उसवलेली चादर नात्यांची
संवादाने शिवायला हवी
तेवढंच बळ मिळतं जगण्याला
वाट गवसते एखादी नवी
😊 सागरराजे निंबाळकर
उसवलेली चादर नात्यांची
संवादाने शिवायला हवी
तेवढंच बळ मिळतं जगण्याला
वाट गवसते एखादी नवी
😊 सागरराजे निंबाळकर
परंपरांचं ओझं असेल तिच्यावर
अन्यथा, तिने नकार दिला नसता
चालायचंच आयुष्य आहे शेवटी
अश्रू ओघळतात हसता हसता
😊 सागरराजे निंबाळकर
गणित आयुष्याचं असंच असतं
शोधात सावल्यांच्या झळ उन्हाची
चालत राहायचं निरंतर केवळ
वाट असते का मालकीच्या कुणाची
@ सागरराजे निंबाळकर
मैफिल माझ्या नावाने भरते पण
हल्ली मला मात्र बोलवत नाहीत
चालायचं, म्हणून दुर्लक्ष करतो
उद्देश ह्यामागचा त्यांनाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
🍃 पारखा सुखाला कोणी नसो 🍃
भावा बहिणीच्या । नात्याची महती
समस्त जगती । ज्ञात सर्वां !! १ !!
मनोभावे आज । औक्षण करते
बंधूस स्मरते । सदोदित !! २ !!
ओवळणीसाठी । नाही कधी हट्ट
बंध ऐसे घट्ट । आहे जेथे !! ३ !!
चिवडा चकली । फराळाचा बेत
एकमेका देत । घास थोडा !! ४ !!
सग्या सोयऱ्यांनी । भरलेले घर
होई चराचर । सुखी तेथे !! ५ !!
अभ्यंग स्नानाचा । दिवाळी पाडवा
गोडवा वाढवा । नात्यातला !! ६ !!
आशिर्वच देते । लक्ष्मी प्रत्येकाला
पारखा सुखाला । कोणी नसो !! ७ !!
अशा सणागत । दुजा हर्ष नाही
वेगळाले काही । काय सांगू !! ८ !!
🍃 सागरराजे निंबाळकर
स्वीकार आहे नकार तुझा पण
यापुढे तुला हवं तसं होणार नाही
लाख भेटतीलही वाटेत तुला
बघ आढळतंय का साम्य काही
@ सागरराजे निंबाळकर
संधीप्रकाशात रेंगाळलेल्या आठवांना
पुन्हा नव्याने, झळाळी यावी
सुखावर चार ओळी सहज सुचतील
कधीकधी दुःखावरही गाणी गावी
@ सागरराजे निंबाळकर
मनाविरुद्ध दिली काही उत्तरं तर
सामंजस्याने, सुटले प्रश्न काही
असतात क्षण असे आयुष्यात
जे, कुणालाही सांगता येत नाही
@ सागरराजे निंबाळकर
निरोपाची वाट पाहताना उमगलं
खिडकीशी थबकून राहिलाय वारा
करू दिलं हितगुज मनाजोगं त्यांना
तसाही कधीतरीच येतो बिचारा
@ सागरराजे निंबाळकर
सगळं चांगलं असूनही जेव्हा
एखाद्यास जातीमुळे नकार येतो
तिथेच हात गळून पडतात राजे
तुमच्यासारखं हल्ली कोण कवेत घेतो
🍃 सागरराजे निंबाळकर
काळजी करू नकोस सये
तुझ्या नावाची वाच्यता होणार नाही
प्रेम केलं म्हणून ऐकलं सारं
सांग सूचना आणखी असल्यास काही
🍃 सागरराजे निंबाळकर
वाटतंय लिहावी ओळ शेवटची
मुक्काम इथे, फार काळ नाही
गैरसमज होता मी सुवर्णाक्षर आहे
नका घेऊ लेखणीवर आळ काही
🍃 सागरराजे निंबाळकर
गेल्यावर किंमत कळते म्हणतात
मी ही बघू का? एकदा जाऊन
तू सारलंस इतक्या प्रेमाने बाजूला
काय करायचं इथे एकट्याने राहून
🍃 सागरराजे निंबाळकर
शाळा खूप केली लोकांनी पण
व्हायला हवा तो तास होत नाही
प्रेम तेव्हाच मिळतं मित्रहो येथे
जोवर तुम्ही कुणाचे खास होत नाही
🍃 सागरराजे निंबाळकर
कमी पडताहेत यत्न माझे
मात्र, मी हार मानलेली नाही
दोष देणार नाही कोणालाही
असेल कमतरता माझ्यातच काही
🍃 सागरराजे निंबाळकर
मान्य केलंय मी निरीक्षणांती
माझ्या श्वासांवर तुझं अधिराज्य
वेगळा होणार नाही कधीही
आयुष्याचा असा घटक अविभाज्य
@ सागरराजे निंबाळकर
एकटक पाहता दिव्याकडे उमगलं
वाच्यता न करता जळतात वाती
असंच काहीसं करावं म्हणतोय
जेणेकरून टिकतील चिरंतर नाती
😊 सागरराजे निंबाळकर
पावसाळे लाख पाहिले असतील
चिखल किती तुडवला ते सांगा
ही गर्दी कर्माने मिळवली आहे मी
ह्या नाहीत, विनाकारणाच्या रांगा
@ सागरराजे निंबाळकर
लाख आली संकटे आयुष्यात तरीही
तुमच्या शुभेच्छा, देतात मला बळ
बीज आपुलकीचं पेरावं लागतं राजे
सहजासहजी नाही मिळत असं फळ
@ सागरराजे निंबाळकर
इवल्याशा पणतीनेही उजळतं घर
महती तिची वेळीच ओळखावी
शुभेच्छा आहेत माझ्या सदैव
दिवाळी यंदाची भरभराटीत जावी
😊 सागरराजे निंबाळकर
😀 निखळ, निसटता विनोद 😀
नेहमीच्या सवयीप्रमाणे न कळवताच मित्राकडे गेलो. पूर्वी त्याला आनंद व्हायचा अचानक भेट दिली की. पण आज तो आनंद चेहऱ्यावर दिसला नाही.
औपचारिकता म्हणून त्याने बायकोला आवाज दिला "अगं जरा चहा ठेव."
तेवढ्यात स्वयंपाक घरातून उत्तर आलं "चहात मीठ चालेल का?"
वातावरणाचा अंदाज घेत मित्राला म्हंटलं "अरे मी हल्ली चहा घेत नाही, त्यामुळे कष्ट नको फारसे."
निघताना मित्राला विचारलं "काही समस्या आहे का? वहिनी चिडलेल्या दिसताहेत."
तो म्हणाला काही विशेष नाही. काल आपला सम्या आलेला त्याला हिने पोहे दिले. हरामखोर जाताना म्हंटला "वहिनी पोह्यात मीठ होतं की मिठात पोहे होते?"
कालपासून फर्मान निघालं आहे, एकही मित्र यापुढे घरी येता कामा नये 🤣
*कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे*.
@ सागरराजे निंबाळकर
🍃 आयुष्य असेच काहीसे आपले 🍃
_साऱ्या दिशा हरवल्या अन_
_रिता झाला हा, आसमंत_
_कोणासवे विहरायचे आता_
_पाखरांची एकमेव खंत_
_शोध घेता संवगड्यांचा_
_दिसले, पंख छाटलेले_
_हे अमानुष कृत्य कोणाचं_
_कोण परंपरेने बाटलेले_
_दोष पाखरांचा कसा म्हणावा_
_भाळी लिहिलेली दुःखाची गाथा_
_उमगेना आता तयांनाही कुठे_
_बडवावा हा अभागी माथा_
_विचार येतो मग, राहून राहून_
_आयुष्य असेच काहीसे आपले_
_ओठांवर स्मित उसणं आणलेलं_
_खोलवर दडवून दुःख आतले_
@ सागरराजे निंबाळकर
मनासारखं घडलं नाही की
संयम सुटतो तिच्या वाणीचा
बाकी सगळं आलबेल आहे
दोष इतुका वगळता राणीचा
😊 सागरराजे निंबाळकर
काय असतं नेमकं जीव लावणं
तिला सहजासहजी नाही कळणार
आज गर्दी असूनही झाली सैरावैरा
मग उद्या, एकांत किती छळणार
@ सागरराजे निंबाळकर
शिळंपाकं जमेल ते ते खाऊन
मुलांना ती तूप वाढत राहिली
त्याग नी समर्पण नाव ह्याला
वृत्ती अशी मी इतरत्र न पाहिली
😊 सागरराजे निंबाळकर
व्यक्तिसापेक्ष बदल होतो माझ्यात
मात्र, तिचा मी एकमेव खास आहे
सुखी असो वा दुःखी आम्ही दोघे
उमगेना, कोणास काय त्रास आहे
😊 सागरराजे निंबाळकर
झिरपले डोळे मनसोक्त अन
बोल ऐकत राहिली ही गादी
एवढं होऊनही प्रश्न पापणीला
का लागतेस तू दुःखाच्या नादी
😊 सागरराजे निंबाळकर
रात्रभर जागण्याची शिक्षा इथे
दोष डोळ्यांचा असा काय होतो
नका खोलात शिरू उत्तराच्या
सोडवेल कोडं ज्याचं त्याचं जो तो
@ सागरराजे निंबाळकर
काळजाने मनाला वश केलं
कळेना हा नेमका कुणाचा गुन्हा
संयम ठेवलाय ओठांनीही कारण
आळ यायचा ह्या, वाणीवर पुन्हा
😊 सागरराजे निंबाळकर
वेगळं करावं सागराला किनाऱ्यापासून
प्रतिभा एवढी लाटेत, आलेली नाही
वेच तू शंख, शिंपले निर्धास्त होऊन
पाहूया कुणाची आहे हरकत काही
😊 सागरराजे निंबाळकर
तुझ्या नी माझ्या नात्याला आता
थोडंसं अडचणीत यावं लागेल
लोकाग्रहास्तव का होईना पण
एकमेकांचं नाव घ्यावं लागेल
😀 सागरराजे निंबाळकर
अपेक्षांचं ओझं, दुःखाची वाच्यता
दोनच गोष्टी तुम्हाला मागे खेचतील
सत्कर्माचं रोप लावून पहा एकदा
लोकंही तुमच्या अंगणी फुलं वेचतील
@ सागरराजे निंबाळकर
दगड ठेवून काळजावर, मीही
करतोय बऱ्याचशा गोष्टी साध्य
संयम सुटू नये ऐनवेळी फक्त
प्रयत्नच माझे एकमेव आराध्य
@ सागरराजे निंबाळकर
साऱ्यांना उजेड दिसतो दिव्याचा, पण
उमजून घ्या दुःख, जळणाऱ्या वातीचं
आई आहे तोवर, वाट दिसते अंधारातही
नंतर काय करायचं, त्या चंदेरी रातीचं
@ सागरराजे निंबाळकर
आसवांनी डबडबतात डोळे पण
आईचा पदर नाही पुसायला
आणखी वेगळं काय सांगू मित्रहो
एवढं पुरे नाही? काळजात घुसायला
@ सागरराजे निंबाळकर
उद्घाटनाला पाहुणा म्हणून गेलो, पण
अवाक झालो पाहून पडद्यामागचं चित्र
प्रतिबिंब माझ्या मनातलं हुबेहूब अन
साकारणारा माझाच, जवळचा मित्र
🤫 सागरराजे निंबाळकर
डोळे वाचायला शिकलो जेव्हा
चित्र माझं, तिच्या डोळ्यात पाहिलं
रंगांची यादी केली तात्काळ पण
कुंचल्यातून साकारणं तेवढं राहिलं
🙂 सागरराजे निंबाळकर
वाट पाहत पाणावल्यात नजरा
गावाबाहेरच्या कुण्या एका कट्ट्यावर
जमलं तर सांगून जा तूच सये
कोणती वेळ लावू भेटीच्या सट्ट्यावर
😊 सागरराजे निंबाळकर
मी पाहताच स्मित करावं तिने
हा योगायोग रोजच कसा घडतो
इथेच दुर्लक्ष होतं पंचेंद्रियांकडे
नकळत, नको तो रोग जडतो
🥰 सागरराजे निंबाळकर
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
पाखरास कळले नाही थोडेही
कोणत्या दिशेला मी जावे आता
पेच हा अघोरी छळतो जीवाला
का कुणास ठेवू मी नावे आता
----- *सागरराजे निंबाळकर* -----
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
पाखरास कळले नाही थोडेही
कोणत्या दिशेला मी जावे आता
पेच हा अघोरी छळतो जीवाला
का कुणास ठेवू मी नावे आता
----- *सागरराजे निंबाळकर* -----
प्रतिप्रश्न करता येत नाही नियतीला
प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं
सुखांसाठी दुप्पट व्याजाची आकारणी
फक्त दुःखास, काही तारण नसतं
😊 सागरराजे निंबाळकर
संवाद कमी होतोय हळूहळू
अबोल्याची आकस्मिक ठिणगी पडली
दोष माझाच आहे खरं तर
मलाच नको ती सवय जडली
@ सागरराजे निंबाळकर
फुलावा एखादा वृक्ष स्नेहाचा
गोडव्याची त्यास फळं लागावी
तेवढाच दिलासा मिळतो पथिकाला
सावलीसह भूक देखील भागावी
😊 सागरराजे निंबाळकर
नका बोलावू तिला शेवटाला ही
तिचीच इच्छा होती मी निघून जावं
एका गोष्टीची काळजी आहे फक्त
नाव माझं पुन्हा त्या ओठांवर न यावं
@ सागरराजे निंबाळकर
सारं करूनही तिच्या नावे
तिने शेवटी एकच प्रश्न केला
जाताना सख्या आठवणीं व्यतिरिक्त
तू माझ्यासाठी काय ठेवून गेला?
@ सागरराजे निंबाळकर
धूळधाण होते जेव्हा स्वप्नांची अन
वास्तवाचे चटके, साहवत नाहीत
किती त्रास होत असेल आसवांना
त्या निष्पाप डोळ्यांनाच माहीत
@ सागरराजे निंबाळकर
शब्दबद्ध करताना भावनांना माझ्या
मात्रा जिव्हेची, चुकते कधीकधी
सर सुखाची आलेली असते अंगणी
गृहप्रवेशास मात्र, मुकते कधीकधी
😊 सागरराजे निंबाळकर
तारुण्यात सारेच वाहवत जातात हो
वाती विझूनही, दिवे असतात जागे
नका ठेवू ठपका, जर दिसलंच कधी
प्रेम दडलेलं त्या, सुरकुत्यांच्या मागे
@ सागरराजे निंबाळकर
एवढ्यात नका हिणवू तिला मित्रहो
तिने कोणताच गुन्हा केलेला नाही
रंग मेहंदीचा खुलला आहे फक्त
चेहऱ्यावर कुठेत, तसे भाव काही
@ सागरराजे निंबाळकर
मोजकंच बोलते ती अताशा माझ्याशी
बहुदा, मेहंदीचा अडसर येत असावा
किती विचित्र असतं ना आयुष्य...
जो वाटतो हवा, तोच आपला नसावा
@ सागरराजे निंबाळकर
शैली माझी नेहमीचीच होती तरी
कळेना, ती नेमकी का बरे लाजली
मध्यांतर होता बहुदा प्रेमाचा तो
कहाणी उत्तरार्धात भलतीच गाजली
☺ सागरराजे निंबाळकर