Sunday, November 3, 2019

वैधव्य

-- भांगेतलं कुंकू पुसावं लागतं --

भांगेतलं कुंकू । पुसावं लागतं
एकटं वाटतं । पती जाता !! १ !!

दोष तसा तिचा । नसतोच काही
यातना तिलाही । दुःख देती !! २ !!

सावरत तोल । पुढे पुढे जाते
आयुष्याशी नाते । घट्ट होता !! ३ !!

सांभाळते नित्य । कोवळ्या मुलांना
साजिऱ्या फुलांना । जीवापाड !! ४ !!

दुसरा विवाह । करू नये तिने
डाव नियतीने । आखलेला !! ५ !!

साहवत नाही । कांकणाचा भार
काळजाच्या पार । साद जाता !! ६ !!

फरपट होते । तिची कधीकधी
सुखासाठी संधी । शोधताना !! ७ !!

मृगजळासम । जाती सर्व दूर
जीवा हुरहूर । लावुनिया !! ८ !!

कशी विचारावी । व्याख्या वैधव्याची
वंचना नित्याची । भाळी जिच्या !! ९ !!

आस एक आहे । होवोत बदल
जगणे सफल । विधवेचे !! १० !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !