----- पहिला पाऊस -----
येता पहिला पाऊस
बाळंतीण झाली धरा
आनंदाच्या बातमीने
हर्षोल्हास चराचरा
किती करावं कौतुक
कसे पुरवू डोहाळे
नभ पहावया हट्ट
कधी निळे कधी काळे
नाव बाळाचं ऐकून
अचंबित झाल्या सरी
माझा पहिला पाऊस
नित्य भरतो घागरी
जेवू घालाया पावसा
पंच पक्वान्नाचा घाट
जाई, जुईची रांगोळी
गर्द हिरवाई पाट
सारं खाऊन तृप्तीची
त्यानं दिली की ढेकर
माझं एकच मागणं
सुखी राहावी लेकरं
असा पहिला पाऊस
येवो साऱ्यांच्याच भाळी
सुखावून दूर गेला
होता माझा कधीकाळी
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !