती
उजळोत स्नेह ज्योती ।।७।।

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Tuesday, September 21, 2021

असते बरी

⚜️ असते बरी..

दुःखामध्ये असली जरी
मुखावर तिच्या बघ तरतरी

बसून असतो दारात तो
ती येण्याच्या आशेवरी

शब्दाखातर तिच्या एका
ओलांडली न मी पायरी

अधूनमधून दुःख नशिबी
बाकी मग ती असते बरी

येऊ देऊ नका कधीच
नात्यामध्ये कुठली दरी

ऐऱ्या-गैऱ्या कसे जमेल
पाठवा निपुण मारेकरी

आहे माझे प्रेम नितांत 
शांत, संयमी गझलेवरी

▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, September 20, 2021

एकटे जगणे

⚜️ _एकटे जगणे_

_साधे-सोपे नाही । एकटे जगणे_
_हसून बघणे । चोहीकडे ।।१।।_

_कुणीतरी हवे । सोबतीला सदा_
_टळते आपदा । एकांताची ।।२।।_

_फक्त आठवणी । किती जपायच्या_
_घोर लावायच्या । काळजाला ।।३।।_

_बघावे लागते । आपले आपण_
_जखमांचे व्रण । लपवून ।।४।।_

_दोन घटकाही । नाही कुणाकडे_
_मोजण्या आकडे । संवादाचे ।।५।।_

_ओठांवर हसू । उसणे आणून_
_नेतो निभावून । वेळ जो-तो ।।६।।_

_सोबतीची जेव्हा । अपेक्षा असते_
_तेव्हाच नसते । कुणी इथे ।।७।।_

_आतच राहते । मनातली खंत_
_नावाला जिवंत । वाणी माझी ।।८।।_

_घोर लागलेला । निष्पाप जीवाला_
_सांगावे कुणाला । यक्षप्रश्न ।।९।।_

▪️ _सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर_

Sunday, September 19, 2021

कविता मिळाली

⚜️ _कविता मिळाली.._

_साहित्याच्या प्रांगणात, कविता मिळाली_
_आनंदाने कवितेच्या, वाहतो पखाली ||धृ||_

_दुःख असो वा एकांत, साथ मज देते_
_रोज नवनव्या रूपे, काव्य जन्म घेते_

_कृपा शारदेची आज, माझ्यावर झाली ||१||_

_मात्रा, वेलांटी, उकार, काना सोबतीला_
_अगणित आहे साऱ्या, अक्षरांच्या लीला_

_सखी बनून कविता, जीवनात आली ||२||_

_कधी चंद्र-तारे कधी, झाड, वेली, पाने_
_हळूहळू होते मग, कवितेचे गाणे_

_एका-एका शब्दानेही, कळते खुशाली ||३||_

▪️ _सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर_
_मो - ८८७९८९७७९७_

Thursday, September 16, 2021

साथ लाभो तुझी नित्य

⚜️ साथ लाभो तुझी नित्य

तुझ्या काळजीला नाही
कोणतेच मोजमाप
तुझ्या-माझ्या विचारांचा
व्हावा सदैव मिलाप

तूच पहिला आणिक
तूच अंतिम पर्याय
लाख येवोत समस्या
शोधू मिळून उपाय

माझ्या असीम सुखाला
तूच आहेस कारण
सांग सये तुजपाशी
काय ठेऊ मी तारण

साथ लाभो तुझी नित्य
नको दुजे मज काही
ईश्वराला मागतो मी
हेच दान बारमाही

◼️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Tuesday, September 14, 2021

आम्ही चाळीत राहतो..

◼️आम्ही चाळीत राहतो..

"उद्या आम्ही चारचाकीने गावी जातोय पण तरीही एक अडचण आहेच. आमच्या डॉगीलाही सोबत न्यावं लागतं." देशपांडे काकू शिंदे आज्जींना फोनवर सांगत होत्या.

नंतर फोन देशपांडे काकांनी घेतल्यावर आज्जींना विचारलं, "तुम्हीही गावी जाताना मोतीला नेत असाल ना सोबत?"

"नाही. आम्ही चाळीत राहतो ना." आज्जी उत्तरल्या.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

स्वयंपाक

◼️स्वयंपाक..

"दिपू, तुझं लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलंय. आतातरी स्वयंपाक शिकून घेना गं बाई." सीमाताई त्यांच्या मुलीला सांगत होत्या.

थोड्यावेळाने स्वयंपाक घरातून आवाज आला. "बाईसाहेब उद्यापासून सात दिवस मी स्वयंपाक आणि धुनी भांड्याला येणार नाही. गावी जातेय गणपतीला."

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

एकमत

◼️एकमत..

अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या सोपानरावांची शुश्रूषा कोण करणार यावरून चारही मुलांनी एकमताने त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला.

दोन वर्षांनी सोपानरावांचं मृत्युपत्र ऐकतेवेळी मात्र कुणाचंही एकमत झालं नाही..

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, September 13, 2021

चुलीवरचं जेवण

◼️चुलीवरचं जेवण..

"आज आईंचा ७५ वा वाढदिवस. आपण 'जय मल्हार' ढाब्यावर जाऊ, तिथे चुलीवरचं जेवण फार छान मिळतं."
रश्मी तिच्या यजमानांना सांगत होती.

तेवढ्यात शलाका म्हंटली, "वहिनी, वीस वर्षांपूर्वी आईने चुलीवर स्वयंपाक करायला सांगितला म्हणूनच तू आणि दादा वेगळे झाला होतात ना?"

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Sunday, September 12, 2021

वारसा

◼️वारसा..

"काय हो, तुम्ही आपल्या सोहमला मागेल ते सगळं देता नेहमी.. यामागे कारण काय नेमकं?"
स्नेहाने संदेशला विचारलं.

"विशेष काही नाही गं, परिस्थितीमुळे मन मारून जगण्याचा वारसा पुढे चालू नये इतकंच !"
संदेश उत्तरला.

😊 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Saturday, September 11, 2021

चुकीचा वापर

⚜️ चुकीचा वापर..

गुण्यागोविंदाने । जगावे जीवन
दुःखास कारण । करू नये ।।१।।

प्रत्येक कार्यात । येतात समस्या
करावी तपस्या । चिंतनाने ।।२।।

सुरळीत जर । झाले सर्व काही
उरणार नाही । उत्सुकता ।।३।।

मनात कटुता । मुखात साखर
चुकीचा वापर । जिथे-तिथे ।।४।।

प्रसिद्धीचा मोह । अनेकांना होतो
त्याचे पायी जो-तो । वेडापिसा ।।५।।

◼️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, September 9, 2021

अवस्था जीवनाची

एक अवस्था जीवनाची
अशीही अनुभवतो आहे

मी मुक्त होतोय जितका
तितकाच अवघडतो आहे

◼️सागरराजे निंबाळकर

प्रतिभेचा सूर्य

🔰 *_प्रतिभेचा सूर्य.._*

_पेटविल्याविना । कष्टांची मशाल_
_विजयाची ढाल । नसे हाती ।।१।।_

_असूदेत भले । काही अपवाद_
_सत्याचा निनाद । करू नित्य ।।२।।_

_वाममार्गे जर । हाती आले काही_
_जागेवर नाही । म्हणा त्यास ।।३।।_

_प्रतिभेचा सूर्य । असे तेजोमय_
_त्यावर वलय । नको दुजे ।।४।।_

_स्वाभिमान हाच । खरा अलंकार_
_शोभा वारंवार । वाढे ज्याने ।।५।।_

_लव्हाळे टिकती । आहे जरी खरे_
_वाकणे सत्वरे । बरे नाही ।।६।।_

_असूदेत कोणी । कितीही निष्णात_
_अंत सागरात । ठरलेला ।।७।।_

▪️ _सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर_
_मो - ८८ ७९८९ ७७९७_

व्यापारी साखरेचे

🔰 व्यापारी साखरेचे..

खरे बोलले की । लागते जिव्हारी
व्हावे का व्यापारी । साखरेचे ।।१।।

जिथे चूक होते । तिथे स्वीकारावी
कारणे न द्यावी । पुढे काही ।।२।।

चूक नसल्यास । राहूयात ठाम
वाटूदे उद्दाम । जगा साऱ्या ।।३।।

अति गोडानेही । होतो मधुमेह
औषधांशी स्नेह । ठेवा मग ।।४।।

अधिकारवाणी । ज्ञानाने मिळते
उगाच नसते । मोल तिला ।।५।।

चूक केल्यावर । ऐकावेत बोल
सांभाळून तोल । जिव्हेचा या ।।६।।

मनुजा तू जरी । चुकीचा पुतळा
जप गोतावळा । सुधारून ।।७।।

◼️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Tuesday, September 7, 2021

लेक लाडकी आमुची

🔰 लेक लाडकी आमुची..

आई-बापाला सोडून
आज सासरी निघाली
लेक लाडकी आमुची
लवकर मोठी झाली ।।धृ।।

घर वाटेल नवीन
त्याला आपलेसे कर
नको रडूस कधीही
आली आठवण जर

धीर लेकीला देताना
आई आसवात न्हाली ।।१।।

नको काळजी इथली
तिथे राहा आनंदाने
थोरा-मोठ्या घे जिंकून
आम्ही दिल्या संस्काराने

त्यांनी म्हंटले पाहिजे
आम्हा लक्ष्मीच मिळाली ।।२।।

कधी गौरी-गणपती
कधी दिवाळ सणाला
सवडीने का होईना
येत राहा माहेराला

भेट शक्य नसल्यास
फक्त, कळव खुशाली ।।३।।

तुझ्या भविष्याचे तूच
नीट लाव अनुमान
साथ आमुची मोजकी
आम्ही, पिकलेले पान

नको होऊ देऊ जीव
काळजीने वरखाली ।।४।।

◼️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७

पार्वतीच्या सुता

पार्वतीच्या सुता..

पार्वतीच्या सुता, तुझं गातो गुणगान
दर्शनाने तुझ्या, माझे हरपले भान ।।धृ।।

शुभ कार्यारंभ होतो, जेव्हा तुझ्या नावे
जुळतात कर माझे, तेव्हा मनोभावे

मूर्ती छोटी परी, तुझी महती महान ।।१।।

विद्येची देवता तुझी, ख्याती चोहीकडे
स्मरूनिया तुला आम्ही, गिरवितो धडे

देवा मला मिळो, तुझ्या चरणात स्थान ।।२।।

गणेशाला वंदितो मी, दिन असो रात
देव्हारा केलाय त्याचा, माझ्या काळजात

त्याच्याविना आता, मज नाही समाधान ।।३।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

Monday, September 6, 2021

पुरस्कार देण्या घेण्यावर

🔰 यादीत बसवता आलं तर..

पुरस्कार देण्या-घेण्यावर
नाही कोणताही कर
बघा यादीत आम्हाला
बसवता आलं तर ।।धृ।।

एक-दोन हजारात
जुळतात लागेबांधे
जरी नसले सक्षम
भार पेलावया खांदे

बांधू मुंडावळ्या आणि
होऊ पुन्हा बिजवर ।।१।।

कधी काव्यरत्न म्हणा
कधी थेट शिरोमणी
तुम्ही सूर्य विद्रोहाचा
मला होऊद्या चांदणी

गुणवत्ता नका बघू
फक्त वाटा भरभर ।।२।।

कधी रिसॉर्ट हिरवे
कधी बंगला एखादा
कवी येतात हसत
खर्च होऊदेत ज्यादा

नको खुर्च्या, सोफा मला
फक्त चटई अंथर ।।३।।

ग्रुप पलीकडे ज्याला
कुणी ओळखत नाही
त्याला भूषण म्हणावे
लाज बाळगाल काही?

नको घाबरू, तू कर
टिक माझ्या नावावर ।।४।।

व्याकरण साधे-सुधे
ज्याचे नेहमी चुकते
त्याला पद अध्यक्षाचे
फक्त दिखाव्यापुरते

हात कापतोय आता
रात्रंदिन थरथर ।।५।।

धंदे राजरोस असे
आता थांबायला हवे
काय देणार आदर्श
पुढे भावंडांना नवे?

क्षणार्धाच्या मोहापायी
करू नये मरमर ।।६।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७

Friday, September 3, 2021

भाऊ झाला पाठीराखा

◼️भाऊ झाला पाठीराखा..

भाऊ झाला पाठीराखा, बाप गेल्यावर
भार अवघ्या घराचा, त्याच्या खांद्यावर ।।धृ।।

जीव तो एकसारखा, साऱ्यांना लावतो
दिन असो वा रात तो, हाकेला धावतो

आईपरी आहे त्याची, माया आम्हावर ।।१।।

शिळी भाकरी स्वतःला, आम्हा तूप रोटी
छत्रछाया वाटे त्याची, मेघाहून मोठी

त्याच्यापुढे आपसूक, जुळतात कर ।।२।।

ओवी, भजन, कीर्तन, गायनाचा छंद
रामकृष्ण जप मुखी, देतसे आनंद

तोच तुकोबा अमुचा, तोच ज्ञानेश्वर ।।३।।

@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर