Friday, July 12, 2019

भाव हा भक्तीचा

----- भाव हा भक्तीचा -----
          (६-६-६-४)

भाव हा भक्तीचा । सर्वोत्तम पाया
माझा विठुराया । विटेवरी !! १ !!

विठू सम दुजा । भगवंत नाही
दश दिशांनाही । ओढ त्याची !! २ !!

युगे अठ्ठावीस । उभा एका जागी
सदा भक्तालागी । तारावया !! ३ !!

विठू माझा बाप । विठू माझी माय
आता उणे काय । संसारात !! ४ !!

नामस्मरणात । वैष्णवांचा मेळा
पाहू किती वेळा । याची डोळा !! ५ !!

प्रतिक्षा भेटीची । तोडून शृंखला
दिस उगवला । सोनियाचा !! ६ !!

राम कृष्ण हरी । जयघोषी दंग
अवघाची रंग । एक झाला !! ७ !!

जळी, स्थळी, काष्ठी । माझ्या ध्यानी मनी
एका जनार्दनी । राही विठू !! ८ !!

जोड द्यावी कर्मा । शुद्ध सत्व गुणे
दुःख व्हावे उणे । सत्संगाने !! ९ !!

@ *सागरराजे निंबाळकर*
       उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !