सहसा मी जाऊ देत नाही, पण
यंदा, हट्टापुढे नमतं घ्यावं लागलं
रूढी परंपरांनी जखडलेलो दोघे
जाताना तिला दुरूनच पाहावं लागलं
@ *सागरराजे निंबाळकर*
सहसा मी जाऊ देत नाही, पण
यंदा, हट्टापुढे नमतं घ्यावं लागलं
रूढी परंपरांनी जखडलेलो दोघे
जाताना तिला दुरूनच पाहावं लागलं
@ *सागरराजे निंबाळकर*
-- *नाम संकीर्तन* --
नित्य भक्तिभावे
राऊळात यावे
मनोभावे रोज
हरिपाठ गावे
नको दुजाभाव
नको रिती चाली
निखळ पाण्याने
भरूया पखाली
चटणी भाकर
कांदा, मुळा, भाजी
मेघराजा बाप
शेती आई माझी
दमल्या भागल्या
सांजवेळी खोपा
नाम संकीर्तन
मार्ग साधा सोपा
नको व्यभिचार
अहंभाव येथे
रिकाम्या हाताने
गेले जगज्जेते
@ *सागरराजे निंबाळकर*
➖➖ *शोकांतिका माझी* ➖➖
रात्र सारी मधूशाळेत सरली.......
दिवसा तुझ्या डोळ्यांची नशा सये
थांबावं तर नेमकं कुठे थांबावं?
मन असं संभ्रमात, सारखं पडू नये
पाजायची जेवढी एकदाच पाज
उधारी अताशा, परवडत नाही
मैफिलीत गाताना गजल तुझ्यावर
शब्द घुमतात, अडखळत काही
साकीलाही कळतो हा घोळ सारा
उदार मनाने ती, रोज माफ करते
दुःख दिसताच डोळ्यात माझ्या
एक प्याला ती, जास्तच भरते
निघून जावंसं वाटतं दूर कुठेतरी
मैफिलीतही तीच नजर छळते
मद्यपी घोषित करून टाकलं पण
शोकांतिका माझी कुणाला कळते
आज जरी छेडत असलो सूर मी
उद्या असेनच, ह्याची काय खात्री
आलीच आठवण तर आठवा एकदा
काजव्याचं चमकणं, अंधाऱ्या रात्री
@ *सागरराजे निंबाळकर*
पाहताच तिला साजशृंगारात
तडकून फुटल्या दर्पणाच्या काचा
लाख समजावत राहिली मला ती
मात्र माझी, मूक राहिली वाचा
परिस्थितीने हतबल होतो थोडा
बस, एवढाच काय तो माझा गुन्हा
छातीशी बिलगून दूर सारलं
आता प्रेम नाही होणे पुन्हा
नजरे समोरून दूर गेली क्षणात
जसं सरतं, अळवावरचं पाणी
दोष श्रीमंतांना कसा द्यावा हो
कालबाह्य ठरली आपुलीच नाणी
ठेच लागली, हरकत नाही
यापुढे जरा जपूनच चालू
विनवणी एकच मनाला माझिया
पुन्हा काही, गरळ नको घालू
जाशील जिथेही, खुश रहा सये
पुन्हा भेट व्हावी, अपेक्षा नाही
काहींना शिंपले गवसले 'सागरात'
काहींच्या हाती वाळूही टिकली नाही
@ *सागरराजे निंबाळकर*
वाहताना द्वाड झाले, आज का हे धुंद वारे
तोडला तो चंद्र कोणी, का निखळले मंद तारे
नाव घेता सागराचे, लाजते का आज सरिता
माप ओलांडून यावे, साक्ष देती हे किनारे
ज्या कळीवर भाळलेला, प्रेमवेडा एक भुंगा
भावले तिज फक्त कोण्या, भाग्यवंताचे इशारे
टांगलेला जीव माझा, दावणीला बैल जैसा
यत्न सारा भाकरीचा, येथ सुटला का कुणा रे
बोबड्या बोलात आई, माझिया श्वासात आई
विश्व अवघे मालकीचे, हे त्रिलोकी गाजणारे
----- *सागरराजे निंबाळकर* -----
------ *हे सोंग कुणा का कळले* -----
हे सोंग कुणा का कळले, सारेच इथे निजलेले
साकीच्या मद्यपाने, सारेच इथे रिझलेले
ती लोभसवाणी काया, तो मधाळ गोंडस राया
गरिबीच्या ओझ्याखाली, सारेच इथे पिचलेले
मी कुणास सांगू पत्ता, श्रावणातल्या सरींचा
आसवांच्या पर्जन्याने, सारेच इथे भिजलेले
नभातला चंद्रोदय, मज खिजवितो मजेने
मी पेटविले जे दिवे, सारेच इथे विझलेले
कळणार कधी कसे त्या, बुटातल्या सुटाला
बापाचे जोडे आता, सारेच इथे झिजलेले
साऱ्यासी लावत गेलो, मी छातीशी प्रेमाने
मज डाव कधी ना कळले, सारेच इथे शिजलेले
----- *सागरराजे निंबाळकर* -----
कधी वाटतं कवटाळावं तिला
कधी, मिठीतून अलगद वगळावं
हे शल्य, बोचऱ्या काट्यांचं
नेहमी फुलांनीच का चघळावं
@ *सागरराजे निंबाळकर*
हे सोंग कुणा का कळले, सारेच इथे निजलेले
मधूशाळेच्या मद्यपाने, सारेच इथे रिझलेले
ती लोभसवाणी काया, तो मधाळ गोंडस राया
गरिबीच्या ओझ्याखाली, सारेच इथे पिचलेले
@ *सागरराजे निंबाळकर*
-- *माझे विनायक थोर* --
छाती पहाडी जयाची
भाळी स्वातंत्र्याची कोर
साऱ्या स्वातंत्र्य वीरात
माझे विनायक थोर !! धृ !!
नाशकात झाला जन्म
किती न्यारी रोषणाई
आई बाबांचे संस्कार
दामोदर राधाबाई
लढा अन्यायाविरुद्ध
देई इवलेसे पोर !! १ !!
अष्टभुजा देवीपुढे
ज्यांनी घेतली शपथ
वय पंधरा अवघे
चाले शिवबाचा पथ
दीक्षा देऊनी शस्त्रांची
शत्रूंवर शिरजोर !! २ !!
काळ्या पाण्याच्या शिक्षेने
मन हेलावून गेले
तन, मन, धन सारे
दान देशापायी केले
काय वर्णावी महती
त्यांची कीर्ती काही और !! ३!!
भाषाशुद्धी लिपीशुद्धी
चळवळ मांडूनिया
साहित्यिक लेखणीने
जातीभेद कांडूनिया
हिंदूत्वाचा पुरस्कार
महासभेसाठी जोर !! ४ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
करावी लागते सलगी वजीराशी
तेव्हा कुठे, अडचणीत येते राणी
अनेकांना कळत नाही हा डाव
ऐकतात जेव्हा, चेकमेटची वाणी
@ *सागरराजे निंबाळकर*
बर्याच दिवसांनी सुचलं मनाजोगं
म्हंटलं, सुरुवात तिच्यापासूनच करावी
शुभेच्छा तिची नेहमी असायची मला
ओंजळ तुझी, शब्दसुमनांनी भरावी
@ *सागरराजे निंबाळकर*
कुणाला खरं वाटलं हे, तर
कुणाला हलके फुलके भास झाले
मुजरा करण्या झुकलो ज्यांच्यापुढे
फक्त नी फक्त तेच माझे खास झाले
@ *सागरराजे निंबाळकर*
तुझ्या डोळ्यात पाहिलं की खात्री होते
कोणीतरी आहे, माझ्यावर प्रेम करणारं
तरळलेच जर कधी, अश्रू डोळ्यातून
त्यांना हलकेच, ओंजळीत धरणारं
@ *सागरराजे निंबाळकर*
थांबायची पावलं ज्या ठिकाणी
तिथून आता ती सरळ चालतात
हे वाण विरहाचं, का कोण जाणे
खऱ्या प्रेमाच्याच पदरी घालतात
@ *सागरराजे निंबाळकर*
लाख मधूशाळा पाहिल्या मी, परी
तुझ्या डोळ्यांसारखी नशा त्यांच्यात कुठे
थंड पडल्या लखलखणाऱ्या विजाही
क्षणात, शरण आले वारे आडमुठे
@ *सागरराजे निंबाळकर*
प्रेम तसं एकतर्फीच होतं, त्यामुळेच
पाहून पाहून साकारली तुझी मूर्ती
विरहाच्या वादळात सगळं उडालं
मात्र, ते शिल्प आजही देतं मज स्फूर्ती
@ *सागरराजे निंबाळकर*
पाहतेस जेव्हा तू माझ्याकडे
मला वेगळाच भास होतो
पसंती फक्त तुझी असते
मात्र मी, जगासाठी खास होतो
@ *सागरराजे निंबाळकर*
कुठवर टाळायचा प्रवास अन
कोणाला सहप्रवासी मानायचं
हे गूढ अनामिक वाटेचं
आपलं आपणच जाणायचं
@ *सागरराजे निंबाळकर*
रोजच्या लपंडावाच्या खेळात
सुखांना मी गवसतच नाही
अंधारामुळे होतंय असं की
मी लपतोय त्या जागेत दोष काही
@ *सागरराजे निंबाळकर*
सकाळी उठल्यावर बायकोला सांगितलं
माझे कपडे इस्त्री करून ठेव.
आज ऑफिसमध्ये आपल्या मुलीचं लग्न होणार आहे,
मी सगळ्यात देखणा दिसलो पाहिजे मुलीचा भाऊ म्हणून.
तेवढ्यात ती म्हणाली, अहो असं काय करता?
कालच तिचं नाव आपण इस्पितळात नोंदवलं की नाही बाळंतपणासाठी.
आणि एवढी घाई काय आत्ता कुठे ८ वा महिना लागला आहे
अजून ४-५ महिने अवकाश आहे की !
त्यानंतर तुम्ही मिरवा मुलीचा देखणा भाऊ म्हणून !
बायकोने माझी अंघोळ होईस्तोवर कपडे इस्त्री करून ठेवले.
आणि बजावून सांगितलं चांगले तयार व्हा. आज तुमच्या एकुलत्या एक भावाचं लग्न आहे.
सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे,
मुलाचा देखणा भाऊ म्हणून !
इस्त्री केलेले कपडे घातले. भरलेला डबा घेतला. आणि निघताना ताईला आवाज दिला, ताई येतो गं !
आणि काळजी करू नकोस आज संध्याकाळी लवकरच घरी येतो.
तुझ्या आणि जिजूच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे ते लक्षात आहे माझ्या.
सर्व तयारी मी अगदी चोख करेन.
माझ्या ताईचा लाडका भाऊ म्हणून !
कसाबसा कल्याण ते कुर्ला फास्ट बोटीने प्रवास करून इस्पितळात पोहोचलो. समोरच आई बसली होती.
मला पाहताच आनंदून म्हणाली, अभिनंदन !
'तू भाऊ झालास' !
@ *सागरराजे निंबाळकर*
तुला भेटल्यावर काय वाटतं
शब्दात मला सांगता येत नाही
जे काही आहे ते उघडउघड
आडोसा तसा, मी ही घेत नाही
----- *सागरराजे निंबाळकर* -----
---------- *जीवनाचे रंग सारे* ----------
जीवनाचे रंग सारे । शांत अथांग किनारे
वाहणारे श्वेत वारे । घालती येरझारा !! १ !!
आठवांचा योग्य नेम । दया, माया, शांती, क्षेम
हात हाती जेमतेम । येतात जगताना !! २ !!
संकटांचा नित्य मारा । जिंकण्याचा योग्य नारा
नको फाफट पसारा । खेळ हा खेळताना !! ३ !!
आले गेले कैक येथे । कर्म सारी नोंद घेते
तरी आम्हीच विजेते । नको हा आविर्भाव !! ४ !!
सागराची लाट पहा । आनंदी, स्वच्छंदी रहा
खुल्या नभाखाली नहा । चिंतांना वगळून !! ५ !!
--------- *सागरराजे निंबाळकर* ---------
------- *बाप माझा* -------
संरक्षक भिंत । समाधानी चित्त
सुखांचं निमित्त । बाप माझा !! १ !!
संकटांना चाप । मायाळू निष्पाप
कष्टांचा आलाप । बाप माझा !! २ !!
मूल्यवान वेळ । सावल्यांचा खेळ
न्यारा ताळमेळ । बाप माझा !! ३ !!
नित्य प्राणवायू । स्वाभिमानी स्नायू
जगावा चिरायू । बाप माझा !! ४ !!
न्यारे वरदान । आण, बाण, शान
आईचा सन्मान । बाप माझा !! ५ !!
भुकेल्याचा घास । खचलेल्या आस
सदा आसपास । बाप माझा !! ६ !!
पोळ्यातला अर्क । सुसंगती तर्क
सदैव सतर्क । बाप माझा !! ७ !!
मदतीचा हात । निपुण निष्णात
तेवणारी वात । बाप माझा !! ८ !!
----- *सागरराजे निंबाळकर* -----
हात तुझा, हाती घेऊन चालताना
आकाशाने शिंपडले चांदण्यांचे सडे
लख्ख प्रकाशात भरली प्रेमशाळा
मी गिरवू लागलो, प्रेमाचे एकेक धडे
@ *सागरराजे निंबाळकर*
मुद्दामच हसवायचो तिला कधीकधी
तिचा हसरा चेहरा, खूपच आवडायचा
ज्या आठवणी कायम साथ देतील
तो क्षण सहजासहजी कसा दवडायचा
@ *सागरराजे निंबाळकर*
काळजाने केलेल्या गुन्ह्याचा
नको शोधूस इथेतिथे पुरावा
अटक व्हायची अन्यथा नजरेने
यायचा दोघात कायमचा दुरावा
@ *सागरराजे निंबाळकर*
मद्यपानाची आवश्यकता नाही सये
कधीकधी मला, न पिताही चढते
सोन्याची आभूषणे ही फिकी पडतात
जेव्हा तू एका, साध्या मोगऱ्याने मढते
@ *सागरराजे निंबाळकर*
पीळ पडतो जेव्हा आतड्याला
हळूच आसवांचा थेंब ओघळतो
म्हणूनच हिणवू नये एखाद्याला
परिस्थिती ज्याची तोच ओळखतो
----- *सागरराजे निंबाळकर* -----
------- *काव्य माझे* -------
स्वप्नांची ने आण । सद्गुणांची खाण
वास्तवाची जाण । काव्य माझे ।।१।।
निवळाया भार । काळजाच्या पार
संदेशाची तार । काव्य माझे ।।२।।
अल्ला, एकदंत । संप्रदायी संत
नाठाळांचा अंत । काव्य माझे ।।३।।
सोने, चांदी, नाणी । कबिरांची वाणी
शाहिरांची गाणी । काव्य माझे ।।४।।
ज्ञानेश्वरी ग्रंथ । धरूया सुपंथ
पाणी एकसंथ । काव्य माझे ।।५।।
सागराची लाट । नागमोडी वाट
वळणांचा घाट । काव्य माझे ।।६।।
महाराष्ट्र माझा । रयतेचा राजा
इतिहास ताजा । काव्य माझे ।।७।।
आजन्म निभावू । शैलीतून दावू
काळजाला लावू । काव्य माझे ।।८।।
हर्षाची घागर । शब्दांचा 'सागर'
झाले उजागर । काव्य माझे ।।९।।
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७
वाटतं कधीकधी सोडावं जग हे
अपेक्षा मनसोक्त जगू देत नाहीत
कवटाळलं उरी मी प्रत्येकाला येथे
मला मात्र, स्वप्न कवेत घेत नाहीत
----- *सागरराजे निंबाळकर* -----
थकला भागलेला जीव आता
मोजतोय शेवटच्या घटका काही
सत्कर्माने उजळावे आयुष्य सारे
पुनर्जन्म असा पुन्हा होणे नाही
----- *सागरराजे निंबाळकर* -----
झळ जी माझ्या काळजाला लागली
अनुभव तिचा, एकदा तू ही घ्यावा
विरहाच्या मदिरेचा नशिला घोट सये
आता आपण जरा, हळूहळूच प्यावा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
_डोळ्यातल्या आसवांना पुसत म्हणाली ती_
_छान दिसतोय तुमचा, जोडा नवाकोरा_
_रूढी परंपरांनी हतबल झालेला तो_
_धन्यवाद म्हणताना, उभा होता पाठमोरा_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
मेहेंदीचा गर्द होत चाललेला रंग नी
अनामिकेत रुतलेली ती, अंगठी घट्ट
पाहून तिळतीळ तुटलं काळीज माझं
मनाला समजावलं, सोड आता हट्ट
----- *सागरराजे निंबाळकर* -----
----- *पाण्याचे कोडे* -----
प्रश्न सोडवावा लवकरात लवकर
आर्जवे सांगते कावळ्याची वाणी
रचला खड्यांचा ढिगारा तरीही
हाती न आले ओंजळभर पाणी
प्रयत्नांती परमेश्वर म्हणता म्हणता
कावळ्याने स्वतःचे प्राण त्यागले
स्वार्थासाठी दुखावून निसर्गाला
सांगा इथे कुणाचे काय भागले
पाणीटंचाई, दुष्काळ कैक समस्या
आज समोर उभ्या ठाकलेल्या
हिरवाईने वृक्षवल्लींच्या ताठ माना
आता पाण्याविना पुरत्या वाकलेल्या
प्रेम करतो निसर्ग भरभरून जसं
तसेच देतो कधीकधी शालजोडे
काक गेला तरी प्रश्न तसाच राहतो
का सुटले नाही त्याला पाण्याचे कोडे
----- *सागरराजे निंबाळकर* -----
उल्हासनगर, ठाणे
------ *आठवतो गावचा पार* -----
_आजही आठवतो, गावचा पार मला_
_त्यावर बसून, होणाऱ्या मनसोक्त गप्पा_
_सदरे आता जरी असले, रेमंडचे माझे_
_त्याला जुन्याच, आठवणींचा कप्पा_
_नभाखालच्या शाळेत जाण्याची लगबग_
_सुरुवातीला गुरुजींनी घेतलेला परिपाठ_
_शिवरायांचा इतिहास, भारताचा भूगोल_
_मूल्यशिक्षणासवे सुसंस्कारांची न्यारी गाठ_
_मोठा होत गेलो, जसजसा मी_
_उच्च शिक्षणासाठी, सोडलेलं गाव_
_शहरात पैसे खोऱ्याने कमावले पण_
_भावनांचा कधीच ना, लागला निभाव_
_संगणक, मोबाईल, आलिशान चारचाकी_
_हीच माझी, जमवलेली आधुनिक नाती_
_इथे गालिचे, दिमतीला माझ्या सदैव_
_तिथे आसवं ढाळत राहिली, गावची माती_
_आज वार्धक्याच्या उंबरठ्यावर उभा मी_
_साथीला दोन वासे नी, केवळ भिंती चार_
_आवाज कसा देऊ, वटवृक्षाच्या पाराला_
_गाव सोडताना, मीच केलं ना त्याला हद्दपार_
------- *सागरराजे निंबाळकर* -------
वृत्त - वियदगंगा
लगावली :- लगागागा लगागागा लगागागा लगागागा
😊 गझल माझीच होती ती 😊
मना संतोष देणारी गझल माझीच होती ती
कसा विसरेन मी सांगा कथा ताजीच होती ती
किती घालू प्रदक्षीणा अताशा त्या कवीतेला
गझल माझी पहुडलेली तरी जागीच होती ती
कधीही बोलवावे मी कधी दिवसा कधी रात्री
मदत करण्या कधीही मज तशी राजीच होती ती
विचारावे कुणालाही कशी होती दिसायाला
वदन हसरे खळी गाली तशी साधीच होती ती
तिला भेटावया गेलो उशीरा कैकदा मित्रा
सलामच संयमाला हो हजर आधीच होती ती
----- *सागरराजे निंबाळकर* -----
हजरत इस्लाम सहर इश्कआबादी रुबाई वृत्त ४
गागाल लगागाल लगालगा लगाल
सखये फिरलो नित्य चहूदिशा नितांत
होती मज आता तुझेच रोज भास
माझिया मनास
खोल डोहात शिरलो तरीही
थांग मनाचा, कधी ना लागला
एरव्ही चांदण्यात न्हालो मी
आज मोह, एका दिव्यातच भागला
😊 *सागरराजे निंबाळकर*
बऱ्याचदा ठरवतो, वगळावं स्वतःला
मात्र, मैफिल पुन्हा पुन्हा साद घालते
दोष मधूशाळेला तरी कसा देऊ मी
साकी इतक्या प्रेमाने जो वाद घालते
😉 *सागरराजे निंबाळकर*
_पत्र तिची आजही जपून ठेवलीत_
_ते एकच हितगुजाचं माध्यम उरलंय_
_जाळल्यास दाह सोसवत नाही म्हणून_
_आठवांना तिच्या मी काळजात पुरलंय_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
_घडी दोन घडीच्या डावात येथे_
_कुणा ठाव काय निकाल असतो_
_ह्याला नियमच म्हणतात निसर्गाचा_
_माणूस निघायला बघतो तेवढाच फसतो_
----- *सागरराजे निंबाळकर* -----
सुखांचा लवलेश नाही तसूभर
तशातच दुःखाचे येणे जाणे
थोडासा हर्ष वाटताच संपत्तीचा
होते चलनातून हद्दपार नाणे
----- *सागरराजे निंबाळकर* -----
गागाल लगागागा गागाल लगा
केव्हाच सखी गेली सोडून मला
का मी जगतो आहे विरहात असा
निष्पर्ण फुले माझ्या बागेत जशी
देहात अता केवळ उरल्यात नसा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
----- *रुबाई* -----
गागाल लगागागा गागाल लगा
चंद्रास कसे लावू मी बोल सये
ही चूक कशी ही तर न्यारीच अदा
चोरून कुणी नेले काळीज तुझे
का आळ उगा त्याच्यावर सांग सदा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
आयुष्यभर जी भरभरून देते
तिचाच शेवटाला घेतो ठोकताळा
वृद्धाश्रम असो वा घर ती म्हणते
माझं जाऊदे, माझ्या बाळाला सांभाळा
----- *सागरराजे निंबाळकर* -----
_गेलेल्या आयुष्याचा विचार करून_
_खरंच काही लागतं का हाती?_
_समजावा त्याला वसंत चार मासाचा_
_ज्यात श्रावणाच्या सरी येती नी जाती_
----- *सागरराजे निंबाळकर* -----